"या उत्सवातून आम्हाला उमेद मिळते," बलबती माझी म्हणतात. त्या आणि कुटिया खोंड समुदायाच्या इतर आदिवासी बाया एका स्थानिक देशी वाणाच्या उत्सवाची तयारी करत होत्या. डोंगर आणि घनदाट जंगलात वसलेल्या बुर्लूबरू गावात सध्या नुसती लगबग सुरू आहे. डोक्यावर देशी बियाण्यानी भरलेली मातीची छोटी मडकी ठेवून महिला ढाप व तामुक या पारंपरिक ढोलांच्या तालावर नाचत होत्या.
त्या आपल्या गावाच्या केंद्रस्थानी असलेल्या धरणी पेनूच्या
(धरणी माता) देवळात जमल्या होत्या. गावच्या पुजाऱ्याने पूजा केल्यावर
त्यांनी उत्सवाच्या ठिकाणी – ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील तुमुडीबंध
तालुक्यातल्या त्यांच्या गावाजवळल एका खुल्या मैदानात – मिरवणूक काढली.
"आम्ही सुगीसाठी पूजा करतो. कधीकधी आम्ही बकरं अन् कोंबडी सुद्धा चढवतो. चांगलं पीकपाणी म्हणजे वर्षभर पोटाला खाणं मिळतं. आम्ही उत्सवात एकमेकींकडून बिया घेतो आणि देतो, म्हणून आमच्याकडून ज्यांनी बिया घेतल्या त्यांच्या रानात पण चांगलं पीक येवो, अशी प्रार्थना आम्ही करतो," ४३ वर्षीय बलबती म्हणाल्या. त्यांचं कुटुंब दोन एकरात तृणधान्यं व मक्याचं पीक घेतं.
यावर्षी कोटागढ, फिरिंगिया आणि तुमुडीबंध तालुक्यातल्या गावांतील बलबती व आणखी ७०० आदिवासी शेतकरी महिला या वार्षिक बीज उत्सवात सहभागी झाल्या. मार्चमध्ये कापणीच्या दरम्यान आयोजित होणाऱ्या या समारंभात बियांचं प्रदर्शन व देवाणघेवाण, बीमोड झालेल्या वाणांचं पुनरुज्जीवन आणि प्रसंगी शेतीच्या पद्धतींवर चर्चा होते.
(बेलघर पंचायतीच्या) बुर्लूबरू गावातील कुटिया खोंड समुदायाच्या ४८ वर्षीय कुलेलाडू जानी म्हणाल्या की, पूर्वी त्या आपापल्या गावी हा उत्सव साजरा करायच्या आणि शेजारच्या गावी आपल्या नातलगांच्या घरी जाऊन बियाण्याची देवाणघेवाण करायच्या. "आम्ही बाजारातून कधीच बी विकत घेत नाही," त्या पुढे सांगतात. उत्सव पुन्हा सुरू झाल्यापासून त्यांनी तृणधान्यांचं वेगवेगळं वाण गोळा केलं असून आपल्या दोन एकर शेतजमीनीवर त्याची लागवड केलीये.
२०१२ दरम्यान मिलेट नेटवर्क ऑफ इंडियाचे संशोधक, स्थानिक संस्था व स्थानिक प्रशासन यांनी एकत्र येऊन स्थानिक युवक व गावकऱ्यांना आयोजनात सोबत घेऊन हा उत्सव पुनरुज्जीवित केला आणि त्याचं बुर्लांग यात्रा नावाच्या भव्य मेळाव्यात रूपांतर झालं.
'यात्रे'दरम्यान शेतकरी नाचणी, राळं, वरी, ज्वारी, मका, तेलबिया, डाळी आणि भाज्या, शिवाय तांदूळ, कंद आणि स्थानिक जडीबुटीच्या विविध प्रजातींचं प्रदर्शन करतात. अखेरच्या दिवशी यांची विधिवत देवाणघेवाण करण्यात येते. हे बी चांगल्या दर्जाचं असून ते कीड आणि रोगाला प्रतिकार करू शकतं, त्यात पोषण मूल्य जास्त असतं आणि उताराही जास्त मिळतो, ३८ वर्षीय प्रमिती माझी म्हणतात.
"आमच्या पिढीजात बीला वाढीसाठी कुठलंच खत लागत नाही," कुलेलाडू पुढे म्हणाल्या. "आम्ही गायीचं शेण वापरतो अन् आमच्या पिकांना चांगली वाढ आहे, धान्य [बाजारी बियाण्यापेक्षा] चविष्ट असतं, शिवाय पुढल्या हंगामासाठी काही बी साठवून पण ठेवता येतं."
उत्सवात महिला त्यांचा बी जतन करण्याचा अनुभव आणि पेरणीच्या पद्धतींबद्दल सांगत होत्या. पुष्कळ आदिवासी आणि ग्रामीण समाजांमध्ये महिला पेरणी ते कापणीपर्यंत विविध कामांव्यतिरिक्त देशी व पिढीजात बियांच्या रक्षक आहेत. "हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाणारं ज्ञान आहे. बी जमवायचं, त्याचं जतन अन् पेरणी करण्याचं काम बायाच पाहतात," माझीगुड्याच्या प्रणती माझी म्हणतात. त्या बाजरी, ज्वारी आणि मक्याचं पीक घेतात.
"कापणीनंतर आम्ही काही धाटं रानात तशीच ठेवतो म्हणजे ती उन्हात कडक वाळतात," कोटागढ तालुक्यातल्या पारामला पाड्यातील पर्बती माझी म्हणाल्या. "एकदा कणसं वाळली की बी निवडून त्या एका मडक्यात साठवून ठेवतो. कीड लागू नये म्हणून मडक्याला बाहेरून गायीच्या शेणाचा थर देतो."
इथल्या अनेक गावात कुटिया खोंड समाजातील लोक तृणधान्यावर आधारित मिश्र शेती करतात. कंधमालचे आदिवासी समाज पूर्वापार पासून अशा तृणधान्याचंच सेवन करत आलाय, पण कालांतराने त्याऐवजी सार्वजनिक वितरण प्रणालीतून मिळणारा रेशनचा तांदूळ खाऊ लागले – मात्र तृणधान्याचा वापर केलेले अन्नपदार्थ अजूनही येथील कित्येक गावांमध्ये प्रसिद्ध आहेत. "आम्हाला मिळणाऱ्या [रेशनच्या] तांदळाला ना चव आहे, ना त्यात ताकद," बारीपांगा गावाच्या धैनपडी माझी, वय ४५, सांगतात. "पण तृणधान्यातून ताकद मिळते अन् पोटही जास्त वेळ भरलेलं राहतं." झरीघाटी गावाच्या सासवंती बडामाझी, वय ४६, म्हणतात, तृणधान्यांमुळे "आम्हाला डोंगरदऱ्या चढायला अन् जास्त वेळ काम करायला ताकद मिळते."
दिवसभर चालणाऱ्या या उत्सवाच्या शेवटी, ढोल, शिंगं आणि झांजांच्या तालावर नाचून झाल्यावर कर्कश आरोळ्यां देत महिला मैदानाच्या मध्यभागी ठेवलेल्या गावरान बियाण्याजवळ येऊन जमतात. विविध वाणांची विधिवत देवाणघेवाण झाल्यावर ते बी साल वृक्षाच्या पानांमध्ये, कागदाच्या चिटोऱ्यांमध्ये किंवा साडीच्या पदराला गाठ मारून त्या परतीची वाट धरतात.
अनुवादः कौशल काळू