बदलत्या काळाची कापशीची चाकं
पारीचा स्वयंसेवक संकेत जैन याला भारतभरातल्या ३०० गावांना जायचंय आणि इतर गोष्टी तर लिहायच्या आहेतच पण मुख्य म्हणजे ही मालिका तयार करायचीयेः गावातल्या एखादं दृश्य आणि त्या छायाचित्राचं हुबेहूब रेखाचित्र . त्याच्या या मालिकेतलं हे पहिलं पान . छायाचित्र किंवा रेखाचित्र पूर्ण पाहण्यासाठी त्यावरील पट्टी हवी तिथे सरकवा
चाक अजूनही फिरतंय पण आताशा खूपच कमी. महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातलं कापशी गाव. हे चाक आहे, कुंभाराचं. आणि हा भाग तो, जिथे कुंभारांनी त्यांच्या कामाला कलेच्या उंचीवर नेऊन ठेवलंय. ते कलाकार मानतात स्वतःला. कागल तालुक्यातल्या अंदाजे ६,००० लोकसंख्येच्या या गावातले विष्णू कुंभार सांगतात, “१९६४ साली इथे १८० कारागीर होते, आज हे काम करणारे फक्त चार जण उरलेत.” वरच्या छायाचित्रात आणि रेखाचित्रात दिसतायत ते हात त्यांचेच.
कोल्हापुरची कुंभारकामाची कला जतन करून ठेवणाऱ्या घराण्याची विष्णु कुंभारांची १३ वी पिढी. हा व्यवसाय उतरतीला लागला आहे असा त्यांचा तरी अनुभव नाही. पण “कारागिरांची संख्या नक्कीच कमी झालीये,” ते सांगतात. त्यांच्याकडे किमान अडीच लाख तासाचा कुंभारकामाचा अनुभव आहे! या व्यवसायातून पोट भरत नाही म्हणून लोक कुंभारकामाकडून इतरत्र वळू लागले आणि या कलेला उतरती कळा आली, पण याला इतरही घटक जबाबदार आहेतच. यंत्राच्या सहाय्याने केलेल्या मातीची भांड्यांमुळे कुंभाराचं चाक अडगळीत जाऊ लागलं आहे. नव्या पिढीला इतर क्षेत्रं खुणावतायत. सध्या मातीकाम करत असलेले कुंभार आता पिकलेत – आणि अनेकांना पाठदुखी जडलीये
“आमचा मुलगा साखर कारखान्यात कामाला आहे, त्याची अगदीच थोडकी मदत होते आम्हाला. त्यानं काही ही कला फार शिकली नाही,” विष्णु सांगतात. “मी आता माझ्या सुनंला, त्याच्या बायकोला शिकवायलोय, तशीच ही कला जिती राहील.”
छायाचित्र आणि रेखाचित्रः संकेत जैन