हादू बाहेराचं रोज १२ तासांसाठी ‘स्वतःचं’ एक घर आहे. तेवढ्या वेळापुरता हा ५१ वर्षीय कामगार उत्तर सुरतेतल्या वेद रोडवरच्या एका अंधाऱ्या खोलीतली ६ x ३ फुटाची जागा ‘आपली’ म्हणून वापरतो.

दिवसाच्या उरलेल्या १२ तासांसाठी त्याचा साथी त्या जागेवर राहतो - त्यांच्या कामाच्या पाळीनुसार स. ७ ते संध्या. ७ किंवा उलट. वीज गुल असेल तेव्हा मिळणाऱ्या ‘सुटी’मुळे संकटच उभं राहतं कारण तेव्हा सगळ्या ६० मजुरांना महावीर मेस मधील त्या ५०० चौ. फुट जागेत दाटीवाटीने राहावं लागतं, जिथे सध्या हादू राहतायत.

उन्हाळ्याचे दिवस - जेव्हा तापमान ४० अंशापर्यंत वाढतं - असह्य असतात. “काही हॉल (कामगार राहतात त्या मोठ्या खोल्या) फारच काळोख्या आणि कोंदट आहेत,” बाहेरा सांगतात. ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील पुरुषोत्तमपूर तालुक्यातील कुसलापल्ली गावातून ते १९८३ मध्ये सुरतेला आले. “मागावर दिवसभर कष्ट केल्यावरसुद्धा आम्हाला नीट आराम करता येत नाही.”

बाहेरांप्रमाणेच यंत्रमागावर काम करणारे अनेक कामगार (त्यांच्यातील बहुतेक गंजम जिल्ह्यातून आलेले आहेत. पहा: कृत्रिम कापड, अस्सल हिरमोड) अशा ‘मेस रूम’ किंवा सामाईक खोल्यांतून राहतात. वार्षिक सुटीसाठी गंजमला जाऊन आल्यावर त्यांना इथे जागा मिळते ती ‘आधी आला तो आधी स्थिरावला’ या न्यायाने. या खोल्या उद्योगांच्या सान्निध्यात असतात; कधी तर त्यांच्या मागांपासून काही मीटर अंतरावर. १२ तासांच्या पाळीनंतर जेव्हा ते आपल्या कामचलाऊ अंथरुणात पडतात तेव्हाही यंत्रांची ‘खट-खट’ त्यांची पाठ सोडत नाही.

PHOTO • Reetika Revathy Subramanian

वर: बहुतेक मेस खोल्यांत, स्वयंपाकाची आणि शिधा ठेवण्याची जागा संडासाजवळ असते. खाली: कामगार आपल्या बॅगा आणि इतर सामान एकावर एक ठेवतात. त्यात देवाच्या तसबिरी असतात, काही खोल्यात पूजेचा कोपराही असतो

सुरत ओडिया वेल्फेअर असोसिएशनच्या अंदाजानुसार गंजमचे अंदाजे ८ लाख कामगार सुरतेत आहेत. गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील स्थलांतरितांसोबत काम करणाऱ्या आजीविका ब्युरो या संस्थेच्या मते शहरातील १५ लाख यंत्रमागांवर काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांचा आकडा ६ लाख इतका आहे.

५०० ते ८०० चौ. फुटांच्या एकेका खोलीत ६० ते १०० कामगार दाटीवाटीने राहतात आणि दोन पाळ्यांत काम करतात. जुनाट, ढेकणांनी भरलेल्या गाद्यांवर झोपतात, चिरडलेल्या ढेकणांचं रक्त कळकट भिंतींवर दिसतं. इथे वाळवीही आहे आणि मधूनच उंदरंही धावतात. उन्हाळ्यात कामगार जमिनीवर किंवा प्लास्टिकवर झोपतात कारण आधी झोपलेल्याच्या घामाने गाद्या ओल्या होतात आणि वास मारतात.

प्रत्येक जागेच्या उशाशी दोघांच्या बॅगा आणि इतर सामान रचून ठेवलेलं असतं. साधारण तीन जोडी कपडे, काही वैयक्तिक समान, थंडीसाठी एखादं पातळसं कांबळं, काही रोकड आणि देवांच्या तसबिरी असं या सामानात असतं.

