एखादं काम कायम अपूर्ण राहणं हेच त्याचं यश मानावं का?
का नाही? नक्कीच. जगातल्या सर्वाधिक बहुरंगी आणि बहुढंगी अशा गावपाड्यांवरचा एक जिताजागता संग्रह तयार करण्याचं काम म्हटल्यावर ते पूर्ण न होणं हेच त्याचं यश. भारताचा ग्रामीण भाग जगातला सर्वात वैविध्यपूर्ण भाग आहे. इथे वेगवेगळ्या समुदायांचे तब्बल ८३ कोटींहून अधिक लोक राहतात आणि ते जवळपास ८०० भाषा बोलतात. हेच वैविध्य त्यांचे व्यवसाय आणि उपजीविका, कला आणि कारागिरी, साहित्य, कथा, रोजचं जगणं, येणं-जाणं अशा आणि इतरही असंख्य गोष्टींमध्ये आपल्याला दिसतं. पारीवर आम्ही या सगळ्यांचा मागोवा घेत आहोत.
जाहिराती आणि प्रसिद्धीचं वलय असलेले काही चेहरे या जोरावर सुरू असलेली मुख्य धारेतली माध्यमं गावपाड्यांवर काय घडतंय ते फारसं नोंदवत नाहीत. आणि म्हणूनच पुढच्या २५ ते ५० वर्षांचा विचार करता, पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया – पारी ही अशी एकमेव जागा असेल, जिथे आताच्या काळात आपल्या गावपाड्यातले लोक कसे राहत होते, कसे जगत होते हे समजून घेता येईल. आणि आजचा विचार करता साध्यासुध्या माणसांचं रोजचं जगणं टिपणारं वार्तापत्र आहे पारी.
पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडियामधून आलेल्या माहितीनुसार भारतात ८०० भाषा बोलल्या जातात आणि या भाषांच्या ८६ लिप्या आहेत. पण यातल्या केवळ ४ टक्के भाषांचा समावेश इयत्ता सातवीपर्यंतच्या शालेय शिक्षणामध्ये केला गेला आहे.
पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया – पारीवर सध्या १५ भाषांमध्ये मजकूर प्रकाशित होतो. तब्बल १ अब्ज २० कोटी लोकांनी या भाषांपैकी एखादी आपली प्रथम भाषा असल्याचं नमूद केलं आहे.
आपल्या संविधानाच्या आठव्या सूचीमध्ये २२ भाषांची यादी दिली आहे. या भाषांचं संवर्धन करण्याची जबाबदारी देशाच्या सरकारावर आहे. पण, इथे अशीही राज्यं आहेत ज्यांच्या राज्यभाषा या २२ भाषांमध्ये समाविष्ट नाहीत, उदा. मेघालयात बोलल्या जाणाऱ्या खासी आणि गारो. आठ भारतीय भाषा ५ कोटी किंवा त्याहून अधिक जण बोलतात. यातल्या तीन भाषा ८ कोटी किंवा त्याहून अधिक जणांच्या तोंडी आहेत. आणि एक तर ५० कोटी लोकांची भाषा आहे. दुसरीकडे अशा काही अनोख्या आदिवासी भाषा आहेत ज्या अगदी ४००० किंवा त्याहूनही कमी लोक बोलतात. भारताच्या पूर्वेकडच्या एकट्या ओडिशामध्ये ४४ आदिवासी भाषा बोलल्या जातात. लिंग्विस्टिक सर्वेतील नोंदींनुसार, गेल्या ५० वर्षांत जवळ जवळ २२० भाषा अस्तंगत झाल्या आहेत. त्रिपुरामधली साइमार बोलणारे शेवटचे फक्त पाच जण उरले आहेत.
आपली गावं आणि खेडी अतिशय वेदनादायी संक्रमणातून जातायत आणि त्यामध्ये त्यांची ही अनोखी वैशिष्ट्यंही नामशेष होतायत. फार मोलाचं काही आपल्या हातून निसटत जातंय. उदा. भारतात विणकामाच्या जितक्या शैली आणि पद्धती आहेत तशा इतर कुठल्याही देशात सापडणार नाहीत. परंपरागत विणकाम करणारे हे समुदाय आता पुरते कोलमडून गेले आहेत. अख्खं जग या कलेला मुकणार आहे. काही अगदी अनोखे व्यवसायही लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, उदा. कथा किंवा गोष्टी सांगणारे कथाकार, किंवा महाकाव्य गाणारे भाट.
असेही काही व्यवसाय आहेत जे फक्त काही देशातच अस्तित्वात आहेत. उदा. ताडी गोळा करणारे लोक. ताडीच्या हंगामात रोज ५० झाडं, तीही तीन वेळा चढून ते ताडी गोळा करतात. या रसापासून ते ताडगूळ बनवतात किंवा ताडी. भर हंगामात ताडी काढणारा एक कामगार, दर रोज न्यू यॉर्कच्या एम्पायर स्टेट इमारतीपेक्षा जास्त उंची सर करत असेल. पण आता असे किती तरी व्यवसाय उद्ध्वस्त झालेत. कुंभार, धातूकाम करणारे कारागीर आणि इतरही अत्यंत कुशल अशा लाखो कारागिरांच्या जीविका हिरावून घेतल्या जात आहेत.
