पुणे जिल्ह्यातल्या सविंदण्याच्या सोनुबाई मोटे त्यांच्या ओव्यांमध्ये विठुरायाच्या पंढरीला जाताना घरच्या सगळ्या मायेच्या माणसांना सोबत घेऊन जातात – दर वर्षी रंगणाऱ्या या वारीच्या सोहळ्याची सांगता या वर्षी १२ जुलैला होईल
“नाच रे मोरा, म्हण, नाच रे मोरा म्हण,” आमच्यासाठी काही ओव्या गायची सोनुबाईंना विनंती केली तेव्हा त्यांच्या नातवाचा, कौस्तुभचा हट्ट सुरू झाला.
प्रसिद्ध गीतकार आणि कवी ग. दि. माडगुळकरांनी देवबाप्पा (१९५३) या चित्रपटासाठी लिहिलेलं हे लोकप्रिय गाणं आपल्या आजीनं गावं अशी त्याची इच्छा आहे. शाळकरी मुलांना आजही हे गाणं खूप आवडतं. आम्ही मात्र सोनुबाईंनी आमच्यासाठी काही जात्यावरच्या ओव्या गाव्यात अशी आशा मनात धरून होतो. पिढ्या न् पिढ्या महाराष्ट्रातल्या घरोघरी जात्यावर दळणं करताना अनाम बायांनी रचलेल्या या ओव्या गायल्या जात आहेत.
२०१७ साली ऑक्टोबरच्या एका प्रसन्न सकाळी आम्ही सोनुबाई आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांच्या घरी होतो. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातलं सविंदणे हे त्यांचं गाव. हेमा राईरकर आणि गी पॉइटवँ यांच्या नेतृत्वाखालील गटाने डिसेंबर १९९५ मध्ये सोनुबाईंनी गायलेल्या २३ ओव्या ध्वनीमुद्रित केल्या होत्या. (या गटाने १९९० पासून १ लाखाहून अधिक ओव्यांचं संकलन केलं आहे. २०१७ पासून पारी-जीएसपी गट महाराष्ट्रातल्या अनेक गावांना जाऊन या ओव्या गाणाऱ्या महिलांच्या भेटी घेत आहे. त्यांचे फोटो काढून, त्यांनी गायलेल्या ओव्या चित्रित केल्या जात आहेत.) वीस वर्षांपूर्वी त्यांच्या ओव्या रेकॉर्ड केल्या होत्या. त्यानंतर आता आमच्या कॅमेरासाठी त्यांनी दमदार आवाजात आठ ओव्या गायल्या.
सोनुबाई आणि त्यांचे यजमान ज्ञानेश्वर शेती करतात. त्या घरचंही सगळं पाहतात. ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांत एकत्र सहा एकराचं रान आहे. रानात ऊस, बटाटा आणि तृणधान्यं घेतात. पन्नाशीच्या सोनुबाई आणि ज्ञानेश्वर यांची तीन अपत्यं आहेत. थोरला मुलगा (जयकुमार, कौस्तुभचा बाबा, जो त्यांच्यासोबत राहतो) १२ वीपर्यंत शिकला आहे आणि गावात हॉटेल चालवतो. त्यांच्या मुलीचं लग्न होऊन ती पुण्याला असते, आणि धाकटा पदवीधर असून एका मराठी वृत्तवाहिनीसाठी पत्रकार म्हणून काम करतो.
घराच्या परसात ॲल्युमिनियमच्या खांबांवर पत्रा टाकून शेड केली आहे आणि नुकतीच निघालेली बाजरी भरडून प्लास्टिकच्या कागदाखाली झाकून ठेवली आहे. बटाट्याची पोती बांधून, लेबलं लावून रांगेत रचून ठेवली आहेत. प्लास्टिकच्या पाटीत नुकत्याच खुडलेल्या ताज्या कोथिंबिरीच्या जुड्या ठेवल्यात. अंगणात खुंट्याला गाय आणि तिचं वासरू बांधून घातलंय आणि दुसरीकडे कोपऱ्यात एक मोटार सायकल, एक स्कूटी आणि लहान मुलाची सायकल दिसतीये. आणि या शेडला लागूनच गुलाबी रंगाच्या गुलाबाची झाडं आहेत आणि लिंबू व पेरूची झाडं फळाने लगडली आहेत.
मितभाषी असणाऱ्या सोनुबाई सांगतात, “मी गावातल्या देवळात आणि धार्मिक सोहळ्यांमध्ये भजनं गाते.” आमच्यासाठी त्या पंढरपूरच्या वारीवरच्या ओव्या गातात. आणि कसलीच कसर राहू नये म्हणून आम्ही निघण्याआधी कौस्तुभ आमच्यासाठी नाच रे मोरा देखील गातो.