सर्व रहिवाश्यांसाठी मिळून, खोलीच्या एका टोकाला दोन मोऱ्या असतात. अंघोळीसाठी, स्वयंपाकासाठी आणि पिण्यासाठी तिथलंच पाणी वापरतात. पाणी नियमितपणे येत नाही त्यामुळे प्लास्टिक ड्रम मधून साठवावं लागतं आणि त्यामुळे सगळ्यांना रोज अंघोळ करता येत नाही.

workers are sitting in room
PHOTO • Aajeevika Bureau
workers are sleeping in hall
PHOTO • Reetika Revathy Subramanian

उत्तर सुरतेतली फुलवाडी भागातली एक मेस रूम. मजुरांना झोपण्यासाठी आणि वावरण्यासाठी १२ तास ही जागा मिळते - उरलेले १२ तास ते मागावर काम करायला जातात

खोलीतल्या मोजक्याच पंख्यांनी गर्मी काही कमी होत नाही. शहराच्या मुख्य भागात, जिथे महावीर मेस आहे, वीज सहसा गुल होत नाही पण अंजनी, सायन यासारख्या बाहेरच्या भागात आठवड्यातून एकदा दक्षिण गुजरात विद्युत कंपनी ४-६ तासांसाठी पुरवठा बंद करते. महावीर मेसला तीन खिडक्या आहेत आणि त्यामुळेही तिला जास्त मागणी असते. उत्तर सुरतेतल्या फुलवाडी भागातील काशिनाथभाई मेससारख्या काही खोल्यांना तर एकही खिडकी नाही. खोलीच्या अरुंद दारातून जी काही हवा येईल तेवढीच.

खेळती हवा नाही, माणसांची दाटी आणि पाण्याची कमतरता यामुळे सतत आजारपण येतात. फेब्रुवारी २०१८ मध्ये, कृष्ण सुभाष गौड (२८) या माग कामगाराचा क्षयाने मृत्यू झाला, त्याला १८ महिने आधी लागण झाली होती. तो फुलवाडीत शम्भुनाथ साहूच्या मेस मध्ये, इतर ३५ जणांसोबत राहत होता. तो आपल्या गावी परत गेला आणि क्षयावर योग्य उपचार घेऊ लागला. पण पैसे संपले आणि तो कामासाठी सुरतेला परतला. इथे अर्थात औषधे सुरु ठेवणे जमेना, साधं शांत झोप घेणंही इथे शक्य नसे.

“क्षयासारखे रोग अतिशय सांसर्गिक असतात. आणि इथली गर्दी आणि घाण यांपासून तर सुटका नाही,” सुरतच्या आजीविका ब्युरो या संस्थेचे समन्वयक संजय पटेल सांगतात. गौडच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. “गौडचा मृत्यू खोलीत झाला, कामाच्या ठिकाणी नाही, त्यामुळे त्याचा मालक नुकसानभरपाई देण्यास नकार देत आहे...खोली आणि कामाची जागा यांत इतक्या एकमेकांशी जोडल्या आहेत इथे शोषण वेगळं काढताच येत नाही.”

त्यानंतर (गौडच्या मृत्यूनंतर) जेमतेम चार महिन्यांनी, जून १९१८मध्ये, १८ वर्षांचा संतोष गौडा (मूळ गाव बिरंचीपुर, ता. बुगुडा, जि. गंजम) अचानक उद्भवलेल्या आजाराला बळी पडला. दोन दिवस ताप, सर्दी आणि हगवण यांचा त्रास होऊन मीनानगरमधल्या भगवानभाई मेसमधील संडासातच तो मरण पावला. “तो डॉक्टरकडे सुद्धा गेला नाही,” त्याचा एक सहनिवासी सांगत होता, “इथे तो तीन वर्षांपासून राहत होता पण त्याचे कोणीच नातेवाईक किंवा मित्र नव्हते. त्याचा मृतदेह घरी पाठवण्याऐवजी आम्ही इथेच सुरतेत त्याचे अंत्यसंस्कार केले.”

outside area of room
PHOTO • Reetika Revathy Subramanian
outside area of rooms
PHOTO • Reetika Revathy Subramanian

मेसचे व्यवस्थापक फक्त खोल्या साफ करतात, रस्ता आणि आसपासची मोकळी जागा तशीच कचरा, धूळ आणि चिखलाने भरलेली असते.