ग्रामीण भारताचं अनोखेपण ज्या कशातून आलं आहे ते पुढच्या २०-३० वर्षांमध्ये कदाचित नाहिसं झालेलं असेल. हे विलक्षण वैविध्य जतन करण्याची स्फूर्ती देणारं किंवा कमीत कमी आपलं शिक्षण करणारं असं काहीही लेखी, मौखिक किंवा इतर स्वरुपात पद्धतशीरपणे नोंदवून ठेवलेलं नाही. त्यामुळे गावाकडचं जग आणि तिथले नाद, आवाज आपण गमावून बसतोय. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना यातलं फार कमी किंवा कदाचित काहीच माहित होणार नाही, कळणार नाही. आताची पिढी देखील हळूहळू या जगाशी असणारी आपली नाळ तोडू पाहतीये.
नष्ट व्हावं, संपावं असं बरंच काही ग्रामीण भारतात आहे. आणि यातलं बरंच त्रासदायक, शोषण करणारं, प्रतिगामी आणि क्रूर आहे. ते संपायलाच पाहिजे. अस्पृश्यता, सरंजामशाही, वेठबिगारी, टोकाचे जातीभेद, लिंगभेद आणि शोषण, जमिनीची लूट आणि अजूनही बरंच काही. पण दुर्दैव हे की सध्याच्या संक्रमणात या प्रतिगामी आणि क्रूर, रानटी प्रथांना बळ मिळतंय आणि जे सर्वोत्तम आणि विविधांगी आहे ते मात्र विरत चाललंय. हे सगळंही इथे नोंदवलं जावं हे पारीचं ध्येय आहे.
पारीचं योगदान नेमकं इथे आहे.
पारी एकाच वेळी एक जिवंत अशी नोंदवही आहे आणि सोबतच एक संग्रहसुद्धा.
यावरती ग्रामीण भारतासंबंधी असं लिखाण आणि इतर साहित्य तयार करण्यात येईल जे आताचं, वर्तमानातलं तसंच सध्याच्या काळाला साजेसं असेल. हे करत असतानाच आम्हाला शक्य आहे तितक्या स्रोतांमधून यापूर्वी प्रकाशित झालेल्या कहाण्या, अहवाल, व्हिडिओ आणि ऑडिओ इथे आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. पारीने स्वतः तयार केलेलं सर्व साहित्य क्रिएटिव्ह कॉमन्स प्रकारात मोडतं. पारीची वेबसाइट वापरासाठी सर्वांना खुली आहे आणि पारीवर कुणीही आपलं साहित्य पाठवू शकतं. आमच्यासाठी लिहा, फोटो काढा, फिल्म तयार करा, ध्वनीमुद्रण करा - तुमच्या कामाचं स्वागतच आहे. या वेबसाइटची मानकं आणि आमच्या ध्येयाशी ते सुसंगत हवं. आणि आमचं ध्येय म्हणजे – साध्यासुध्या माणसांची रोजची आयुष्यं.
भारतातली ग्रंथालयं आणि संग्रहालयांचा वापर खासकरून गेल्या २० वर्षांत कमी झाला आहे. असं असलं तरी आश्वासक गोष्ट ही होती की संग्रहालयात तुम्हाला जे दिसायचं तेच इथल्या गल्ली बोळात, रस्त्यावरही मिळायचंः लघुचित्रांच्या विविध शैली किंवा मूर्तीकामाच्या परंपरा अगदी हुबेहुब पहायला मिळत असत. आता त्याही लुप्त होऊ लागल्या आहेत. तरुण मुलं-मुली ग्रंथालयं आणि संग्रहालयात नेमाने नाही तर क्वचितच दिसतात. पण एक जागा आहे जिथे येणाऱ्या पिढ्या कायम जातील, रमतील. फक्त आपल्या देशातच नाही तर जगभर. ती जागा आहे इंटरनेट.
भारतामध्ये ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा वाढत असली तरी लाखो वंचितांसाठी ती आजही चार हात दूर आहे. [मार्च २०२१ मध्ये अखेरची डायल-अप जोडणी बंद झाली.] त्यामुळे एक सार्वजनिक संसाधन तयार करण्यासाठी, एक जितं जागतं ज्ञानपत्र आणि लोकांची आयुष्यं नोंदवणारा संग्रह उभा करण्यासाठी हीच जागा, हाच मंच सर्वोत्तम आहे. द पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया. अनेक विश्वं, एक वेबसाइट. कोणत्याही दुसऱ्या साइटवर नसतील इतके भिन्न आवाज आणि विभिन्न भाषा इथे ऐकता आणि वाचता येतील.
