तो काही त्या दुकानाचा मालक नव्हता. फक्त मालकाचा मित्र. थोडा वेळ गेल्यानंतर त्याने स्वतःची बढती “मालकाचा नातेवाईक” अशी केली. आणि त्यानंतर काहीच क्षणात तो “दुकानात काम करणारा नातेवाईक” झाला. जर आम्ही जरा आणखी खोदून चौकशी केली असती तर तर तो स्वतः दुकानाचा मालक असल्याचं त्यानं सांगून टाकलं असतं.

त्याचा फोटो काढून घ्यायला त्याने नकार दिला. आणि आम्ही शक्यतो त्याच्या दुकानाच्या आतले फोटोही काढू नयेत अशी त्याची इच्छा होती. पण बाहेरच्या बोर्डचा फोटो काढायला मात्र त्याने आनंदाने परवानगी दिली.

विदेशी शराब दुकान – दुकानाच्या दारापासून थोड्याच अंतरावर बोर्ड लिहिलेला होता. परवानाधारकः रमेश प्रसाद. सध्याच्या छत्तीसगडमध्ये (पण त्या काळी मध्य प्रदेशात असलेल्या) सरगुजा जिल्ह्याच्या काटघोडा गावाच्या सीमेवर आम्ही होतो. आमच्यासाठी दुभाषाचं काम करणारा गडी जरासा नशेत होता. तो नक्कीच रमेश प्रसाद नसणार. त्याचं इथे या दुकानात काम काय असेल असा विचार करता आम्ही या निष्कर्षावर पोचलो की तो या विदेशी दारुच्या दुकानाचं मोठं गिऱ्हाइक असावा.

विदेशी दारू? अं... खरं तर सत्य वेगळंच आहे. आयएमएफएल हे लघुरुप मी शेवटचं कधी ऐकलं ते काही आता ध्यानात नाही. आयएमएफएल म्हणजे इंडियन मेड फॉरेन लिकर (भारतीय बनावटीची विदेशी दारू). हा फोटो १९९४ सालचा आहे. त्या काळी भारतीय बनावटीची विदेशी दारू विरुद्ध देशी दारू असा मोठा वाद उसळला होता.

लॉ इनसाइडर या वेबसाइटवरून या प्रकारच्या मद्याची माहिती मिळाली ती अशीः “जिन, ब्रँडी, व्हिस्की किंवा रम सारखं भारतात तयार केलेलं, मिश्रित केलेलं किंवा परदेशातून आयात केलेलं मद्य ज्यामध्ये मिल्क पंच किंवा इतर कोणतंही मद्य ज्यामध्ये वरील घटकांचा समावेश आहे. पण यामध्ये बियर, वाइन आणि विदेशी मद्याचा समावेश नाही.” लक्षात घ्या, “बियर, वाइन किंवा विदेशी मद्याचा समावेश नाही.”

आयएमएफएल मध्ये आयात केलंली आणि स्थानिक घटकांचं मिश्रण केलेली अशी दोन्ही प्रकारची दारू समाविष्ट आहे (यात काकवी असू शकते किंवा स्थानिक स्तरावर त्याचं मिश्रण केलं जाऊ शकतं किंवा आयात केलेली दारू इथे केवळ बाटलीबंद करण्याचं काम केलं जातं). पण खरं तर याबाबत काही स्पष्टता नाही.

PHOTO • P. Sainath

त्या काळी देशी दारू तयार करणाऱ्यांना राग येणं साहजिकच होतं. एकामागून एक राज्यात ताडी, अरॅक किंवा देशी दारूवर बंदी घालण्यात येत होती. पण भारतीय बनावटीच्या विदेशी दारूचा मात्र उदोउदो चालू होता. आम्ही त्या विदेशी शराब दुकानाच्या बाहेर उभं होतो तेव्हा मला इथून १७०० किलोमीटरवर असलेल्या तमिळ नाडूच्या पुडुकोटेटईमध्ये १९९३ साली पाहिलेलं एक दृश्य आठवलं. तिथे देशी अरॅकवर बंदी घालण्यासाठी नेमलेले अधिकारी ब्रँडीच्या दुकानांचे सौदे करण्यात मग्न होते. तमिळ नाडूच्या दक्षिणेकडच्या प्रांतात आयएमएफएल दुकानं ‘ब्रँडीचं दुकान’ याच नावाने ओळखली जातात. वैध दारूच्या विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाला अरॅकच्या विक्रीमुळे चांगलाच फटका बसत असल्याने ती एक मोठी डोकेदुखी झालेली होती.

एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये दारूबंदीचं महत्त्व सांगणाऱ्या अधिकाऱ्यांना द्रमुकच्या कार्यकर्त्याने पाच रुपयांची नोट दिली. आणि तो म्हणाला, “ब्रँडीच्या दुकानांचा गाजावाजा करत तुम्ही दारूच्या व्यसनाविरोधात लढताय. त्यासाठी हे माझं योगदान.” त्यांची मान शरमेने खाली गेली.

तर १९९४ साली काटघोडामध्ये आम्हाला जरासा उशीर झालेला होता. म्हणून आमच्यासाठी स्वतःहूनच मार्गदर्शकाचं काम करणाऱ्या त्या मद्यधुंद मित्राला आम्ही निरोप देऊन आम्ही निघालो. परकीय अंमलही ठीकच असंच त्याच्याकडे पाहून वाटत होतं. विदेशी शराब दुकानाचे परवानाधारक रमेश प्रसाद यांची काही भेट होऊ शकली नाही. कारण आम्हाला पुढच्या तीन तासांत देशी महामार्गाने अंबिकापूरला येऊन पोचायचं होतं.

आयएमएफएलची आठवण होण्याचं कारण म्हणजे २२ डिसेंबरला मध्य प्रदेशचे महसूल मंत्री जगदीश देवडा यांनी विधानसभेत (जराशा अभिमानानेच) अशी माहिती दिली की, “२०२०-२१ साली आयएमएफएल दारूचा खप ४२०.६५ लाख प्रूफ लिटर इतका वाढला आहे. २०१०-११ साली हाच आकडा ३४१.८६ लाख लिटर इतका होता. त्यामध्ये तब्बल २३.०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.”

आता या ‘प्रूफ’ लिटरमधल्या प्रूफचा अर्थ तरी काय? अनेक शतकांपूर्वी इंग्लंडमध्ये दारूमध्ये मद्यार्काचं प्रमाण नक्की किती आहे हे मोजण्यासाठी एक तपासणी केली जायची, त्यातून हा शब्द पुढे आला. तज्ज्ञ मंडळी सांगतात की मद्यार्काचं प्रमाण म्हणून अशा प्रकारचं ‘प्रूफ’ आता इतिहासजमा झालं आहे. होईना का. मध्य प्रदेशात मंत्री देवडा असंही म्हणू शकतात की आम्ही देखील इतिहासच घडवतोय. ज्या एका दशकाच्या काळात आयएमएफएलचा खप २३ टक्क्यांनी वाढला त्याच दशकभरात देशी दारूच्या खपात ८.२ टक्के अशी किरकोळ वाढ झाली. पण देशी दारूचं एकूण सेवन पाहिलं तर ते भारतीय बनावटीच्या विदेशी दारूपेक्षा म्हणजेच आयएमएफएलपेक्षा दुपटीहून जास्त आहे. त्यामुळे देशी आजही वरचढच आहे. पण विदेशीचा खप मात्र तिच्यापेक्षा दुपटीहून जास्त वेगाने वाढत चाललाय. स्वाभिमानी देशभक्तांना ही विसंगती चक्रावून टाकणार हे नक्की.

P. Sainath

ପି. ସାଇନାଥ, ପିପୁଲ୍ସ ଆର୍କାଇଭ୍ ଅଫ୍ ରୁରାଲ ଇଣ୍ଡିଆର ପ୍ରତିଷ୍ଠାତା ସମ୍ପାଦକ । ସେ ବହୁ ଦଶନ୍ଧି ଧରି ଗ୍ରାମୀଣ ରିପୋର୍ଟର ଭାବେ କାର୍ଯ୍ୟ କରିଛନ୍ତି ଏବଂ ସେ ‘ଏଭ୍ରିବଡି ଲଭସ୍ ଏ ଗୁଡ୍ ଡ୍ରଟ୍’ ଏବଂ ‘ଦ ଲାଷ୍ଟ ହିରୋଜ୍: ଫୁଟ୍ ସୋଲଜର୍ସ ଅଫ୍ ଇଣ୍ଡିଆନ୍ ଫ୍ରିଡମ୍’ ପୁସ୍ତକର ଲେଖକ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ପି.ସାଇନାଥ
Translator : Medha Kale

ମେଧା କାଲେ ପୁନେରେ ରହନ୍ତି ଏବଂ ମହିଳା ଓ ସ୍ଵାସ୍ଥ୍ୟ କ୍ଷେତ୍ରରେ କାମ କରିଛନ୍ତି । ସେ ମଧ୍ୟ PARIର ଜଣେ ଅନୁବାଦକ ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ମେଧା କାଲେ