मी जेव्हा सवरीदेवीला तारपा वाजवतो, तिला बोलावतो, आमच्या लोकांच्या अंगात वारा येणार. एक तास त्याचं अंग हिलणार. वारा आल्यावर झाड हिलतं, तसं त्याचं अंग हिलणार. श्रद्धा आहे. मानंल त्याचा देव, नाही त्याचा नाही.

दहा बारा वर्षांचा होतो, तेव्हापासून वाजवतोय मी तारपा. बापाने सांगितलं ‘तू ही आपली आदिवासी संस्कृती टिकव.’ आणि तेव्हापासून ७५ वर्षा होऊन गेली, मी तारपा वाजवतोय. आज वय ८९ आहे माझं.

माझा पिंजोबा नवश्या. तो वाजवायचा.
त्याचा मुलगा धाकल्या. तो वाजवायचा.
धाकल्याचा मुलगा लाडक्या. तो वाजवायचा.
लाडक्या माझा बाप.

Bhiklya Dhinda’s father Ladkya taught him to play and make tarpa from dried palm toddy tree leaves, bamboo and bottle gourd. ‘It requires a chest full of air. One has to blow in the instrument and also make sure that your body has enough air to breathe,’ says Bhiklya baba
PHOTO • Siddhita Sonavane
Bhiklya Dhinda’s father Ladkya taught him to play and make tarpa from dried palm toddy tree leaves, bamboo and bottle gourd. ‘It requires a chest full of air. One has to blow in the instrument and also make sure that your body has enough air to breathe,’ says Bhiklya baba
PHOTO • Siddhita Sonavane

भिकल्या बाबांचे वडील लाडक्या  धिंडांनी त्यांना माडाची पात, बांबू आणि वाळलेल्या दुधीपासून तारपा बनवायला शिकवलं. ' हे एवढा श्वास आहे ना छातीभरून, तेवढी याले हवा लागते. त्याला पण हवा पोचवायची आणि आपले शरीराला पण कमी रहली नाही पाहिजे, ' भिकल्या बाबा सांगतात

ब्रिटिशांचं राज्य होतं. स्वातंत्र्य आलं नव्हतं. गावात फक्त ‘मोठ्या’ लोकांची शाळा. गरिबांची नाही. शाळेत नाय गेलो. ‘गायीमागे गेला तर रोटी मिळंल. शाळंत गेला तर उपाशी रहल.’ आमच्या आईला ७ मुलं. मी गायीमागे जायला लागलो.

माझा बाप मला सांगायचा. ‘गुराशी नुसताच ना? मग तारपा वाजवायचा ना. शरीर पण चांगला रह. करमणूक पण रह.’ काही खोडकिडा असला तर त्या आवाजानं पळतं.

मग मी रानात गेला की वाजवत रहायचा. फार लोक सांगायचे, ‘आज धिंड्याचा पुत्र दिवसभर क्यांव क्यांव करत होता.’ बाप म्हणायचा, ‘मी आहे तोपर्यंत तुला [तारपा] बनवून देईन. पण माझा बरा वाईट झाल्यावर तुला कोण देईल?’ मग मी तारपा बनवायला शिकलो.

धनधान्य पिकला की बारा कुणब्याची बारस राहते. वाघबारस. मग दिवाळी सुरू होते. आमचा वडील तेव्हा तारपा वाजवायचा. माझा भाऊ वाजवायचा. तो वारला. गावामध्ये आम्हाला मान होता. किती होता? तर आम्हाला विचारल्याशिवाय गावदेवीचा उत्सव करत नव्हते.

ब्रह्मदेवाने ब्रह्मांडनिर्मिती केली अन् देव निघून गेलं. आता देव नाही आहे. आता माणूस तोच देव. म्हणून मी निसर्गपूजक झालो. माझा तारपा हीच माझी देवता म्हणून हात जोडायला लागलो.

तारपा म्हणजे नर आणि मादी. जसा आपला परिवार आहे तसा त्यांचा. श्वास दिला की नर मादीचं मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो. दगड जसा निर्जीव तसा ते निर्जीव दिसतं. पण त्याचा आवाज, सूर निघतो.

यात तीन वस्तू आहेत. माडाचं पात. त्याचा ‘साउंड’ बनवायचा. दोन बंबू. एक मादी. एक पुरुष. ठेका देणारा. आणि तिसरी वस्तू म्हणजे दुधी. दुधी वरती लावायचा आणि त्याला श्वास द्यायचा. इथून श्वास दिला की नर मादीचं मिलन होऊन आकर्षित आवाज निघतो.

