सत्यभान आणि शोभा जाधव ट्रॅक्टरवर बसण्याच्या तयारीतच आहेत. “जितकं शक्य आहे तितकं सोबतच घेऊन निघताव आम्ही – बाजरी, पीठ-मीठ, स्वैपाकाचं सगळं सामाईन,” सत्यभान सांगतात, “म्हणजे मग प्रवासात किंवा बेळगावमध्ये ज्यादा खर्च करावा लागत नाही.”
महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातलं १२०० लोकसंख्येचं बोडखा हे अडनिडं गाव. ऑक्टोबर महिन्यातली दुपार, हवेत चांगलाच उष्मा आहे. गावातले बरेच जण याच तयारीत आहेत – कपडे, भांडीकुंडी आणि वाटेत खायला चपात्या, आणि बाकी बऱ्याच सामानाची बांधाबांध आणि ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये सामान लादणं सुरू आहे. आपल्या साध्यासुध्या घराची लाकडी दारं बंद करून साखळी आणि कुलुप पक्कं बसलंय ना याची दोनदोनदा खातरजमा केली जातीये. घरदार पुढचे पाच महिने त्यांच्याच भरोशावर असणार आहे.
हा असा घर सोडून निघण्याचा सोहळा दर वर्षीचाच आहे. दर वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास मराठवाड्याच्या एकट्या बीड जिल्ह्यातले सव्वा लाख (जिल्हाधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार) शेतमजूर आणि शेतकरी पुढचे ४-५ महिने पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या उसाच्या फडांमध्ये तोड करण्यासाठी निघतात. आपल्या गावात हाताला काम नाही, वाढता उत्पादन खर्च, बाजारभावाची हमी नाही, कर्जाची सोय नाही, पाण्याचं दुर्भिक्ष्य आणि इतरही अनेक गोष्टींमुळे शेती संकटात सापडलेली... त्यामुळे त्यांना बाहेर पडावंच लागतं.
ही लोकं निघाली की गाव कसं सुनसुनं होऊन जातं. अगदी मोजकी मंडळी मागे राहतात – म्हातारी, अपंग आणि काही लेकरं. आणि घरची म्हातारी मंडळी लेकरांना सांभाळू शकणार नसतील तर त्यांनाही घेऊन निघावं लागतं, मग त्यांच्या शाळा मध्येच सुटल्या तरी. सत्यभान आणि शोभादेखील त्यांच्या ६ वर्षाच्या मुलाला, अर्जुनला सोबत घेऊन निघालेत. ९ आणि १२ वर्षांची दोघं मात्र मागेच राहणार आहेत. “त्यानं माझ्यासंगं यायचा हट्टच केला,” शोभा सांगतात. “बाकी दोघं सासू-सासऱ्यापाशी ठेवलीयेत.”
काही दिवसात बोडख्याचं जाधव कुटुंब आणि त्यांच्यासारखेच इतर जण कर्नाटकातल्या गोकाक तालुक्यात - बीडहून सुमारे ४५० किमी अंतरावर पोचतील. बहुतेक कुटुंबं दलित किंवा बंजारा समाजाची आहेत. तिथं पोचायचं म्हणजे ट्रॅक्टरला जोडलेल्या उघड्या ट्रॉलीवर बसून, संपणारच नाही असं वाटणारा अडीच दिवसाचा प्रवास करायचा.
प्रत्येक ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडल्या जातायत, कर्नाटकातल्या साखर कारखान्यांना ऊसतोडीसाठी मजूर पुरवण्याचं काम करणारे कंत्राटदार सदाशिव बडे सगळी व्यवस्था पाहून घेतायत. “माझ्यावर २०० ट्रक आणि ट्रॅक्टर पाठवायची जिम्मेदारी आहे [यातले बहुतेक बीड जिल्ह्यातूनच निघणार],” ते म्हणतात. “प्रत्येक गाडीत १० जोड्या; माझ्या असल्या ५० गाड्या आधीच निघाल्यात. आता आजूबाजूच्या गावातली माणसं जमा करून आणखी दोन गाड्या बोडख्याहून निघायच्या तयारीत आहेत बघा.”
