‘‘ही बघा, माझी मोटर मातीत गाडली गेली होती,’’ पुराच्‍या पाण्‍यात बुडालेला आपला पंप खोदून काढताना देवेंद्र रावत म्हणतात. मध्य प्रदेशातल्‍या शिवपुरी जिल्ह्यातल्‍या सुंड गावातला हा शेतकरी. ‘‘माझी जमीन अक्षरशः वाहून गेली या पुरात. तीन पंप चिखलात रुतून बसले आहेत, विहीरही ढासळली आहे. काय करू आता मी?’’ ४८ वर्षांचे देवेंद्र सवाल करतात.

नरवर तालुक्‍यात, सिंध नदीच्‍या दोन उपनद्यांच्‍या मध्ये सुंड गाव वसलं आहे. २०११ च्‍या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ६३५. नदीला २०२१ मध्ये पूर आला तेव्‍हा गाव अक्षरशः उद्ध्वस्‍त झालं. आधी कधी असा पूर आल्‍याचं आपल्‍याला आठवत नसल्‍याचं देवेंद्र सांगतात. ‘‘या पुराने तीस बिघा (साधारण १८ एकर) जमिनीवरचं सगळं पीक वाहून नेलं. माझ्‍या कुटुंबाची सहा बिघा (साधारण ३.७ एकर) जमीन पुरात खरवडून गेली.’’

काली पहाडी गाव तर संपूर्ण पुराच्‍या पाण्‍याने वेढलेलं होतं, जणू एखादं बेटच. आता कधी जास्‍त पाऊस पडला आणि लोकांना दुसर्‍या तीराला जायचं असेल तर पाण्‍यातून पाय ओढत चालावं लागतं किंवा चक्‍क पोहत जावं लागतं.

‘‘पूर आला तेव्‍हा अख्खे तीन दिवस आमचं गाव पाण्‍याखाली होतं,’’ देवेंद्र सांगतात. सरकारने बोटी पाठवल्‍या आणि लोकांना बाहेर काढलं. दहा-बारा जण गावाबाहेर यायला तयार झाले नाहीत. ते गावातच राहिले. जे गावकरी बोटीतून गावाबाहेर पडले त्‍यापैकी काहींनी जवळच असणार्‍या बाजारपेठेत आसरा घेतला आणि काही जण जवळच्‍या गावांमध्ये राहाणार्‍या आपल्‍या नातेवाईकांकडे निघून गेले. पूर आला तेव्‍हा गावातली वीज गायब झाली. ती यायला एक महिना लागला. देवेंद्रना हे सगळं लख्ख आठवतंय.

PHOTO • Rahul

सुंडचे रहिवासी देवेंद्र रावत २०२१ च्‍या पुरात मातीत रुतलेली मोटर बाहेर काढण्याचा आटापिटा करतायत

२०२१ मध्ये १४ मे ते २१ जुलै या काळात पश्‍चिम मध्य प्रदेशमध्ये सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्‍के कमी पाऊस पडला असं भारताच्‍या हवामान खात्‍याकडची नोंद सांगते.

मात्र आठवड्याभरानंतर, २८ जुलै ते ४ ऑगस्‍ट या काळात सरासरीपेक्षा ६० टक्‍के अधिक पाऊस झाला. मरिखेरा इथे असलेलं अटल सागर आणि नरवरचं मोहिनी या सिंध नदीवरच्‍या दोन मोठ्या धरणांमध्ये पाण्‍याचा लोंढा आला. प्रशासनाने या दोन्ही धरणांचे दरवाजे उघडले आणि सुंड पाण्‍याखाली गेलं. ‘‘धरणांचे दरवाजे उघडण्‍याशिवाय आमच्‍याकडे काही पर्यायच नव्‍हता, नाहीतर पाण्‍याच्‍या दबावाने धरण फुटलं असतं. २ आणि ३ ऑगस्‍ट २०२१ या दोन दिवशी प्रचंड पाऊस पडला आणि त्‍यामुळे अशी परिस्‍थिती निर्माण झाली,’’ अटल सागर धरणाचे उपविभागीय अधिकारी (सब डिव्‍हिजनल ऑफिसर - एसडीओ) जी. एल. बैरागी सांगतात.