आणि म्हणूनच हा उपक्रम, त्याचा आवाका आणि त्याचं परिमाण अभूतपूर्व असेल. यात अनेकानेक दृकश्राव्य आणि लिखित माध्यमं वापरली जातील. ज्यात भारताच्या खेड्यापाड्यातले लोक आपल्या गोष्टी, आपलं काम, रोजच्या घडामोडी आणि अनेकविध इतिहास स्वतःच सांगतील. मळ्यांमध्ये चहाची पानं खुडणाऱ्या स्त्रिया, भर समुद्रात मासे धरणारे मच्छिमार, भातलावणी करता करता गाणी गाणाऱ्या शेतकरी-शेतमजूर स्त्रिया किंवा कहाण्या सांगणारे कथाकार. कुठल्याही क्रेन किंवा फोर्कलिफ्टचा वापर न करताही शेकडो वर्षांपासून वापरात असणाऱ्या तंत्राने प्रचंड अवजड जहाजं समुद्रात लीलया उतरवणारे खलाशी. थोडक्यात स्वतःबद्दल, आपल्या कष्टांबद्दल आणि आयुष्याबद्दल बोलणारी साधीसुधी, रोजची माणसं जे जग पाहण्यात आपण कमी पडलो त्याबद्दल आपल्याशी बोलतील.
२५ एप्रिल २०२० रोजी युनायटेड स्टेट्स लायब्ररी ऑफ काँग्रेसने द पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया हे एक मोलाचं संसाधन असल्याची नोंद घेतली. तसंच त्यांच्या स्वतःच्या वेबसाइटवर आणि विदासंग्रहात पारीचा समावेश करण्यासाठी आमची परवानगी मागितली.
पारीवर काय आहे?
पारीवर दृश्य, श्राव्य, फोटो आणि लिखित माध्यमं वापरली जातात, ती एकमेकात गुंफली जातात. तसंच पारी हा सध्याच्या काळातील एक पत्रकारितेचा मंच आहे.
२० डिसेंबर २०१४ रोजी केवळ इंग्रजी भाषेमध्ये मजकूर असलेली छोटी वेबसाइट म्हणून पारीचा प्रवास सुरू झाला. आज पारीवरचा मजकूर १५ भाषांमध्ये प्रसिद्ध होतोय. आम्ही बातम्या देणारी साइट नाही तरीही दर वर्षी लाखो लोक पारीच्या वेबसाइटला भेट देतायत.
पारीने हाती घेतलेले हे काही आगळे वेगळे प्रकल्प. अर्थात इथे दिलेल्या १२ प्रकल्पांपुरतं आमचं काम मर्यादित नाही. त्यापलिकडेही बरंच काही पारीवर आहे. परंतु या यादीतून तुम्हाला आमच्या कामाची थोडक्यात झलक पहायला मिळेल.
पारीवर प्रकाशित झालेली वातावरण बदलांचा मागोवा घेणारी लेखमाला विविध प्रकारच्या कृषी-परिसंस्थांमध्ये काय घडतंय ते आपल्याला सांगते. देशातले ३० प्रांत आणि त्यातल्या विभिन्न विभागांचा यात समावेश आहे. २०२० साली सुरू झालेल्या या वार्तांकनाला आतापर्यंत चार पुरस्कार मिळाले असून या लेखमालेत ३० सखोल वृत्तांत प्रसिद्ध झाले आहेत. यात आमचं वेगळेपण काय? ही लेखमाला अगदी साध्यासुध्या लोकांच्या प्रत्यक्ष अनुभवांमधून, त्यांच्या नजरेतून पर्यावरणाचा, वातावरण बदलांचा मागोवा घेते. शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, भटके पशुपालक, समुद्री शैवाल गोळा करणाऱ्या स्त्रिया, मध गोळा करणारे समुदाय, कीटक गोळा करणारे लोक आणि इतरही अनेक जण तुम्हाला इथे भेटतात. अतिशय संवेदनक्षम अशा पर्वतीय परिसंस्था, वनं, सागर किनारे, प्रवाळांची बेटं, वाळवंट, कोरडवाहू आणि निम्न कोरडवाहू क्षेत्रांचा मागोवा या कहाण्या घेतात.
या कहाण्यांच्या गाभ्याशी साध्यासुध्या माणसांचं म्हणणं असलं तरी विज्ञान आणि शास्त्रज्ञांचं काय म्हणणं आहे हे देखील आमच्या कहाण्यांमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे बदलत्या वातावरणाशी थेट झुंजत असलेल्या लोकांचं म्हणणं, त्यांना उमगलेलं शहाणपण आणि भारतातल्या काही नावाजलेल्या पर्यावरण शास्त्रज्ञांचं विवेचन फार काही वेगळं नाही. उदा. वातावरण बदलाच्या रणांगणात कीटकांचा लढा.
बाकी माध्यमांमध्ये हे विषय कसे हाताळले जातात? शब्दबंबाळ, क्लिष्ट वार्तांकनाचा लोकांच्या जगण्याशी थेट संबंध आहे असं वाटतच नाही. उदा. अंटार्क्टिकमधील वितळत असलेलं बर्फाचं आच्छादन, अमेझॉन जंगलातील किंवा ऑस्ट्रेलियातील वणवे. किंवा मग देशा-देशांमधील बैठका, करार, इत्यादी. पारीवरील वातावरण बदलांसंबंधीचे वृत्तांत हे संकट आपल्या उंबऱ्याशी येऊन ठेपलंय याची जाणीव वाचकाला करून देतात.
