प्राण जावा तर कोम्बु वाजवत असतानाच, एम. करुपय्यांना वाटतं. तसं पाहिलं तर तुतारीसारखं हे वाद्य युद्धभूमीवर लढाई सुरू होत असताना रणशिंग म्हणूनच वाजवलं जायचं. त्यामुळे त्यातनं निघणाऱ्या संगीताचा गतप्राण होण्याशी जवळचा संबंध होताच. हत्तीच्या सोंडेसारखं, तांब्याचं किंवा काश्याचं हे वाद्य वाजवत वाजवतच या जगातून निरोप घ्यावा हा विचार करुपय्यांच्या मनात येतो तो मात्र वेगळ्या कारणाने.
४९ वर्षीय करुपय्यांसाठी कोम्बु हा एक उत्कृष्ट कलाप्रकार आहे. हे वाद्य वाजवणारी त्यांची चौथी पिढी आहे. मदुराईतल्या त्यांच्या गावी आज चरितार्थासाठी ते रिक्षा चालवत असले तरी त्यांचं वाद्य हाच त्यांचा खरा प्राण आहे.
अगदी तीस वर्षांपूर्वीपर्यंत ही कला अगदी “टॉप”ला होती, करुपय्या सांगतात. १९९१ साली तेव्हाच्या मुख्यमंत्री जे. जयललितांसाठी आपण वादन केल्याचं त्यांना आठवतं. “त्यांनी आम्हाला पुन्हा आमचं वादन सादर करायला सांगितलं होतं. इतक्या त्या प्रभावित झाल्या होत्या.”
आजकाल मात्र त्यांना आणि इतर कोम्बुवादकांना कधी काम मिळतंय तर कधी नाही. थिरुपरनकुंद्रम तालुक्यातलं मेलकुयिलकुडी हे त्यांचं गाव. अतिशय लयबद्ध असणारा हा कलाप्रकार तसाही सध्याच्या पॉप संस्कृतीमुळे घसरणीलाच लागला होता. मार्च २०२० मध्ये कोविडमुळे टाळेबंदी लागली आणि तेव्हापासून तर या कलेला फारच फटका बसला आहे. वादकांना कामही नाही आणि कमाईही.
करुपय्यांना मंदिरातल्या उत्सवात, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा मयतींच्या वेळी काम मिळालंच तर त्यांना एका वेळचे ७०० ते १००० रुपये मिळतात. “गेल्या वर्षीपासून, टाळेबंदी असल्यामुळे आम्ही अळगर कोइल थिरुविळामध्ये वादन केलं नाहीये. त्या काळात आम्हाला सलग आठ दिवस काम मिळायचं.” मदुराई शहरापासून २० किलोमीटरवर असलेल्या अळगर कोइल मंदिरात दर वर्षी (एप्रिल-मे महिन्यात) साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाला लाखो लोक हजेरी लावतात. कोम्बु वादक तिथे आपली कला सादर करतात.
“प्रत्येकालाच काही कोम्बु वाजवता येत नाही. ते फार कौशल्याचं काम आहे,” आर. कालीश्वरन सांगतात. लोककलावंत आणि लोककलांसाठी काम करणारी ऑल्टरनेटिव्ह मीडिया सेंटर (एएमसी) ही चेन्नईस्थित संस्था त्यांनी सुरू केली आहे. हे वाद्य कुठल्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि मध्ये कधी तरी वाजवलं जातं. ते काही सतत वाजवलं जात नाही. त्यामुळे हे कलाकार सुरुवातीला १५ मिनिटं वादन करतात मग पाच मिनिटं विश्रांती घेतात आणि त्यानंतर परत १५ मिनिटं वाजवतात. “वादक खूप खोल श्वास घेतो आणि मग [कोम्बुमध्ये] फुंकतो.” त्यांचा श्वासावर कमालीचं नियंत्रण असल्यामुळेच आजही अनेक कलाकारांनी वयाची १०० वर्षं पूर्ण केलेली आहे, कालीश्वरन सांगतात.