मध्य प्रदेशात जेव्‍हा जेव्‍हा भरपूर पाऊस पडतो, तेव्‍हा सगळ्यात जास्‍त पूर येतो तो सिंध नदीला. ‘‘सिंध ही गंगेच्‍या खोर्‍यातली नदी आहे, पण ती हिमालयात उगम पावत नाही. ती दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते. तिच्‍यातलं पाणी हे बरंचसं पावसाचंच पाणी असतं,’’ बिपीन व्‍यास सांगतात. भोपाळच्‍या बरकतउल्‍ला विद्यापीठातल्‍या जैवविज्ञान विभागात ते प्राध्यापक आहेत.

या पुरामुळे पीकचक्रावरही परिणाम झाला. ‘‘आमची भातं आणि तीळ पूर्ण पाण्यात गेले. या वर्षी आम्हाला गव्‍हाचं पीकही नीट घेता आलं नाही,’’ देवेंद्र सांगतात. सिंधच्‍या खोर्‍यात मोठ्या प्रमाणात मोहरीचं पीक घेतलं जातं. या पुरानंतर सुंडमधल्‍या बर्‍याच शेतकर्‍यांनी मोहरी पेरायला सुरुवात केली.

PHOTO • Rahul
PHOTO • Aishani Goswami

डावीकडे: पुरात उद्‌ध्वस्‍त झालेल्‍या आपल्‍या शेतात देवेंद्र आणि रामनिवास (मध्ये). उजवीकडे: रामनिवास (पांढर्‍या शर्टात) म्हणतो, ‘ वातावरणातले बदल, प्रचंड पाऊस आणि पूर यामुळे आमच्‍या पिकांचं सतत नुकसान होतं’

हवामान बदलामुळे पिकांचं सतत नुकसान होतंय. त्‍याबद्दल बोलताना देवेंद्रचा पुतण्‍या रामनिवास म्हणतो, ‘‘वातावरणातले बदल, प्रचंड पाऊस आणि पूर यामुळे आमच्‍या पिकांचं सतत नुकसान होतं. प्रचंड उष्णतेमुळे पिकं करपून जाण्‍याचा धोकाही सतत असतोच.’’

पुरानंतर गावाच्‍या नोंदी ठेवणारा पटवारी आणि सरपंच, कोणाचं किती नुकसान झालंय ते पाहायला आले होते. त्‍यांनी नुकसानभरपाई मिळवून देण्‍याचं आश्‍वासनही दिलं होतं.

‘‘माझी भातं गेली, त्‍यासाठी मला एका बिघ्याला २,००० रुपये या दराने नुकसानभरपाई मिळाली,’’ देवेंद्र सांगतात. ‘‘पण पुराने आमचं पीक वाहून गेलं नसतं तर आम्हाला किमान तीन ते चार लाख रुपये फायदा झाला असता,’’ देवेंद्रच्‍या सांगण्‍याला रामनिवास जोड देतो.

देवेंद्रचं कुटुंब संपूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. लॉकडाऊनमुळे पिकांचे बाजारभाव खूप कमी झाले होते. कोरोनाकाळापासून या कुटुंबाची परिस्‍थिती बिघडत गेली आहे. २०२१ मध्ये देवेंद्रची मुलगी आणि पुतणी, दोघींचं लग्‍न झालं. ‘‘कोरोनामुळे सगळंच महाग झालं होतं खरं तर. पण दोघींची लाग्‍नं आधीच ठरली होती, आमच्‍याकडे पर्यायच नव्‍हता दुसरा,’’ देवेंद्र स्‍पष्‍टीकरण देतात.

मग ऑगस्‍ट २०२१ मध्ये ध्यानीमनी नसताना पूर आला आणि हे कुटुंब जास्त हलाखीत ढकललं गेलं.

PHOTO • Aishani Goswami
PHOTO • Rahul

डावीकडे: २०२१च्‍या पुरामध्ये सिंध नदीकाठावरची खूप झाडं पडली. उजवीकडे : नरवरचं मोहिनी धरण

*****

इंदरगढ तालुक्‍यात सिंध नदीच्‍या काठावर असलेल्‍या तिलैथा गावात राहाणारे साहब सिंग रावत आपल्‍या शेताकडे बोट दाखवत सांगतात, ‘‘बिगरमोसमी पावसाने साडेबारा बिघा (साधारण ७.७ एकर) जमिनीत लावलेला आमचा ऊस उद्‌ध्वस्‍त केला.’’ २०२१ च्‍या हिवाळ्यात दातिया जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडला. त्‍यामुळे पिकांचं नुकसान तर झालंच, पण वित्तहानीही बरीच झाली, असं इथले शेतकरी सांगतात.

