जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकापुष्पात मुळशी तालुक्यातल्या कुसुम सोनवणे आणि त्यांच्या मैत्रिणी बाबासाहेबांनी समानतेसाठी आणि जातीअंतासाठी जो लढा दिला त्याची स्मृती जागवणाऱ्या १४ ओव्या गातायत
अशी भिमाई रायानी केली थोरच करणी
दिल्लीच्या गं तख्तावरी केली एक धरणी
२५ मार्च, २०१८ रोजी सकाळी ९ वाजता आम्ही पुणे जिल्ह्यातल्या नांदगावला कुसुम सोनवणेंच्या घरी पोचलो. “अहो, आमची कामं व्हायचीत अजून,” त्या म्हणतात. “पाणी भरायचंय, पोरांची सकाळची जेवणं उरकायचीयेत.” त्यांची आणि बाकी मैत्रिणींची कामं होईपर्यंत आम्ही वाट बघू असं त्यांना आम्ही सांगतो. आम्ही त्यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्या ध्वनिमुद्रित करण्यासाठी इथे आलो होतो.
त्यांची कामं उरकता उरकता कुसुमताईंनी बाहेरच्या खोलीतल्या भिंतीवर ठेवलेल्या पुरस्कारांकडे बोट केलं. पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ पट्ट्यात राहणाऱ्या गावपाड्यातल्या गरिबांसाठी काम करणाऱ्या गरीब डोंगरी संघटनेमध्ये त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना हे पुरस्कार मिळाले आहेत. भिंतीवर जोतिबा आणि सावित्रीबाई फुलेंच्या तसबिरी लावल्या आहेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक मोठा फोटो. पण या सगळ्यात सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे भिंतीवर, जवळ जवळ छतापाशी चिकटपट्टीने चिकटवलेली भारताच्या राज्यघटनेची प्रस्तावना.
या प्रस्तावनेतलं एक मूल्य म्हणजे – ‘दर्जाची आणि संधीची समानता’ – त्या दिवशी कुसुमताई आणि त्यांच्या मैत्रिणींनी आमच्यासाठी ज्या ओव्या गायल्या त्यात हेच तर त्या ठासून सांगत होत्या. बाबासाहेबांनी काय काय साध्य केलं ते त्या गातात, तेही अगदी ताठ मानेने.
यातलं एक यश म्हणजे २ मार्च १९३० रोजी आंबेडकरांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात ‘अस्पृश्यां’ना प्रवेश मिळण्यासाठी केलेला सत्याग्रह. महिनाभर सत्याग्रह केल्यानंतरही मंदिराची दारं उघडली गेली नव्हती. बाबासाहेबांनी १९३४ पर्यंत हा संघर्ष सुरू ठेवला. त्यानंतर मात्र त्यांनी ही मागणी फार ताणून धरली नाही. संपूर्ण जातव्यवस्था मोडून काढली तरच हिंदू समाजाचा खराखुरा उद्धार होऊ शकतो आणि सर्वांसाठी समानता प्रत्यक्षात येऊ शकते हे त्यांना पुरतं कळून चुकलं होतं.
जातीव्यवस्थेचे निर्मूलन – अॅनिहिलेशन ऑफ कास्ट (१९३०) या पुस्तकात डॉ. आंबेडकर म्हणतातः
“लाजिरवाणी बाब ही की आजही जातव्यवस्थेचे समर्थक आहेत. आणि ते हर तऱ्हेने या व्यवस्थेचं समर्थन करतात. एक दावा असा की जात व्यवस्था म्हणजे वेगळं काही नसून श्रम विभागणीची व्यवस्था आहे, आणि कोणत्याही सुसंस्कृत समाज व्यवस्थेसाठी श्रमांची विभागणी आवश्यकच असते, त्यामुळे जाती व्यवस्थेमध्ये काहीही चुकीचं नाही. हा दावा खोडून काढताना पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की जात व्यवस्था म्हणजे फक्त श्रमांची विभागणी नाही. ही श्रमिकांची देखील विभागणी आहे. सुसंस्कृत समाजाला श्रमाची विभागणी आवश्यक असते हे निश्चित. पण कोणत्याच सुसंस्कृत समाजामध्ये श्रमांच्या विभागणीसोबत श्रमिकांची अशी चिरेबंदी कप्प्यांमध्ये विभागणी केली जात नाही.”
