कोचरे गावातली संतोष हळदणकरांची ५०० कलमांची हापूसची बाग कधी काळी फळांनी लदलदलेली असायची. आता मात्र तिची रया गेली आहे.

अवकाळी पाऊस आणि तापमानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्याचं उत्पादन प्रचंड घटलं आहे. कोल्हापूर आणि सांगलीच्या बाजारात जाणाऱ्या आंब्याच्या गाड्या आणि पेट्यांची संख्याही कमी झाली आहे.

“मागील ३ वर्ष खूप कठीण चालली आहेत. त्या आधीच्या ७-८ वर्षा पूर्वी गावातून १०-१२ गाड्या आंबे घेऊन विकायला जायच्या पण आता संपूर्ण गावातून १ गाडी भरताना मुश्किल होत आहे,” गेली १० वर्षं आंब्याच्या व्यवसायात असणारे संतोष हळदणकर सांगतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ला तालुक्यातल्या तीन मुख्य उत्पादनांपैकी एक म्हणजे आंबा (जनगणना, २०११). परंतु हवामान इतकं लहरी झालं आहे की आंब्याचं उत्पादन गेल्या वर्षी सरासरीच्या १० टक्क्यावर आलं आहे असं हळदणकर सांगतात.

“२-३ वर्षात निसर्गातील बदलामुळे खूप नुकसान झालं,” स्वरा हळदणकर म्हणतात. आंब्याची शेती करणाऱ्या स्वरा सांगतात की हवामान बदलत असल्यामुळे आंब्यांवर नव्या किडी यायला लागल्या आहेत. तुडतुडे आणि थ्रिप्ससारख्या किडींचा आंब्याच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे.

कृषी विषयात बीएससी केलेला नीलेश परब गेल्या अनेक वर्षांपासून थ्रिप्स या किडीचा अभ्यास करतोय. त्याच्या निरीक्षणानुसार, “कोणतेही औषध या थ्रीप्स रोगवरती काम करत नाही.”

कसलाच फायदा नाही आणि फळ घटत चालल्यामुळे संतोष आणि स्वरा यांच्यासारख्या आंबा उत्पादकांना आपल्या मुलांनी या व्यवसायात येऊ नये असं वाटतं. “आंब्याला काही दर नाही, दलाल लोक फसवतात. एवढे कष्ट करून सगळा पैसा फवारणीला जातो, कामगारांना जातो,” स्वरा सांगतात.

फिल्म पहाः आंब्याची सद्दी संपली?

Jaysing Chavan

Jaysing Chavan is a freelance photographer and filmmaker based out of Kolhapur.

Other stories by Jaysing Chavan
Text Editor : Siddhita Sonavane

Siddhita Sonavane is Content Editor at the People's Archive of Rural India. She completed her master's degree from SNDT Women's University, Mumbai, in 2022 and is a visiting faculty at their Department of English.

Other stories by Siddhita Sonavane