दररोज सकाळी, हिमांशी कुबल शर्ट आणि टी-शर्ट अंगावर चढवते आणि आपल्या पतीसोबत त्यांची लहानशी नाव समुद्रात घालते. आणि संध्याकाळी रंगीत साडी नेसून, केसात अबोली माळून ती बाजारात मासे साफ करून कापून देते.
आता तिशीत असलेली हिमांशी अगदी लहान असल्यापासून मासेमारी करतीये. सुरुवातीला मालवण तालुक्यातल्या नद्या आणि खाड्यांमध्ये आणि तीन वर्षांपूर्वी त्यांनी नाव विकत घेतली तेव्हापासून नवऱ्यासोबत अरबी समुद्रात ती मासे धरतीये. मालवणच्या दांडीच्या किनाऱ्यावर अगदी चपळाईने जाळं टाकू शकणाऱ्या मोजक्याच महिला मच्छीमार आहेत त्यातल्या त्या एक. या तालुक्याच्या १,११,८०७ लोकसंख्येपैकी १०,६३५ रहिवासी मासेमारीत गुंतलेले आहेत.
“मी माझ्या नवऱ्यासोबत इतर बोटींवर माशाची छाटणी करण्याचं काम करायचे,” ती सांगते. “पण तीन वर्षांपूर्वी आमची स्वतःची छोटी [इंजिन नसलेली नाव] बोट विकत घेण्याइतके पैसे जमले, आणि मग तेव्हापासून आम्ही एकत्र मासे धरायला जातो.”
जवळच, लिलावाचा आवाज येतो, “तीनशे, तीनशे दहा, तीनशे वीस!” अनेक मच्छीमार त्यांच्या बोटींमधून मासळीने भरलेले क्रेट समुद्रकिनाऱ्यावर मांडून ठेवतायत. व्यापारी आणि दलाल सगळ्यात चांगला बाजार व्हावा म्हणून या गर्दीतून वाट काढत सौदे करतायत. भटकी कुत्री, मांजरं आणि पक्षीही त्यांचा वाटा पळवतायत.
“शक्यतो, आम्ही रोज सकाळी मासे धरायला जातो.” हिमांशी सांगते. “पण जर हवा खराब असेल किंवा इतर काही कारणांनी जर आम्ही दर्यावर गेलो नाही, तर मग आम्ही बाजारात मासे कापायला आणि साफ करायला जातो. आणि रोज संध्याकाळी लिलावाला तर आम्ही आम्ही हजेरी लावतोच.”
खरं तर भारतभरात मासे धरायचं काम पुरुष करतात आणि धंद्यातल्या बाकी सगळ्या गोष्टी, म्हणजे मासेविक्री, त्याची सगळी उस्तवार हिमांशीसारख्या बाया करतात. देशभरात मासे धरून आणल्यानंतरच्या कामात गुंतलेल्या कामगारांपैकी ६६.७ टक्के स्त्रिया आहेत आणि या व्यवसायाचा अविभाज्य भाग आहेत. २०१० साली झालेल्या समुद्री मत्स्यव्यवसाय गणनेच्या नोंदी दाखवतात की मासे धरल्यानंतरच्या कामात (प्रत्यक्ष मासेमारी वगळता अन्य सगळी कामं) तब्बल ४ लाख स्त्रियांचा समावेश आहे. शिवाय, मत्स्यशेतीसाठी ‘मत्स्य बीज’ (अंडी) गोळा करण्याच्या कामात जवळपास ४०,००० स्त्रिया गुंतलेल्या आहेत.
“हे दमवणारं काम आहे – मासे खरेदी करायचे, लादून न्यायचे, बर्फात घालून साठवायचे आणि मग कापून विकायचे. आणि हे सगळं आम्ही आमच्या जोरावर करतो,” जुअनिता सांगतात (पूर्ण नाव नोंदवलेलं नाही). मासे व्यापारी असणाऱ्या, विधवा जुअनिता दांडीच्या किनाऱ्यावरच्या त्यांच्या सिमेंट-विटांच्या एका खोलीच्या घरात बसल्या आहेत. लिलावात केलेल्या खरेदीच्या पावत्या भिंतीला लटकवलेल्या एका तारेत अडकवून ठेवल्या आहेत.