सुंड गावातली घरं उंचावर आहेत, त्‍यामुळे ती वाचली. पण काली पहाडी गावातल्‍या सुमित्रा सेन आपण कसे सतत पाण्‍याची पातळी मोजत होतो ते विसरलेल्या नाहीत. पाणी वाढलंच तर झर्रकन डोंगरावर पळण्‍यासाठी पाच किलो धान्‍य भरलेली एक पिशवी त्‍यांनी तयार ठेवली होती.

पंचेचाळीस वर्षांच्‍या सुमित्रा सेन मजुरी करतात. जवळच्‍या शाळेत स्वयंपाकाचं काम करतात. त्‍यांचे पती, पन्‍नाशीचे धनपाल सेन अहमदाबादला एका छोट्या कारखान्‍यात गेली दहा वर्षं काम करतायत. त्‍यांचा धाकटा मुलगा, सोळा वर्षांचा अतिंद्र सेनही तिथेच काम करतो. जातीने नाई म्हणजेच नाभिक असलेल्‍या सुमित्रा यांना सरकारकडून बीपीएल, म्हणजे दारिद्र्यरेषेखालील असल्‍याचं कार्ड मिळालं आहे.

सेओंधा तालुक्‍यातल्‍या मदनपुरा गावातल्‍या विद्याराम बाघेल यांची पुरात तीन बिघा (अंदाजे २ एकर) जमीन वाहून गेली आहे. ‘‘बोटभरही पीक राहिलं नाही शेतात. आणि आता तर शेतात संपूर्ण वाळूचा थर पसरला आहे,’’ तो म्हणतो.

PHOTO • Rahul
PHOTO • Rahul
PHOTO • Rahul

डावीकडे: बिगरमोसमी पावसाने साहिब सिंग रावत यांचा ७.७ एकरातला ऊस उद्‌ध्वस्‍त केला. मध्ये: पाणी वाढलं  आणि घर सोडावं लागलं तर, म्हणून सुमित्रा सेनने पाच किलो धान्‍य भरलेली पिशवी तयार ठेवली होती. उजवीकडे: विद्याराम बाघेल यांच्‍या शेतात वाळूचा थर पसरला होता

*****

खूप खर्च होतो आहे म्हणून सरकार सिंध नदीवर पूल बांधायला तयार नाही असं सुंडच्‍या गावकर्‍यांचं म्हणणं आहे. गावात जवळपास ७०० बिघा (अंदाजे ४३३ एकर) शेतजमीन आहे आणि ती सगळी गावकर्‍यांच्‍याच मालकीची आहे. रामनिवास म्हणतो, ‘‘आम्ही दुसरीकडे कुठे राहायला गेलो तरी जमीन कसण्‍यासाठी आम्हाला इथे यावंच लागेल.’’

हवामान बदल होऊ दे, जोरदार पाऊस पडू दे, की प्रचंड पूर येऊ दे… इथून हलायचंच नाही, असं देवेंद्रच्‍या कुटुंबाने ठरवून टाकलंय. ‘‘आम्ही गावकरी आमचं गाव सोडणार नाही. आता आमच्याकडे जितकी जमीन आहे, तेवढीच दुसरीकडे दिली, तरच आम्ही स्‍थलांतर करण्‍याचा विचार करू,’’ देवेंद्र सगळ्यांच्‍या वतीने सांगतात.

Rahul

Rahul Singh is an independent reporter based in Jharkhand. He reports on environmental issues from the eastern states of Jharkhand, Bihar and West Bengal.

यांचे इतर लिखाण Rahul
Aishani Goswami

Aishani Goswami is a water practitioner and architect based in Ahmedabad. She has a Masters in Water Resource Engineering and Management and studies rivers, dams, floods and water.

यांचे इतर लिखाण Aishani Goswami
Editor : Devesh

देवेश एक कवी, पत्रकार, चित्रकर्ते आणि अनुवादक आहेत. ते पारीमध्ये हिंदी मजकूर आणि अनुवादांचं संपादन करतात.

यांचे इतर लिखाण Devesh