काही इमारतींतील वरच्या मजल्यावरील खोल्या एका बाजूने खुल्याच असतात. “कामगार अशा ठिकाणाहून पडून मेल्याचीही उदाहरणे आहेत,” फोटो: आजीविका ब्युरोच्या डॉक्टर आणि सल्लागार डॉ. रमणी अत्कुरी सांगतात. “या मेस खोल्या गर्दीच्या, अंधाऱ्या आणि कोंदट असतात अशा वातावरणात खरुज, बुरशीचे त्वचारोग, मलेरिया, क्षय यांसारखे सांसर्गिक रोग सहज पसरू शकतात.”

सरकारने मात्र काम आणि घर यांतील सीमारेषा स्पष्ट केलेली आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या यंत्रमाग सेवा केंद्राचे उपनिदेशक निलय पंड्या सांगतात की नुकसानभरपाई आणि विमा यांचे फायदे फक्त कामाच्या जागी झालेले मृत्यू व दुखापत यांनाच लागू होतात. “यंत्रमाग क्षेत्र खूपच विकेंद्रित आहे,” पंड्या म्हणतात. ते सुरतच्या सरकारी यंत्रमाग विणकर गट विमा योजनेवर निरिक्षक होते. त्यांचा अंदाज आहे की, “आजही जेमतेम १०% कामगारांचीच या योजनेखाली नोंद झाली आहे.”

ही योजना २००३ मध्ये सुरू झाली. यासाठी कामगार वर्षाकाठी ८० रुपये भरतो. (त्याशिवाय सरकारकडून रु. २९० व सामाजिक सुरक्षा निधीमधून रु. १०० भरले जातात.) तो स्वत: किंवा त्याचे कुटुंबीय यांना पुढीलप्रमाणे पैसे मिळू शकतात : नैसर्गिक मृत्यू – रु. ६०,०००, अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व – रु. १,५०,००० व  कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व – रु. ७५,०००. “मात्र त्यांच्या राहण्याच्या जागा आमच्या योजनेच्या आवाक्यात येत नाहीत,” पंड्या सांगतात.

या खोल्यांपैकी शंभुनाथ साहूच्या मेसमध्ये साधारण ७० जण (दोन पाळ्यांत) राहतात. फुलवाडी भागातील एका पाच मजली इमारतीतील इतर आठ मेस खोल्यांपैकी ही एक खोली आहे. यंत्रमागांचा गोंगाट खोल्यांत घुमत असतो. मोडकळीला आलेल्या जिन्यावर कचरा आणि सांडपाणी साठलेले असते, त्यातच स्टोव्हवर डाळ आणि तांदूळ शिजत असतात. मेसचे व्यवस्थापक फक्त खोल्या साफ करतात, रस्ता आणि आसपासची मोकळी जागा तशीच कचरा, धूळ आणि चिखलाने भरलेली असते. सुरत मनपाच्या घंटागाड्या कचरा उचलायला या भागात नियमितपणे येत नाहीत, त्यामुळे कचरा आठवडाभर साचून राहतो.

outside area of room
PHOTO • Reetika Revathy Subramanian

बहुतेक मेस खोल्या मागांशेजारीच असतात त्यामुळे मागांचा कर्णकर्कश असा ‘खट-खट’ आवाज सतत ऐकू येतो

इमारत रस्त्याच्या पातळीपेक्षा खाली असेल तर पावसाळ्यात कधीकधी इमारतीच्या व्हरांड्यात आणि कधी तर खोल्यांमध्ये पाणी शिरतं आणि सगळीकडे निसरडं आणि ओलं होतं. अशा वेळी कपडे वाळणं कठिण असतं. “मग आम्हाला दमट कपडे घालूनच कामाला जावं लागतं, इलाजच नसतो,” तीन दशकांपासून इथे राहणारे पोलासरा तालुक्यातल्या बालिचाइ गावचे रामचंद्र प्रधान, वय ५२ सांगतात.

