पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्याच्या खडकवाडीच्या मुक्ताबाई उभे नऊ ओव्या गातात, पोटापाण्याच्या शोधात दूरदेशी गेलेल्या आपल्या पतीसाठी पत्नीच्या मनात असलेली आस आणि प्रेमाने ओथंबलेल्या या ओव्या
अवंदाचं साल नाही आलं पीकपाणी
दूर देसी गेला बाई माझा घरधनी
दूर देसी गेला मला एकली टाकून
तिथं जीव लावायला नाही त्याला कोण
“आठवतंय की या ओव्या गायलेल्या, किती वर्षं झाली,” यंदा एप्रिलच्या शेवटी शेवटी फोनवर बोलताना मुक्ताबाई उभे म्हणाल्या. पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या खडकवाडीच्या मुक्ताबाई उभेंनी १९९६ साली मूळच्या जात्यावरच्या ओव्या प्रकल्पासाठी या ओव्या गायल्या होत्या.
सध्याच्या कोविड-१९ महामारी आणि टाळेबंदीच्या काळात वीस वर्षांपूर्वी गायलेल्या या ओव्यांमधून भारतभरातल्या स्थलांतरितांचे, आपलं कुटुंब गावी सोडून दूर देशी गेलेल्यांचे अनुभव ऐकायला मिळतात. या ओव्यांमधल्या दूरदेशी गेलेल्या धन्यासारखेच हे स्थलांतरित कामगारही गावाकडचं आपलं घर सोडून कोसो दूर कामाच्या शोधात शहरात येऊन पोचले होते.
१९८० च्या आधी, विजेवर, डिझेलवर चालणाऱ्या गिरण्या यायच्या आधी भारतातल्या गावोगावी बाया रोज जात्यावर दळणं करायच्या. दोघी-तिघी मिळून स्वयंपाकघरात, किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात, त्यांच्या स्वतःच्या खाजगी अशा जगात दळणं करताना ओव्या गायल्या जायच्या. इतरांच्या नजरा आणि समाजाची बंधनं विसरून त्या मुक्तपणे स्वतःच्या भावनांना वाट करून द्यायच्या. जात्याची घरघर आणि बांगड्यांची किणकिण या दोन्ही नादांच्या तालात साध्या, सरळ यमक जुळणाऱ्या या ओव्या रचल्या जायच्या.
मुक्ताबाईंचं लवकर वयातच लग्न झालं आणि सासूकडून त्या ओव्या शिकल्या. या ओव्यांमधून आपल्या धन्याबद्दल – कामासाठी दूरदेशी गेलेल्या या श्रमिकाबद्दल - वाटणारं प्रेम आणि आस व्यक्त होते. १९९६ मध्ये त्यांनी या ओव्या गायल्या तेव्हा त्या ४० वर्षांच्या होत्या.
आता वयाची ६४ वर्षं पूर्ण केलेल्या मुक्ताबाई ओवीतल्या काही गोष्टींबद्दल दिलखुलास हसतात. पतीच्या डोळ्यातलं मोत्याचं पाणी आणि जवसाच्या फुलासारखी काया याविषयी मी त्यांच्याशी बोलत होते. “मी जवसाची फुलंच पाहिली नाहीत कधी,” मुक्ताबाई सांगतात, “पण या ओवीत ही सुवासिन तिच्या धन्याचं किती प्रेमानं कौतुक करते.”
आम्ही सध्याची महामारी आणि टाळेबंदीबद्दलही बोललो. “कोरोनामुळे सगळं बंद पडलंय. आम्ही दोघं आमच्या शेतात थोडं फार काम करतो, पर आता दोघांचं वय झालंय. जमेल तसं करायचं,” त्या म्हणाल्या. त्या आणि सत्तरीच्या उंबरठ्यावर आहेत त्यांचे पती गुलाबभाऊ उभे यांची कोळावडे गावाची वाडी असणाऱ्या खडकवाडीत दोन एकर जमीन आहे. त्यांचा मुलगा अमोल त्यांच्या गावापासून २० किलोमीटरवर असलेल्या उरावडे गावात गाड्यांचे सुटे भाग बनवणाऱ्या कारखान्यात काम करतो. मार्चमध्ये टाळेबंदी जाहीर झाली तेव्हा तो घरी होता पण ४ मे रोजी त्याला कामावरून बोलावणं आलं. मुक्ताबाईंच्या तिघी मुलींची लग्नं झालीयेत आणि त्या पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या गावी राहतात.
मुक्ताबाई त्यांच्या गावातल्या बचत गटाच्या अध्यक्ष आहेत. “कसं झालंय, माझ्यासारखंच गावातल्या बहुतेक बायांना घरातलं अन् रानातलं काम करून वेळच राहत नाही. मी नुस्ते पैसे गोळा करते, बँकेत टाकते. बाकी या पदाचा काही फायदा नाही – नुस्तं नावाला अध्यक्ष,” त्या म्हणतात.
तीन वर्षांपूर्वी पारी-जीसपीचे आम्ही काही जण कोळावड्याला गेलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्यांना पुस्तकं वाचायला फार आवडतं. “मी रणजित देसाईंची श्रीमान योगी आणि पांडव प्रताप हरी आन् इतर धार्मिक पुस्तकं वाचलीयेत,” त्या म्हणाल्या होत्या.