वाचनालय
पारीवरील वाचनालयाचं वैशिष्ट्य काय माहित आहे? आम्ही आमच्याकडची पुस्तकं तुम्हाला विनाशुल्क देऊन टाकतो. आमच्या साइटवर पुस्तकाची फक्त लिंक न देता अख्खं पुस्तक किंवा अहवाल तुमच्यासाठी उपलब्ध आहे. यामध्ये पुस्तकांसोबत ई-स्वरुपात उपलब्ध असलेले किंवा आम्ही डिजिटाइझ केलेले ग्रामीण भागाशी संबंधित अहवाल, अभ्यास, सर्वे किंवा एखादा दस्तावेज पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहेत. पारी वाचनालयातील सगळं साहित्य तुम्ही मोफत डाउनलोड करु शकता. मात्र योग्य ऋणनिर्देशांसह त्याचा वापर व्हावा इतकी आमची माफक अपेक्षा आहे.
ग्रामीण भारताविषयीचे अभ्यास आणि अहवाल एका ठिकाणी मिळावेत हे आमच्या वाचनालयाचं ध्येय आहे. या पुस्तकांचा किंवा वाचनालयातील इतर साहित्याचा वापर सोपा व्हावा यासाठी प्रत्येक पुस्तक/अहवाल/अभ्यासासोबत ‘फोकस अँड हायलाइट्स’ म्हणजेच महत्त्वाचे मुद्दे देण्यात आले आहेत. हे सर्व काम सेवाभावी कार्यकर्त्यांनी केलं आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे त्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. (आजवर ३२० जणांनी हे काम केलं असून किमान ४०-५० जण या कामात गुंतलेले असतात).
पारी वाचनालयात तुम्हाला शासकीय सर्वेक्षणे, स्वायत्त सामाजिक संस्थांचे अहवाल, ऐतिहासिक महत्त्व असलेले जनगणना अहवाल आणि वसाहतकालीन गॅझेट्स, कायद्यांचे मसुदे, संविधानातील सुधारणा, सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे, स्वामित्व हक्क नसणारं अनेक प्रकारचं साहित्य, स्कॅन केलेली पुस्तकं, ई-पुस्तकं, शोधनिबंध, वार्तापत्रांचे अंक आणि इतरही बरंच काही मोलाचं साहित्य तुम्हाला वाचायला मिळू शकेल.
शेतकरी आंदोलने
पारीवर शेतकऱ्यांचा संघर्ष, शेतीवरील अरिष्ट आणि शेतीसंबंधी शेकडो कहाण्या तुम्हाला वाचायला मिळतील. पारीची सुरुवात झाली त्या दिवसापासून हा विषय पारीच्या केंद्रस्थानी आहे. २०२० साली केंद्राने रेटलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातल्या शेतकऱ्यांनी अभूतपूर्व संघर्ष केला. करोनाच्या महासाथीचं तांडव सुरू असताना देखील हे शेतकरी शांततापूर्ण, संवैधानिक मार्गांचा वापर करत आपल्या न्यायासाठी लढत होते. अलिकडच्या काळात अख्ख्या जगात कुठेही इतकं मोठं आंदोलन झालेलं नाही. त्या आंदोलनाचा सखोल मागोवा घेणारा एक विशेष विभाग पारीवर तुम्ही पाहू शकता.
कृषी कायद्यांविरोधातील संघर्षः संपूर्ण वृत्तांत नक्की पहा, वाचा. तसंच २०१८ साली आपल्या मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई पायी चालत आलेल्या शेतकरी आंदोलनाच्या कहाण्या देखील नक्की वाचा.
चेहरे
भारताच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांचे चेहरे या आधी इतक्या व्यवस्थितपणे कुणीही नोंदवून ठेवलेले नाहीत. पारीचा चेहरे हा विभाग हा असा पहिला आणि एकमेव प्रयत्न आहे. २०१४ साली अरुणाचल प्रदेशातील निदो तानिया या तरुण विद्यार्थ्याची दिल्लीमध्ये मारहाण करून हत्या करण्यात आली. त्याच्या हल्लेखोरांचं म्हणणं होतं की “तो चिनी दिसत होता.” त्या घटनेने या प्रकल्पाला जन्म दिला. खरंच, भारतीय दिसणं म्हणजे नक्की काय? कोणाचा चेहरा भारतीय मानायचा?
आहे. भारतीय चेहरा आहे. आजवरच्या आमच्या प्रवासात आम्ही एक शिकलोय. भारतात १ अब्ज ४० कोटी ‘भारतीय’ चेहरे आहेत. पारीचे छायाचित्रकार आणि सेवाभावी कार्यकर्ते जिथे जाणं शक्य आहे अशा सगळ्या तालुक्यांमधल्या, जिल्ह्यांमधल्या भारतीयांचे चेहरे कॅमेऱ्यात टिपत आहेत.
