एंजल फिश, पीकॉक फिश, गप्पी आणि मॉली, हर तऱ्हेचे मासे कांदोन घोरांच्या घरात एका अंधाऱ्या खोलीतल्या पाण्याच्या टाकीत पोहतायत. “फार नाजूक काम आहे हे. पोटच्या पोरांप्रमाणे त्यांना वाढवावं लागतं,” ते सांगतात.

कोलकात्याच्या दक्षिणेला ३० किलोमीटरवर साउथ २४ परगणा जिल्ह्यातल्या उदयरामपूर या गावातले कांदोन हे मत्स्य शेतकरी आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब शोभेच्या माशांची पैदास करतं. ५४० उंबरा असणाऱ्या त्यांच्या गावाच्या तीन पाड्यांवरची - घोरा पाडा, मोंडोल पाडा आणि मिस्त्री पाडा - मिळून ५०-६० कुटुंबं हेच काम करतायत.

पश्चिम बंगालच्या इतर भागातल्या, केरळ आणि तमिळनाडूतल्या शेतकऱ्यांप्रमाणे तेही शोभेच्या रंगीबेरंगी माशांच्या देशी आणि विदेशी प्रजातींची पैदास करतात आणि देशभरात मासे पाळणाऱ्यांना विकतात.

PHOTO • Barnamala Roy

गेल्या २५ वर्षांच्या काळात कांदोन घोरांच्या कुटुंबाने साध्या मातीच्या वाडग्यांपासून ते माशांची पैदास करण्यासाठी तळ्यांपर्यंत प्रगती केली आहे

या पाड्यांवर हिरवंशार पाणी आणि सभोवती नारळाची आणि सुपारीची झाडं दिसतात. घरांबाहेर कोंबड्या हिंडतायत आणि सूर्य माथ्यावर येण्याआधी मुलं शाळेतून घरी परततायत. आणि कधी कधी कोलकात्याच्या गलीफ स्ट्रीट पेट बाजारात मासे विकत घेण्याआधी त्यांची जरा जवळून ओळख करून घेण्यासाठी म्हणून काही गिऱ्हाईकही गावात चकरा मारत असतात. दर रविवारी कोलकात्याच्या या बाजारात किरकोळ विक्रेते एकत्र येतात.

कांदोन यांच्या घरामागे त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचा माशांचा तलाव जाळीने झाकला आहे. इतरही मत्स्य शेतकऱ्यांनी अशीच सोय केलीये. “पावसाळ्यात माशाची पैदास जोरात असते त्यामुळे तलावाची आधीच मशागत करून ठेवावी लागते,” ते सांगतात. त्यांच्या लहानशा घरात एका खोलीत घरात वाढवाव्या लागणाऱ्या प्रजातीचे मासे जोपासलेले आहेत. अनेकदा अंडी नष्ट होतात त्यामुळे बाजारात किती माशांची विक्री होते ते नक्की नसतं. सरासरी पाहता आठवड्याला १,५०० असा आकडा आहे. “या धंद्यात कमाई निश्चित नसते. महिन्याला ६,०००-७,००० रुपयांच्या वर काही जात नाही,” कांदोन सांगतात.

माशांची पैदास आणि बाजारात विक्रीचं कौशल्य उदयरामपूरमध्ये पिढीजात आहे. घरातल्या सगळ्यांनाच माशांची काय काळजी घ्यायची ते माहित असतं. प्रत्येकालाच माशांमधले आजार आणि त्यावर काय उपचार करायचे याची माहिती असते. “जेव्हा ते आजारी असतात किंवा काही इजा झालेली असते तेव्हा ते शक्यतो पाण्याच्या पृष्ठभागापाशी तरंगत राहतात,” कांदोन सांगतात. “आणि ते खाणं थांबवतात. काही फिकुटतात आणि त्यांची शेपटी पांढुरकी पडते.” आमतालाच्या स्थानिक दुकानांमध्ये माशांसाठीची औषधं उपलब्ध आहेत. “त्यांना बरं करण्यासाठी आम्ही त्यांना वेगळ्या भांड्यात ठेवतो आणि फक्त औषधं देतो. एरवीचं खाणं पूर्ण बंद करावं लागतं.”