जुअनितासारख्या व्यापाऱ्यांशिवाय इथले लिलाव पूर्णच होऊ शकणार नाहीत. हे व्यापारी इथे हरतऱ्हेची मासळी विकत घेतात आणि नंतर स्थानिक बाजारात किंवा जवळपासच्या छोट्या शहरांमध्ये विकतात. लिलावात घासाघीस करणं हा तर त्यांचा रोजचाच कार्यक्रम. आणि प्रत्येकीची स्वतःची अशी एक शैली ठरलेली असते – काही जणी लिलाव संपल्यानंतर ठरेल त्या सौद्याप्रमाणे पैसे द्यायचा वादा करतात पण थोडे जादा मासे टाकण्याची गळ घालतात. काही जणी लिलाव संपला की गुपचुप भाव कमी करायची (कधी कधी तर फक्त ५ रुपये सुद्धा) विनंती करतात.
मासे विकता विकता अख्खा दिवस संपतो, मासळी कमी झाल्याच्या आणि रात्रीला कोणता मासा करायचा याच्या गप्पा रंगतात. इथे मासे साफ करायचं कामही बायाच करतात. मासे धुवायचे, खवले काढायचे, पोटातली घाण काढून टाकायची आणि कापायचे. प्रत्येक मासा, एखाद्या शल्यचिकित्सकासारखा सराईतपणे कापला जातो.
“मी नववीत असताना शाळा सोडली आणि तेव्हापासून मी मासे सुकवायचं काम करतीये. पोट भरायला काय तर करायला हवं का नाय,” मालवण तालुक्याच्या देवबागमधल्या ४२ वर्षीय बेनी फर्नांडिस सांगतात. त्या महिन्याला ४,००० रुपयांची कमाई करतात. एका हातात सुकटीची पाटी खुबीने तोलत त्यांनी दुसऱ्या कडेवर त्यांच्या तान्ह्या मुलाला घेतलंय. भारतभरात मासे सुकवण्याचं कामही बहुतेक करून बायाच करतात. तळपत्या उन्हात तासंतास हे कष्टाचं काम केलं जातं. “पावसाळ्यात मासे सुकवायची कामं नसतात, मग आम्ही मिळेल ती छोटी-मोठी कामं करतो आणि भागवतो,” बेनी सांगतात.
हिमांशी, जुअनिता आणि बेनीसारख्यांची स्थिती मच्छीमार समाजातल्या अधिकच बिकट आहे असं अभ्यास दाखवतात. सध्या मासेमारीची जी गत आहे – बेमाप मासेमारी, यांत्रिक बोटींची दादागिरी, घटती मासळी, वातावरणातील बदल आणि सोबतच छोट्या मच्छीमारांना सतावणाऱ्या इतरही समस्या – या सगळ्याचा परिणाम त्यांच्यावर अधिक होतो.
आणि या धंद्यातल्या बहुतेक स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने लाभ किंवा अनुदान मिळत नाही, खरं तर त्यांचं पोटही याच धंद्यावर अवलंबून आहे, तरीही. उदाहरणार्थ, पावसाळ्यात जेव्हा मासेमारीवर बंदी असते, तेव्हा काह राज्यांमध्ये मच्छीमार कुटुंबांना सरकारकडून दरमहा काही भरपाई दिली जाते. पण मच्छीमार महिलांच्या (जिथे पुरुष मच्छीमार नाहीत) कुटुंबांना मात्र असा लाभ दिला जात नाही.
तिथे दांडीच्या किनाऱ्यावर, सूर्य कललाय, स्त्रियांची वेगळी लगबग सुरू झालीये – पोरं गोळा करायची, घरची कामं संपवायची आणि इतरही काही. सूर्य बुडाला की त्याचं कामाचं ठिकाण तेवढं किनाऱ्यावरून घर असं बदलतं.
हा लेख दक्षिण फौंडेशनसोबतच्या प्रकल्पाचा भाग म्हणून लिहिला आहे.
अनुवादः मेधा काळे