टाळेबंदीने हिरावलेलं जगणं
कोविडच्या महासाथीच्या सुरुवातीला अख्ख्या देशात अचानक टाळेबंदी लागली तेव्हा लाखो करोडो लोकांच्या जिण्यावर काय परिणाम झाले हे आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून पारीवर सांगायला सुरुवात केली. स्थलांतरित कामगार शहरं सोडून लाखोंच्या संख्येने आपापल्या गावी परतू लागले तेव्हा सगळी माध्यमं एकच प्रश्न विचारत होती की हे परत का जातायत? मुळात ते आपापली गावं सोडून इथे का आले हा खरं तर योग्य प्रश्न होता. आणि पारीवर आम्ही तोच विचारत होतो. आणि या प्रश्नाचं उत्तर होतं – शेतीवरील अरिष्ट.
पारीचे पत्रकार या स्थलांतरित कामगारांसोबत केवळ शहरांच्या वेशीपर्यंत जाऊन थांबले नाहीत. ते परतले त्या गावांपर्यंत आम्ही पोचलो. आजवर इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक आपली राहती जागा सोडून दुसरीकडे निघून गेले नव्हते. ते प्रवास आणि त्या नोंदी एका व्यापक संदर्भात गुंफण्याचं काम आम्ही करत होतो. या कामगारांना, एकूणच समाजाला आणि धोरणकर्त्यांना देखील त्यातून चार गोष्टी नक्कीच शिकता येतील अशी आमची खात्री आहे.
या सगळ्याचा परिपाक म्हणजे टाळेबंदीने हिरावलेल्या जगण्याचा मागोवा घेत पारीने किमान २०० कहाण्या-वृत्तांत प्रकाशित केले. या सगळ्या प्रक्रियेत काही स्थलांतरित कामगारांनी स्वतः पत्रकार बनून आपल्या कहाण्या लोकांना सांगितल्या हे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचं.
कला, कलाकार, कारागीर आणि हस्तकलांच्या कहाण्या
भारतातील विविधता आणि अनेकानेक संस्कृती पारीसाठी फार मोलाच्या आहेत. पारीवरील अनेक विभाग या वैविध्याची नोंद घेण्याचा आणि हा वारसा जतन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पारीवरच्या आमच्या कहाण्यांमधून गावपाड्यातील कवी आणि गायकांशी ओळख करून घ्या. अतिशय समृद्ध परंपरा असणारं पण आता उतरती कळा लागलेलं कुंभारकाम किंवा विणकाम नक्की कसं केलं जातं ते जरूर पहा, वाचा. ढोल-ढोलक-ढोलकी-डफ-दिमडी अशी किती तरी तालवाद्यं गावातल्या सणांमध्ये नेहमीच वाजतात. पण तेवढंच त्यांचं काम नाही. जातीच्या, लिंगभेदाच्या भिंती उल्लंघून जाताना याच वाद्यांचं बळ वंचितांना मिळतंय. या अद्भुत अशा वाद्यांच्या दुनियेची सफर तुम्हाला नक्कीच आवडेल.
चामड्याचं काम करणारे कारागीर, कठपुतळ्या तयार करणारे, त्यांचे खेळ करणारे कलाकार, लाकूडकाम, शंखापासून वस्तू तयार करणारे कारागीर अशा अनेकांच्या कहाण्या, फोटो आणि व्हिडिओंचा देखणा संग्रह आम्ही पारीवर तयार करत आहोत.
जात्यावरची ओवी आणि कच्छी गीतं
या क्षेत्रात आम्ही काय करण्याचा प्रयत्न करतोय याचा आवाका समजून घेण्यासाठी सध्या पारीवर सुरु असलेले दोन विभाग तुम्ही पहायलाच हवेत. पत्रकारितेच्या कुठल्याही वेबसाइटवर तुम्हाला हे असं काहीही सापडणं केवळ अशक्य. देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध परंपरा आणि संस्कृतींमधली अशीच काही गाणी-गीतं यापुढेही पारीवर सादर करण्याचा आमचा मानस आहे. सध्या सुरू असलेलं आमचं काम पहाः
पारीवरील जात्यावरची ओवी हा संग्रह गावातल्या बायांनी रचलेल्या आणि गायलेल्या गाण्यांचा आजवरचा सर्वात मोठा संग्रह असावा. हेमा राईरकर, गी प्वातवँ आणि बर्नार्ड बेल यांच्या मूळ चमूने महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यातल्या बायांनी गायलेल्या एक लाखांहून अधिक ओव्यांचा हा आगळा वेगळा संग्रह तयार केला. यामध्ये तुम्हाला ओव्या फक्त वाचायला नाही तर ऐकायलाही मिळतील. त्या गाणाऱ्या बायांची ओळख, त्यांची कहाणी तुम्हाला कळेल. ओव्यांचे अनुवाद वाचता येतील. या बाया किती विविध विषयांवर ओव्या रचतात आणि गातात? रोजचं जगणं, घर-कुटुंब, पुरुषप्रधान व्यवस्था, जात-व्यवस्था, संतकवी, इतिहासातल्या घटना, बाबासाहेब आंबेडकर आणि इतरही अगणित विषयांवरच्या ओव्यांचा हा संग्रह तुम्हाला नक्कीच आवडेल.