PHOTO • Barnamala Roy

कांदोन घोरा, सोबत पत्नी पुतुल (डावीकडे) आणि मुलगी दिशा (उजवीकडे): ‘मी बहुतेक घरीच शिकवण्या घेईन आणि माशांची काळजी घेईन,’ दिशा सांगते

कांदोन यांच्या कुटुंबाचा माशांच्या पैदाशीचा प्रवास २५ वर्षांपूर्वी साध्या मातीच्या भांड्यांपासून सुरू होऊन नंतर माती किंवा प्लास्टिकची तसराळी (किंवा माजला) आणि त्यानंतर तळं आणि घरातल्या काचेच्या टाकीपर्यंत आलाय. कांदोन यांचं माशांचं प्रेम त्यांना त्यांच्या वडलांकडून मिळालंय, ते सांगतात. “या जगात कमाई करण्याचं आमच्याकडे एवढं एकच साधन आहे. आम्ही काही ते सोडून देऊ शकत नाही. आमची मुलं शहरात शिकतायत, पण कधी तरी तेही याच धंद्याकडे वळतील.” त्यांची पत्नी पुतुल दुजोरा देते. त्या देखील मत्स्य शेतकऱ्यांच्याच कुटुंबातल्या आहेत.

त्यांची मुलगी दिशा विद्यानगर महाविद्यालयात तत्त्वज्ञान विषयात पदवीचं शिक्षण घेतीये. आम्ही तिच्या घरी गेलो तेव्हा ती तिच्या खोलीबाहेरच्या व्हरांड्यात काही मुलांची शिकवणी घेत होती. “मी बहुतेक घरीच शिकवण्या घेईन आणि माशांची काळजी घेईन,” ती सांगते.

PHOTO • Barnamala Roy

उदयरामपूरच्या रहिवासी तरुबाला मिस्त्रींनी माशाच्या घाटाची कानातली घातली आहेत. ‘या धंद्यातून जी कमाई होते ती काही पुरेशी नाही, पण दुसरा काही पर्याय पण नाही ना,’ त्या म्हणतात

आम्ही गावातल्या आतल्या भागात जायला लागलो तसतसं आम्हाला गुडघाभर पाण्यात उभे असलेले स्त्री-पुरुष दिसू लागले. माशांच्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी ते जाळीत किडे पकडत होते. मासे मोठे व्हायला लागले की ते दलदलीतल्या अळ्या खायला लागतात – माशांच्या तळ्यात त्यांची देखील वाढ होते. वाटेत आमची गाठ सरपण घेऊन चाललेल्या तरुबाला मिस्त्रींशी पडली. “या धंद्यातून जी कमाई होते ती काही पुरेशी नाही, पण दुसरा काही पर्याय पण नाही ना,” त्या म्हणतात. त्यांचं (आणि त्यांच्या समाजाचं) माशांवरचं प्रेम त्यांच्या कानातल्यांवरून स्पष्ट दिसून येतं.

उत्तम मिस्त्री हे आणखी एक मत्स्य शेतकरी. त्यांच्या घरी माशांची पैदास विहिरीत केली जाते. त्यांची खासियत म्हणजे फायटर फिश. एकमेकांशी मारामाऱ्या टाळण्यासाठी त्यांना त्यांची स्वतंत्र जागा द्यावी लागते. पिल्लं मातीच्या भांड्यांमध्ये राहतात तर मोठे मासे सावलीत बाटल्यांमध्ये ठेवले जातात. आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा उत्तम त्यांचा आठवड्याचा अळ्यांचा खुराक बाटल्यांमधल्या माशांना देत होते. त्यांनी जास्त खाल्लं, तर ते मरून जाऊ शकतात.

