“गधे का दूध, बच्चा मजबूत,” माझ्या कानावर पुकारा आला. मी वळून पाहिलं आणि चमकलेच.
तिथे सुखदेव उभे होते आणि काजोल, मान डोलावत, निःशब्द. तिने तोंडातून आवाजही काढला नाही. त्यांच्या बाजूने शांतपणे ती चालत होती.
मी पुरती चक्रावले असले तरी मालाडच्या रस्त्यावरच्या कुणी सुखदेव यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. काजोलच्या गळ्यात बांधलेली दोरी एका हातात आणि कधी कधी तिला सरळ चालण्यासाठी म्हणून रस्त्यावर आपटायची काठी दुसऱ्या हातात असे सुखदेव चालले होते.
कधी कधी आठ वर्षांच्या काजोलऐवजी, आठ वर्षांचीच असलेली राणी त्यांच्यासोबत घरोघरी फिरत असते. गाढविणीच्या दुधाचे गोडवे सुखदेव यांच्या तोंडून ऐकत. त्या दिवशी राणी आपल्या घरी म्हणजेच मालाड पूर्वमधल्या अप्पापाडा वस्तीत होती. आणि तिच्यासोबत होतं काजोलचं पाच महिन्याचं शिंगरू. दोन वर्षांची लंगडीदेखील घरीच होती. तिचा मागचा उजवा पाय जन्मतःच अधू होता.
त्यांच्यासोबत सुखदेवच्या कुटुंबाच्या मालकीच्या आणखी सहा गाढविणी होत्या – त्यांचा भाचा रामदासच्या मालकीची मुडा आणि थोरला भाऊ वामनच्या मालकीच्या पाच, पण त्यांची विशिष्ट अशी नावं नाहीत.
सुखदेव “सिनेमासाठी पागल” असल्याचं त्यांच्या पत्नी जयश्री सांगतात. त्यामुळे त्यांच्या गाढविणींची नावं शक्यतो सिनेमातल्या तारेतारकांवरनंच ठेवली जातात – पूर्वी एक माधुरी दीक्षित देखील होती म्हणे.
उत्तर मुंबईच्या उपनगरांमध्ये टेकडीवरती ही सगळी माणसं आणि गाढवं गुण्यागोविंदाने एकत्र नांदतायत. खचाखच भरलेल्या झोपड्यांमध्ये माणसं आणि शेजारीच खांबांना रस्सीने बांधलेली गाढवं. शेजाऱ्या पाजाऱ्यांना काही त्यांचा त्रास असल्याचं दिसत नाही. “आम्ही इथे आलो त्याच्या फार आधीपासून ते इथे आहेत,” याच पाड्यावर राहणारा साहिल सांगतो.
या शिंगराचा बाप म्हणजे राजा, तो सारखा पळून जायचा आणि लोकांना धक्के मारायचा. “तो लई मस्ती करायचा, गाढविणींना आपल्यामागं पळवायचा, रस्त्याने चालणाऱ्यांना धक्के मारायचा – पण कुणाला कधी काही इजा केली नाही त्यानं,” रामदास सांगतो. राजा त्याच्या मालकीचा होता. पण अशा वागण्यामुळे चार महिन्यांपूर्वी त्याने त्याला गावी विकून टाकलं.
जाधव कुटुंब कधी कधी पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीच्या खंडोबाच्या जत्रेत गाढवं विकत घेतात किंवा विकतात. वेगवेगळ्या राज्यातले लोक या जत्रेत गाढवांच्या खेरदी-विक्रीसाठी येत असतात. आजारी, अधू प्राण्याला रु. ५,००० इतकी किंमत मिळते तर अवजड माल वाहून नेऊ शकणाऱ्या धट्ट्याकट्ट्या गाढवांची किंमत २५,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते.
मी सुखदेवना त्यांच्या गावाबद्दल विचारताच अगदी अभिमानाने त्यांनी मला विचारलं, “तुम्ही सैराट पाहिलाय का? त्या पिक्चरचं शूटिंग आमच्या गावात झालंय. त्याच गावचे आहोत आम्ही.” अख्ख्या कुटुंबासाठी त्यांच्या गावाची ओळख ही अशीच – जिथे या सुपरहिट सिनेमाचं शूटिंग झालंय – सोलापूर जिल्ह्यातलं करमाळा.