कच्छच्या रणातली गाणी म्हणजे कच्छ प्रांतातल्या गाण्यांचा एक बहुमाध्यमी संग्रह. यामध्ये ३४१ गीतं आहेत. प्रेम, प्रेमाची आस, लग्न, भक्ती, मायभूमी, लिंगभाव, लोकशाहीतले हक्क अशा विविध विषयांवरच्या या गाण्यांची भाषा, संगीत आणि यामध्ये वापरण्यात आलेल्या या वैविध्यपूर्ण प्रांताच्या प्रतिमा हे सगळंच विलक्षण आहे. कच्छमध्ये कधी काळी या मौखिक परंपरा अतिशय समृद्ध होत्या मात्र आता अस्तंगत होऊ लागलेल्या या वारशाचं जतन करण्यासाठी ३०५ वादक, गायकांच्या एका संघटनेने या गाण्यांचं रेकॉर्डिंग केलं आहे. विविध प्रकारे या गाण्यांना चाली लावून, त्यातलं वैविध्य जपलं आहे. कच्छच्या रणातल्या या गाण्यांचे स्वर विरत जात असताना कच्छ महिला विकास संगठनच्या सहाय्याने आम्ही पारीवर हा संग्रह जतन करतोय.
आदिवासी मुला-मुलींचा चित्रसंग्रह
आदिवासी मुलांच्या नजरेतून, त्यांच्या चित्रांमधून जगाकडे पाहणारा हा एक आगळा वेगळा चित्रसंग्रह तुम्हाला केवळ पारीवर पहायला मिळेल. ही चित्रं ओडिशाच्या केंदुझार आणि जाजपूर जिल्ह्यातल्या इयत्ता तिसरी ते नववीच्या मुलांनी काढलेली आहेत. त्यांच्या शिक्षकांनी पारीवर प्रकाशित झालेल्या आठ कहाण्या त्यांना वाचून दाखवल्या होत्या. आदिवासी संस्कृती, गावाकडचं जीवन आणि समुदाय, पर्यावरण आणि वातावरणातले बदल या विषयांवरच्या या गोष्टी ऐकल्यानंतर मुलांनी आपापल्या कल्पनांमधून ही चित्रं साकार केली.
ओडिशातील ५७ शाळांमधल्या ९८ आदिवासी मुला-मुलींनी काढलेल्या एकूण १११ चित्रांचा हा पहिला वहिला संग्रह आहे. वय वर्षं ९ ते १५ या वयोगटातल्या या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा खचितच जास्त आहे. ६८ मुली आणि ३० मुलं. प्रत्येक चित्रासोबत एक छोटा २०-३० सेकंदाचा व्हिडिओ आहे ज्यात हे लहानगे चित्रकार स्वतःविषयी आणि त्यांच्या कामाविषयी काही सांगतात. बहुतेक सगळे ओडियामध्ये बोलत असले तरी काहींनी आपल्या हो, मुंडा आणि बिरहोर या आदिवासी भाषांमध्ये आपलं मनोगत मांडलं आहे.
ही मुलं १२ आदिवासी समुदायांमधली आहेत – बाथुडी, भुइया, भुमिज, गांडिया, गोंड, हो, कोल्हा, मनकिरडिया (बिरहोर आदिवासींची ही पोट-जमात आहे, मनकिडिया अशीही नोंद), मुंडा, समती, संताल आणि सौंती. यातल्या काही आदिवासींची गणना विशेष बिकट परिस्थितीतील आदिवासी समूह अशी करण्यात आली आहे.
अशा प्रकारचा हा पहिलाच संग्रह असला तरी शेवटचा मात्र नक्कीच नाही. देशाच्या प्रत्येक विभागात आदिवासी मुला-मुलींच्या कलेचे, चित्रांचे असे इतरही संग्रह करण्याचा पारीचा मानस आहे.
स्त्री आरोग्यावरील पारीची लेखमाला
स्त्रियांच्या खास करून ग्रामीण भागातील स्त्रियांच्या प्रजनन अधिकारांचा वेध घेणारी ही पारीची लेखमाला म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक अनोखा उपक्रम. भारताच्या गावपाड्यातल्या स्त्रिया आणि किशोरवयीन मुलींचं जगणं, आरोग्याविषयी, सेवांविषयीचे त्यांचे अनुभव आणि स्थिती या लेखमालेच्या केंद्रस्थानी आहेत.
