प्लॅस्टिक हे सगळ्यांना पुरून उरतं. आपण ज्या ज्या रूपात त्याची कल्पना करू त्या त्या रूपात ते असतंच, आणि जिथे बघावं तिथेही - रसत्यावर पडलेलं, पाण्यावर तरंगणारं,पोत्यांमधे भरलेलं, कचराकुंड्यांमधे टाकलेलं, आणि छपरांवर रचलेलं. आणि जेव्हा तेराव्या कंपाउंड जवळच्या खाडीजवळ, त्यातले धातूचे भाग वेगळे करायलासाठी प्लॅस्टिक जाळलं जातं तेव्हा त्यातून निघणारा घातक धूर हवेत भरून रहातो.

या रिसायकलिंग सेंटरच्या कंपाउंडमधे रोज मुंबईतून येणाऱ्या प्लॅस्टिक आणि इतर भंगार मालाचा ओघ चालूच रहातो. मुंबईत रोज १०,००० टन कचरा तयार होतो त्यातला बऱ्यापैकी कचरा ट्रक, टेम्पो आणि हातगाड्यांवरून इथे आणला जातो. ह्या सेक्टरच्या अतिशय अरुंद गल्ल्यांमधे कामगार तो ट्रकमधे चढवतात आणि उतरवतात. बहुतेक कामगार वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले स्थलांतरित तरुण आहेत.

इथे रिसायकलिंग (पुनर्वापर) करण्याच्या अनेक पायऱ्यांची प्रक्रिया छोट्या छोट्या असंख्य शेड्समधे चालू असते. त्यातल्या काही तर चार मजली असून त्यांची  इथे दाटी झाली आहे. इथली प्रत्येक वस्तू एका असेंब्लीलाईनच्या मार्गाने जाते. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे आणि एका प्रक्रियेतून दुसऱ्या प्रक्रियेकडे. या सगळ्यातून शेवटी बाहेर पडतो एक नवीन कच्चा माल किंवा एखादी तयार वस्तू.

या तेरा कंपाउंडमधल्या रिसायकलिंगच्या यंत्रणेतले सगळे भाग कसे एकमेकांशी सांधे जुळवून आहेत. खरेदी आणि विक्रीची पद्धत रुळून गेली आहे. लोक ‘कामासाठीच वापरली जाणारी भाषा’ वापरतात, आणि कामात कशानंतर काय करायचं हेही अगदी रुळून गेलं आहे, आणि प्रत्येक जण एक किंवा त्याहून अधिक विशेष असं काम करतो. रद्दीवाले (शहरभर पसरलेले) लोकांकडचा रद्दी माल गोळा करतात, भंगारवाले आणि फेरीवाले रोजचा जमलेला माल इथल्या शेड्समधे आणून टाकतात. वाहनांचे ड्रायव्हर आणि हेल्पर कांटावाल्यांकडे (वजनकाटा बाळगणारे लोक) माल उतरवतात. शिवाय गोडाऊनचे मालक असणारे शेठ असतात, त्यांनी सब-कॉन्ट्रॅक्ट दिलेले सुपरवायझर  असतात, आणि हजारो प्रकारच्या कामांमधे गुंतलेले स्त्री-पुरुष कामगार असतात.

PHOTO • Sharmila Joshi
PHOTO • Sharmila Joshi

या तेरा कंपाउंडमधल्या रिसायकलिंगच्या व्यवस्थेमधले सगळे भाग कसे एकमेकांशी सांधे जुळवून आहेत . खरेदी आणि विक्रीची पद्धत रुळून गेली आहे

विविध यंत्रांचा ‘खटाखट’ असा आवाज सारखा येत रहातो, धातू जाळून तो वितळवला जातो आणि फ़ॅक्टरीमधे वापरायसाठी धातूचे शीट तयार केले जातात. वापरलेल्या पुठ्ठ्यांच्या खोक्याचे चांगले भाग कापून त्यापासून नवे खोके बनवले जातात, जुन्या पादत्राणांचे सोल (तळ) चर्नरमधे टाकतात, जेरी कॅन स्वच्छ करून छपरांवर त्यांचा डोंगर रचला जातो. या तेराव्या कंपाउंडमधे जुने फ्रीज आणि वॉशिंग मशीन यांचा एकेक  भाग वेगळा करतात आणि त्यातलं प्लास्टिक आणि धातूचे भाग रिसायकल करायला पाठवतात. कॉम्प्युटरचे कीबोर्डसुद्धा असेच विलग केले जातात, फर्निचर सुट्टं करतात किंवा दुरुस्त करतात, तेल आणि रंगांचे जुने डबे स्वच्छ करून त्यांना नवजीवन दिलं जातं आणि त्यातले जहरी अवशेष उघड्या गटारांमधे वाहतात.

काही गोडाउन्समधे कामगार प्लॅटिक नीट तपासून दर्जा, आकार आणि प्रकारानुसार त्याचं वर्गीकरण करतात. यात बाटल्या, बादल्या, बॉक्स आणि इतरही बरंच काही असतं. ह्या वस्तू वेगळ्या वेगळ्या करून त्या स्वच्छ करतात. काही शेड्समधे त्यांच्यापासून पेलेट्स (समान आकाराच्या गोळ्या-तुकडे)  तयार केला जातात. त्यापासून पुढे हलक्या प्लास्टिकच्या वस्तू बनतात. हा सगळा माल गोण्या भरभरून  टेम्पो आणि ट्रक मधे घालून  रिसायकलिंगच्या पुढच्या टप्प्यात पाठवला जातो - या कामगारानं (कव्हर फोटोत दिसणाऱ्या) आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कदाचित हे काम नुकतंच पूर्ण केलं असेल.

तिथला एक कामगार मला म्हणाला , “असलं गाव (खेडं/ठिकाण) तुम्ही कुठे  पाहिलं आहे का? इथे तुम्हाला सगळं काही मिळतं. इथे कोणीही आलं तरी त्याला काहीतरी काम मिळतंच. दिवसाअखेरी कोणीही उपाशी रहात नाही.”

गेल्या दशकात मात्र इथली बरीच गोदामं इथून बाहेर जातायत. मुंबईच्या उत्तरेला नालासोपारा किंवा वसईमधल्या रिसायकलिंग केंद्रांमधे हलवली जातायत. याचं कारण आहे जागांची वाढती किंमत आणि ‘रिडेव्हल्पमेंट’ बद्दलची अनिश्चिती. धारावी हा मध्य मुंबईतला साधारण एक चौरस किलोमीटरवर पसरलेला भाग आहे. याचा ‘पुनर्विकास’ होण्याच्या योजना बरीच वर्षं केल्या जातायत. जेव्हा त्या अंमलात आणतील तेव्हा इथले कचऱ्यावर चालणारे रिसायकलिंगचे अनेक उद्योग आणि ते करणारे असंख्य कामगार विस्थापित होतील. गेली अनेक वर्षे इथे काम केलेल्यांना त्यांच्या शहरातल्या ‘गावातून’ दूर हटवून इथे टोलेजंग इमारती उभ्या रहातील.

अनुवादः सोनिया वीरकर

Sharmila Joshi

शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.

यांचे इतर लिखाण शर्मिला जोशी
Translator : Sonia Virkar

मुंबईस्थित सोनिया वीरकर इंग्रजी आणि हिंदीतून मराठीत अनुवाद करतात. पर्यावरण, शिक्षण आणि मानसशास्त्र हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

यांचे इतर लिखाण Sonia Virkar