“मी काठी मारली तरी त्याने माझ्यावर उडी घेतली, माझ्या मानेवर आणि हातावर पंजा मारला. मी जंगलात आतमध्ये चार किलोमीटरवर होतो. सगळे कपडे रक्ताने भरले होते. कसाबसा मी घरी चालत आलो.” बिबट्याच्या हल्ल्यातून वाचलेले विशालराम मरकाम पुढचे दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये होते. आपल्या म्हशींना काही झालं नाही याचाच त्यांना आनंद होता. “बिबट्याने माझ्या कुत्र्यांवरही हल्ला केला. ती पळून गेली,” ते सांगतात.

२०१५ सालची ही घटना. मरकाम आता तो प्रकार हसण्यावारी नेतात कारण त्या हल्ल्याच्या आधी आणि नंतरही शिकारी जनावरं त्यांनी अगदी जवळून पाहिली आहेत, ते म्हणतात. छत्तीसगडच्या जबर्राच्या जंगलात ते आपल्या म्हशी चारतात आणि तिथे फक्त भक्ष्याच्या शोधातले बिबटेच नाही तर वाघ, कोल्हे, लांडगे, रानकुत्री, रानडुकरं आणि सोबत सांबर, चितळं आणि गवेसुद्धा फिरत असतात. उन्हाळ्यात आटत चाललेल्या पाण्याच्या शोधात जेव्हा जनावरं मोजक्या पाणवठ्यांवर जातात तेव्हा तर या प्राण्याचं दर्शन होण्याची शक्यता दुपटीने काय तिपटीने वाढते.

“माझ्या म्हशी स्वतःच्या मनाने जंगलात मनमुक्त फिरत असतात. त्या परत आल्या नाहीत तरच मी त्यांना शोधायला जंगलात जातो,” मरकाम सांगतात. “कधी कधी जनावरं पहाटे ४ वाजेपर्यंत परत येत नाहीत. मग रात्रीच्या अंधारात जंगलात त्यांना शोधण्यासाठी डबल [पॉवरचा] टॉर्च वापरायला लागतो.” ते आम्हाला त्यांचे तळवे आणि पाय दाखवतात. अनवाणी जंगलात फिरल्याने त्यांचे पाय जखमा आणि वणांनी भरलेले आहेत.

धमतरी जिल्ह्याच्या नगरी तहसिलातल्या जबर्रा गावाच्या जवळ जंगल आहे. आणि याच जंगलात ९-१० किलोमीटर आतपर्यंत या मनस्वी म्हशी गवताच्या शोधात चरत, हिंडत असतात. “उन्हाळ्यात त्या याच्या दुप्पट अंतर फिरत असतील. गवतच नसतं. आणि चाऱ्यासाठी आता केवळ जंगलावर अवलंबून राहणं शक्य नाही. जनावरं भुकेने मरून जायची,” मरकाम सांगतात.

Vishalram Markam's buffaloes in the open area next to his home, waiting to head out into the forest.
PHOTO • Priti David
Markam with the grazing cattle in Jabarra forest
PHOTO • Priti David

डावीकडेः विशालराम मरकामांच्या म्हशी घरासमोरच्या अंगणात, जंगलात जायच्या तयारीत. उजवीकडेः मरकाम जबर्राच्या जंगलात गुरं चारतयात

“मी त्यांच्यासाठी पायरा [धान्याच्या वाळलेला पाला] आणतो, पण त्यांना जंगलात फिरत तिथलं जंगली गवत खायला जास्त आवडतं,” खोडसाळ मुलांबद्दल बोलावं तसं मरकाम आपल्या म्हशींचं कौतुक सांगत असतात. आणि सगळ्या आई-वडलांसारखं त्यांनाही आपल्या लेकरांना परत बोलावण्याच्या काही क्लृप्त्या माहित आहेत. त्यांच्या म्हशींचं लाडकं मीठ. ढीगभर मीठ ठेवलं की ते चाटण्याच्या आशेने त्या रात्री ८ वाजेपर्यंत घरी परतात. त्यांचं ‘घर’ म्हणजे त्यांच्या मालकाच्या घराशेजारचा कुंपण घातलेला मोठा गोठा. विशालराम यांचं घरं विटामातीचं आहे.

जबर्राच्या ११७ कुटुंबांपैकी बहुतेक गोंड आणि कमार आदिवासी आहेत आणि काही मोजकी कुटुंबं यादवांची आहेत (छत्तीसगडमध्ये मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट). मरकाम गोंड आदिवासी आहेत आणि या ५,५३२ हेक्टर जंगलाची त्यांना खडा न् खडा माहिती आहे. आपल्या आयुष्याची पन्नास वर्षं त्यांनी याच जंगलाच्या सावलीत काढली आहेत. “मी पाचवीपर्यंत गावातल्या शाळेत शिकलो त्यानंतर मी शेती करायला सुरुवात केली,” ते सांगतात.

