आमच्या आजीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा सुरू झाला हा ‘देश’ ‘अंग्रेज’ लोकांच्या तावडीतून सोडवला तेव्हा. आपल्या सर्वांना हवं असलेलं स्वातंत्र्य मिळालं तिच्यासारख्या अनेकांच्या संघर्षातून. तेव्हापासूनच माझी ठाकुमा भबानी महातो (फोटोत मध्यभागी) मोठ्या संघर्षाने मिळवलेला आपला लोकशाही हक्काचं पालन करतीये. (उजवीकडे भबानी दीदांची बहीण ऊर्मिला महातो आणि डावीकडे पार्थ सारथी महातो)

यंदा २०२४ साली होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकाही याला अपवाद नाहीत. तिचं वय आज सुमारे १०६ वर्षं आहे. तब्येत अगदी नाजूक झालीये पण मतदानाच्या हक्काचा सवाल येतो तेव्हा मात्र तिच्यामध्ये वेगळाच उत्साह संचारतो. दृष्टी अजून उत्तम आहे आणि कानही अजून तिखट आहेत. पण हातातली ताकद मात्र कमी झालीये. त्यामुळे तिने माझी जराशी मदत घेतली. पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्याच्या मनबझार तालुक्यातल्या आमच्या चेपुआ गावात २५ मे रोजी मतदान होणार आहे. पण निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपुढच्या वयोवृद्ध नागरिकांना घरून मतदान करण्याची मुभा दिली असल्याने भबानी दीदाने आज (१८ मे २०२४ रोजी) चेपुआत आपल्या घरीच मतदान केलं.

निवडणूक अधिकाऱ्यांची आवश्यक ती परवानगी घेऊन मी तिला त्या सगळ्या प्रक्रियेत मदत केली. निवडणूक अधिकाऱ्यांचा चमू घरून गेला आणि तिने जुन्या काळातल्या आठवणी सांगायला सुरुवात केली. इंग्रज राजवटीत गोष्टी कशा होत्या तिथपासून ते आजच्या काळापर्यंत येत तिने तिची गोष्ट संपवली.

तिची ती सर्व कहाणी ऐकली आणि पुन्हा एकदा मला माझ्या ठाकुमाबद्दल मनात नितांत आदर दाटून आला.

क्रांतीकारी भबानी महातोंविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर पी. साईनाथ यांनी लिहिलेली भबानी महातोः क्रांतीची धगधगती चूल ही गोष्ट वाचा.

शीर्षक छायाचित्र: प्रणब कुमार महातो

Partha Sarathi Mahato

Partha Sarathi Mahato is a teacher in West Bengal's Puruliya district.

यांचे इतर लिखाण Partha Sarathi Mahato
Translator : Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

यांचे इतर लिखाण मेधा काळे