ओवी संग्रहाच्या या पानात रंगूबाई पोटभरे, वाल्हाबाई टाकणखार आणि राधाबाई बोऱ्हाडेंच्या तोंडच्या आठ ओव्या आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. या तिघी जणी बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातल्या भीमनगर या दलित वस्तीत राहत होत्या/आहेत.
दलित आणि इतर सर्व शोषित समाजांसाठी बाबासाहेबांनी जे कार्य केलं आणि या समाजाचा कैवारी म्हणून असणारी त्यांची भूमिका ही या ओव्यांमागची खरी प्रेरणा. माजलगावमधली भीमनगर ही प्रामुख्याने दलितांची वस्ती. ओवी प्रकल्पासाठी ही वस्ती म्हणजे बाबासाहेबांवरच्या ओव्यांचा जिवंत झरा. बाबासाहेब म्हणजे एक मुत्सद्दी राष्ट्रीय नेतृत्व, दलित आणि शोषितांचा आवाज जगापुढे मांडणारे कैवारी आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार.
या आठ ओव्यांमधल्या पहिल्या ओवीत रंगूबाई बाळाच्या जन्मामुळे महू गावात कशी लगबग चालू आहे ते गातात. (महू हा मध्य प्रदेशातला एक छावणी एरिया (कॅण्टोनमेंट) आहे. २००३ पासून या गावाला अधिकृतपणे डॉ. आंबेडकरनगर असं नाव देण्यात आलं आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी बाबासाहेबांचा जन्म या गावी झाला.) ओवीत म्हटलंय की रामजीला (आंबेडकर) मुलगा झालाय ही बातमी साऱ्या गावात पसरलीये.
दुसऱ्या ओवीत राधाबाई बोऱ्हाडे गातात की बाळाचं बारसं लवकरच होणार आहे. रामजीची बहीण मीराबाई म्हणते की बाळाचं नाव भीमराज ठेवावं. महाराष्ट्रात बाळाचं नाव ठेवण्याचा मान आत्याचा असतो.
तिसऱ्या ओवीत म्हटलंय की सकाळी उठल्या उठल्या आधी बाबासाहेबांचं स्मरण करावं, त्यांचं नाव घेऊन मगच सकाळची कामं सुरू करावी. चौथ्या ओवीत राधाबाई म्हणतात, सकाळी उठल्या उठल्या त्या आधी भीमाच्या नावाचा जप करतात आणि मगच त्यांची दिवसभराची कामं करू शकतात. नाही तर कामं सुधरत नाहीत.
पुढच्या चार ओव्या वाल्हाबाई टाकणखार आणि राधाबाई बोऱ्हाडेंनी एकत्र गायल्या आहेत. तीन ओव्यांमध्ये म्हटलं आहे, अंगणात दुधाचा सडा टाका, हा वाडा गौतम बुद्धाचा आहे. एक जण गाते, मी गौतमाची बहीण आहे आणि दुसरी गाते, मी त्याची भाची आहे.
आठवी ओवी परत एकदा बाबासाहेबांच्या जन्माबद्दल आहे. भीम त्याच्या माईचा लेक आहे आणि त्याच्या जन्मामुळे जणू तिच्या देहाचा उद्धार झाला आहे असं गायलं आहे.
टीपः अनेक दलित जातींनी आंबेडकरांसोबत धर्मांतर केलं आणि त्या नवबौद्ध म्हणून गणल्या जाऊ लागल्या. बौद्ध धर्मामुळे त्यांना जात व्यवस्था नाकारता आली आणि एक नवी ओळख मिळाली. त्यामुळे गौतम बुद्धाचा संदर्भ या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या तिघी जणी केवळ बुद्धाची भक्ती करत नाहीत तर स्वतःला त्याच्या कुटुंबाचा भाग मानतात. पाच ते सात क्रमांकाच्या ओवीत म्हटलंय की त्यांचं घर (वाडा) आणि अंगण आता अस्पृश्याचं नाहीये, हा आता गौतम बुद्धाचा वाडा आहे. गावात घरासमोर अंगणात सडा टाकायची पद्धत आहे. दुधाने सडा टाकणं म्हणजे एखादी गोष्ट शुद्ध करणं. जातीने दलितांवर केलेल्या अत्याचाराची ‘घाण’ जणू काही या दुधाच्या सड्याने त्या धुऊन काढत आहेत.
बाई महू गावामधी, कशाचा गलबला
कशाचा गलबला, रामजीला ग पुत्र
झाला
या ग शेजारीणी बाई, नामकरन आज
बोलती मीराबाई, नाव ठिवा ग भिमराज
बाई सकळा उठूनी, भीमाच नाव घेवा
धरणी मातावरी, मंग पावुल ग टाकवा
बाई सकळा उठूनी, मुखी माझ्या भीम
भीम
मुखी माझ्या भीम भीम, मंग सुधरत काम
बाई सकळा उठूनी सडा टाकीते दुधाचा
सडा टाकीते दुधाचा वाडा गौतम बुध्दाचा
बाई सकळा उठूनी सडा टाकीते सहील
सडा टाकीते सहील आहे गौतमाची बहीण
बाई सकळा ऊठूनी, सडा टाकीते मी कसी
सडा टाकीते मी कसी आहे गौतमाची ग भाशी
बाई भीम भीम करता, भीम आपल्या माईचा
भीम आपल्या माईचा, झाला उध्दार ग
देहीचा
कलावंत – रंगू पोटभरे, वाल्हा टाकणखार, राधा बोऱ्हाडे
गाव – माजलगाव
वस्ती – भीम नगर
तालुका – माजलगाव
जिल्हा – बीड
जात – नवबौद्ध
दिनांक – २ एप्रिल १९९६ रोजी ओव्या रेकॉर्ड करण्यात आल्या. २ एप्रिल २०१७ रोजी आम्ही पुन्हा एकदा माजलगावला गेलो आणि या तिघींची भेट घेतली.
फोटोः वेरोनीक बाकी व संयुक्ता शास्त्री
पोस्टरः श्रेया कात्यायिनी