पानिखाइती कनिष्ठ प्राथमिक विद्यालय क्र. २ ची पडकी इमारत ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यापासून एक मीटरही दूर नाही. शाळेच्या इमारतीच्या आतल्या भिंतीवर ‘प्राथमिक शिक्षा गोराकी शिशूर मौलिक अधिकार’ (‘प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे’) ही घोषणा रंगवलेली दिसते. नदीकडे तोंड असलेल्या, भिंतीच्या दुसऱ्या बाजूवर महात्मा गांधींचं चित्र आणि आसामीमध्ये लिहिलेला आणखी एक संदेश दिसतोः ‘सत्याचा नेहमीच विजय होतो’.

PHOTO • Ratna Bharali Talukdar

पानिखाइतीतल्या ढासळलेल्या शाळेची भिंत सांगते ‘प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे’

सोनताली चारमधल्या पानिखाइती गावातल्या या एकमेव सरकारी शैक्षणिक संस्थेतले विद्यार्थी आणि त्यांचे एकुलते एक शिक्षक यांच्यासाठी मात्र कटू सत्याचाच विजय झालाय. सावकाश वाढत गेलेलं नदीचं पात्र आणि ढासळलेली शाळेची इमारत म्हणजे ब्रह्मपुत्रेतल्या चारवरची जीवन किती अस्थायी आहे याचंच द्योतक म्हणायला पाहिजे. माजी विद्यार्थिनी, रेहेना रेहमान म्हणते, “... शाळा वाहून गेलीये. आम्ही एकत्र शाळेत जायचो त्याच्या फार रम्य आठवणी आहेत आमच्या मनात...”

ऑक्टोबर २०१६ पर्यंत उफाणलेली नदी शांत होण्याची कोणतीच चिन्हं दिसत नव्हती आणि ही शाळा वाहून जाण्यापासून वाचवण्यासाठी आसाम सरकारकडे केलेल्या विनंतीला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा गावकऱ्यांनी हळू हळू पाण्याखाली जात असलेल्या इमारतीचे दरवाजे, खिडक्या, छताचे पत्रे आणि बाकं बाहेर काढली होती.

आसाममध्ये ब्रह्मपुत्रेच्या पात्रामध्ये वाळूने तयार झालेली छोटीछोटी बेटं म्हणजे चार. (पहाः वाळूचा किल्लाः ‘चार’निवासींचा संघर्ष ) अंदाजे २४ लाख लोक या चार बेटांवर राहतात. पानिखाइती गाव आणि व्यापक सोनताली चारचा प्रदेश कामरुप जिल्ह्याच्या बोको विधानसभा मतदार संघात येतो.

PHOTO • Ratna Bharali Talukdar

नदीने हळू हळू शाळा गिळंकृत केल्यानंतर मागे राहिलेले पानिखाइती कनिष्ठ प्राथमिक विद्यालयाचे भग्नावशेष

काही आठवड्यांनी, २८ नोव्हेंबर रोजी चारला भेट दिली असता दिसतं की शाळेचे मागे राहिलेले अवशेषही दिसेनासे झाले होते. एके काळी जिथे शाळेची इमारत होती तिथे आता फक्त पाणी वाहत होतं. मोटरवर चालणाऱ्या बोटी या नव्या भागातून लोकांची आणि सामानाची वाहतूक करत होत्या.

सध्या पाण्यात गेलेल्या शाळेपासून ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या तात्पुरत्या पत्र्याच्या खोलीत सध्या शाळा भरतीये. मुख्याध्यापक तारिक अलींच्या घराच्या अंगणात असलेली ही खोली नदीपासून केवळ १५ मीटरच्या अंतरावर आहे. नियमित वर्ग आणि चाचणी परीक्षाही इथे घेतल्या जातायत.