साहुच्या ५०० चौ.फुटांच्या मेसमध्ये, इतर मेसप्रमाणेच मोठमोठी भांडी, स्वयंपाकघर, एक पूजेचा कोपरा, संडास, भाज्यांचा ढीग, तांदळाची पोती - आणि ३५ कामगार, आपापल्या सामानासह राहतात. साहू, स्वत: गंजम जिल्ह्यातील पोलासरा गटातील सनबरगामचा रहिवासी आहे. त्याच्या म्हणण्यानुसार या कामगारांना “पौष्टिक अन्न” मिळतं आणि मेस “स्वच्छ राखली” जाते.

फुलवाडीमधील सहयोग औद्योगिक भागातील दुसऱ्या एका मेसचा व्यवस्थापक शंकर साहू (मूळचा पोलासरा तालुक्यातील निमिना गावातील रहिवासी) सांगतो, “दर आठवड्याला मी २०० किलो बटाटे खरेदी करतो. साधारण ७० जणांना दोन वेळा भरपूर होईल असे जेवण मी बनवतो. कामगारांना नीट जेवण मिळालं नाही तर ते चिडतात.” एका स्वयंपाक्याच्या मदतीने साहू डाळ, भात, भाजी आणि रस्सा बनवतो. “मी [आठवड्यातून दोन वेळा] मासे, अंडी आणि कोंबडीदेखील देतो.” महिन्यातून एकदा मटन दिलं जातं.

स्वयंपाकातलं पुन्हा पुन्हा वापरलं जाणारं तेलही कामगारांच्या आरोग्यावर परिणाम करतं. मार्च २०१८ मध्ये आजीविका ब्युरोने फुलवाडी आणि मीनानगर भागातील ३२ मेसमधील लोकांच्या आहाराची पाहणी केली. त्यात असं दिसलं की अमेरिकन अन्न व पोषण बोर्डाच्या शिफारसीच्या तुलनेत २९४% एवढे स्निग्ध पदार्थ आणि ३७६% मीठ त्यांच्या आहारात असतं. “वयस्क कामगारांमध्ये उच्च रक्तदाब अधिक प्रमाणात आढळतो पण सगळ्यांच्याच रक्तातील चरबीची गुणवत्ता निकृष्ट आहे,” डॉ. अत्कुरी म्हणतात.

a worker Shankar Sahu is stand
PHOTO • Reetika Revathy Subramanian
mess manager subrat Gouda is seated
PHOTO • Reetika Revathy Subramanian
mess owner Kashinaath Gouda
PHOTO • Reetika Revathy Subramanian

डावीकडून: फुलवाडीतील एक मेस व्यवस्थापक शंकर साहू; अंजनीतील एक व्यवस्थापक सुब्रत गौडा(बसलेला); मेस मालक काशिनाथ साहू

मेसच्या खोल्या स्थानिक व्यापाऱ्यांच्या मालकीच्या असतात आणि व्यवस्थापकांना, जे बहुतेक करून गंजम जिल्ह्यातले आहेत, महिना रु. १५ ते २० हजार इतक्या भाड्याने दिलेल्या असतात.

“खोलीत किती कामगारांना जागा द्यावी यावर काही बंधन नाही. जितके जास्त जण भरू तितके जास्त पैसे मिळतात,” फुलवाडीतील काशिनाथभाई मेसचा मालक/ व्यवस्थापक काशिनाथ गौडा (५२) सांगतो. कामगार दोन पाळ्यांमध्ये राहतात...तरीही व्यवस्थापकांसाठी विशेष फायदा नसतो. पण मागावर काम करण्यापेक्षा हे काम कितीतरी बरं म्हणायचं. १९८०-९० च्या मध्यावर, गौडा पोलासरा तालुक्यातील तितुलिया या गावाहून इथे आले. “जवळ जवळ २० वर्षे मी ‘खट-खट’ यंत्रावर काम केलं. मोठ्या कष्टाचं जिणं होतं ते,” ते सांगतात. “दहा वर्षांपूर्वी मी हे मेस सुरु केलं. हे २४ तासांचं काम आहे कारण कामगार दोन पाळ्यांत येतात. तसं जोखमीचं पण आहे कारण कधी कधी कुणी कामगार एकदम चिडून हिंसक होतात, अंगावर येतात. तरीही मागावर काम करण्यापेक्षा हे काम नक्कीच कितीतरी चांगलं आहे. मी वर्षातून एकदा घरी जातो. बायको आणि दोन मुलं आहेत. काही वर्षांनी, माझ्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या की मी माझ्या गावाकडे परत जाईन.”