हे एवढा श्वास आहे ना, तेवढी याले हवा लागते. त्याला पण हवा पोचवायची आणि आपले शरीराला पण कमी रहली नाही पाहिजे. देवानं बुद्धी दिली म्हणून मानवाने हे बनवलं ना. मग हे देवाचंच वाद्य आहे.

माझा बाप मला सांगायचा. ‘गुराशी नुसताच ना? मग तारपा वाजवायचा ना. शरीर पण चांगला रह. करमणूक पण रह.’ काही खोडकिडा असला तर त्या आवाजानं पळतं

व्हिडिओ पहाः 'माझा तारपा, माझी देवता'

*****

आमचे आडवडील आम्हाला सांगत. त्या काळातल्या गोठे जर सांगल्या तर लोक आपली निंदा करतात. पण आमचे आडवडील सांगत.

ब्रह्मांडनिर्मिती करून देव निघून गेलं. मग आमची वारल्यांची उत्पत्ती कुठे झाली?

कंदराम देहल्यापासून.

कंदराम देहल्याला देवाने दही दिला. त्याच्या मोठ्या आईच्या जवळ. त्याने तो दही खाल्ला आणि मईश खाऊन तो पळलं. मग त्याच्या आईने त्याला फोकारून लावला.

कंदराम देहल्यालहून

पळसोंड्याला परसंग झाला
नटवचोंडीला नटलं
खरवंड्याला खरं झालं
शिणगारपाड्याला शिणगारलं
आडखडकाला आड झालं
काटा खोचाय कासटवाडी झालं
कसेलीला येऊन हसलं
आन् वाळवंड्याला येऊन बसलं.
गोऱ्याला जान खरं जालं
गोऱ्याला रहला गोंद्या
चांद्या आलं, गंभीरगडा आलं.


वारल्यांच्या उगमाची ही गोष्ट जव्हारमधल्या गावांच्या नावांवरून रचलेली आहे. यामध्ये वेगवेगळ्या गावी वेगवेगळ्या गोष्टी घडत जातात.

Left: Bhiklya Dhinda with his wife, Tai Dhinda.
PHOTO • Siddhita Sonavane
Right: He says, ' Tarpa is just like a family. There is a male and a female. When I blow some air, they unite and the sound that you get is magical. Like a stone, it is lifeless. But with my breath it comes alive and produces a sound, a musical note’
PHOTO • Siddhita Sonavane

डावीकडेः भिकल्या धिंडा आणि त्यांच्या पत्नी, ताई धिंडा. उजवीकडेः ते म्हणतात, जसा आपला परिवार आहे तसा तारप्याचा. एक नर, एक मादी. श्वास दिला की नर मादीचं मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो. दगड जसा निर्जीव तसा ते निर्जीव दिसतं. पण त्याचा आवाज, सूर निघतो'

मी लहान असताना आमचा अख्खा गाव जव्हारला नवल्याच्या शेतात मजुरीला जायाचा. रत्नागिरीचा खोत तो. त्याच्या सगळ्या जमिनी. ५० पैशे मजुरी. कधी एक रुपया.

जव्हारचे महाराज करवळाच्या पानावर जेवायचे. सगळे लोक तिथे करवळाच्या पानावरच जेवायचे. लोक जेवतात ती पानं मी उचलून टाकायचो. तिथे राजकोळी, कोकणा, वारली, कातकरी, ठाकूर, महार, चंभार सगळे परदंक्शनाला यायचे. तिथे कसलाच भेदभाव मानायचा नाही. वारली असेल, कोकणा असेल, जे कुणी असेल, समान मानायचा. मग मी कातकऱ्याचं पण पाणी पियाला लागलो, मुसलमानाचं पाणी पियाला लागलो. एरवी राजकोळी आमचं पाणी नाही पीत. आणि आमचे लोक अजूनही कातकऱ्याचं पाणी नाही पीत. ढोरकोळ्याचं नाही, चंभाराचं नाही. पण मी कसलाच भेदभाव मानला नाही.

पुढे ६०-६५ साली मी काम करून मी ७०० रुपये जमवलं. ७०० रुपयांत माझा लग्न झाला. ती ७०० रुपयाची म्हातारी आहे माझी. ताई धिंडा तिचं नाव.

परिपंच केला. पोरं शाळंला टाकली. १० वी ला नापास झालं. नाही गेलं. नातू कंपनीला जातो कामाला. बकऱ्या होत्या ६३ त्या विकून टाकल्या. एका पोराला घर बांधून दिलं. दुसऱ्या पोराला दुसरं दिलं. मी आणि म्हातारी इथे या घरात ऱ्हातो.

मी माझा मुलगा, मुलग्याचा नात, नातूचा पणतू...चौथी पिढी लागली.