डावीकडेः उत्तम मिस्त्री फायटर माशांना त्यांचा आठवड्याचा अळ्यांचा खुराक देतायत. उजवीकडेः एक छोटा फायटर मासा आणि लाळेच्या मदतीने त्याने तयार केलेलं बुडबुड्यांचं जाळं

मत्स्य शेतकऱ्यांच्या या वस्तीत, कोणत्या माशांची पैदास कोण करणार हे मुळातच ठरलेलं आहे, जेणेकरून त्यांचा धंदा नीट चालेल. मिस्त्री घोरांप्रमाणे गलीफ स्ट्रीट मार्केटला जाऊन मासे विकत नाहीत, ते किरकोळ विक्रेत्यांकडे माल देतात.

मोंडल पाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका फाट्यावर आम्हाला गोलक मोंडल भेटले. ते गहिरी तण उपटत होते. जवळच एक पपईचं झाड त्यांच्या कुटुंबाच्या तळ्यात झुकलेलं होतं आणि तिथेच काही बाया जाळीत अळ्या धरत होत्या. गोलक यांनी आम्हाला त्यांच्याकडे गप्पी आणि मोली मासे दाखवले. ते एका टाक्यात, काही भांड्यांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या एका तळ्यात माशांची पैदास करतात. फायटर मासे त्यांच्या लहानशा घराच्या गच्चीवर बाटल्यांमध्ये वाढवले जातात.

PHOTO • Barnamala Roy

गोलक मोंडल अनेक प्रकारच्या माशांची पैदास करतात, त्यात जर्द केशरी रंगाच्या मॉली माशांचाही समावेश आहे (उजवीकडे). अजून थोडी जमीन घेऊन आपली मत्स्य शेती वाढवावी असा त्यांचा मानस आहे

मोंडल यांच्याकडचे गोल्डफिश आणि एंजलफिश अनुक्रमे पाच व दोन रुपयांना विकले जातात. फायटर माशाची किंमत १५० रुपये आणि १०० गप्पी माशांसाठी देखील तेवढेच पैसे घेतले जातात. “आम्हाला किती फायदा होईल हे काही निश्चित नसतं, आठवड्याला १,००० हून जास्त तर नाहीच,” ते म्हणतात. “आणि कधी कधी, आम्हाला पडत्या भावातही विक्री करावी लागते.” आपल्या कुटुंबाचा धंदा वाढेल असं मोंडल यांचं स्वप्न आहे आणि अजून चांगल्या पद्धतीने मत्स्यशेती करण्यासाठी त्यांना आणखी जमीन घ्यायची आहे.

त्यांचा मुलगा बाप्पा, वय २७ एका गाड्यांच्या कंपनीत काम करतो आणि पुढे जाऊन जास्त गांभीर्याने मत्स्य शेतीकडे वळण्याचा त्याचा मानस आहे. “आता शहरातल्या सुशिक्षित लोकांनाही नोकऱ्या मिळत नाहीयेत, त्यामुळे आम्ही तर काय आशा ठेवाव्या?” तो म्हणतो. “उलट आमचंच बरंय म्हणायचं, आमच्याकडे निदान हा धंदा तरी आहे.”

अनुवादः मेधा काळे

Barnamala Roy

बर्णमाला रॉय ने कोलकाता की प्रेसीडेंसी यूनिवर्सिटी से अंग्रेज़ी में स्नातकोत्तर की पढ़ाई की है. वह एक स्वतंत्र लेखक व अनुवादक हैं, और पूर्व में 'किंडल' मैगज़ीन में सब-एडिटर के तौर पर काम कर चुकी हैं.

की अन्य स्टोरी Barnamala Roy
Translator : Medha Kale

मेधा काले पुणे में रहती हैं और महिलाओं के स्वास्थ्य से जुड़े मुद्दे पर काम करती रही हैं. वह पारी के लिए मराठी एडिटर के तौर पर काम कर रही हैं.

की अन्य स्टोरी मेधा काले