गुणधर नाईक घरी आहे का, मी शेजारच्या घरी भांडी घासत बसलेल्या एका बाईला विचारलं.

“तुम्ही कुठनं आलात, आणि इथे तुमचं काय काम?” तिने विचारणा केली.

मी खरियारचा एक पत्रकार आहे आणि मी पूर्वी गुणधरबद्दल लिहिलं होतं, मी सांगितलं. त्याचं कसं काय चालू आहे हे पहायला मी आलोय.

त्या बाईने बारकाईने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, “तुम्ही ठाकूरजी तर नाही?” हो, मी म्हणालो. इतक्या वर्षांनंतरही तिने मला ओळखलं याचा मनाला आनंद वाटला.

१९९६-९७ दरम्यान मी ओडिशाच्या बोलांगीर जिल्ह्याच्या बांगोमुंडा तालुक्याच्या बारलाबहेली गावात कित्येकदा आलो होतो. आणि आता वीस वर्षांनी मी परत एकदा तिथे उभा होतो.

१९९६ मध्ये पश्चिम ओडिशामध्ये भयंकर दुष्काळ पडला होता – बलांगीर, नौपाडा आणि इतर जिल्ह्यांचा त्यात समावेश होता. प्रचंड उपासमार आणि भूकबळी झाले होते. परिणामी मोठ्या संख्येने लोक गावं सोडून गेले होते. अनेक जण आंध्र प्रदेशातल्या वीटभट्ट्यांवर कामाला गेले. खेदाची बाब म्हणजे, या प्रदेशासाठी यात वावगं काहीच नव्हतं – दर २-३ वर्षांनी दुष्काळाचा फेरा यायचा आणि हे असं सगळं घडायचं.

बालमती नाईक, उर्फ घामेला, ही एक ३२ वर्षांची आदिवासी बाई. शेतमजुरी करणारी ही विधवा बारलाबहेलीच्या ३०० रहिवाशांपैकी एक. दोन वर्षांआधी तिच्या पतीचं निधन झालं होतं. कर्ज फेडण्यासाठी घामेलाला तिचा छोटा जमिनीचा तुकडा सोडून द्यावा लागला होता. ती रोजंदारीवर काम करत असे, पण दुष्काळामुळे तिच्या गावात कुठे काही कामच नव्हतं. ती आणि तिचा सहा वर्षांचा छोकरा, गुणधर भुकेकंगाल झाले होते. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी घामेलाच्या मृत्यूआधीच तिच्या परिस्थितीबद्दल तालुका विकास अधिकाऱ्यांना कळवलं होतं. पण त्यांनी काहीही केलं नाही.

६ सप्टेंबर १९९६ रोजी, अंदाजे १५ दिवस उपाशी राहिल्यानंतर घामेला गेली. त्यानंतर अनेक तासांनी तिच्या निष्प्राण देहाशेजारी बसून रडत, ओरडत असलेला तिचा सहा वर्षांचा मुलगा गावकऱ्यांच्या नजरेस पडला.

या भूकबळीवरचे आणि त्यानंतरच्या परिणामांवरचे माझे लेख ऑक्टोबर १९९६ मध्ये दैनिक भास्करने प्रसिद्ध केले होते. काही स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षातल्या राजकीय नेत्यांनी त्या गावाला भेट दिली आणि हा मुद्दा उचलून धरला. मानवी हक्क आयोगाचे सदस्यही भेट द्यायला आले आणि त्यांनी हा भूकबळीच असल्यावर शिक्कामोर्तब केलं. राजकीय नेते, तालुका विकास अधिकारी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी गावाच्या वाऱ्या केल्या. अगदी पंतप्रधान एच डी देवेगौडादेखील त्यांच्या दुष्काळी भागांच्या दौऱ्याचा भाग म्हणून इकडे भेट देणार होते, मात्र ते काही आले नाहीत.

PHOTO • Purusottam Thakur

घामेलाच्या भूकबळीबद्दल आणि तिचा अनाथ मुलगा, गुणधरबद्दल ऑक्टोबर १९९६ मध्ये दैनिक भास्करमध्ये आलेल्या बातम्या

आमच्या हाताला काम हवंय हेच गावकरी भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगत होते. पण गावच्या पुढाऱ्यांचा असा आरोप आहे की जेव्हा त्यांनी त्यांच्या मागण्या लावून धरायला सुरुवात केली तेव्हा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्यांनी धमकी दिली की राजकारण थांबवा आणि तुमची निदर्शनं जास्त ताणू नका, अन्यथा तुम्हाला आता जे काही लाभ मिळतायत (उदा. शिधापत्रिका) तेही दिले जाणार नाहीत.