या प्रत्यक्षात न दिलेल्या व्याख्यानात (नंतर जे पुस्तकाच्या रुपात प्रकाशित झालं) ते असंही म्हणतात की ‘अस्पृश्यां’च्या संचारावर आणि काही दलितांवर त्यांची महागाचे कपडे आणि दागिने घेण्याची ताकद असतानाही साधे कपडे आणि दागिने घालण्याची बंधनं टाकण्यात आली आहेत. पण काय अन्न खायचं हे ठरवण्यासाठीही दलितांनी सवर्णांची परवानगी घेणं अपेक्षित आहे, बाबासाहेब जयपूर संस्थानातल्या चकवारा गावातल्या एका अशा जातीचा संदर्भ देतातः
१९३६ च्या एप्रिलमध्ये एक माणूस तीर्थयात्रेहून परत आपल्या गावी आला आणि त्याने त्याच्या ‘अस्पृश्य’ सोबत्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं. त्याने सर्वांना जे अन्न वाढलं त्यात तूप होतं. हे पाहून सवर्णांना इतका राग आला की त्यांनी आलेल्या पाहुण्यांवर काठीने हल्ला केला, स्वयंपाकाची नासधूस केली आणि लोकांना तिथून पळून जायला भाग पाडलं. एक ‘अस्पृश्य’ तूप खातो आणि इतरांना वाढतो हा उपमर्द आणि सवर्णांचा अपमान समजण्यात आला.
या घटनेला दशकं उलटली, कुसुमताई आणि त्यांच्या मैत्रिणी गातायतः
नव्हता मतदानाचा हक्क केला तेंव्हा हाज ना हाज
आरक्षण दिलं आम्हा, भीमरायांनी माझ्या
इथे ध्वनीफीत आणि चित्रफितीत सादर केलेल्या १४ ओव्यांपैकी ही पहिली ओवी.
‘...जात व्यवस्था म्हणजे फक्त श्रमांची विभागणी नाही. ही श्रमिकांची देखील विभागणी आहे,’ जातव्यवस्थेचे निर्मूलन (१९३६) या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.
वर्षानुवर्षं संघर्ष केल्यानंतर दलित हतबल झाले होते, अगदी काकुळतीला आले होते, असं या गातात. पण भीमरायानी त्यांच्यासाठी आरक्षण आणलं, ज्यामुळे त्यांना शिक्षण आणि नोकऱ्या मिळू शकल्या. आरक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि बायासुद्धा भाषण देण्याइतक्या धीट झाल्या. हे सगळं एकाच हिऱ्यामुळे झालं – तो म्हणजे रामजीचा पुत्र – बाबासाहेब आंबेडकर.
यातल्या अनेक ओव्यांमध्ये बाबासाहेबांना रामजीचा आणि भीमाईचा पुत्र असं संबोधण्यात आलं आहे. चौथ्या ओवीत या गातात की रामजीचा हा मुलगा विलायतेला शिकायला गेला. डॉ. आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टरेट डिग्री घेतली आणि त्यानंतर ते लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स इथे शिक्षणासाठी गेले याचा हा संदर्भ. एक मैत्रीण गाते की “भीमाईच्या लेकानं गोलमेज परिषदेत मोठी करणी केली,” १९३०-३२ दरम्यान वेगवेगळ्या परिषदांमध्ये त्यांनी ‘दलित वर्गा’चं प्रतिनिधित्व केलं याकडे ही ओवी निर्देश करते.
