पुणे जिल्ह्यातील दापोडी गावच्या सरूबाई कडू यांनी ओव्यांच्या प्रकल्पातील सर्वात जास्त ओव्या गायल्या आहेत . त्यांची गोष्ट दोन भागांत . या पहिल्या भागात त्यांनी दुरावलेले मुलगे , कधीतरीच ज्यांचे लाड होतात अशा लेकी आणि स्वच्छंदी नवरे यांच्याविषयीच्या दहा ओव्या गायल्या आहेत .
“आता मला काहीच आठवत नाही आणि गाताही येत नाही,” सरूबाई कडू सांगत होत्या. ओसरीच्या भिंतीला टेकून बसलेल्या सरुबाईंच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होती. बसल्या बसल्या त्या बोटांनी आपले गुडघे दाबत होत्या. आम्ही निराश झालो पण वाटलं थोड्या आग्रहानंतर त्या कदाचित आपलं मन बदलतीलही.
जुलैचा महिना होता; ओवी प्रकल्पाला ५००० ओव्या बहाल करणाऱ्या गायिकेला भेटण्यासाठी आम्ही पुण्यापासून ८० किलोमीटरवर दौंड तालुक्यात आलो आहोत. एका गायिकेने म्हटलेल्या ओव्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. दुसऱ्या क्रमांकावर जी आहे तिने याच्या निम्म्याच म्हटल्यात. आणि यांतील बहुतेक ओव्या सरूबाईंनी स्वत:च रचलेल्या आहेत.
१९९६ ते २००९ या काळात, सरूबाईने मुळशी तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांच्या भेटींत म्हटलेल्या या ५००० ओव्या हा प्रकल्प सुरु करणाऱ्या गटाने हाताने लिहून काढल्या होत्या आणि १,१०,००० ओव्यांच्या एकूण डेटाबेसचा हिस्सा झाल्या होत्या. आता हा प्रकल्प ‘पारी’ने हाती घेतला आहे आणि तो पुढे नेण्यासाठी नव्याने त्या गावांना भेटी देऊन त्या स्त्रियांना भेटणं, फोटो आणि व्हिडिओ घेणं असं काम चालतं. मूळगटाच्या भेटीनंतर जवळजवळ २० वर्षानी, गेल्या जुलैमध्ये आम्ही सरूबाईच्या काही ओव्या ध्वनिमुद्रित केल्या व व्हिडीओ देखील घेतले.
मुळशी तालुक्याच्या डोंगराळ भागातील ग्रामीण गरिबांसाठी काम करणाऱ्या गरीब डोंगरी संघटना या संस्थेच्या सरूबाई सदस्या होत्या. अशिक्षित असूनही त्या साक्षरतेसाठी होणाऱ्या स्वयंअध्ययनाच्या शिबिरांना मदत करत.
१९९४ मध्ये, वरसगाव धरणामुळे पाण्याखाली गेलेल्या वडवली गावच्या त्या रहिवासी. पुण्यापासून ५० किमीवरील हे धरण सहलींसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. या धरणाखाली गेलेल्या अनेक गावांतील लोकांचं दौंड तालुक्यात पुनर्वसन केलं गेलं, मुळशीपासून १२० किमी. अंतरावर.दापोडीला एका चिंचोळ्या गल्लीच्या तोंडाशी असलेल्या एका पडझड झालेल्या मातीच्या घराबाहेर एक बाई बसल्या होत्या. ओवी प्रकल्पाच्या मूळ गटातील जितेंद्र मैड आमच्याबरोबर होते. त्यांनी सांगितलं की त्या सरूबाई. सरूबाईंनी आम्हाला गल्लीतील त्यांच्या घरापाशी नेलं, त्याला फाटक होतं आणि मोकळा ओटा होता. “मी इथे राहते.” मग त्या झोपडीबाहेर त्या का बसल्या होत्या असं आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी म्हटलं, “हं, ते दुसरीचं होतं, ती बाहेर गेली होती म्हणून मी राखत होते.” आम्हाला ते कारण थोडं विचित्र वाटलं, फारसं पटलंही नाही.
आम्ही त्यांना जुन्या ओव्यांची आठवण करून दिली, ५०००हूनही अधिक. पण त्या मात्र ठामपणे सांगत होत्या की मला एकही ओवी आठवत नाही. शिवाय काही महिन्यांपूर्वी सरुबाईच्या चेहऱ्याच्या डाव्या भागाला वात झाला होता आणि आता बरं वाटत असलं तरी त्यांना गायला कठीण होतंय.