पंढरीची वारी
विठ्ठलावरची भक्ती महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या खेडोपाडीच्या लोकांना सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरकडे खेचून आणते. वारीची सुरुवात सुमारे ८०० वर्षांपूर्वी झाली असावी. १३ व्या शतकात संत ज्ञानेश्वर आणि १७ व्या शतकात संत तुकाराम या भक्ती परंपरेतल्या संतांनी तसंच इतरही अनेकांनी ही वारी केली आहे.
दर वर्षी लाखो गडी आणि बाया – बहुतेक जण शेतकरी, धनगर किंवा पशुपालक – वारीला जातात. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातून दोनदा वारी निघते – आषाढात (जून-जुलै) आणि कार्तिकात (ऑक्टोबर-नोव्हेंबर). आषाढातली वारी जास्त लोकप्रिय असून शेतात पेरण्या झाल्या की लोक वारीला जायला निघतात. वारीला जाणाऱ्यांचं विठ्ठलाकडे एकच साकडं असतं, चांगला पाऊस पडू दे, सगळीकडे चांगलं पिकू दे. यंदा वारीची सुरुवात २४ जूनला झाली आणि १२ जुलै रोजी आषाढी एकादशीला पंढरपुरात वारीची सांगता होईल.
पंढरीला जाताना आपल्या घरच्यांना न्यावं असं या ओव्या सांगतात. आणि एकटीनं जरी गेलं तरी घरच्यांची माया सोबत असेलच
पंढरीच्या वाटेवर कुटुंबाची संगत
सोनुबाई पहिल्या दोन गणपतीच्या ओव्यांमध्ये गातात की देवी शारदा देवांच्या सभेमध्ये उपस्थित होती. पुढच्या सहा ओव्या पंढरीच्या वारीबद्दल आणि जाताना आपल्या घरच्या मंडळींना सोबत नेण्याबद्दल आहेत. यातली प्रत्येक ओवी घरच्या प्रत्येकासाठी गायली आहे – आई, वडील, भाऊ, बहीण, मामा आणि मावशी. तांब्याच्या कळशीनं जाई, चाफा, तुळस आणि रुईला पाणी घालावं असं ओवीत गायलं आहे.
या प्रत्येक ओवीचं यमक पहा – आई आणि जाई, बापाला आणि चाफ्याला. तांब्याच्या कळशीनं पाणी घालणं याचं एक प्रतीकात्मक महत्त्व आहे. जाई, चाफ्याची फुलं आणि रुईच्या पानांचे हार देवाला वाहण्याची पद्धत आहे. तुळशीला तर विठ्ठलाची निरपेक्ष, निस्वार्थी पत्नी असा मान देण्यात आला आहे.
पंढरीला जाताना आपल्या जिवलगांना घेऊन जाणं किती मोलाचं आहे हे या ओव्यांमध्ये सांगितलंय. आणि कदाचित जर कुणी वारीला एकटंच निघालं असलं तरी घरच्यांची माया त्यांना वारीच्या वाटेवर सोबत करेल.
जात्यावरची ओवी मूळ गटाने ध्वनीमुद्रित केलेल्या ओव्यांमध्ये (खाली) सोनुबाई थोड्या उडत्या चालीत ओव्या गायला सुरुवात करतात, त्याच चालीत त्यांनी आम्हाला ओव्या गाऊन दाखवल्या. मात्र या मूळ रेकॉर्डिंगमध्ये स्व. हेमा राईरकर सोनुबाईंना सांगतात, “गळा [चाल] बदलायचा.” आणि लगेच सोनुबाई थोड्या शांत, संथ चालीत या ओव्या गाऊ लागतात.
पहिली माझी ओवी गणराया गणपती
देवाच्या सभेला सारजा बाई गं व्हती
दुसरी माझी ओवी गणरायाला गायिली
देवाच्या सभेला उभी सारजा राहिली
पंढरीला गं जाया संगं न्यावं त्या बापाला
तांब्याच्या कळशीनं पाणी घालावं चाफ्याला
पंढरीला जाया संगं न्यावं त्या आईला
तांब्याच्या कळशीनं पाणी घालावं जाईला
पंढरीला जाया संगं न्येवा त्या बह्यणीला
तांब्याच्या कळशीनं पाणी घालावं रोहिणीला
पंढरीला जाया संगं न्येवा त्या भावाला
तांब्याच्या कळशीनं पाणी घालावं देवाला
पंढरीला जाया संगं न्येवा त्या मावशीला
तांब्याच्या कळशीनं पाणी घालावं तुळशीला
पंढरीला जाया संगं न्येवा त्या मामाला
तांब्याच्या कळशीनं पाणी घालावं रामाला
कलावंतः सोनुबाई मोटे
गावः सविंदणे
तालुकाः शिरूर
जिल्हाः पुणे
व्यवसायः शेती, गृहिणी
जातः मराठा
दिनांकः या ओव्या सर्वप्रथम १३ डिसेंबर १९९५ रोजी रेकॉर्ड करण्यात आल्या. फोटो आणि व्हिडिओ ८ ऑक्टोबर २०१७ रोजीचे आहेत.
पोस्टरः सिंचिंता माजी
अनुवादः मेधा काळे