कोम्बु कलई कुळु या मेलकुयिलकुडीतल्या कलाकारांच्या गटाचे नेते आहेत ६५ वर्षीय के. पेरियासामी. त्यांना फक्त आणि फक्त कोम्बु वाजवता येतं. त्यांनी अनेकांना ही कला शिकवली आहे. सध्या ३० ते ६५ या वयोगटातले जे कुणी हे वाद्य वाजवतायत त्यातल्या बहुतेकांनी त्यांच्याकडूनच ही कला शिकली आहे. “आम्हाला दुसरं काय काम मिळणार? आम्हाला फक्त रेशनचा तांदूळ मिळतोय, तोही खराब. आम्ही कसं तगून रहायचं सांगा,” पेरियासामी म्हणतात.
त्यांच्या घरातल्या थोडंफार मोल असणाऱ्या सगळ्या वस्तू – स्टीलचा घडा, भाताचं काश्याचं भांडं, त्यांच्या बायकोचं थाली (मंगळसूत्र) असं सगळं गहाण ठेवलेलं आहे. “आता आमच्यापाशी पाणी आणण्यापुरते प्लास्टिकचे हंडे तेवढे राहिलेत,” उसासा सोडत पेरियासामी सांगतात. खरं तर त्यांना घोर लागलाय तो या कलेचा – या कलेसाठी आणि कलावंतांसाठी हे सरकार काही करेल का? नाही तर त्यांच्यासोबत कोम्बुवादन देखील लुप्त होईल का?
मेलकुयिलकुडीच्या २० कोम्बुवादकांकडे मिळून १५ कोम्बु आहेत. गेल्या चाळीस वर्षांपासून या समाजाने ही जतन केली आहेत. जुनी वाद्यं चिकटपट्ट्या लावून काळजीपूर्वक जपली जातात. नड असेल तर हे कलाकार आपलं वाद्य विकतात किंवा गहाण टाकतात. नवीन वाद्य महाग असून त्यासाठी २०,००० ते २५,००० रुपये मोजावे लागतात. इथून २५० किलोमीटरवरच्या कुंभकोणममध्येच नवीन वाद्यं मिळतात.
पी. मागराजन आणि जी. पळपाण्डी दोघं तिशीत आहेत. वयाची दहा वर्षं पूर्ण होण्याआधीच त्यांनी कोम्बु वाजवायला सुरुवात केली होती. या कलेसोबतच ते मोठे झालेत आणि त्यांना मिळणारी बिदागी देखील तशीच वाढलीये. “मी १० वर्षांचा होतो तेव्हा मला माझ्या वादनासाठी ५० रुपये मिळायचे. तेही मला भारी वाटायचे. आज मला ७०० रुपये मिळतात,” मागराजन सांगतात.
पळपाण्डी ७०० रुपये रोजाने गवंडीकाम करतो. नियमित पैसा मिळतो आणि खात्रीने काम मिळतं. पण त्याची आवड मात्र कोम्बुवादनच आहे. त्याच्या आजोबांकडून तो ही कला शिकलाय. “थाथा जिवंत होते ना तोपर्यंत मला या कलेचं मोल कळालं नाही,” तो म्हणतो. टाळेबंदीने त्याची दुहेरी कोंडी केलीये. बांधकामं पण कमी झालीयेत आणि कोम्बुवादनही. “काही तरी मदत मिळेल याची वाट पाहतोय,” तो म्हणतो.
“कालीश्वरन सरांनी मदत केली,” करुपय्या सांगतात. मे महिन्यात तमिळ नाडूमध्ये निर्बंध लागले तेव्हा कालीश्वरन यांच्या एएमसी संस्थेने प्रत्येक कलाकाराच्या कुटुंबाला १० किलो तांदूळ देऊ केला. चार मुली आणि एक मुलगा असं करुपय्यांचं मोठं कुटुंब आहे. आमचं भागेल, ते म्हणतात. “आम्ही रानातून काहीतरी भाजीपाला आणू. वांगी काय, कांदे काय. शहरातल्या लोकांचं कसं?”
या लेखातील मजकूर लेखकासोबत अपर्णा कार्तिकेयन यांनी लिहिला आहे.