तर, “त्यांनी दिल्लीच्या तख्तावर स्वतःचं नाम कमवलं,” पाचव्या ओवीत गायलंय. दलितांसाठी, हे सगळं यश ही फार अभिमानाची बाब आहे, आणि हेच चौथ्या ते दहाव्या ओवीत दिसून येतं. बाबासाहेबांची ही मोठी “करणी म्हणजे त्यांनी या भारतामध्ये समानतेचा नारा दिला,” असं या साऱ्या गातात.
आठव्या ओवीतून आपल्याला समजतं की १९२७ मध्ये भीमरायांनी आकाश पाताळ एक केलं जेणेकरून नऊ कोटी दलितांना नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा. ब्राह्मणांनी दलितांना मंदिरात प्रवेश नाकारला होता पण भीमरायाने मंदिरातल्या काळारामाचं दर्शन घडवण्यासाठी सत्याग्रह केला असं या साऱ्या गातात. (या ओवीत चुकून हा सत्याग्रह १९२७ साली केल्याचं म्हटलं आहे मात्र तो खरं तर १९३० मध्ये केला होता.)
अकरावी ते तेरावी ओवी जातीव्यवस्थेबद्दल आहे. एखादी व्यक्ती कोणत्या कुटुंबात जन्माला यावी हा काही तिचा दोष नाही. दुःखाची बाब ही की आम्हाला जातीच्या जाचक भिंतींनी आम्हाला विभागून टाकलंय. शेवटच्या ओवीमध्ये, भीमरायाने त्याच्या अनुयायांना काय सांगितलं ते गाताना या म्हणतात – मंदिरातला काळाराम दगडाचा आहे – थोडक्यात काय तर हिंदू जाती व्यवस्था पाषाणहृदयी आहे.
या ध्वनिफितीतल्या १४ ओव्या जरूर ऐकाः
नव्हता मतदाना चा हक्क केला तेंव्हा हाज ना हाज
आरक्षण दिलं आम्हा, भीमराया यांनी माझ्या
आमच्या ना हक्कासाठी आलो होतो काकुलती
मिळालं ना आरक्षण, महिला भाषण बोलती
नव्हतं ना आरक्षण, नव्हता कोणताच हाक
अशी एक हिरा जल्म आला रामजी बाबा यांचा लेक
अशी रामजी च्या पोरानं, यानं उंच शिक्षण घ्यावं
अशी रामजी च्या पोरानी, यांनी विलायते ला जावं
बाई भिमाई रायानी एक करनी मोठी केली
दिल्लीच्या गं तक्त्या वरी गोलमेज सभाना हालविली
अशी भिमाई रायानी केली थोरच करणी
दिल्लीच्या गं तक्त्यावरी केली एक धरणी
अशी रामजी च्या पोरानं केली एकच करणी
यांनी समानतेचा नारा दिला भारत धरणी
१९२७ साली एक नवल मोठं केलं
काळाराम मंदिराचं दरवाजे खुलं केलं
बाई भीम रायानी आकाश मातकुला केला
नवकोटी बांधवांना काळाराम दाखविला
अशी मंदिराला जाया आम्हा केली मनाई
रामजी च्या पुतरानी मोठी केली कमाई
मानव जाती मधी त्यांनी केला होता कोष
मानव ना जल्म आले, त्यात त्यांचा काही दोष
अशी मंदिराला जाया होती मोठीच आवड
बामन जाती यांनी केली होती गं निवड
१९२७ साली मोठा सत्याग्रह केला
अशी भिमाई रायानी आम्हा हक्क मिळवून दिला
काळाराम मंदिरात आहे दगडाचं पाषाण
बाई भीमरायानी दलितांसाठी दिलं भाषण
कलावंतः कुसुम सोनवणे
गावः नांदगाव
तालुकाः मुळशी
जिल्हाः पुणे
जातः नवबौद्ध
मुलं – दोन मुलगे, दोन मुली
व्यवसायः शेती
दिनांकः या ओव्या, छायाचित्रं आणि ध्वनीफित २५ मार्च २०१८ रोजी संकलित करण्यात आली.
पोस्टरः सिंचिता माजी
अनुवादः मेधा काळे