छत्तीसगडच्या पूर्वेकडच्या टोकाला असलेल्या धमतरी जिल्ह्यातला ५२ टक्के भूभाग राखीव आणि संरक्षित वन जाहीर करण्यात आला असून त्यातला निम्मा भाग घनदाट जंगलाने व्यापला आहे असं २०१९ सालचा भारतीय वन सर्वेक्षण अहवाल सांगतो. साल आणि सागाची झाडं इथे सर्वदूर आढळतात. शिवाय साज, कोहा, हर्रा, बहेरा, तिनसा, बिजा, कुंबी आणि महुआ हे वृक्षही मोठ्या प्रमाणात आढळतात.

गेल्या काही वर्षांत अपुरा पाऊस आणि वनांचं आच्छादन विरळत चालल्याने जनावरांसाठी चरायच्या जागा देखील कमी होत चालल्या आहेत. मरकाम सांगतात की त्यांच्या दलात आधी ९० म्हशी होत्या पण आता केवळ ६०-७० म्हशीच उरल्या आहेत. आणि यातली १५ पिलं आहेत. “जंगलात पूर्वीसारखं म्हशींसाठी खायला मिळेनासं झालंय. त्यांनी झाडं तोडायचं थांबवलं तरच काही तरी आशा आहे,” ते म्हणतात. “[२०१९] साली माझ्या जनावरांसाठी चाऱ्यावर मी १०,००० रुपये खर्चले असतील. एक ट्रॅक्टर चारा घ्यायचा तर ६०० रुपये लागतात. शेतकऱ्यांच्या रानातून पेंडा आणायला मला २० खेपा कराव्या लागल्या होत्या.”

उन्हाळ्यात आटत चाललेल्या पाण्याच्या शोधात जेव्हा जनावरं मोजक्या पाणवठ्यांवर जातात तेव्हा तर या प्राण्याचं दर्शन होण्याची शक्यता दुपटीने काय तिपटीने वाढते

व्हिडिओ पहाः ‘मी मेल्यावरच या जनावरांची साथ सुटणार’

२०१९ साली ऑगस्ट महिन्यात जबर्रा ग्राम सभेला वन हक्क कायदा , २००६ अंतर्गत ‘सामुदायिक वनसंपदा अधिकार’ बहाल करण्यात आले. मरकाम यांचा ठाम विश्वास आहे की या अधिकारांचा वापर करून जनावरांसाठी कुरणं निश्चित वाढवता येतील. हा कायदा सांगतो की पूर्वापारपासून अनेक समुदाय आपली वनं जोपासत आले आहेत आणि अशा समुदायांना त्यांची वनसंपदा “राखण्याचा, जोपासण्याचा आणि (या वनसंपदेचं) व्यवस्थापन करण्याचा हक्क आहे”. असे अधिकार मिळालेलं जबर्रा हे छत्तीसगडमधलं पहिलं गाव आहे.

“कोणती झाडं लावायची आणि जोपासायची, कोणत्या जनावरांना चरायला परवानगी द्यायची, जंगलात कोणाला प्रवेश द्यायचा, वनक्षेत्रात छोटी तळी, पाणवठे करायचे, जमिनीची धूप होऊ नये म्हणून करायचे उपाय – असे सगळे निर्णय आता ग्रामसभेच्या हातात आले आहेत,” जबर्रामध्ये पेसा म्हणजेच पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम, १९९६ या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणारे जिल्हा समन्वयक प्रखर जैन सांगतात.

कायद्यातल्या तरतुदी चांगल्याच आहेत, मरकाम म्हणतात. बाहेरचे लोक इथे येतात आणि जंगलाची नासधूस करतात. “मी पाहिलंय, काही जण येतात, मासे पकडण्यासाठी जंगलाच्या आतल्या तळ्यांमध्ये कीटकनाशकं फवारतात, मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी विष टाकतात,” ते सांगतात. ती आमची माणसं नाहीत.

पुढच्या ग्रामसभेत चाऱ्याच्या टंचाईचा मुद्दा मांडणार असल्याचं ते सांगतात. “आतापर्यंत मी बोललो नाहीये कारण मला वेळच मिळत नाहीत. रात्री उशीरापर्यंत मी शेणघाण काढत असतो. मिटिंगला कधी जावं?” ते म्हणतात. आणि परत एकदा आपण याबाबत ग्रामसभेत बोलणार असल्याचं सांगतात. “जंगलतोडीच्या विरोधात आम्ही लोकांनी एकत्र यायला पाहिजे. जंगल वाचलं तर आमचं पोट भरणार आहे. जंगलाचं संरक्षण करणं आमच्याच हातात आहे.”