आम्ही त्यांना आणि इतर पाच जणींना खडकवाडीच्या राम मंदिराच्या सभामंडपात भेटलो होतो. मंडपाच्या तिन्ही बाजूंनी येणाऱ्या हवेमुळे एप्रिल महिन्यातला भर उन्हाळ्यातला उष्मा जरा सुसह्य होत होता. आंब्याने लखडलेली झाडं वाऱ्यावर डुलत होती. जमलेल्या बायांनी उन्हाची काहिली आणि पावसाची प्रतीक्षा याबद्दलच्या काही ओव्या गायल्या होत्या. पारीवर या ओव्या – उन्हाळ्याची सात गाणी आणि मुळशीची सहा पाऊसगाणी या लेखांमध्ये प्रसिद्ध केल्या आहेत.
कोळावड्याच्या एकूण २५ बायांनी स्व. हेमा राईरकर आणि गी प्वातवाँ यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या जात्यावरच्या ओव्या प्रकल्पाच्या मूळ चमूसाठी १,२६५ ओव्या गायल्या होत्या. ६ जानेवारी १९९६ रोजी ध्वनीमुद्रित केलेल्या मुक्ताबाई उभेंनी गायलेल्या ५३ ओव्यांपैकी या नऊ ओव्या सादर करत आहोत.
पहिल्या ओवीमध्ये सुवासीन आपल्या घरच्या देवाची पूजा करतीये आणि आपल्या कुंकवाला म्हणजेच आपल्या पतीला आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करतीये. दुसऱ्या ओवीत ती पिंपळाच्या पाराचं पूजन करते आणि विष्णुनारायणाकडे संसार सुखाचा होऊ दे अशी प्रार्थना करते. तिसऱ्या ओळीमध्ये ती म्हणते की पहाटेच्या प्रहरी सुखदेव घरावर आला आणि पहाटेचा वारा तिच्या अंगाला झोंबू लागलाय.
चौथ्या आणि पाचव्या ओळीमध्ये ती म्हणते की यंदा साली चांगलं पिकलं नाही त्यामुळे तिचा पती कामाच्या शोधात दूर देशी गेलाय. तिथे त्याची काळजी घ्यायला कुणी नाही. पतीबद्दल असलेलं गहन प्रेम आणि त्याची आस या ओव्यांमधून व्यक्त होते.
सहाव्या, सातव्या आणि आठव्या ओवीत ती तिच्या लाडक्या धन्याची आठवण काढते आणि त्याचं वर्णन करते. त्याच्या डोळ्यांना मोत्याचं पाणी किंवा तेज आहे, त्याची काया जवसाच्या फुलासारखी निळीभोर आहे. (अनेक ओव्यांमध्ये कृष्णाच्या कायेचं वर्णन करण्यासाठी जवसाच्या फुलांची उपमा वापरली जाते.) धुतलेल्या तांदळासारखे त्याचे दात आहेत. त्याच्याशिवाय ती व्याकूळ झालीये. त्याला आवडणारा हुळा भाजून ठेवलाय पण त्याने उशीर केल्याने तोही आता वाळून चाललाय.
शेवटच्या ओवीत ती त्याला परतून येण्यासाठी आर्त साद घालतेः “कवासिक याल माझ्या कुडीतल्या जीवा? कवासिक याल माझ्या देवाच्या बी देवा?” पती हा पूजलेल्या देवाहूनही मोठा असल्याचंच या ओवीत गायलंय.
या नऊ ओव्या ऐकाः
सुवासिन पूजते मी घरच्या देवाला
आयुष्य मागते मी माझ्या कुंकवाला
सुवासिन पूजिते मी पिंपळाचा पार
विष्णुनारायण देवा सुखाचा संसार
झुंजुमुंजु झालं सुखदेव वाड्या आला
पहाटंचा वारा कसा झोंबत अंगाला
अवंदाचं साल नाही आलं पीक पाणी
दूर देसी गेला बाई माझा घरधनी
दूर देसी गेला मला एकली टाकून
तिथं जीव लावायला नाही त्याला कोण
राया डोळ्यामंदी तुझ्या मोतियाचं पाणी
राया तुझा रंग जवसाच्या फुलावाणी
राया तुझं दात जसं धुतलं तांदूळ
तुझ्या बिगर रे मला भरलं व्याकूळ
तुला आवडीते हुळा भाजून ठेविला
काय सांगू बाई सारा वाळून चालला
कवासिक याल माझ्या कुडीतल्या जीवा
कवासिक याल माझ्या देवाच्या बी देवा
कलावंतः मुक्ताबाई उभे
गावः खडकवाडी
तालुकाः मुळशी
जिल्हाः पुणे
जातः मराठी
व्यवसायः शेती
दिनांकः या ओव्या आणि सोबतची माहिती ६ जानेवारी १९९६ रोजी संकलित करण्यात आली. छायाचित्रं ३० एप्रिल २०१७ आणि ८ मे २०२० रोजी घेण्यात आली.
पोस्टर - सिंचिता माजी
अनुवादः मेधा काळे