Bhiklya baba in the orchard of dudhi (bottle gourd) in his courtyard. He ties each one of them with stings and stones to give it the required shape. ‘I grow these only for to make tarpa . If someone steals and eats it, he will surely get a kestod [furuncle] or painful throat’ he says
PHOTO • Siddhita Sonavane

भिकल्या बाबा आपल्या अंगणातल्या दुधीच्या मांडवाखाली. प्रत्येक दुधी ते विशिष्ट पद्धतीने बांधतात, दगड बांधून त्याला हवा तसा आकार देतात. 'हे फक्त तारप्यासाठी. जर कुणी चोरून खाल्ला, तर त्याला केसतोड निघणारच. त्याचा गळा दुखणारच,' बाबा म्हणतात

तर अशी आम्ही महाराष्ट्रातली आदिवासी माणसा. सण आला तर तुला, मला एकुच सण धरायचा. नवा भात आला तर कुटुंबात, सगळ्याले गावात, गावदेवीला तिचा निवद-बोना दाखवायचा. नंतर खायाचा. आम्ही आदिवासी अजूनही देवीला दाखवल्याशिवाय नवा भात खात नाय. डांगर खात नाय. दुधी खात नाय. तुम्ही लोक डांगर लागला... खाल्ला. दुधी लागला... खाल्ला. आम्ही नाय.

तुम्ही म्हणता, अंधश्रद्धा. पण अंधश्रद्धा नाही. श्रद्धाच आहे.

आता विठल, रकुमाई, गणपती सगळे मोठ्या लोकांचे देव. ते आमचे देव नाहीत. आमच्यापाशी अगरबत्ती पण नाही लावायला. मग आम्ही दगडाचा देव केला ना. त्याची पूजा केली.

वाघबारस असली की आम्ही आजही सवरीदेवीचा उत्सव करतो.

धनधान्य पिकला की हे वाद्य डोंगरात, रानात न्यायचा. तिथं सांगायला तंगडा सवरी, गोहरा सवरी, पोपटा सवरी, तुंबा सवरी, घुंगा सवरी अशा सवरी देवीच्या जवळच्या साथी. या निसर्गाच्या देवता. त्या आहेत अजून तरी. आम्ही त्याची पूजा करायला लागलु. त्यांना आवतन देत मी तारपा वाजवतो. ‘बाई, तू ये’ कसं म्हणतो, तसंच या तारपावर मी वेगळा वेगळा चाल वाजवतो. एका एका सवरीसाठी वेगवेगळा चाल.

धनधान्य नवा पिकला की आम्ही गावदेवीच्या देवळात जातो. गावदेवी कशासाठी बसवली? तिला एक मान दिला. ‘आपला पोर, सोर, ढोर, धांगर सुखाचा राहिला पाहिजे, शेती वाडी आबाद राहिली पाहिजे. नोकरी करत असेल तर त्याला वेश दिला पाहिजे. परिपंच चांगला चालला पाहिजे’ असं आम्ही आदिवासी त्या देवीला जाऊन संबरण करतो.

*****

मागच्या वर्षी (२०२२) मी दिल्लीला गेलो. एकूण ५०० लोक. नंदुरबार, धुळे, बडोदा... सगळीकडचे आदिवासी. मी स्टेजवर चढलो तर त्यांनी मला विचारलं. तू आदिवासी कशावरनं?

मी म्हटलं जो पहिला मानव वसला, त्याने ही मायभूमी, तिची माती परीक्षा केली तो आदिवासी.

श्वासाने जी वाजेल ती आमची संस्कृती आणि हाताने वाजे ती आकृती. आकृती आता आली. संस्कृती आमची श्वासाने वाजत आली आहे. खूप सारी वर्षा.

ज्याच्याकडे हिरवा देव आणि तारपा तो आमचा वारली आदिवासी.

परिपंचात नर मादीला साथ देतो आणि मादी नराला साथ देते तसा हा तारपा आहे. दोघांचं मिलन होऊन आवाज आकर्षित निघतो.

मी एक नंबर आलो. महाराष्ट्राचा एक नंबर आणला.

माझे मनालं मी निसर्गपूजक आहे. निसर्गाची पूजा केली तर मीच जगंन असा नाही. माझ्यावर जबाबदारी आहे बाई, फक्त माझी नाही, अख्ख्या मानवाची.

