जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत कोळावडे गावच्या लीलाबाई कांबळे आईची जागा दुसरी कुणीच घेऊ शकत नाही असं गातायत तर लवार्ड्याच्या ताराबाई उभे जावयाला आता सततच्या मागण्या थांबव असं सुचवतायत
“गावचे पुढारी आणि चोर स्वतःच्या डोक्याने चालणाऱ्या सरपंचाला, मग ती बाई असो किंवा पुरुष, कधीच पाठिंबा देत नाहीत. त्यांची टेंडरं पास करणाऱ्याच्याच ते मागे असणार,” पुणे जिल्ह्याच्या कोळवडे गावच्या ५८ वर्षाच्या लीलाबाई कांबळे सांगतात. कुळाने शेत कसणाऱ्या लीलाबाई पुढे म्हणतात, “आन् का बाई सरपंच असेल तर मग तिचा नवरा किंवा सासराच सगळा कारभार ताब्यात घेतो. तिच्यावर पूर्ण त्यांचीच सत्ता चालते. आणि जर एखाद्या बाईने तिचं स्वतःचं, स्वतंत्र मत मांडायचं ठरवलं तर तिच्याच घरचे तिच्या पायात खोडा घालतात.”
लीलाबाई गरीब डोंगरी संघटनेच्या कार्यकर्त्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या डोंगरी भागातल्या गरिबांसोबत ही संघटना काम करते. संघटनेने सुरू केलेल्या साक्षरता वर्गात त्या लिहायला वाचायला शिकल्या आणि इतक्या वर्षांमध्ये त्यांची स्वतःची गावच्या राजकारणाबद्दल ठाम अशी काही मतं तयार झाली आहेत.
लीलाबाईंच्या घरी त्यांचे पती विठ्ठल, मुलगा संतोष, सून शीतल आणि शाळेत जाणारी यश आणि सोहम ही नातवंडं असा परिवार आहे. ते कुळकरी आहेत आणि १० ते २० गुंठ्याचं रान बटईने कसतात. निम्मा माल जमिन मालकाला जातो. अर्थात त्यांची इतर दोन मुलं अशोक आणि नंदकुमार पुण्यात बांधकाम मजूर म्हणून काम करतात.
३० एप्रिल २०१७ रोजी आम्ही अचानक लीलाबाई आणि त्यांच्या गावातल्या इतर बायांना भेटायला जायचं ठरवलं. मुळशी तालुक्यातल्या कोळवड्यातल्या अनेकींच्या ओव्या जात्यावरच्या ओव्या संग्रहामध्ये समाविष्ट आहेत. लीलाबाईंच्या घरापासून आम्ही सुरुवात केली.
लीलाबाईंनी जात्यावरच्या ओव्या संग्रहासाठी १७६ ओव्या गायल्या आहेत. या ओव्या २० वर्षांपूर्वी लिहून घेतल्या होत्या. जात्यावरच्या ओव्यांचं संकलन करणाऱ्या मूळ गटाने नव्वदच्या दशकात त्यातल्या १८ ओव्या ध्वनीमुद्रित केल्या होत्या. आम्हाला त्यांचा फोटो घ्यायचा होता आणि त्यांना घेऊन त्यांच्या गावातल्या आणि लवार्ड्याच्या इतर ओवीकार महिलांना भेटायचं होतं. त्या आम्हाला – जितेंद्र मैड (ओव्यांचं संकलन करणाऱ्या मूळ गटातले सदस्य), संयुक्ता शास्त्री आणि मी – ताराबाई उभ्यांच्या घरी लवार्ड्याला घेऊनही गेल्या पण नेमक्या त्या दिवशी ताराबाई घरी नव्हत्या
त्यामुळे मग आम्ही लीलाबाईंच्याच घरी परत आलो. त्यांच्या घरी आजही तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ जात्यावरच दळली जाते. लीलाबाईंचं घर मातीचं, छपराला कौलं आणि पत्रे. घराच्या व्हरांड्याच एक लोखंडी सोफा आणि बैठकीच्या खोलीत छोटा टीव्ही आणि शेजारीच एक दिवाण. जात्याची जागा स्वयंपाकघरात. तिथेच भांडी घासायची लहानशी मोरी आहे.