तेवढ्यात त्यांची शेजारीण, ताराबाई मरगळे रस्त्यावरून जाताना दिसली आणि सरूबाईंनी तिला सामील व्हायला बोलावलं. त्या आल्यामुळे सरूबाई मोकळ्या होऊन गायला तयार झाल्या आणि आम्हाला १० ओव्या ध्वनिमुद्रित करता आल्या. त्यातल्या काही जुन्या ओव्या सरूबाईंनी नव्या वाटाव्या इतपत बदलल्या होत्या.
सरूबाईंची एक ओवी दूर जाणाऱ्या मुलाबद्दल होती. त्यात आई मुलाला ‘दुरावू नकोस’ असं सांगते/मागणं मागते. पुढच्या चार ओव्या लेकीबद्दलच्या होत्या. त्यात म्हटलंय, “अगं, आम्हाला इतका लळा लावू नकोस, उद्या तुझं लग्न झाल्यावर तू आम्हाला सोडून सासरी जाणार आहेस.” लाडकी लेक वडिलांकडे हट्ट करून काही मागते तेव्हा आई म्हणते, “तुझे लाड करणं आत्ता आमच्या हाती आहे, तुला हवं तर कानातल्या कुडक्यांना मोती जडवून घे.” पुढच्या ओवीत लेक बापाचे बोट धरून चांदीचे गोठ हवेत असं सांगते.
पुढच्या तीन ओव्या पुरुषांच्या व्यभिचारीपणाविषयी आहेत. त्यात म्हटलंय, “आपण बायका मूर्ख असतो. आपण इथे पाण्यासाठी भांडत असतो आणि नवरा मात्र एखाद्या कोंबड्यासारखा दुसऱ्या बाईच्या मागे धावत असतो. आपण बायका वेड्या असतो, तव्यावरच्या पोळीसारख्या (स्वत: धग सोसूनही मऊ घास होतो) पण इकडे नवरा मात्र दुसऱ्या बाईसाठी खिशात चोळी दडवत असतो. पाणी भरलेल्या घंगाळाप्रमाणे बायको नवऱ्याची तहान भागवायला तयार असते पण तो मात्र दुसऱ्या बाईपायी आपल्या बायकोसमोर तोंड वेंगाडतो.
शेवटच्या दोन ओव्या मुलाच्या लग्नाविषयी, त्यातल्या हळदीच्या विधीविषयीच्या आहेत. कडुलिंब घातलेल्या पाण्याने त्याला न्हाऊ घालत आहेत, त्याच्या अंगावरच्या हळदीने पिवळं झालेलं पाणी मांडवाबाहेर वाहतंय. आई म्हणते, हळदीमुळे माझ्या हाताची बोटं, मुठी पिवळ्या झाल्यात; माझ्या बाळाला देवाने खूप आयुष्य द्यावं.
ओव्या म्हणून झाल्यावर ताराबाई निघतात, त्यांना निंदणी करायला जायचंय. आम्ही आणखी थोड्या गप्पागोष्टी करतो. ताराबाई काही मूळ प्रकल्पात सहभागी नव्हत्या. पण आज त्यांच्या असण्याने सरूबाईचा निरुत्साह दूर होण्यास मदत झाली. या दोघींची आयुष्यंच या ओव्यांत चित्रित झालीयेत. मुलांवरचं प्रेम, नवऱ्यांचा बाहेरख्यालीपणा, उतारवयात मुलांनी आधार दिला नाही तरी मुलांना दिलेले आशीर्वाद हे सारं आहे इथे. ताराबाईंच्या नवऱ्याने दुसरी बायको केल्यामुळे त्या वेगळ्या झाल्यात. सरूबाईंचा नवरा दोन वर्षांपूर्वी वारला. तिला चार मुलगे आहेत, त्यातले दोन अजून हयात आहेत.
मध्येच सरूबाईंचा मुलगा दिलीप आला, कुणीतरी भेटायला आल्याचं त्याला कळलं म्हणून. तो सांगतो की सरकारकडून मिळालेली जमीन त्यांच्या मूळ जमिनीहून कमी आहे. ती पडीक होती आणि त्यांना ती कसण्यासाठी खूप खर्च झाला. दिलीप गवंडीकाम करतो आणि आपल्या बायकोच्या मदतीने छोटं किराण्याचं दुकानही चालवतो. “आम्हाला कसंबसं भागवण्यासाठी सुद्धा खूप कष्ट करावे लागतात,” तो सांगतो.