उन्हं उतरायला लागलीयेत आणि दिवस मावळायच्या बेतात आहे, बहुतेकांनी बाजरीचे कट्टे, आणि लाकडी खोक्यांमध्ये पीठ मीठ सगळं बांधून, कपडे, भांडीकुंडी पोत्यात भरून ट्रॉलीमध्ये लादलीयेत. गाडीच्या दोन्ही बाजूनी रस्सीने आवळून बांधलेले पाण्याचे केशरी हंडे लटकतायत.
सामान लादून झालं की सगळी माणसं रात्रीचं जेवण घरच्यांसोबत करायला आपापल्या घरी परतलेत – आता बरेच महिने असं एकत्र जेवण होणार नाही. निघणाऱ्याला निरोप देण्याचं काम दर वर्षीचंच असलं तरी निघणारी माणसं ट्रेलरमध्ये चढू लागली की वाट लावायला आलेल्यांच्या डोळे पाणावतात. पहिल्या ट्रेलरमध्ये बाया आणि लहानगी पोरं बसतात. बापे आणि पोरं मागच्या ट्रेलरमध्ये. जी लेकरं आजी-आजोबांसोबत मागं राहणार ती आईला गाडीत चढताना पाहून भोकाड पसरतात. आयांच्या चेहऱ्यावरचा अपराधी भाव आणि दुःख लपत नाही.
शोभा गेल्या १७ वर्षांपासून सत्यभान यांच्यासोबत ऊसतोडीला जातायत. दोघंही आता चाळिशीला टेकलीयेत. शोभाताई यंदा जरा खुशीत आहेत. “यंदाच्याला दिवाळी लवकर आली ना,” त्या सांगतात. “घरच्या सगळ्यांसोबत सण साजरा करता आला या वेळी. अहो, या ऊसतोडीमुळे घरच्या लोकावाबरोबर दिवाळी कशी साजरी होते त्याचा जणू विसरच पडल्यागत झालतं.”
प्रवासाला सुरुवात करण्याआधी एखादा कुणी नारळ वाढवतो आणि मग ट्रॅक्टरचालक, २४ वर्षांचा महादेव तिडके इंजिन सुरू करतो. रात्रीचे १० वाजलेत. महादेवही बोडख्याचाच. १९ वर्षांचा असल्यापासून तो तोडीला कामगार घेऊन जातोय.
“जय भीम,” सत्यभान आवाज देतात आणि मग अंधाऱ्या वाटांनी, चांदण्यांनी लखडलेल्या आकाशाच्या साथीने ट्रॅक्टरचा प्रवास सुरू होतो. हवेत गारवा आहे. महादेव त्याच्या सीटशेजारच्या मशीनमध्ये पेन ड्राइव्ह लावतो आणि मग हिंदी सिनेमाची गाणी रात्रीच्या तो अंधार कापत जाऊ लागतात. ट्रॅक्टरवरची माणसं मागे राहिलेल्यांचा हात हलवून निरोप घेतात, आणि पोत्यांमध्ये सामानासुमानात कशी तरी बसायला नीट जागा करून घेतात.
ट्रॉलीत दोन बकऱ्यादेखील आहेत. “बेळगावला दुधाची तेवढीच सोय होईल,” खडबडीत रस्त्यावरचे ट्रॅक्टरचे धक्के खात अर्जुनला नीट मांडीत बसवत शोभा सांगतात. कार आणि ट्रक शेजारून जोरात जातायत. बोचरे वारे वहायला लागल्यावर शोभा सोबतच्या पिशवीतली माकड टोपी काढून अर्जुनला घालतात आणि स्वतः साडीचा पदर कानाभोवती गुंडाळून घेतात. बाकीची मंडळीदेखील आपापल्या सामानातून फाटक्या, जीर्ण झालेल्या चादरी काढून अंगावर लपेटून घेतात. थंडीपासून त्या कसा आणि किती बचाव करणार? काही जण मात्र निवांत झोपी गेलेत.