मरकाम यांचं घर जंगलाला अगदी लागून आहे. तीन खोल्यांच्या घराला मोठं अंगण आहे. रात्रीच्या वेळी आडकाठ्या लावून ते रेडकं आणि कालवडी ठेवतात. त्याशेजारीच मोठा गोठा आहे तिथे म्हशी आणि रेड्यांची जागा आहे.

A pile of hay that Markam has bought to feed his buffaloes as there isn't enough grazing ground left in the forest.
PHOTO • Purusottam Thakur
He restrains the calves in his fenced-in courtyard to stop them from straying into the jungle.
PHOTO • Priti David
The 'community forest resources rights' title granted under the Forest Rights Act to Jabarra gram sabha

डावीकडेः जंगलात कुरणं घटत चालल्यामुळे मरकाम यांनी म्हशींसाठी विकत आणलेला चारा. मध्यभागीः भटकत जंगलात जाऊ नयेत म्हणून छोट्या पिलांना अंगणात कुंपणाच्या आत ठेवलंय. उजवीकडेः वन हक्क कायद्याअंतर्गत जबर्रा ग्राम सभेला ‘सामुदायिक वनसंपदा अधिकार’ बहाल करण्यात आले आहेत

सकाळचे ६.३० वाजलेत, सूर्य वर यायला लागलाय तेव्हाच आम्ही त्यांना भेटतो. हिवाळ्यात रात्रीच्या शेकोटीतले निखारे अजून विझले नाहीयेत. गोठ्यातल्या जनावरांचे आणि त्यांच्या पिलांचे हंबरण्याचे आवाज घरात आणि अंगणात भरून राहिलेत. अंगणात दुधाच्या चरव्या धुऊन सुकायला ठेवल्या आहेत. धमतरीच्या एका दूध व्यापाऱ्याला मरकाम दूध घालून आलेत. मरकाम सांगतात की कधी कधी एका दिवशी ३५-४० लिटर दूध जातं आणि लिटरमागे ३५ रुपये भाव मिळतो. तो दिवस चांगला म्हणायचा. शेणही विकलं जातं. “रोज मी ५०-७० टोपल्या शेण गोळा करतो. रोपवाटिकावाले लोक विकत घेतात. मी एका महिन्यात ट्रॅक्टरभर शेण विकलं आणि [एका ट्रॅक्टरचे] १,००० रुपये मिळाले असतील,” ते सांगतात.

आमच्याशी बोलता बोलता एक रेडकू बाहेर येतंय असं पाहून ते आडकाठी लावून येतात. पिलं मोकळ्या अंगणात ठेवलेली आहेत. मोठी जनावरं चरायला जंगलात निघाली आहेत, त्यांच्या बरोबर पिलं जाऊ नयेत यासाठी ही दक्षता घ्यावी लागते. “ती अजून बारकी आहेत. घरापासून मी त्यांना फार लांब जाऊ देत नाही. कुणी मोठं जनावर येऊन त्यांना पकडून घेऊन जाऊ शकतं,” ते सांगतात. आपल्याला जाऊ देत नसल्याचा राग मोठमोठ्याने रेकून व्यक्त करणाऱ्या पिलांच्या आवाजाहून मोठ्या आवाजात ते आमच्याशी बोलतायत.

जनावरं राखता राखता मरकाम आपल्या एकरभर शेतात भात करतात. वर्षाला ७५ किलो तांदूळ होतो. घरी खाण्यापुरता माल येतो. “पूर्वी मी फक्त शेती करायचो, मग मी एक म्हैस घेतली, २०० रुपयांना. तिला १० पिलं झाली,” गुरं राखायला कशी सुरुवात केली त्याची गोष्ट ते सांगतात. जबर्राच्या ४६० रहिवाशांपैकी जवळपास सगळे छोट्या छोट्या भूखंडांमध्ये भात, कुळीथ आणि उडदाचं पीक घेतात. जंगलातून मोहाची फुलं, मध गोळा करून आणतात आणि थोडी फार गाई-गुरं राखतात.

Markam fixes the horizontal bars on the makeshift fence to corral the calves.
PHOTO • Purusottam Thakur
Outside his three-room house in Jabarra village
PHOTO • Priti David

डावीकडेः मरकाम छोट्या पिलांना कुंपणाच्या आत ठेवण्यासाठी आडवं लाकूड लावतात. उजवीकडेः जबर्रातल्या आपल्या तीन खोल्यांच्या घरासमोरच्या सोप्यात

मरकाम आणि त्यांच्या पत्नी किरण बाई इथे राहतात. त्या जनावरांना सांभाळायला मोठा हातभार लावतात. त्यांची दोघं मुलं लहानपणी वारली. आणि दोघी मुलींची लग्नं झालीयेत आणि त्या परगावी राहतात.

