या कच्च्या पायवाटा कित्येक किलोमीटर पसरल्या आहेत. या वाटेने सौरामधील रुग्णालयापर्यंतचा प्रवास म्हणजे दरवेळी युद्धाचा प्रसंग. मुबिना आणि अर्शिद हुसैन अखून यांना आपला मुलगा मोहसीन याच्या वैद्यकीय तपासणीसाठी महिन्यातून किमान एकदा तरी रुग्णालयात जावं लागतं. अर्शिद आपल्या नऊ वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन राख-ए-अर्थ पुनर्वसन वसाहतीतील सांडपाणी आणि वितळत्या बर्फाने ओसंडून वाहणाऱ्या वाटा तुडवतात.
२-३ किलोमीटर पायपीट केल्यावर त्यांना सहसा ऑटोरिक्षा मिळतो. तो रू. ५०० सवारीने त्यांना अंदाजे १० किमी लांब असलेल्या उत्तर श्रीनगरच्या सौरा वस्तीतील शेर-ई-काश्मीर वैद्यकीय विज्ञान संस्थानात नेऊन परत आणतो. कधीकधी या कुटुंबाला रूग्णालयापर्यंतचं अख्खं अंतर पायी चालत जावं लागतं – खासकरून मागील वर्षीच्या टाळेबंदी दरम्यान त्यांच्यावर ही वेळ आली होती. "अख्खा दिवस निघून जातो," मुबिना म्हणते.
सुमारे नऊ वर्षांपूर्वी मुबिना आणि अर्शिद यांचं जगच बदलून गेलं. २०१२ मध्ये मोहसीन जेमतेम काही दिवसांचा होता तेव्हा त्याला ताप आला आणि कावीळ झाली, आणि त्याच्या शरीरातील बिलीरुबिनची पातळी प्रचंड वाढली. नंतर लागोपाठ डॉक्टरांच्या वाऱ्या झाल्या. दोन महिने तो श्रीनगरमधील शासकीय जी. बी. पंत बाल रुग्णालयात होता. अखेर त्यांना कळवण्यात आलं की त्यांचा मुलगा 'ॲबनॉर्मल' आहे.
"त्याच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती तेव्हा त्याला आम्ही एका खासगी डॉक्टरकडे घेऊन गेलो ज्यांनी आम्हाला सांगितलं की त्याचा मेंदू पूर्णपणे खराब झाला असून त्याला कधीच उठता-बसता येणार नाही," तिशितली मुबिना आठवून सांगते.
कालांतराने मोहसीनला सेरेब्रल पाल्सी असल्याचं निदान झालं. तेव्हापासून मुबिनाचा बहुतांश वेळ आपल्या मुलाची देखरेख आणि आजारपण करण्यात जातो. "मला त्याची लघवी साफ करावी लागते, त्याची गादी, कपडे धुवावे लागतात आणि त्याला बसवावं लागतं. तो दिवसभर माझ्या मांडीत बसून राहतो," ती म्हणते.
२०१९ मध्ये ते राख-ए-अर्थ पुनर्वसन वसाहतीत आले. भेगाळलेल्या भिंती आणि अर्धवट छप्पर असलेल्या भकास काँक्रिट बांधकामात येण्यापूर्वी त्यांच्या अडचणी काहीशा कमी होत्या.
ते पूर्वी दल लेकच्या मीर बेहरी वस्तीत राहायचे. "महिन्याचे १० ते १५ दिवस मी दल लेकमध्ये गवत कापायची," ती म्हणते. त्यातून चटया तयार करून ती स्थानिक बाजारात प्रत्येकी रू. ५० ला विकायची. ती सरोवरातून कमळ खुडून महिन्यातून १५ ते २० दिवस रोज चार तास काम करून आणखी रू. ३०० कमवायची. अर्शिद (हंगामात) महिन्याचे २०-२५ दिवस शेतमजुरी करून दिवसाला रू. १,००० रोजी कमवायचे, आणि मंडईत भाज्या विकून दिवसाला कमीत कमी रू. ५०० नफा कमवायचे.
कुटुंबाची मासिक आवक चांगली असल्यामुळे त्यांचं नीट भागत होतं. आणि मीर बेहरीहून मोहसीनकरिता रुग्णालयात आणि डॉक्टरांना भेटायला जाणं सहज शक्य होतं.
"पण मोहसीनचा जन्म झाल्यापासून मी काम करणं बंद केलं," मुबिना म्हणते. "मग माझी सासू म्हणाली की मी नुसती मोहसीनच्या काळजीत असते आणि तिला घरकामात मदत करायला माझ्याकडे वेळ नसतो. आम्हाला तिथे [मीर बेहरी] ठेवून तरी काय करणार?"