या लेखमालेत भारतभरातल्या ५० कहाण्या आहेत. प्रजनन आरोग्याचे विविध पैलू यात तुम्हाला सापडतील – मूल होत नसल्यास सहन करावा लागणारा सामाजिक कलंक, स्त्रियांच्याच नसबंदीवर असलेला भर, कुटुंब नियोजनात पुरुषांचा नगण्य सहभाग, गावपाड्यांवर न पोचलेली आरोग्यसेवा यंत्रणा, ती घेण्यासाठी करावी लागणारी जीवघेणी कसरत, अप्रशिक्षित आरोग्यसेवादाते. जीवावर बेतू शकणारी बाळंतपणं, मासिक पाळीसंबंधीचे भेद, मुलग्याचा हव्यास आणि इतरही कित्येक विषय यात हाताळले आहेत. आरोग्यासंबंधीचे पूर्वग्रह आणि प्रथा, लोक आणि त्यांचे समुदाय, लिंगभाव आणि हक्कांचे लढे आणि क्वचित कधी गावपाड्यातल्या या स्त्रियांनी केलेल्या संघर्षातून मिळालेलं यश असं सगळं काही या लेखमालेत तुम्ही वाचू, पाहू, ऐकू शकता.
दिसणाऱ्या बाया, न दिसणारं काम
दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया हे संपूर्णपणे डिजिटाइझ केलं गेलेलं, क्यूरेट केलेलं, स्थिर छायाचित्रांचं कदाचित पहिलंच प्रदर्शन असावं. याचं वैशिष्ट्य हे की प्रत्यक्षात मांडलं गेलेलं हे फोटो प्रदर्शन कल्पकपणे ऑनलाइन सादर केलं गेलं आहे. प्रत्येक पॅनेलचा स्वतःचा एक सरासरी २-३ मिनिटांचा व्हिडिओ आहे. शेवटच्या पॅनेलमध्ये या प्रदर्शनाचा शेवट एका ७ मिनिटांच्या व्हिडिओने होतो.
हे सगळे फोटो पारीचे संस्थापक संपादक पी. साईनाथ यांनी भारताच्या दहा राज्यांमध्ये काढलेले आहेत. १९९३ ते २००२ या काळात या कामासाठी त्यांनी एक लाख किलोमीटर अंतर पालथं घातलं होतं. आर्थिक सुधार कार्यक्रम सुरू झाल्यानंतरची पहिली दहा वर्षं ते राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना येण्याआधीची दोन वर्षं असा हा काळ.
हे मूळ प्रदर्शन कुठे कुठे मांडलं गेलं? बस स्टँड, रेल्वे स्टेशन, कारखान्यांच्या प्रवेशद्वारांवर, शेतमजूर आणि इतर श्रमिकांच्या मोर्चांमध्ये, शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये हे प्रदर्शन फिरलं आहे. हे सगळं काम पारीवर पहिल्यांदाच ऑनलाइन स्वरुपात येत आहे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमांचं दालन
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वराज्यासाठी लढलेलं कुणीही पुढच्या काही वर्षांनंतर या जगात नसेल. ज्यांच्या संघर्षातून हा देश अस्तित्वात आला अशा कुणाशी आपल्याला बोलता येणार नाही, त्यांच्या तोंडून त्या काळच्या कथा ऐकता येणार नाहीत. आपल्या पुढच्या पिढ्यांनाही हा अनुभव घेता येणार नाही. पण या खंद्या शिलेदारांशी आपली नाळ जोडून घेता यावी याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे पारीवरचं स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमांचं दालन.
इथे तुम्हाला अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो पहायला मिळतील. इतकंच नाही तर मोजक्या व्हिडिओंमधून त्यांचं बोलणं ऐकता येईल, त्यांना पाहता येईल. हा ठेवा तुम्हाला इतरत्र कुठेही सापडणार नाही. या सगळ्यांची कुटुंबं, घरं, गावंही तुम्ही पाहू शकाल.
१५ ऑगस्ट २०२२ रोजी, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना आम्ही हे दालन सर्वांसाठी खुलं केलं. स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ असणारे यातले अनेक जण कुणालाही माहित नाहीत. यातल्या काहींच्या गोष्टी पारीवर याआधी प्रकाशित झाल्या आहेत. पण इतर अनेक गोष्टी नव्या आहेत. हा संग्रह असाच वाढत जाणार आहे. यात आणखी अनेक फोटो आणि व्हिडिओ येतील, आणि इतकंच नाही इतर काही स्वातंत्र्यसैनिकांचाही समावेश या दालनात केला जाईल.
वर्गांमध्ये पारी
आजच्या अभ्यासक्रमांमध्ये आणि शहरांमधल्या शाळांमध्ये ग्रामीण भारत शोधावा लागेल अशी गत आहे. जिथे आहे तोही अगदी साचेबद्ध प्रतिमांच्या स्वरुपात. दुसरीकडे शहरांमधली आणि महानगरांमधली आजची तरुणाई आपल्याच देशात परक्यासारखी मोठी होत आहे. पारी एज्युकेशन या आमच्या कार्यक्रमातून आम्ही हे बदलण्याचा प्रयत्न करत आहोत. वर्गातली सत्रं, कार्यशाळा आणि पारीसोबत काम करत ही तरुण मुलं भारतात नांदणाऱ्या अनेक भारतांची सफर करत आहेत. अनेक जण स्वतः गावपाड्यातून वार्तांकन करत आहेत.