जाधव कुटुंब वडार समाजाचं. सुखदेव यांच्या वडलांकडे आणि आज्याकडे गाढवं होती. “गावात [आणि आसपासच्या गावात] आम्ही तलावाच्या कामावर, घरं बाधायला, बंधारे घालायला मदत करायचो – आमची गाढवं माल वाहून न्यायची,” ५२ वर्षांचे सुखदेव सांगतात. “जी काही कमाई व्हायची त्यातनं चार घास पोटाला खायचे आणि दिवस काढायचे,” ३८ वर्षांच्या जयश्री सांगतात.
काम मिळायचं, पण काळ खडतर होता. “मधून मधून दुष्काळ पडायचा,” सुखदेव सांगतात. “भाकर असली तर कालवण नसायचं. घसा कोरडा पडायचा, पण प्यायला पाणी नसायचं.” त्यात कुटुंबाचा पसारा वाढत चालला होता, त्यांच्या मालकीची जमीन नव्हती आणि दिवसेंदिवस काम मिळणं पण दुरापास्त व्हायला लागलं होतं. त्यांच्या नातेवाइकांकडून त्यांनी मुंबईतल्या जंगलांबद्दल ऐकलं होतं की तिथे त्यांची गाढवं फिरून चरू शकतील म्हणून. आणि त्यांच्या हेही कानावर आलं होतं की गावापेक्षा शहरात कामही चिक्कार मिळतं आणि मजुरी पण जास्त असते.
१९८४ साली जाधव कुटुंबाचा हा मोठाला कबिला मुंबईत दाखल झाला. सुखदेव यांचे आई-वडील, त्यांचे सहा भाऊ, चिल्लीपिल्ली आणि त्यांच्या भावकीतली इतर काही मंडळी. आणि त्यांच्यासोबत होती “शेकडो गाढवं.”
सगळे पायी पायी आले, सुखदेव सांगतात. त्यांच्यातले काही जणच अधून मधून टेम्पोतून आले कारण सगळ्या गाढवांना वाहनातून आणणं काही शक्य नव्हतं. करमाळ्यापासून मुंबईचं ३२५ किलोमीटर अंतर पायी कापायला त्यांना ११-१२ दिवस लागले, ते सांगतात. “धाबा दिसला की आम्ही खाऊन घ्यायचो.”
मुंबईत मोकळ्या जागेच्या शोधात ते मालाडच्या अप्पाच्या पाड्यावर आले. त्या काळी हा भाग बोरिवलीच्या अभयारण्याचा भाग असल्याने इथे दाट झाडी होती. “आमची गाढवं कुठे पण फिरून चरायची,” सुखदेव सांगतात. “आता तुम्हाला इथे माणसं दिसतायत कारण सगळ्यात पहिल्यांदा आम्ही वस्ती केली इथे.”
१९८० च्या मध्यापर्यंत मुंबईत बांधकामाचा धंदा इतका तेजीत आला नव्हता तरीदेखील जाधव कुटुंबियांच्या गाढवांसाठी बांधकामाचं, रेल्वे लाइनवर विटा, वाळू आणि इतर माल वाहून नेण्याचं बरंच काम मिळायचं. “ठाकूर गाव, हनुमान नगर, महावीर नगर कुणी बांधलं?” उपनगरातल्या वस्त्यांबद्दल सुखदेव विचारतात. “आम्ही बांधलंय, आणि आमच्या गाढवांनी.”
“आमची माणसं आणि १०-१५ गाढवं काम करायची,” जयश्री सांगतात. “सगळ्यांना दिवसाची मजुरी एकगठ्ठाच मिळायची. सगळ्यात मिळून वाटून घ्यायचो आम्ही – कधी ५० तर कधी १०० रुपये वाट्याला यायचे.”
