या संपूर्ण महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यसाठी पारीवर आम्ही त्यांच्यावर आणि जाती व्यवस्थेवर रचलेल्या ओव्या प्रकाशित करत आहोत. या मालिकेतल्या शेवटच्या दोन ओव्या बीड जिल्ह्यातल्या मुक्ताबाई जाधव यांच्या.
एप्रिल महिना संपत आला. बाबासाहेब आंबेडकरांवरच्या या शेवटच्या दोन ओव्या इथे सादर करत आहोत. भीम नगरच्या मुक्ताबाईंनी त्या सांगितल्या आहेत. बीड जिल्ह्याच्या माजलगावमधली ही वस्ती प्रामुख्याने दलितांची वस्ती आहे. ओवी संग्रहासाठी या वस्तीमधून खूप मोठ्या प्रमाणावर आंबेडकरांवरच्या ओव्या गोळा झाल्या होत्या.
पहिल्या ओवीत एक जण रमाबाईंना विचारते, सोन्याची फुलं (कर्णफुलं) कधी केली? त्याचं उत्तर दुसऱ्या ओळीत दिलंय, ही कर्णफुलं भीमरावांनी विमानानी पाठविली. कानातली फुलं आणि विमानाचा उल्लेख समृद्धी अधोरेखित करतो.
दुसऱ्या ओवीत मुक्ताबाई ब्राह्मणाच्या बाईला विचारतात, तू सडा कशाला टाकतीयेस? आता सडा टाकून काय उपयोग? दुसऱ्या ओळीत ती तिला स्पष्ट सांगते, आम्ही आमची जातीची कामं आता सोडलीयेत. वर्षानुवर्षं जातीव्यवस्थेने लादलेली ही कामं, जशी मेलेली जनावरं ओढणं, इ. आता आम्ही करणार नाही. कारण आता आम्ही बुद्धवाड्यात चाललोय, नव्या भूमीत निघालोय. त्यामुळे आम्ही निघालो, आता सडा टाकून उपयोग नाही, आता तुम्हालाच ढोरं ओढायची आहेत असं त्या निक्षून सांगतात.
सोन्याचे घोसफुल रमाबाई कधी केले?
भीमराज तीचे पती इमाईनात पाठविले
बामणाचे पोरी काय टाकीतीस सडा?
आमी गेलो बुध्द वाड्या, आता तुम्ही ढोरं वढा
कलाकार : मुक्ता जाधव
गावः माजलगाव
वस्तीः भीमनगर
तालुकाः माजलगाव
जिल्हाः बीड
जातः नवबौद्ध
तारीखः या ओव्या २ एप्रिल १९९६ रोजी रेकॉर्ड केल्या आहेत.
पोस्टरः श्रेया कात्यायिनी
फोटोः संयुक्ता शास्त्री
नक्की वाचा – कष्ट करायचं आणि परमेश्वर बघायचं! ले. जीतेंद्र मैड