दिलीप गेल्यानंतर सरूबाई आम्हाला खरं सांगतात : काही आठवड्यांपूर्वी घरात खूप वाद झाले आणि आता त्यांचा मुलगा त्यांना घरात ठेवत नाही. आम्ही आधी पाहिलेल्या पडक्या घरात त्या आता राहतात. त्या स्वत:च्या झोपडीत त्यांनी आणखी पुष्कळ ओव्या गायल्या. त्या ओव्या पुढच्या भागात सादर केल्या जातील.
गावाला गं गेलं बाळ, गावासारखा होऊ नको
तपल्यागं सुरपाचं, उणं कुणाला दावू नको
लाडकी गं माझी लेक, लयी लाडकी होवू नको
जाशील परघरी, वेडी माया लावू नको
लाडकी गं माझी लेक, लाड सांगती बापाला
सांगते गं बाई तुला, देणं मागती चापाला
लाडकी गं माझी मैना, लाड कोड माझ्या हाती
आता माझी बाई, लाव कुडक्याला मोती
लाडकी गं माझी मैना, धरी बापाच्या बोटाला
सांगते गं बाई तुला, चांदी मागती गोठाला
आपण गं येडी नार, जसा पाण्याचा झुंबडा
लोकाच्या गं नारीसाठी, मूर्ख घरीचा कोंबडा
आपली गं येडी नार, जशी तव्यातली पोळी
लोकाच्या नारीसाठी मूर्ख खिशात घाली चोळी
आपली गं येडीजस पाण्याचं घंगाळ
लोकाच्या नारीसाठी तोंड करीतो वंगाळ
मांडवाच्या दारी हळदीबाईचं पाटं गेलं
वाणी चं गं माझं बाळ लिंबाचं न्हाण न्हालं
मांडवाच्या दारी माझ्या पिवळ्या झाल्या मुठी
सांगते बाळा तुला, तुला हळद जगू जेठी
gāvālā gaṁ gēlaṁ bāḷa, gāvāsārakhā hōū nakō
tapalyāgaṁ surapācaṁ, uṇaṁ kuṇālā dāvū nakō
lāḍakē lēkī phāra lāḍakī hōvū nakō
jāśīla paragharī vēḍī māyā lāvū nakō
lāḍakī gaṁ mājhī lēka, lāḍa sāṅgatī bāpālā
sāṅgatē gaṁ bāī tulā, dēṇaṁ māgatī cāpālā
lāḍakī mājhī mainā lāḍa kōḍa mājhyā hātī
ātā mājhī bāī lāva kuḍakyālā mōtī
lāḍakī gaṁ mājhī mainā, dharī bāpācyā bōṭālā
sāṅgatē gaṁ bāī tulā, cāndī māgatī gōṭhālā
āpaṇa gaṁ yēḍī nāra, jasā pāṇyācā jhumbaḍā
lōkācyā gaṁ nārīsāṭhī, mūrkha gharīcā kōmbaḍā
āpayalī nāra jaśī tavyātalī pōḷī
lōkācyā nārīsāṭhī ghātalī khiśāta cōḷī
āpayalī nāra jasa pāṇyāca ghaṅgāḷa
lōkācyā nārīsāṭhī tōṇḍa karītō vaṅgāḷa
māṇḍavācyā dārī haḷadībāīca pāṭa gēlā
navarā bāḷa mājhā limbācā nhāṇa nhālā
māṇḍavācyā dārī pivaḷyā jhālyā muṭhī
sāṅgatē bāḷā tulā tulā haḷada jagū jēṭhī
कलाकार : सरूबाई कडू
गावः दापोडी
तालुकाऋ दौंड
जिल्हा : पुणे
जात : मराठा
वय : ७०
मुलः ४ मुलगे (२ हयात)
व्यवसायः शेतकरी, शेतमजूर
दिनांकः या ओव्यांचं ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग २४ जुलै, २०१७ राजी करण्यात आलं. ओव्या १९९६ ते २००९ दरम्यान हाताने उतरून घेण्यात आल्या होत्या.
फोटोः बर्नार्ड बेल आणि बिनायफर भरुचा
पोस्टरः श्रेया कात्यायनी
मराठी अनुवादः छाया देव