पण २००९-१० च्या सुमारास प्राणी हक्कांविषयी काम करणाऱ्या गटांनी प्राण्यांवर अवजड सामान लादायला विरोध करायला सुरुवात केली. “ही संस्थेची लोक म्हणायची, प्राण्यांचा छळ करायचा नाही,” चाळिशीतला रामदास संतापून म्हणतो. त्यामुळे आता बिल्डर लोक गाढवांना कामं देत नाहीत. “मी माझ्या बापाच्या, आज्याच्या वेळपासून हे काम करतोय. त्यांनी माझ्याच नाही त्यांच्या [गाढवांच्या] पोटावरही पाय दिलाय. अहो माणसंदेखील कितकालं ओझं वाहून नेतायत, त्याच्याबद्दल कुणाची तक्रार नाही, हां?”
तसंही, हळू हळू मोठाली यंत्रं आली आणि बांधकामावर गाढवांचं काम कमीच व्हायला लागलं, जयश्री सांगतात. “आताशा ही यंत्रं अवजड सामान उचलतात, पूर्वी आमची गाढवं उचलायची.” अजूनही डोंगराच्या उतारावर बांधकाम सुरू आहे तिथे रामदासला कधी कधी काम मिळतं. “जिथं ट्रक पोचू शकत नाही, तिथे आजही गाढवंच माल वाहून नेतायत,” तो सांगतो. पण हे दृश्य आता विरळाच.
कामं नाहीत म्हटल्यावर जाधव कुटुंबातले काही जण करमाळ्याला परत गेले तर काही जण पोटापाण्याच्या शोधात पुण्याला पोचले. जे मुंबईत राहिले त्यांना रोजंदारीवर काम मिळतं आणि दिवसाला त्यांची ३०० ते ४०० रुपयांची कमाई होते. “दुसरं काय काम करावं? इथं तिथं जाऊन बिगारी काम करायचं. एक दिवस काम मिळालं तर पुढचे दोन दिवस बेकार बसायचं,” रामदास सांगतो. त्याच्याकडची एकमेव गाढवीण म्हणजे मुडा. लहानपणापासून प्राण्यांसोबतच वाढल्यामुळे “स्वतःच्या खुशीसाठी” त्याने मुडाला अजूनही पाळलंय.
कधी कधी सुखदेव यांचा पुतण्या, थोरले बंधू वामन यांचा मुलगा २१ वर्षीय आनंद धट्ट्याकट्ट्या पॉवर या गाढविणीला गोरेगावच्या फिल्मसिटीत घेऊन जातो. तिथे एखाद्या सिनेमात किंवा मालिकेत मधूनच तिचं दर्शन होतं आणि ३-४ तासांच्या चित्रीकरणासाठी मिळालेले २००० रुपये घेऊन ते दोघं परततात. पण हे कामही क्वचितच मिळतं – आणि त्यासाठी पॉवरसारखं जनावर लागतं.
तर बांधकामावरचं काम कमी कमी होत गेलं आणि मग सुखदेव आणि जयश्रींनी दारोदारी जाऊन गाढविणीचं दूध विकायला सुरुवात केली. गावातही अधून मधून सुखदेवच्या घरच्यांनी हे दूध विकलं होतं. एखाद्याच्या घरात दुखणाइत असेल तर मग लोक गाढविणीचं दूध शोधत येतात. तब्येतीसाठी हे दूध खूप पौष्टिक असल्याचं मानलं जातं.
सकाळी ७ वाजता ते निघतात (आणि दुपारी ४ पर्यंत परततात), नवे रस्ते शोधत वेगवेगळ्या वस्त्या, चाळींमध्ये जाऊन ते गिऱ्हाईक गाठतात. कधी कधी तर पार विरारपर्यंत – इथून ५० किलोमीटर – त्यांची चक्कर होते. “माजी लक्ष्मी मला जिथं नेईल, तिथं मी जाणार,” सुखदेव म्हणतात.