PHOTO • Ratna Bharali Talukdar

नोव्हेंबर २०१६: एके काळी इथे पानिखाइती कनिष्ठ प्राथनिक विद्यालय क्र. २ ची इमारत उभी होती

१९७४ साली जेव्हा पानिखाइतीच्या रहिवाशांनी गावातल्या ६-११ वर्षांच्या मुलांसाठी शाळा सुरू करायचं ठरवलं तेव्हा रुबेया खातून (आता त्यांच्या सत्तरीत) आणि त्यांच्या कुटुंबाने आपली दोन बिघा जमीन दान केली [आसाममध्ये ७.५ बिघा म्हणजे एक एकर]. १९८२ मध्ये प्राथमिक शिक्षण विभागाने शाळेची दखल घेऊन तारिक अलींची मुख्याध्यापक म्हणून नेमणूक करेपर्यंत गावकऱ्यांनी स्वतःच शाळा चालवली. चारवर मोजक्या खाजगी शाळा आणि मदरसे आहेत मात्र तेव्हापासून आजतोवर पानिखाइती कनिष्ठ प्राथमिक विद्यालय क्र. २ ही इथली एकमेव सरकारी शाळा आहे. बैठका आणि चर्चांसाठीची जागा म्हणूनही शाळेचा उपयोग झाला आहे. आजूबाजूच्या चार आणि गावातल्या मुलांनाही या एकशिक्षकी शाळेबद्दल ओढ निर्माण झाली आहे.

PHOTO • Ratna Bharali Talukdar

ऑक्टोबर २०१६ मध्ये पडझड झालेल्या शाळेजवळ उभ्या रुबेया खातून. त्यांच्या शेतकरी कुटुंबाने शाळेसाठी जागा दान केली होती. त्यांची जमीन आणि शाळाही आता ब्रह्मपुत्रेच्या पाण्यात वाहून गेली आहे

२०१६ साली केवळ दोन महिन्यांच्या काळात ब्रह्मपुत्रेच्या वाढत्या पाण्याने पानिखाइतीचा जवळ जवळ दोन तृतीयांश भूभाग वाहून गेला आणि २०० हून अधिक कुटुंबांना विस्थापित व्हावं लागलं. “एका मागोमाग एक गावं ब्रह्मपुत्रेच्या पाण्यात बुडायला लागल्यावर सुरक्षित ठिकाणी शाळा हलवावी यासाठी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे काही सदस्य आणि गावकऱ्यांसोबत मी तालुका प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे किती खेटे मारले,” तारिक अली सांगतात. “त्यांनी आम्हाला परत पाठवलं, का तर शाळा दुसरीकडे हलवण्यासाठी त्यांच्याकडे निधीची तरतूद नाही म्हणून.”

PHOTO • Ratna Bharali Talukdar

आता महाविद्यालयात जाणारी रेहेना रेहमान, शाळेची माजी विद्यार्थिनी आणि शाळेचे विद्यार्थी सध्या पानिखाइती विद्यालय क्र. २ ज्या तात्पुरत्या खोलीत भरते तिथे

त्यांचं स्वतःचं घर आणि तात्पुरती शाळा देखील नदीपासून काही मीटरच्याच अंतरावर असल्याने जमिनी अशाच वाहून जाऊ लागल्या तर शाळा कुठे हलवायची हेच तारिक अलींना अजिबात सुचत नाहीये. विस्थापित झालेले अनेक रहिवासी जमीन किंवा उपजीविकांच्या शोधात आसामच्या इतर गावांमध्ये आणि शहरांमध्ये गेले आहेत आणि त्यामुळे शाळेची पटसंख्या १९८ वरून ८५ इतकी घसरली आहे.

“ज्या मुलांनी आधीच शाळा सोडलीये त्यांचा माग काढणं अवघड आहे,” अली सांगतात. “इथे अनिश्चितता आणि धोका इतका जास्त आहे की पालकांनी मुलांचे शाळेचे दाखले देखील नेले नाहीयेत. ही दुर्दैवी मुलं शाळेतून गळण्याचीच शक्यता सर्वात जास्त आहे.”

२०१४ सालच्या आसाम मानव विकास अहवालानुसार चार प्रदेशांमध्ये ६-१४ वयोगटातील ९३.३३ मुलांची शाळेत नोंदणी झाली आहे आणि १५-१६ वयोगटातली ५७.४९ मुलं आजही शिक्षण घेत आहेत. संपूर्ण आसाम राज्यासाठी हेच आकडे अनुक्रमे ९३.८५ आणि ७४.५७ टक्के इतके आहेत. हा अहवाल असंही नोंदवतो की राज्यामध्ये शाळा सोडलेल्या किंवा कधीच शाळेत न गेलेल्या एकूण मुलांपैकी ३३.२१ टक्के मुलं चार प्रदेशांमधली आहेत.