मार्च २०२० पासून कोविडमुळे टाळेबंदी लागली तेव्हा मरकाम यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे कारण या काळात धमतरीच्या बाजारात त्यांना दूधच विकता आलं नाही. “दुकानं आणि खानावळी बंद होत्या. त्यामुळे दुधाचा सगळा व्यापार ठप्प होता,” ते सांगतात. मग त्यांनी तूप बनवायला सुरुवात केली कारण ते जास्त काळ टिकतं. किरण बाई त्यांना दूध आणि साय उकळायला मदत करायच्या.

किरण बाई, मरकाम यांच्या दुसऱ्या पत्नी. ते स्वतः गोंड आहेत. छत्तीसगडमध्ये आदिवासींमध्ये सर्वात जास्त प्रमाण गोंडांचं आहे. लग्नावेळी त्यांना किरण बाईंना हुंडा द्यावा लागला होता. “आमच्या जमातीच्या बाहेर लग्न केल्यामुळे दंड म्हणून मला सगळ्यांना जेवण द्यावं लागलं होतं. मी दीडेक लाख रुपये खर्च केले असतील,” ते सांगतात.

त्यांचं काम पुढे चालवायला वारसच नाही त्यामुळे त्यांच्यानंतर या जनावरांचं काय होणार याची त्यांना चिंता वाटते. “मी नसलो की माझं जनावरं कुठे पण भटकत राहतात. मी मेलो तर त्यांना सोडून द्यावं लागणार कारण त्यांचं पाहणारं दुसरं कुणीच नाहीये,” ते म्हणतात. “त्यांची काळजी घेण्यात मी पुरता अडकून गेलोय. मेल्यावरच त्यांची साथ सुटणार.”

या व्हिडिओमध्ये विशालराम मरकाम वातावरणातील बदलांविषयी बोलतायतः वातावरण बदलाच्या रणांगणात कीटकांचा लढा , २२ सप्टेंबर २०२०, पारीवर प्रकाशित

Purusottam Thakur

ପୁରୁଷୋତ୍ତମ ଠାକୁର ୨୦୧୫ ର ଜଣେ ପରି ଫେଲୋ । ସେ ଜଣେ ସାମ୍ବାଦିକ ଏବଂ ପ୍ରାମାଣିକ ଚଳଚ୍ଚିତ୍ର ନିର୍ମାତା । ସେ ବର୍ତ୍ତମାନ ଅଜିମ୍‌ ପ୍ରେମ୍‌ଜୀ ଫାଉଣ୍ଡେସନ ସହ କାମ କରୁଛନ୍ତି ଏବଂ ସାମାଜିକ ପରିବର୍ତ୍ତନ ପାଇଁ କାହାଣୀ ଲେଖୁଛନ୍ତି ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ପୁରୁଷୋତ୍ତମ ଠାକୁର
Priti David

ପ୍ରୀତି ଡେଭିଡ୍‌ ପରୀର କାର୍ଯ୍ୟନିର୍ବାହୀ ସମ୍ପାଦିକା। ସେ ଜଣେ ସାମ୍ବାଦିକା ଓ ଶିକ୍ଷୟିତ୍ରୀ, ସେ ପରୀର ଶିକ୍ଷା ବିଭାଗର ମୁଖ୍ୟ ଅଛନ୍ତି ଏବଂ ଗ୍ରାମୀଣ ପ୍ରସଙ୍ଗଗୁଡ଼ିକୁ ପାଠ୍ୟକ୍ରମ ଓ ଶ୍ରେଣୀଗୃହକୁ ଆଣିବା ଲାଗି ସ୍କୁଲ ଓ କଲେଜ ସହିତ କାର୍ଯ୍ୟ କରିଥାନ୍ତି ତଥା ଆମ ସମୟର ପ୍ରସଙ୍ଗଗୁଡ଼ିକର ଦସ୍ତାବିଜ ପ୍ରସ୍ତୁତ କରିବା ଲାଗି ଯୁବପିଢ଼ିଙ୍କ ସହ ମିଶି କାମ କରୁଛନ୍ତି।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ Priti David
Translator : Medha Kale

ମେଧା କାଲେ ପୁନେରେ ରହନ୍ତି ଏବଂ ମହିଳା ଓ ସ୍ଵାସ୍ଥ୍ୟ କ୍ଷେତ୍ରରେ କାମ କରିଛନ୍ତି । ସେ ମଧ୍ୟ PARIର ଜଣେ ଅନୁବାଦକ ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ମେଧା କାଲେ