म्हणून मुबिना आणि अर्शद यांच्यावर वेगळं होण्याची वेळ आली. त्यांनी जवळच एक छोटं टिनशेड उभारलं. सप्टेंबर २०१४ च्या पुरात ते वाहून गेलं. मग ते अधूनमधून नातेवाइकांकडे राहू लागले आणि मधल्या काळात तात्पुरतं छप्पर उभारून राहायचे.
दर वेळी मोहसीनच्या नियमित तपासणी आणि औषधांसाठी डॉक्टर आणि रुग्णालय तर आवाक्यात होते.
२०१७ मध्ये मात्र जम्मू आणि काश्मीर सरोवर व जलमार्ग विकास प्राधिकरणाने दल लेक परिसरात एक 'पुनर्वसन' मोहीम राबवली. अधिकाऱ्यांनी अर्शिदचे वडील गुलाम रसूल अखून यांची भेट घेतली. ते वयाच्या सत्तरीत आहेत, आणि सरोवरातील बेटांवर शेती करतात. त्यांनी येथून जवळपास १२ किमी लांब असलेल्या बेमिना वस्तीतील राख-ए-अर्थ या नव्या पुनर्वसन वसाहतीमध्ये साधारण २,००० चौरस फूट भूखंडावर एक घर बांधण्यासाठी अंदाजे रू. १ लाखांचा प्रस्ताव स्वीकारला.
"माझे वडील म्हणाले की ते जाणार आहेत आणि मी एक तर त्यांच्यासोबत येऊ शकतो किंवा आहे तिथेच राहू शकतो. तोवर - २०१४ मध्ये - आमच्या दुसऱ्या मुलाचा – अलीचा – जन्म झाला. मी त्यांच्यासोबत यायला राजी झालो. त्यांनी आम्हाला आपल्या [राख-ए-अर्थ] मधील घरामागे एक छोटी जागा दिली जिथे आम्ही आम्हा चौघांसाठी एक झोपडी बांधली," अर्शिद म्हणतात.
ही गोष्ट २०१९ मधील आहे आणि अखून कुटुंबाप्रमाणे आणखी जवळपास १,००० कुटुंब या दुर्गम वसाहतीत राहायला आले, जिथे ना शाळा होती ना रुग्णालये, आणि कामाच्या संधीदेखील नाही – फक्त पाणी आणि वीज तेवढी मिळायची. "आम्ही [तीनपैकी] पहिल्या समूहाचा आणि ४,६०० प्लॉटचा विकास केलाय. आतापर्यंत, २,२८० कुटुंबांना प्लॉट मिळाले आहेत," प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तुफैल मट्टू म्हणतात.
रोजंदारी शोधायला अर्शिद राख-ए-अर्थहून तीन किलोमीटर लांब एका मजूर नाक्यावर जातात. "पुष्कळ जण तिथे सकाळी ७ वाजता येतात," ते म्हणतात, "आणि दुपारपर्यंत काम मिळण्याची वाट पाहतात. मला सहसा बांधकामाच्या ठिकाणी दगडं उचलण्याचं काम मिळतं." पण हे काम रू. ५०० रोजीवर महिन्याचे १२-१५ दिवसच मिळतं, आणि दल लेकवर राहत असताना या कुटुंबाला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा पुष्कळ कमी आहे.
अर्शिद म्हणतात की काम मिळालं नाही तर ते आपल्या बचतीतून भागवून नेतात. "पैसे नसले की, आम्ही मोहसीनला इलाज करायला घेऊन जाऊ शकत नाही."
राख-ए-अर्थ मध्ये केवळ एकच उप-केंद्र आहेत ज्यात फक्त मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या असंसर्गजन्य आजारांची चाचणी, आणि मुलांचं लसीकरण व गर्भवती स्त्रियांकरिता प्रसतीपूर्व तपासण्या इतक्याच सेवा उपलब्ध आहेत, श्रीनगरच्या बाटामालू प्रांताच्या विभागीय आरोग्य अधिकारी, डॉ. समीना जान म्हणतात. ही पुनर्वसन वसाहत या प्रांतात आहे.
राख-ए-अर्थ मध्ये एक आरोग्य केंद्र आणि एक रुग्णालय बांधण्यात येतंय, आणि "बांधकाम पूर्ण झालं असून ते लवकरच सुरू होईल," तूफैल मट्टू म्हणतात. "आतापर्यंत उपकेंद्रातील केवळ एक दवाखाना सुरू झालाय. दिवसातून काही तास एक डॉक्टर येत असतो." म्हणून आपत्कालीन परिस्थितीत लोकांना इथून १५ किलोमीटर लांब असलेल्या पांथा चौकातील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावं लागतं. किंवा, अखून कुटुंबाप्रमाणे त्यांना सौरा येथील रुग्णालयात जावं लागतं.
