छोटंसं, रया गेलेलं एक घर. साताऱ्याच्या काटगुण गावासाठी खरं तर ही वास्तू म्हणजे मानाचा बिंदू असायला हवी, आणि कदाचित तशी ती असेलही. मात्र स्थानिक पंचायतीच्या मात्र ती गणतीतही नाही. एवढंच काय महाराष्ट्र शासनाच्याही ती स्मरणात नाही.

ही वास्तू म्हणजे महान समाज सुधारक जोतिबा फुल्यांचं पिढीजात घर, त्यांच्या आजोबांनी बांधलेलं. आज त्याला अगदीच अवकळा आलीये. छत कोसळायला लागलंय. गरिबांसाठी राबवलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतली घरंही याहून बरी म्हणावीत. घरकुल योजनेखाली हे घर परत कसं तरी बांधलं असावं ही एक शक्यता.

खरं तर हे घर इतकं लहान आहे की ते साफ आणि दुरुस्त करणं काहीच अवघड नाही. पंचायतीने याच घराच्या मागे एक जिम बांधलंय, त्यावरून तरी देखभालीसाठी पैशाची कमी असावी असं वाटत नाही. घराच्या थेट समोर फुल्यांच्याच नावाची एक शैक्षणिक संस्था आहे. रस्त्यालगत एक खुला मंचही आहे.

PHOTO • P. Sainath

विचारांचीही दुर्दशा – फुल्यांच्या नावापेक्षा प्रायोजकाचं नावच अधिक लक्ष वेधून घेतंय

या मंचावरील बोर्डावर प्रायोजक म्हणून लिहिलेलं जॉन्सन टाइल्स हे नाव महात्मा जोतिराव फुले या नावापेक्षा मोठं आणि ठळक आहे. हे सगळंच कुठे तरी विकृत आहे. आजच्या कॉर्पोरेट काळात फुले असते तर त्यांच्या समाज सुधारणेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याआधी कदाचित त्यांनाही त्यांचं रेवेन्यू मॉडेल काय आहे, पैसा कसा उभा राहणार हे मागितलं गेलं असतं. फुल्यांचं आंदोलन न्याय, मानवी हक्क, शिक्षण, जातीभेदाशी लढा आणि प्रतिष्ठेवर आधारित होतं. ‘जगभरातल्या राहणीची नव्याने मांडणी’ करू पाहणाऱ्या जॉन्सन टाइल्सपेक्षा नक्कीच फार वेगळं. शेजारीच असलेला फुल्यांचा पुतळा त्यांच्या घराकडे पाठ करून उभा आहे. या वास्तूची पडझड आणि गावातली भीषण पाणी समस्या याचा जणू तो निषेध करत असावा...

काटगुणच्या 3,300 गावकऱ्यांना पाण्याची भीषण टंचाई सहन करावी लागतीये. नेर धरण आणि जलाशय फक्त 20 किलोमीटरवर असूनसुद्धा ही परिस्थिती आहे. काटगुण खटाव तालुक्यामध्ये आहे. तीन जिल्ह्यातल्या अति तुटीच्या 13 तालुक्यातले लोक दर वर्षी दुष्काळ परिषदेसाठी एकत्र येतात, त्यात खटावचाही समावेश आहे. जुन्या महाबळेश्वरात कृष्णेचा उगम होतो, तिथून तिच्या पात्राचा वेध घेता घेता आम्ही काटगुणला पोचलो होतो.

PHOTO • P. Sainath

घराचं छत आतून ढासळू लागलं आहे. उजवीकडे – घराकडे पाठ फिरवून उभे असणारे जोतिबा. घरच्या आणि अख्ख्या काटगुणच्याच दशेचा जणू ते निषेध करतायत

एवढी अवकळा एकट्या जोतिबांच्याच घराची नाहीये. काटगुणच्या सगळ्याच रहिवाशांची परिस्थिती बिकट आहे. बऱ्याच जणांनी कामासाठी शहरं जवळ केली पण त्यातलेही काही आता परतलेत.

“मला महिन्याला 15,000 मिळत होते”, एका प्रसिद्ध सिनेनिर्मात्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करणारे गौतम जावळे सांगतात. “बाहेरनं आलेलं माणूस त्या शहरात एवढ्या पैशात कसं राहणार? एकीकडे हाताखाली बीएमडब्ल्यू, मर्सिडिज बेन्झसारख्या भारी भारी गाड्या, अन् दुसरीकडे रोजच्या गरजांसाठी पैसा नाही. मग काय, आलो परत.”

जोतिबांच्या पडक्या घरापुढे जावळे आम्हाला त्यांची कहाणी सांगत होते. घराच्या भिंतीवर ‘फुले निवास’ असं नाव रंगवलंय. हे जोतिबांचं पिढीजात घर. पण त्यांचा जन्म इथे झाला का? नक्की माहित नाही. हे त्यांच्या आजोबांचं घर एवढंच निश्चित. त्यांचा जन्म कुठे झाला याबाबत मतभेद आहेत. काहींचं म्हणणं असं की त्यांचा जन्म याच वास्तूत झाला आणि नंतर त्यांचं कुटुंब जुलमी अधिकाऱ्यांपासून सुटका व्हावी म्हणून इथून पळून गेलं. इतरांच्या म्हणण्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील खानवडी हे त्यांचं जन्मगाव. आणि काही लिखित संदर्भांनुसार त्यांचे वडील पुण्याला रहायला गेले आणि त्यानंतर फुल्यांचा जन्म पुण्यातच झाला.

यातलं आम्हालाही नक्की काही माहित नाही. एक गोष्ट मात्र आम्ही नक्की सांगू शकतो - या गावाला आज फुल्यांसारखी ज्ञानाची, शिक्षणाची आणि न्यायाची तहान नाही. असलीच तर ती आहे फक्त पाण्याची तहान. बस्स.

अनुवाद: मेधा काळे

P. Sainath

ପି. ସାଇନାଥ, ପିପୁଲ୍ସ ଆର୍କାଇଭ୍ ଅଫ୍ ରୁରାଲ ଇଣ୍ଡିଆର ପ୍ରତିଷ୍ଠାତା ସମ୍ପାଦକ । ସେ ବହୁ ଦଶନ୍ଧି ଧରି ଗ୍ରାମୀଣ ରିପୋର୍ଟର ଭାବେ କାର୍ଯ୍ୟ କରିଛନ୍ତି ଏବଂ ସେ ‘ଏଭ୍ରିବଡି ଲଭସ୍ ଏ ଗୁଡ୍ ଡ୍ରଟ୍’ ଏବଂ ‘ଦ ଲାଷ୍ଟ ହିରୋଜ୍: ଫୁଟ୍ ସୋଲଜର୍ସ ଅଫ୍ ଇଣ୍ଡିଆନ୍ ଫ୍ରିଡମ୍’ ପୁସ୍ତକର ଲେଖକ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ପି.ସାଇନାଥ
Translator : Medha Kale

ମେଧା କାଲେ ପୁନେରେ ରହନ୍ତି ଏବଂ ମହିଳା ଓ ସ୍ଵାସ୍ଥ୍ୟ କ୍ଷେତ୍ରରେ କାମ କରିଛନ୍ତି । ସେ ମଧ୍ୟ PARIର ଜଣେ ଅନୁବାଦକ ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ମେଧା କାଲେ