PHOTO • Ratna Bharali Talukdar

हा एकमेव लाकडी पूल पानिखाइती आणि बाकी जगातला दुवा आहे, सातत्याने वाढत जाणाऱ्या पाण्यामुळे सतत गावकऱ्यांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाली आहे

“पानिखाइतीच्या अगोदर, लोटोरिया, लोटोरिया बिलोरजन, लोटिरतारी, गोराइतारी, बोरोगुल, कुचियारदिया पाथार, जातिया दिया नं. १ आणि जातिया दिया नं. २ ही गावं नदीने गिळंकृत केली आहेत,” इथले स्थानिक रहिवासी अब्दुस समद सांगतात. “आम्ही सातत्याने सरकारला जमिनी वाहून जाऊ नयेत म्हणून उपाययोजना करण्याची आणि गावांचं रक्षण करण्याची विनंती केली आहे, पण कुणीही आमचं म्हणणं ऐकलेलं नाही.” पूर्वी लष्करात असलेले समद देखील आतापर्यंत पाच वेळा विस्थापित झाले आहेत आणि आता पानिखाइतीजवळ सोनताली प्रदेशातल्या बार अरिकाती गावी स्थायिक झाले आहेत.

व्हिडिओ पहाः चारवरची शाळा – मधून नदी वाहतीये

आसामच्या जलसंपदा विभागाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार ब्रह्मपुत्र आणि तिच्या उपनद्यांच्या पात्रामुळे १९५० पासून आजपर्यंत ४.२७ लाख हेक्टर जमीन वाहून गेली आहे. ही जमीन राज्याच्या एकूण भौगोलिक प्रदेशाच्या ७.२० टक्के इतकी आहे. वाहून गेल्यामुळे दर वर्षी सरासरी ८००० हेक्टर जमीन नष्ट होत असल्याचं दिसून येत आहे.

रुबेया खातून, ज्यांनी शाळेसाठी जमीन दिली त्याही यातून सुटलेल्या नाहीत. घराची आणि शेतीची अशी १० बिघा जमीन वाहून गेल्यामुळे त्या आता त्यांच्या एका नातेवाइकांकडे नदीच्या किनाऱ्यावर राहत आहेत. त्यांना वृद्धापकाळ किंवा विधवा पेन्शन, काहीही मिळत नाही.

पानखाइती आणि सोनतालीचे लोक अगदी ५० मीटरवरून जाणाऱ्या प्रवाहाच्या दिशेने सरकणाऱ्या नदीकडे पाहतायत. जर नदीचा या प्रवाहात प्रवेश झाला तर त्यांचा सगळा संपर्क तुटणार आहे, अगदी सोनतालीच्या बाजारातही त्यांना जाता येणार नाही. चारवरचं जीवन असतं ते असं.

फोटोः रत्ना भराली तालुकदार

अनुवादः मेधा काळे

Ratna Bharali Talukdar

ରତ୍ନା ଭରାଲି ତାଲୁକଦାର ପରୀର ୨୦୧୬-୧୭ ବ୍ୟକ୍ତିତ୍ୱ। ସେ ଉତ୍ତର-ପୂର୍ବ ଭାରତର ଏକ ଅନଲାଇନ୍‌ ପତ୍ରିକା ନେଜିନ୍‌ର କାର୍ଯ୍ୟନିର୍ବାହୀ ସମ୍ପାଦକ। ଏଥିସହ ସେ ଜଣେ ସୃଜନଶୀଳ ଲେଖିକା। ସେ ବିସ୍ଥାପନ, ଦେଶାନ୍ତର, ଶାନ୍ତି ଏବଂ ସଂଘର୍ଷ, ପରିବେଶ ଏବଂ ଲିଙ୍ଗ ଆଦି ବିଭିନ୍ନ ପ୍ରସଙ୍ଗ ସମ୍ପର୍କରେ ଲେଖିବା ପାଇଁ ଏହି ଅଞ୍ଚଳର ବିଭିନ୍ନ ସ୍ଥାନ ଗସ୍ତ କରିଥାନ୍ତି।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ରତ୍ନ ଭରାଲି ତାଲୁକଦାର
Translator : Medha Kale

ମେଧା କାଲେ ପୁନେରେ ରହନ୍ତି ଏବଂ ମହିଳା ଓ ସ୍ଵାସ୍ଥ୍ୟ କ୍ଷେତ୍ରରେ କାମ କରିଛନ୍ତି । ସେ ମଧ୍ୟ PARIର ଜଣେ ଅନୁବାଦକ ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ମେଧା କାଲେ