ते या वसाहतीत राहायला आल्यापासून मुबिनाची स्वतःची तब्येत खालावली आहे आणि तिला चकरा येतात. "मुलगा आजारी असतो, म्हणून मलाही खूप कष्ट पडतात," ती म्हणते. "त्याचे ना हात काम करत, ना पाय, ना डोकं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी त्याला मांडीत घेऊन बसते. दिवस मावळतो तसं सगळं अंग दुखायला लागतं. त्याचा विचार अन् काळजी करून करून मी आजारी पडते. डॉक्टरकडे गेलं की ते मला उपचार अन् आणखी चाचण्या करून घ्यायला सांगतात. माझ्याकडे स्वतःचा इलाज करून घ्यायला १० रुपये पण नाहीत."
तिच्या मुलाच्या नियमित औषधांचा खर्च दर खेपेला रू. ७०० एवढा असून ती १० दिवस पुरतात. वारंवार येणारा ताप, अल्सर आणि खाजेची काळजी घेण्यासाठी त्याला जवळपास दर महिन्याला रुग्णालयात न्यावं लागतं. जम्मू आणि काश्मीर इमारत व अन्य बांधकाम कामगार कल्याण मंडळाने जारी केलेल्या लेबर कार्डवर हे उपचार पूर्णतः मोफत मिळायला हवे, कारण अर्शिद यांना त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांसाठी दर वर्षी रू. १ लाखांपर्यंतचे वैद्यकीय लाभ मिळतात. पण कार्ड वैध ठेवण्यासाठी त्यांना वर्षाला एक माफक शुल्क भरावं लागतं, आणि त्याकरिता नूतनीकरण करते वेळी ९० दिवसांचं रोजगार प्रमाणपत्र सादर करावं लागतं. अर्शिद काही हे नियमितपणे करू शकलेले नाहीत.
"इतर मुलांसारखं मोहसीनला कधीच चालणं, शाळेत जाणं, खेळणं किंवा हालचाल करणं जमणार नाही," जी. बी. पंत रुग्णालयाचे डॉ. मुदासिर राठर म्हणतात. डॉक्टर केवळ संसर्ग, अपस्मार आणि इतर स्वास्थ्य समस्यांची काळजी घेण्यासाठी पूरक उपचार, आणि स्नायू ताठ होण्याच्या समस्येसाठी फिजिओथेरपी करू शकतात. "सेरेब्रल पाल्सी हा बरा न होणारा मेंदूचा आजार आहे," श्रीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. आसिया अंजुम सांगतात. "नवजात बालकाला होणाऱ्या काविळाचा वेळीच उपचार झाला नाही, तर ही अवस्था होऊ शकते. त्यामुळे मेंदूला इजा, गतिविभ्रम, स्नायूंची ताठरता किंवा मतिमंदत्व येऊ शकते."
कामाचा शोध आणि डॉक्टरांच्या वाऱ्या करणारे मुबिना आणि अर्शिद आपला बहुतांश वेळ आणि पैसा मोहसीनची काळजी घेण्यात आणि लहान मुलाचा सांभाळ करण्यात खर्च करतात. सात वर्षांचा अली तक्रार करतो, "ती बयाला [दादा] सारखी आपल्या मांडीवर घेऊन बसते. मला कधीच नाही." त्याला आपल्या भावाशी जुळवून घेता येत नाही कारण "तो माझ्याशी बोलत नाही, खेळत नाही आणि त्याला मदत करायला मी अजून लहान आहे."
अली शाळेत जात नाही. "बाबांकडे पैसे नाहीत, मी शाळेत कसा जाणार?" तो विचारतो. शिवाय, राख ए अर्थ मध्ये शाळा नाहीत. प्राधिकरणाने आश्वासन दिलेली शाळा अजून अर्धवट बांधली आहे. सर्वांत जवळची सरकारी शाळा दोन किलोमीटर लांब बेमिनामध्ये आहे, आणि तीही मोठ्या मुलांकरिता.
"राख ए अर्थ मध्ये येऊन सहा महिने होत नाहीत तर आम्हाला कळून चुकलं की इथे फार काळ राहता येणार नाही. इथली अवस्था फारच बेकार आहे. आमच्याकडे मोहसीनला रुग्णालयात घेऊन जायला वाहतुकीचं साधनही नाही. आणि [त्याकरिता] आमच्याकडे पैसे नसले की मोठी अडचण होते."
"इथे काही कामच नाहीये," अर्शिद म्हणतात. "आम्ही काय करावं? मी एक तर काम शोधीन किंवा कर्ज घेईन. आमच्याकडे दुसरा उपाय नाही."
अनुवाद: कौशल काळू