माझा तारपा त्याला हात जोडून मी म्हणायचो, ‘देवा मी तुझी सेवा करतो. मग तू पण माझं काही पहा ना. मला विमानात ने.’ त्याने खरंच मला विमानाने दिल्लीला नेला. हा भिकल्या लाडक्या धिंडा विमानात फिरून आला. सगळा देश फिरून आला. आळंदी, जेजुरी, बारामती सन्या सिंगणापूर...चौफेर फिरून आलो. कुणी गोम्याची राजधानी पणजी नाही पाहिली. तिथला पण एक पत्रक दिलाय मला. मी नाही सांगत. फार गोष्टी आहेत. त्या मी नाही सांगत. पण माझ्या हृदयात आहेत ना. कसं आहे, बेडुक विहिरीत ऱ्हातो. त्याला जग नाही माहित. बाहेर येत नाही त्याला दिसत नाही. मी बाहेर पडलो ना... जग पाहिला ना.

Left: The many tarpas made by Bhiklya baba.
PHOTO • Siddhita Sonavane
Right: He has won many accolades for his tarpa playing. In 2022, he received the prestigious Sangit Natak Akademi Award and was felicitated in Delhi. One wall in his two-room house is filled with his awards and certificates
PHOTO • Siddhita Sonavane

डावीकडेः भिकल्या बाबांनी बनवलेले विविध आकाराचे तारपे. उजवीकडेः त्यांच्या वादनासाठी त्यांना आजवर कित्येक पुरस्कार मिळालेले आहेत. २०२२ साली त्यांना मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आणि दिल्लीला त्यांचा सत्कार झाला. उजवीकडेः त्यांच्या दोन खोल्यांमधली एक अख्खी भिंत त्यांना मिळालेली प्रमाणपत्रं आणि पुरस्कारांनी सजलेली आहे


चिक्कार गोष्टी आहेत. मला पण माहित आहे ना. पण मी सांगत नाही. कुणाला भेटायचाच नाही. ते पत्रकार येतात, लिहून घेतात आणि मग म्हणतात, ‘आमच्यामुळे भिकल्या बाबा मोठा झाला. आम्ही त्याला मोठा केला.’ किती गोष्टी आहेत. माझ्या हृदयात आहेत ना. तुमचा नशीब की मी तुम्हाला भेटला.

संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार दिल्लीला दिला. तेव्हा माझ्या डोळ्याले पाणी आला. बापाने शाळा शिकवला नाय. शिकून नोकरी लागती, नाय लागती. पण त्याने सांगला, ‘हे वाद्य आपलं दैवत आहे.’ आणि हे खरोखरच दैवत आहे. त्याने मला सगळा काही दिला. मला माणुसकी दिली. जगभरात माझा नाव झाला. पोस्टाच्या पाकिटावर माझा तारपा आला. आज फोनवर भिकल्या धिंडा बटन दाबला तर माझा व्हिडिओ दिसता ना... आणखी काय पाहिजे?

आजची पोरा तारप्यावर नाचत नाहीत. डीजे लावून नाचतात. नाचू द्या. पण नवा भात आल्यावर, धनधान्य पिकल्यावर गावदेवीला निवद नेताना, संबरण करताना डीजे लावणार का? तारपाच वाजणार ना तेव्हा?

या दस्तावेजासाठी आरोहन संस्थेच्या माधुरी मुकणे यांची मोलाची मदत झाली आहे. त्यांचे आभार.

मुलाखत व अनुलेखनः मेधा काळे
फोटो आणि व्हिडिओः सिद्धिता सोनवणे

भारतभरातल्या अनेक भाषा आज लोप पावत आहेत. या भाषा बोलणाऱ्या समुदायांचं जगणं टिपत आणि सामान्य माणसांच्या शब्दांत नोंदवून ठेवण्याचं काम पारीने हाती घेतलं आहे.

वारली इंडो-आर्यन भाषा असून ती गुजरात, दिव-दमण, दादरा नगर हवेली,  महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यामध्ये राहणाऱ्या वारली आदिवासींची भाषा आहे. युनेस्कोच्या ॲटलस ऑफ लँग्वेजेसनुसार (भाषांचा नकाशासंग्रह) भविष्यात धोक्यात येऊ शकणाऱ्या भारतीय भाषांमध्ये वारली भाषेचा समावेश होतो.

या लेखातील भाषा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यात बोलली जाणारी वारली भाषा आहे.

Bhiklya Ladkya Dhinda

Bhiklya Ladkya Dhinda is an award-winning Warli Tarpa player from Walwande in Jawhar block of Palghar district. His most recent honour being the Sangeet Natak Akademi Puraskar in 2022. He is 89.

Other stories by Bhiklya Ladkya Dhinda
Photos and Video : Siddhita Sonavane

Siddhita Sonavane is Content Editor at the People's Archive of Rural India. She completed her master's degree from SNDT Women's University, Mumbai, in 2022 and is a visiting faculty at their Department of English.

Other stories by Siddhita Sonavane