पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यात नांदगाव या गावी एका अतिशय गरीब कुटुंबात कुसुम सोनवणेंचा जन्म झाला. लहानग्या कुसुमला शाळेत जायचं होतं. पण आईने पाठवलं नाही आणि गुरांमागे धाडलं. शाळेत जायची त्यांची इच्छा अपुरीच राहिली.
वयाच्या १२ व्या वर्षीच कुसुमचं लग्न झालं. सासर मुळशी तालुक्यातलंच साठेसई. त्यांचा नवरा मुंबईला दगड फोडायच्या (खडीच्या) कारखान्यात कामाला होता. मुंबईला कामगारांचा संप झाला आणि त्याची नोकरी गेली. तो गावी परतला आणि गावातच मजुरी करू लागला. १९८० मध्ये कुसुमताई गरीब डोंगरी संघटनेच्या सदस्य झाल्या. पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागातल्या गरीब लोकांबरोबर काम करणारी ही एक संघटना.
या संग्रहात कुसुमताईंनी चार ओव्या गायल्या आहेत. ओव्यांसोबतच त्यांनी बाईचं समाजातलं स्थान, ओळख आणि पुरुषप्रधान समाजात त्यांना स्वतःला कोणत्या जाचाला आणि दबावाला तोंड द्यावं लागतं याबद्दलची मतं मांडली आहेत.
ध्वनीफीतीच्या सुरुवातीला कुसुमताई त्यांचे विचार मांडतात आणि मग ओवी सुरू करतात. त्यानंतरचं त्यांचं बोलणं आणि ओव्या, जशा मूळ रेकॉर्ड केल्या गेल्या त्याच क्रमाने मांडल्या आहेत.
कुसुम सोनवणेः आहेत ना तशी गाणी. कशी? तर स्त्रिया कंटाळलेल्या असतात... समाजाच्या दबावाला, नवऱ्याच्या दबावाला, भावाच्या दबावाला. मग त्या कंटाळल्या असतात, त्यांना असं वाटतं की हा जीव नको, काही उपयोग नाही, काही खरं नाही (आयुष्याचं) मग त्या ओवीत असं म्हणतात,
जळू जळू तरूणपण, उभा राहिल्याचा दोष
राजामधी राज, बाळपणी राज बेस
कुसुम सोनवणेः लहानपण आहे ना तेच चांगंलय. वयात आले, १८ वर्षाची झाले... हे तरूणपण नको.
(गाऊन दाखवाल का?)
ओवी १
राजामधी राज, बाळपणी राज बेस
जळू तरुणपण, उभा राहिल्याचा दोष
लहानपणी काही केलं तरी मुलगी निर्दोष असते. त्यामुळे सगळ्यात जास्त आनंद कधी मिळतो, तर बालपणात
ते मेलं तरूणपण जळू दे. तारुण्यात साधं उभं जरी राहिलं तरी दोष मुलीलाच दिला जातो. तारुण्यातल्या उभारीलाच सारा बोल लावला जातो.
कुसुम सोनवणे: काय होतं, कंटाळती बाई. जिवाला कंटाळती. तिला वाटतं, हे तरुणपण नको, जळू दे हे तरूणपण. नको हे, पेटू दे.
ओवी २
बाई जळू तरूणपण, आग लागू दे उभारीला
अशी बोलच लागतो, माता ना गांधारीला
कुसुम सोनवणेः जर मुलगी वाईट वागली, वाईट राहिली, वाईट वापरली तर समाज हा मुलीला नावं ठेवतो. आणि मग काय म्हणतो, अमक्या तमक्या बाईची मुलगी आहे ही. हिची आईच चांगली नाही. तिची खानदानच चांगली नाही. म्हणून आईला बोल लावतो. म्हणून आग लागू दे या तरुणपणाला, या उभारीला. जळू दे, पेट बसू दे.
टीपः महाभारतामध्ये कौरवांची आई गांधारी ही खरं तर चांगली पत्नी आणि आई होती. मात्र मुलांच्या कृत्यांसाठी आईला कसे बोल लावले जातात याचंच ती प्रतीक ठरली.
ओवी ३
बाई ना अस्तुरी जलम, ठावं असता आले नसते
अशी ना देवाच्या दारची, तुळस झाले असते
मला जर माहित असतं की मी बाईच्या जन्माला येणार आहे, तर मी जन्मालाच आले नसते. मी देवाच्या दारची तुळस होणं पत्करलं असतं.
टीपः कुसुमताईंना सांगायचंय की बाई होण्यापेक्षा देवाच्या दारची तुळस झाले असते तर मला जास्त मान मिळाला असता आणि लोकांनी मला पूजलं असतं.
ओवी ४
अशी ना अस्तुरी जलम, कुनी घातला येड्यानी
अशी ना परक्याच्या घरी, माझा देह राबतो भाड्यानी
कोण्या वेड्याने बाईला जन्माला घातलंय? माझं शरीर परक्याच्या घरात भाड्यावर राबतंय
कुसुम सोनवणेः जर समजा माहित असतं ना बाईचा जन्म आहे तर जन्माला आलेच नसते. पण हा देह आहे, पिंड रचला, मोठा झाला आणि दुसऱ्याच्या घरी भाड्यानी राबायला आला. (बाईला, तिच्या जन्माला) किंमत नाही.
कलावंत – कुसुम सोनवणे
गाव – नांदगाव
तालुका – मुळशी, कोळवण खोरं
जिल्हा – पुणे
लिंग – स्त्री
जात – नवबौद्ध
वय – ५२
शिक्षण – निरक्षर
मुलं – २ मुलगे, २ मुली
व्यवसाय – भातशेती
दिनांक – या ओव्या आणि कुसुमताईंचं बोलणं ५ ऑक्टोबर १९९९ रोजी रेकॉर्ड करण्यात आलं.
ध्वनीमुद्रण, शब्दांकन आणि अनुवाद – पारी ग्राइंडमिल साँग्ज प्रोजेक्ट टीम
फोटो – बर्नार्ड बेल
पोस्टर – श्रेया कात्यायिनी व सिंचिता माजी