आईचा बळी गेल्यानंतर गुणधरची तब्येत खूपच खालावली होती. स्थानिक पंचायत नेत्यांनी त्याला गावापासून नऊ किलोमीटरवर असणाऱ्या खरियार मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. अतितीव्र कुपोषण आणि मेंदूचा मलेरिया झाल्याचं निदान झालं. तो अत्यवस्थ होता, पण जगला.

गुणधर बरा झाल्यावर त्याची रवानगी परत त्याच्या गावी करण्यात आली. त्याची कहाणी टिपण्यासाठी राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी बारलाबहेली गाठलं. जिल्हा प्रशासनाने त्याला ५००० रुपयांची मदत दिली – ३००० रुपयांची ठेव आणि २००० रुपये बचत खात्यात. हे केलं आणि त्या निराधार मुलाच्या जबाबदारीतून त्यांनी अंग काढून घेतलं.

गेली १९ वर्षं माझ्या मनात विचार येत असे, गुणधरचं काय झालं असेल...

घामेलाच्या पतीचा आधीच्या लग्नातून झालेला एक मुलगा होता, सुशील. जेव्हा ती गेली तेव्हा तो वीस एक वर्षांचा होता आणि खरियार-भवानीपटणा मार्गावरच्या एका बांधकामावर काम करत होता.

त्या शेजारणीने मला सांगितलं की गुणधर आता टुकला गावातल्या राइस मिलमध्ये काम करतो. हे गाव बारलाबहेलीपासून पाच किमीवर आहे. त्याची सासुरवाडी तिथेच आहे, तिने सांगितलं, आणि त्याला दोन महिन्याचा एक मुलगा आहे. त्याचा सावत्र भाऊ जवळच्याच शेतात हलिया (गडी) म्हणून कामाला आहे.

शेताच्या बांधाबांधाने माझ्या मोटर सायकलवर जात असतानाच मला सुशील त्याच्या मालकाच्या शेतात काम करत असताना दिसला. त्याच्या तीन मुली आणि मुलगा तिथे जवळच होते. मी गुणधरची आई गेली तेव्हा त्याला भेटलो होतो, तेव्हा त्याचं लग्न व्हायचं होतं. आता चाळिशी गाठलेल्या सुशीलने मला ओळखलं नाही मात्र जेव्हा मी त्याला त्या बातम्यांविषयी सांगितलं तेव्हा मात्र त्याला सगळं काही आठवलं.

सुशीलला महिन्याला ४,००० रुपये मिळतात, दिवसाला १३० रुपये. त्यावरच त्याच्या कुटुंबाची गुजराण होते. त्याच्या एक-दोघा लेकरांच्या अंगावर कपडे होते, बाकीच्यांच्या नव्हते. त्यांची गरिबी बिलकुल लपत नव्हती.

मी गुणधरला भेटण्यासाठी टुकलाला निघालो. पप्पू राइस मिलच्या मालकाने, पप्पूने मला सांगितलं की गुणधर आज त्याच्या गावी गेला होता. मग मी त्याच्या सासुरवाडीला गेलो. तिथे त्याची बायको रश्मिता भेटली. तिच्या कडेवर त्यांचा दोन महिन्याचा मुलगा शुभम होता. रश्मिताने सांगितलं की तिचा नवरा आज बारलाबहेलीला त्यांचं घर साफसूफ करायला गेलाय आणि खरं तर त्याला जाऊन बराच वेळ झालाय.
PHOTO • Purusottam Thakur
PHOTO • Purusottam Thakur

वरः गुणधरची बायको, रश्मिता (उभ्याने, डावीकडे), त्याची मेहुणी आणि सासू सासरे टुकला गावी त्यांच्या घराबाहेर. खालीः रश्मिता आणि त्यांचा मुलगा शुभम

मी परत बारलाबहेलीला गेलो आणि खरोखर गुणधर त्याच्या घरीच होता. त्याने हसून मला रामराम केला. सहा वर्षांचा तो छोकरा आता मोठा झाला होता, लग्न झालं होतं आणि एका पोराचा बाप होता. तरीही त्याच्यामध्ये निरागस असं काहीतरी होतं. आणि लहानपणच्या कुपोषण आणि अशक्तपणातून तो आजही बाहेर आला नव्हता.

माती आणि कौलांचं त्याचं घर बरचसं तेव्हा होतं तसंच होतं. गुणधरचं कुटुंब एका खोलीत राहतं तर सुशीलचं दुसऱ्या खोलीत. बायकोच्या बाळंतपणासाठी म्हणून ते सासुरवाडीला जाऊन राहिले होते. आता ते लवकरच बारलाबहेलीला परततील.

PHOTO • Purusottam Thakur

बारलाबहेलीच्या आपल्या साध्या-सुध्या घरात, सुशीलची दोन मुलं

तुला मागच्या किती गोष्टी लक्षात आहेत, मी गुणधरला विचारलं.