ड्रायव्हर महादेवने कानाला मफलर गुंडाळलाय आणि अंगात पूर्ण बाह्यांचा सदरा घातलाय. मध्यरात्री रस्त्यावर दिव्याचा पत्ता नाही, वळणावळणाच्या वाटेने तो ट्रॅक्टर घेऊन निघालाय. रात्रीचे ३.३० झालेत आणि त्याला जरा विश्रांती हवीये. “लई टेन्शन असतं डोक्याला,” तो सांगतो. “एक सेकंद पण डोळे मिटून चालत नाही. मी जिती माणसं भरून निघालोय.”
त्याला हायवेवर एक रिकामं खोपट दिसताच तो गाडी तिथेच थांबवतो. एक चादर काढतो, खोपटात जमिनीवर अंथरतो, आणि तीच अंगावर ओढून झोपी जातो. त्याचे बहुतेक सारे प्रवासी – लेकरं धरून सुमारे २४ जण – ट्रॉलीत झोपी गेलेत. एक दोन तासाने महादेव परत गाडी सुरू करून रस्त्याला लागतो.
खरं तर आधी मिळायचा तेवढा पैसा आता ऊसतोडीत मिळत नाही. पण हाताला निश्चित काम मिळणार याची हमी निकाळजेंसारख्या इतरांना दर वर्षी घरं सोडून तोडीला जाण्यासाठी पुरेशी आहे
बुधवार पहाट. शोभा, सत्यभान आणि इतर मंडळी जागी होतात. महादेवने उस्मानाबादच्या कळंब तालुक्यात एका तळ्यापाशी जरा वैराण माळ पाहून गाडी उभी केलीये. सगळे खाली उतरतात, रातभर अडचणीत बसून अंग आंबून गेलंय. सगळे दात घासतात आणि तोंड धुऊन घेतात. बाया झाडोरा पाहून प्रातर्विधी उरकून घेतात.
तासाभराने, सकाळी ८.३० च्या सुमारास येरमाळ्याला एका धाब्यापाशी गाडी नाश्त्यासाठी थांबते. ही मजुरांची नेहमीची नाश्त्याची जागा असणार कारण इथे इतरही ट्रॅक्टर-ट्रॉल्या नाश्त्यासाठी थांबलेल्या आहेत. पोहे खाता खाता बोडख्यापासून १२ किलोमीटरवर असणाऱ्या जोडहिंगणी गावचे ४८ वर्षीय शिवाजी निकाळजे सांगतात की ऊसतोडीचं काम दिवसेंदिवस कमी व्हायला लागलंय. निकाळजे गेली १५ वर्षं तोडीसाठी कर्नाटकात जातायत. “आम्हाला जोडप्यामागे ७५,००० उचल मिळते,” ते सांगतात. “तोडलेल्या एक टन ऊसामागे २२८ रुपये मिळतात. ठरलेला कालावधी संपला की मुकादम आम्ही किती ऊस तोडला ते मोजतात आणि त्यातून आमची उचल असते त्यात कमी जास्त काय ते हिशेब करतात.” ७५,००० रुपये कमवायचे असतील तर एका जोडप्याला ३३५ टन ऊस तोडावा लागतो.
निकाळजे त्यांची पत्नी आणि १५ वर्षाची मुलगी सरस्वती यांच्यासोबत तोडीला निघालेत. सरस्वती गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्याबरोबर जातीये. “मी सातवीत शाळा सोडली,” ती सांगते. “मी आई-वडलांबरोबर जाते, तेवढंच त्यांचं काम हलकं करता येतं. ते दिवसभर रानात ऊसतोडीचं काम करतात, मी सोबत असले की कसं निदान दिवसभर कष्टाचं काम केल्यानंतर परत चुलीपुढे तरी बसावं लागत नाही त्यांना.”