ग्रामीण आणि शहरी भागातल्या शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठातल्या अनेक विद्यार्थ्यांनी पारीसाठी वार्तांकन केलं आहे. त्यांचं काम तुम्ही पारीवर वाचू-पाहू शकता. शाळेच्या चार भिंतींपलिकडच्या अनेक तरुणांनीही आपला परिसर, आपली संस्कृती आणि इतिहास त्यांच्या कहाण्यांमधून पुढे आणला आहे. दीडशेहून अधिक शैक्षणिक संस्था सध्या पारी एज्युकेशनसोबत काम करत आहेत आणि हा आकडा सातत्याने वाढत आहे. आम्हाला पुरेसा पैसा आणि काम करणारी माणसं मिळाली तर ही संख्या आणखी झपाट्याने वाढत जाईल यात शंका नाही.
तुमचा सहभाग आणि सहयोग मोलाचा आहे
लिहिते हात वाढावेत, पारीसाठी आपलं साहित्य देणाऱ्यांच्या संख्येत भर पडावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असलो तरी संपादकीय निवड आणि गुणवत्तेबाबत आम्ही कायम आग्रही असतो. विश्वसनीय काम असणाऱ्या अनुभवी लेखकांचा सहभाग अर्थातच या कामासाठी गरजेचा आहे. यातले बहुतेक पत्रकार आणि लेखक असले तरी तसा नियम नाही. या कामात रस आहे असं कुणीही यामध्ये सहभागी होऊ शकतं. आमच्यासाठी लिहा, चित्रण करा. अगदी बऱ्या दर्जाच्या मोबइल फोनवरही चालेल. अट एकच फक्त तुमचं साहित्य आमच्या या संग्रहाच्या उद्देशांमध्ये बसलं पाहिजे. तुम्ही व्यावसायिक पत्रकार असायला पाहिजे असं काहीही नाही.
एक लक्षात घ्या, पारीवरच्या कहाण्यांपैकी बऱ्याचशा खुद्द गावाकडच्या माणसांनीच सांगितल्या आहेत. त्यांच्या वतीने कुणा माध्यमकर्मींनी या कहाण्या सांगितलेल्या नाहीत. येत्या काळात यातली काही मंडळी आपली कहाणी स्वतःच चित्रित करतील. आणि या गोष्टी सगळ्यांपर्यंत नेल्या जातील. अट एकच - यामध्ये ‘गाव’ असायला पाहिजे.
पारीचा वापर सर्वांसाठी मोफत आहे. ही साइट काउंटरमीडिया ट्रस्टतर्फे चालवली जाते. एक अनौपचारिक मित्रपरिवार ट्रस्टच्या कामाला आर्थिक आणि इतर सहाय्य करतो. सेवाभावी काम, देणग्या आणि थेट वैयक्तिक योगदानातून हे काम उभं राहिलं आहे. वार्ताहर, व्यावसायिक चित्रपटनिर्माते, चित्रपट संपादक, छायाचित्रकार, बोधपट निर्माते आणि पत्रकार (टीव्ही, ऑनलाइन आणि प्रिंट) अशा सर्वांचा स्वयंस्फूर्तीने काम करणारा हा परिवार पारीसाठी सर्वात मोठा ठेवा आहे. ही वेबसाइट तयार करताना तसंच पारीची सुरुवात करण्यातही अध्यापक, शिक्षक, संशोधक, तंत्रज्ञ आणि इतरही अनेक क्षेत्रातल्या व्यावसायिकांचं कौशल्य मोलाचं ठरलं आहे.
अनेक जण आमच्यासाठी सेवाभावीपणे काम करत आहेत. मात्र त्या कामापलिकडे जाऊन उत्तमोत्तम मजकूर तयार करण्यासाठी पारीला निधीची आवश्यकता असते. आणि आम्ही हा निधी लोकांकडूनच गोळा व्हावा यासाठी प्रयत्नशील असतो. आम्ही थेट शासकीय निधी किंवा कॉर्पोरेट कंपन्यांचा पैसा स्वीकारत नाही. तसंच आम्ही आमच्या साइटवर कुठल्याही जाहिराती देत नाही कारण आजची तरुणाई या जाहिरातबाजीच्या विळख्यात पुरती अडकली आहे. आणि म्हणूनच आम्हाला तुमच्या मदतीची किती गरज आहे हे तुमच्या लक्षात येईल.
‘तुमच्या देशाचं वार्तांकन करा’ असं म्हणून आम्ही वर्गणीसाठी आवाहन केलं असलं तरी ग्रामीण भारत पूर्णपणे कधीच एका ठिकाणी मांडता येणार नाही हे आम्ही जाणतो. या साइटवरचं साहित्य म्हणजे महाकाय अशा अनेक वास्तवांचे काही धागे किंवा अंश. ही अनेक विश्वं सर्वांसमोर आणणं हे अधिकाधिक व्यापक अशा लोकसहभागातूनच शक्य आहे. आणि म्हणूनच पारीला सढळ हस्ते मदत करा, हीच विनंती.