“मला आठवतं की माझे आई-बाबा कायम आजारी असायचे कारण ते कायमच उपाशी असायचे,” तो सांगतो. “माझ्या आईच्या अंगात ताप होता. ती किती तरी दिवस उपाशी होती आणि अखेर ती गेली.”

हॉस्पिटलमधून जेव्हा तो गावी परतला तेव्हा माझ्या बातम्यांमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली होती. मग प्रशासनाने त्याला आदिवासी मुलांच्या स्थानिक आश्रम शाळेत प्रवेश मिळवून दिला.

“मी तिथे (राइस मिलमध्ये) बारदाना शिवायचो, त्याचे मला दिवसाला ८० रुपये मिळायचे,” तो सांगतो. “जे धानाची पोती वाहून नेण्याचं काम करायचे, त्यांना दिवसाला १३० रुपये मिळायचे. पण मला या असल्या उन्हात पोती उचलता येत नाहीत, म्हणून मग मी बारदाना शिवायचं काम करतो.”

गुणधरकडे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचं कार्ड नाही मात्र त्याच्याकडे अंत्योदयची शिधापत्रिका आहे आणि त्यावर त्याला महिन्याला ३५ किलो तांदूळ मिळतो.

तू तुझ्या मुलांना शिकवणार का, मी त्याला विचारलं.

“मी एक गरीब माणूस आहे. माझ्याच्याने होईल तितकं मी त्यांना शिकवीन. आमचे दोन घास खायचेदेखील वांदे आहेत त्यामुळे माझ्या बायकोला पुरेसं दूध येत नाहीये. म्हणून आम्हाला अमूल दूध घ्यावं लागतं, ज्यात आमचा बराचसा पैसा चाललाय.”

गेल्या महिन्यात मी पुन्हा एकदा गुणधरच्या गावी गेलो तेव्हा कळालं की तो वीटभट्टीवर काम करण्यासाठी आंध्र प्रदेशात गेलाय. सगळं कुटुंबच त्याच्या मेहुणीच्या लग्नासाठी पैसा हवा म्हणून वीटभट्टीवर गेलं होतं. पण दर डोई १८,००० रुपये उचल घेतल्याने त्यांना इतकं जास्त कष्टाचं काम करावं लागलं की बारलाबहेलीला परतल्यावर सततच्या आजारपणांवरच त्यातला बराचसा पैसा खर्च झाला आणि त्यातनं राहिला तो त्यांनी लग्नासाठी म्हणून साठवून ठेवलाय.

काही काळाने गुणधर परत वीटभट्टीवर कामाला गेला. आता तो तिथे माथाडी म्हणून काम करतोय, तयार विटा पुढच्या प्रवासासाठी ट्रॅक्टरवर लादायचं काम आहे त्याचं.

एकोणीस वर्षं झाली तरी हा तरूण आणि त्याचं कुटुंब अजूनही उपासमारीपासून वाचण्यासाठी, दोन घास अन्नासाठीच झगडतयात. याच उपसामारीने त्याच्या आईचा बळी घेतला आणि त्याला आयुष्यभरासाठी अशक्त आणि कमजोर बनवलं.

या लेखाची एक आवृत्ती १४ ऑगस्ट २०१६ रोजी अमर उजालामध्ये प्रसिद्ध झाली आहे. पारीसाठी हिंदीतून इंग्रजीत अनुवादः रुची वार्ष्णेय

मराठी अनुवादः मेधा काळे

Purusottam Thakur

ପୁରୁଷୋତ୍ତମ ଠାକୁର ୨୦୧୫ ର ଜଣେ ପରି ଫେଲୋ । ସେ ଜଣେ ସାମ୍ବାଦିକ ଏବଂ ପ୍ରାମାଣିକ ଚଳଚ୍ଚିତ୍ର ନିର୍ମାତା । ସେ ବର୍ତ୍ତମାନ ଅଜିମ୍‌ ପ୍ରେମ୍‌ଜୀ ଫାଉଣ୍ଡେସନ ସହ କାମ କରୁଛନ୍ତି ଏବଂ ସାମାଜିକ ପରିବର୍ତ୍ତନ ପାଇଁ କାହାଣୀ ଲେଖୁଛନ୍ତି ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ପୁରୁଷୋତ୍ତମ ଠାକୁର
Translator : Medha Kale

ମେଧା କାଲେ ପୁନେରେ ରହନ୍ତି ଏବଂ ମହିଳା ଓ ସ୍ଵାସ୍ଥ୍ୟ କ୍ଷେତ୍ରରେ କାମ କରିଛନ୍ତି । ସେ ମଧ୍ୟ PARIର ଜଣେ ଅନୁବାଦକ ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ମେଧା କାଲେ