गाढविणीचं दूध जेव्हा हवं तेव्हा तिथल्या तिथं दोहलं जातं. दूध काढल्या काढल्या आणि थोडंच घ्यायचं असतं. म्हणून मग जयश्री आणि सुखदेव सोबत एक चमचादेखील ठेवतात. “हे औषध आहे. ताप म्हणू नका, खोकला म्हणू नका, पित्त म्हणू नका, सगळं दूर होईल. मुलांच्या वाढीसाठी पण लई ब्येस हाय. हे डॉक्टर लोक आता आता आलेत. त्या आधी औषध म्हणून हेच तर दिलं जायचं,” जयश्री सांगतात. त्यांचा ठाम विश्वास आहे की या दुधात आईच्या दुधाइतकं सत्त्व आहे. “प्याच एकदा आन् मग बगा कशी ताकद येती ते.”
पूर्वी, गावाकडे जाधव कुटुंब एक चमचा दुधासाठी २ रुपये घ्यायचे. आता साधारणपणे १० मिली दुधासाठी ५० रुपये असा भाव आहे. “जैसा देश वैसा भेस,” सुखदेव सांगतात, गिऱ्हाईक पाहून पैसे ठरवायचे हे सुखदेव यांचं सूत्र. “या प्लास्टिक हाथरलेल्या झोपड्यांसाठी ३० रुपये, पक्क्या घरातल्यांसाठी ५०-६० रुपये आणि बिल्डिंगीत राहणाऱ्यांना १०० रुपये.” काही जण तर कपभर किंवा छोटं स्टीलचं फुलपात्र भरून दूध मागतात. त्यासाठी मात्र ५०० रुपये पडतात. पण अशी मागणी वारंवार होत नाही.
पण त्यांना पुरेसं गिऱ्हाईक मिळतं का? त्यांचा मुलगा सूरज, वय २०, सांगतोः “नाही, फार कमी लोकांना गाढविणीच्या दुधाबद्दल माहिती आहे. गावाकडच्या किंवा जुन्या माणसांनाच त्याचं महत्त्व कळतं. आजकालच्या तरुण मुला-मुलींना त्याची माहितीच नसणार.”
कधी कधी लोक सुखदेव यांचा फोन नंबर लिहून घेतात म्हणजे त्यांना दूध लागलं तर ते त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. “लोक पार अंधेरी, खार, नालासोपाऱ्याहून इथे [अप्पापाड्यावर घरी] येतात...” जयश्री सांगतात.
जास्तकरून गिऱ्हाईक म्हणजे ज्यांच्या घरात नवजात बाळ आहे किंवा कुणी आजारी आहे ते लोक. “तीन दिवस जर का हे घेतलंत ना, सगळा थकवा दूर होणार. पाच-सहा दिवसात खडखडीत बरे होणार बघा,” जयश्री सांगतात. थंडीच्या दिवसात थंडी-तापावर इलाज म्हणून जास्त गिऱ्हाईक येतं.
कधी कधी आईबाप नजर उतरवण्यासाठी एक सोपस्कार करतात. बाळाला चमच्याने दूध पाजलं की सुखदेव किंवा जयश्री त्याचं किंवा तिचं डोकं गाढविणीच्या पाठीला, खुराला आणि शेपटीला टेकवतात. आणि जर का बाळ फारसं रडत नसेल तर गाढविणीच्या पोटाखालून बाळ अल्याड पल्याड करतात. आणि मग क्षणभरच बाळाला उलटं हवेत धरतात. असं केल्यामुळे नजर लागत नाही अशी त्यांची समजूत आहे.
सुखदेव आणि जयश्रींची दिवसाची एकूण कमाई ५०० ते १,५०० रुपये इतकी होते – पण ते आठवड्यातून ३-४ दिवसच कामाला बाहेर पडतात, इतर दिवशी गाढवांना आणि त्यांनाही जरा आराम.
हे काम करण्यासाठी तुमच्याकडे नुकतीच व्यालेली गाढवीण हमी. शिंगरू नऊ महिने आईचं दूध पितं, त्यानंतर दूध आटतं, जयश्री सांगतात. काजोलचं दूध आटलं की शिंगरासकट तिला विकणार आणि जयश्री आणि सुखदेव नुकतीच व्यालेली दुसरी गाढवीण आणि तिचं शिंगरू विकत घेणार. ठाणे जिल्ह्यात त्यांच्या ओळखीचे काही व्यापारी आहेत, त्यांच्याकडून अशी जोडी घेण्यासाठी त्यांना वाट पहावी लागते आणि दलालांना आगाऊ सांगून ठेवावं लागतं.