ट्रॅक्टर रस्त्याला लागतो आणि मग अर्चना दर वर्षीच्या या तोडीच्या कामाबद्दल माझ्याशी बोलतात. “आम्हाला स्वतःची जमीन नाही. आम्ही बोडख्यात आणि आसपासच्या गावांमध्ये रानानी मजुरी काम करतो. मला दिवसाला १०० रुपये तर त्यांना २०० रुपये रोज मिळतो. पण पाऊसमान असं विचित्र झालंय की शेतीत पण काय पुरेसं काम मिळेल असं सांगता येत नाही. गेल्या महिन्यात आमचे दोघांचे मिळून आम्ही फक्त १००० रुपये कमाई केली.” मग काय थोडे फार पैसे साठवलेले होते ते आणि “इकडून तिकडून” काही तरी करून त्यांनी कसं तरी भागवलं.
आजकाल ऊसतोडीतही पूर्वीइतकी कमाई होत नसली तरी किमान काम मिळण्याची हमी असते तेच निकाळजे आणि त्यांच्यासारख्या इतर कुटुंबांसाठी पुरेसं आहे. त्या भरोशावर ते घरदार सोडून चार-पाच महिने काम करायला तयार असतात. “मागल्या साली आमच्या हातात फक्त ४०,००० रुपये पडले कारण ऊस कारखान्यांकडे फारसं कामच नव्हतं,” अर्चना सांगतात. “काही वर्षांखाली आम्ही लाखभर कमविले होते. पाऊस कमी झाला की ऊस पण कमीच होतोय.”
थोड्याच वेळात आम्ही कुर्डूवाडीला पोचलो. सोलापूर जिल्ह्यातलं हे एक छोटं गाव आहे. आम्ही जेवणासाठी तिथे थांबलो. सगळे जण ट्रॅक्टरवरनं खाली उतरले. कपडे चुरगळलेले, केस विस्कटलेले आणि चेहऱ्यावर थकवा दिसू लागलेला.
सतरा वर्षांच्या आदिनाथ तिडकेची पावलं मात्र झपझप पडतायत. तो गेल्या दोन वर्षांपासून तोडीला जातोय पण यंदा पहिल्यांदाच त्याला त्याच्या चुलत्याइतकी मजुरी मिळणार. त्याचे चुलतेही त्याच्यासोबतच ट्रॅक्टरमध्ये आहेत. “गेल्या वर्षीपर्यंत मला टनामागे १९० रुपये मिळत होते,” तो सांगतो. “यंदा मला पण मोठ्या माणसांइतकीच मजुरी मिळणार बघा.”
कुर्डूवाडीतल्या त्या निवांत धाब्यावर आलेले हे प्रवासी सोबत बांधून आणलेली चटणी-भाकर काढतात सोबत फक्त डाळ मागवतात. “संध्याकाळी खायला दिवाळीचा लाडू-चिवडा बांधून घेतलाय,” शोभा सांगतात.
रात्री ८.३० वाजायच्या सुमारास ट्रॅक्टर सोलापूर जिल्ह्यातल्या तीर्थस्थळी, पंढरपूरला पोचतो, बीडहून १८० किमी. धाब्यावर रात्रीचं जेवण होतं. हवेतला गारवा जाणवायला लागतो. परत एकदा पिशव्यांमधनं मफलर, स्वेटर, ब्लँकेट बाहेर येतात.
गुरुवारी जवळ जवळ मध्यरात्र होता होता गाडी गोकाकच्या सतीश शुगर फॅक्टरीत पोचते. उसाने भरलेले बरेच ट्रक तिथे आधीच येऊन पोचलेत. “चला, आता कुठे थोडी निवांत झोप मिळेल,” सत्यभान म्हणतात. सगळे जण कारखान्याच्या जवळच जमिनीवर अंथरूण टाकतात. उद्या सकाळी मेहनतीची ऊसतोड सुरू होणार.