इतक्या तासांचं कष्टाचं काम आणि दयनीय राहणीमुळे अनेक कामगार दारूचा आसरा घेतात. गुजरातेत दारूबंदी असल्याने कारखान्यांच्या परिसरात चोरून फुग्यात विकली जाणारी २० रुपये पाव लिटर अशी मिळणारी गावठी दारू ते घेतात.

workers are seated in room
PHOTO • Reetika Revathy Subramanian

वेद रोडवरील त्रिनाथ साहू काका मेसमध्ये आपल्या साथी कामगारांसोबत श्यामसुंदर साहू. “मी अशा ठिकाणी राहतो हे माझ्या कुटुंबाला माहित नाही...”

“अनेक तरुण कामगार दारूकडे वळतात,” सुब्रत गौडा सांगतो. तो उ. सुरत मध्ये अंजनी औद्योगिक भागात भगवान मेस चालवतो. “कामावरून आले की ते सरळ दारूच्या गुत्त्यात जातात. खोलीवर परत येतात तेव्हा त्यांना संभाळणं कठिण जातं. ते खूप हिंसक होतात, शिव्या देतात.” जवळच्याच दुसऱ्या एका मेसचा व्यवस्थापक प्रमोद बिसोयी सांगतो, “हे कामगार घरापासून, कुटुंबापासून दूर इथे फार कठिण परिस्थितीत आयुष्य जगतात. ना विश्रांती, ना करमणूक. मग या जगापासून पळण्याचा एकच मार्ग त्यांना सापडतो – दारू!”

पोलासरा तालुक्यातील सनबरगामचा कान्हू प्रधान आपल्या व्यसनातून सुटण्याची धडपड करतोय. “दर आठवड्यात मी तीन दिवस पितो. नाहीतर या थकवणाऱ्या कामाच्या तणावातून सुटका कशी मिळणार?” फुलवाडीमधील सहयोग औद्योगिक एककातील आपल्या कामावरून परतताना तो सांगतो. “घरी पाठवण्यासाठी पैसे जमा करण्याचाही ताण असतो. दारू पिणं वाईट आहे मला कळतंय, पण सोडणं कठीण आहे.”

संध्याकाळचे ६ वाजलेत, ३८ वर्षीय श्यामसुंदर साहू वेद रोडवरील मागावर रात्रपाळीत कामावर जाण्याची तयारी करत आहे; गेल्या २२ वर्षांचा नेम आहे हा. “सोळाव्या वर्षी मी इथे आलो. बालिचाइ गावाला वर्षातून एकदा जातो; तेवढं सोडलं तर हेच माझं काम आणि हेच जगणं. “मी अशा ठिकाणी, इतक्या लोकांसोबत राहतो, हे माझ्या कुटुंबाला माहीत नाही...पण माझा नाईलाज आहे. कधी कधी कामाच्या ठिकाणी अधिक काळ राहणं जास्त सोईचं वाटतं.” एवढं बोलून तो मधला १० फुटी रस्ता ओलांडून आपल्या ‘घरून’ फॅक्टरीत पोचतो.

अनुवादः छाया देव

Reetika Revathy Subramanian

Reetika Revathy Subramanian is a Mumbai-based journalist and researcher. She works as a senior consultant with Aajeevika Bureau, an NGO working on labour migration in the informal sector in western India

Other stories by Reetika Revathy Subramanian
Translator : Chhaya Deo

Chhaya Deo is a Nashik based activist of Shixan Bazaarikaran Virodhi Manch, a group working against commercialisation of education and for quality education which is a constitutional right of Indian citizens. she writes and also does translation work.

Other stories by Chhaya Deo