निघण्याआधी लीलाबाईंनी आम्हाला भाकरी, बटाट्याची भाजी आणि भातासोबत खमंग अशी मसुरीच्या डाळीची आमटी खाऊ घातली. त्यांच्या ओवीतल्या आईसारख्याच गोड अशा लीलाबाईंनी त्यांच्या सुनेसोबत रांधलेलं ते जेवण फार प्रेमाने केलं होतं हे निश्चित.
लीलाबाई आणि ताराबाईंच्या ओव्या
इथे लीलाबाईंनी गायलेल्या पाच आणि ताराबाईंनी गायलेली एक ओवी सादर करत आहोत.
पहिल्या तीन ओव्यांमध्ये लीलाबाई आईची थोरवी सांगतात. आईसारखं कुणीच नाही, अगदी जवळची शेजारीण असली तरी तिला आईची सर नाही असं त्या गातात. आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. ती मधासारखी किंवा खडीसाखरेसारखी गोड आहे, तिच्यात जराही कडूपणाचा अंश नाही. आईची माया ती आईचीच, दुधाची सर ताकाला कशी येणार?
दुसऱ्या ध्वनीफितीतल्या तीन ओव्या वडील आणि सासरच्या मंडळींबद्दल आहेत. लीलाबाई म्हणतात, जेव्हा बाप लेकीचं लग्न लावून देतो तेव्हा त्याला वाटत असतं की त्यानं लेकीचं भलं केलंय. लेकीचं लग्न लावून दिल्यावर सासरचे तिचा छळ करणार हे बापाच्या ध्यानात येत नाही का असा सवाल त्या करतात. कसायाच्या हाती गाईची जी अवस्था होईल तशीच लेकीची सासरी होणार असं त्या ओवीत गातात.
लीलाबाई गातात, जावई कितीहा लेकासारखा असला तरी त्याचं वागणं-बोलणं उगीर असतं. हुलग्यासारखं चवीला उग्र. शेवटच्या ओवीत जावयाच्या मागण्यांबद्दल त्या म्हणतात, पोटची पोर दिली याहून जास्त तुला अजून काय देऊ?
अशी आई आई म्हणं आई कुणीच व्हईना
अशी आईची सर शेजा नारीला येईना
अशी बया बया म्हणं इतकी गोड काही
अशी खडीसाखरंला जरा कडूपणा नाही
अशी बया बया म्हण बया मवूळाची मध
अशी अंतरी करीते शोध ताकाचं व्हईना दुध
बापानी दिल्या लेकी आन् लेकीचं बरं केलं
गाईनायाचं दावं कसायाच्या हाती दिलं
जावई बाळ जशी हुलग्याची पेरयणी
पोटीची दिली कन्या याची उगीर बोलयणी
जावई म्हणं बाळ हंड्यात घाली पायी
पोटीची दिली कन्या तुला आणिक देवू काई
कलावंतः लीलाबाई कांबळे
गावः कोळवडे
तालुकाः मुळशी
जिल्हाः पुणे
जातः नवबौद्ध
वयः ५८
मुलं: तीन मुलगे
व्यवसायः कुळाने शेती
कलावंतः ताराबाई उभे
गावः लवार्डे
वाडीः खडकवाडी
तालुकाः मुळशी
जिल्हाः पुणे
जातः मराठा
वयः ५७
मुलं: तीन मुली
व्यवसायः शेतकरी. त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचं एक एकर रान आहे त्यात त्या तांदूळ, गहू, नाचणी आणि राळ-वरईसारखी पिकं घेतात.
या ओव्या ६ जानेवारी १९९६ आणि ५ ऑक्टोबर १९९९ रोजी ध्वनीमुद्रित केल्या आहेत.
पोस्टरः श्रेया कात्यायनी
अनुवादः मेधा काळे