गाढवांना नीट चारायला पण लागतं. “ते काही पण खातात,” जयश्री म्हणतात. “ते जंगलात [जवळचा अभयारण्याचा भाग] फिरून चरून येतात. त्यांना काकडी द्या, डाळ, भात काही पण असो, ते खातात.” पण त्यांचा आवडता खुराक म्हणजे ज्वारी आणि गहू. त्यांच्या नेहमीच्या गिऱ्हाइकांकडून त्यांना शिळ्या चपात्या देखील मिळतात. आपल्या तीन गाढविणींच्या खुराकावर या कुटुंबाला ७०० ते १२०० रुपये खर्च येतो.
गर्दी गिचमिड असलेल्या मुंबईत प्राणी पाळणं काही सोपं काम नाहीये. त्यांनी खुली जागा लागते. सकाळी मोकळं सोडलं की शक्यतो संध्याकाळपर्यंत ती परततात. पण कधी कधी असंही झालंय की अनेक दिवस एखादं जनावर परतच येत नाही. “मग काय आम्हीच हुडकत, लोकांनी कुठे गाढव पाहिलंय का विचारत त्यांना शोधून आणतो,” सुखदेव सांगतात.
“गाढव परत घरी आलं ना की त्याचा चेहरा बघूनच आम्हाला समजतं की त्याला किंवा तिला काही तरी सांगायचंय,” सूरज पुढे सांगतो. “ते आम्हाला धक्का देणार, किंवा शेपूट हाणणार. पायाला दुखापत झाली असली तर पाय हलवून आम्हाला दाखवणार.”
कधी कधी मात्र गेलेलं जनावर परतच येत नाही. अनेक वर्षांपूर्वी काही गाढवं गेली ती परत आलीच नाहीत. हे वारंवार घडायला लागल्यावर मात्र या सतत वाढणाऱ्या आणि गर्दीगोंगाटाच्या शहरात या कुटुंबाने गाढवं विकली किंवा गावी धाडली.
सूरजला गाढवांचं फार प्रेम आहे. तो आणि त्याचा भाऊ आकाश, वय २२ दोघांनी माध्यमिक शाळेत असताना शिक्षण सोडलं आणि मिळेल तसं आता दोघं रोजंदारीवर काम करतात. त्याच्या लाडक्या गुटकीची आठवण निघते आणि सूरज सांगतो, “मी अगदी लहान होतो तेव्हापासून ते १५ वर्षांचा होईपर्यंत ती माझी सगळ्यात जवळची दोस्त होती. मी दुसऱ्या कोणत्याच गाढवाच्या पाठीवर बसलो नसेन. मी तिच्याबरोबर जंगलात तासंतास फिरायचो आणि माझी सगळी गुपितं तिला सांगायचो.” मालाडच्या महामार्गावर अपघात होऊन गुटकी गेली तेव्हा सूरजच्या डोळ्याचं पाणी किती तरी तास खळलं नव्हतं.
गाढव मेल्यावर – भारतात सामान्यपणे त्याचं आयुष्यमान १५-२० वर्षं आहे – त्याला अभयारण्यात झाडाखाली पुरत असल्याचं जाधव सांगतात.
त्यांच्या भागात सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत घर मिळण्यास जाधव कुटुंब पात्र आहे. त्यासाठी त्यांना निवासाचा पुरावा आवश्यक आहे. आणि तो एकदा मिळाला की गाढवांसाठी त्यांना थोडी तरी जागा मिळण्याची सूरजला आशा आहे. “काय माहित, थोडी राहतील, बाकी गावी परततील,” तो म्हणतो. हे ऐकल्यावर सुखदेव उद्गारतात, “अरं देवा, त्यांच्याबिगर मी कुठं बी जायचा नाही.”
अनुवादः मेधा काळे