“बांका दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, अमरपूरचा गूळ आणि कटोरियाचं टसर रेशीम,” कटोरियाचे एक विणकर, अब्दुल सत्तार सांगतात. त्यांच्या मते आता दोन्हीला उतरती कळा लागली आहे.
अमरपूर तालुक्यातलं बल्लिकिटा कटोरियापासून तीन किलोमीटरवर आहे. बल्लिकिटाच्या वेशीवरचा गुळाचा कारखाना शोधणं फार काही अवघड नाही. उसाचा रस उकळत, करपत असतानाच वास, तुम्हाला बरोबर तिथे घेऊन जातो.
बिहारच्या बांका जिल्ह्यातला हा कारखाना सुमारे ४० वर्षांपूर्वी आपल्या वडलांनी म्हणजेच साधू सरण कापरींनी सुरू केल्याचं राजेश कुमार सांगतात. हा लहान कारखाना आहे, १२ ते १५ कामगार इथे काम करतात. दिवसभराच्या, सकाळी १० ते सूर्यास्तापर्यंत म्हणजेच साधारण ६ वाजेपर्यंतच्या कामाचे त्यांना २०० रुपये मिळतात. दर वर्षी कारखाना ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात सुरू असतो. डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे ऐन हंगाम.
“आता अमरपूरमध्ये १०-१२ गूळ कारखाने आहेत. पंधरा वर्षांपूर्वी हाच आकडा शंभरच्या जवळपास होता,” कारखान्याचे मालक, राजेश कुमार सांगतात. “बहुतेक कामगार बल्लिकिटा, बाजा, बैदा चाक आणि गोरगामा या आसपासच्या गावांमधून कामाला येतात”
कारखान्यातलं उसाचा रस काढणारं एकमेव यंत्र ४ वाजता बंद केलं जातं. त्यामुळे रसावर प्रक्रिया करायला पुरेसा वेळ मिळतो. कुमार सांगतात, “हे यंत्र या कारखान्याइतकंच जुनं आहे.” यंत्राच्या पलिकडे खोदलेल्या भूमीगत खड्ड्यांमध्ये उसाचा रस जमा केला जातो
६० वर्षांचे अक्षय लाल मंडल, चार फूट खोल खड्ड्यात उतरतात आणि तळाशी साठलेला रस बादल्यांमध्ये भरून घेतात. नंतर ते या बादल्या कारखान्याच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या रस उकळणाऱ्या खड्ड्यांपर्यंत घेऊन जातात. “मी कोलकात्यात लोहाराचं काम करायचो. आता वय झालंय. आलो गावाकडे. आता तीन वर्षांपासून इथे काम करतोय,” मंडल सांगतात. “माझ्यासारखे बरेच (माझ्या वयाचे, गावी परतलेले) इथे कामाला आहेत”
“रसाचे खड्डे आणि उकळणारे खड्डे यातली आजची ही माझी शेवटची खेप आहे,” मंडल सांगतात, ते थकलेले दिसतायत. “आम्ही कामं बदलत राहतो. सकाळच्या वेळात मी ऊसाचे भारे उतरून घ्यायचं काम केलं”
ऊसाचं पाचट आणि चोथा रस उकळण्यासाठी, भट्टीसाठी वापरला जातो. राजेंद्र पासवान, वय ४५, भट्टी पेटती ठेवण्यासाठी भट्टीत सतत पाचट घालत आहेत. “कारखान्याच्या मालकाचा स्वतःचा ऊस आहे” ते सांगतात, “त्याच्या जोरावरच कारखाना चालू आहे.” कारखान्याचे मालक राजेश कुमार माहिती देतात की स्थानिक पातळीवर ऊस लावणं परवडेनासं झाल्याने इतर कारखाने बंद पडले
या कारखान्यात रस उकळण्यासाठी तीन खड्डे केले आहेत. पहिल्यांदा रस उकळला जातो. त्याचा पाक व्हायला लागला की तो दुसऱ्या खड्ड्यात ओतला जातो. इथे तो अजून उकळला जातो. त्यातली मळी आणि फेस पाकावर यायला लागतात, ते लोखंडी सराट्याने काढले जातात आणि या रस उकळायच्या खड्ड्याशेजारी असलेल्या एका दुसऱ्या खड्ड्यात जमा केले जातात. तिसऱ्या खड्ड्यात पोचेपर्यंत रसाचं गुळात रुपांतर व्हायला सुरुवात झालेली असते
एका खड्ड्यातून दुसऱ्या खड्ड्यात पाक ओतण्यासाठी कामगार रस्सी बांधलेल्या, लाकडी दांडा अडकवलेल्या लोखंडी बादल्यांचा वापर करतात
शेवटची उकळी आली की घट्ट होत असलेला गुळाचा पाक छोट्या दगडी खळग्यांमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देतात. सुबोध पोतदार (उजवीकडे) पत्र्याच्या डब्यांमध्ये गुळाचा पाक ओतताना. “मी शेतकरी आहे. पण या कारखान्याचा मालक माझ्या गावचा (बल्लिकिटा) आहे. सध्या मजुरांचा तुटवडा आहे त्यामुळे त्याने मला कामाबद्दल विचारलं,” ते सांगतात
“मी पाकाची तार पाहतोय. त्यानंतर मी डबा बंद करून टाकणार,” रामचंद्र यादव माहिती देतात. इथून दोन किलोमीटरवर असलेल्या बाजा गावाहून ते कामाला येतात. त्यांनी या आधी इतर कारखान्यातही काम केलं आहे. त्यातले बरेचसे आता बंद झाले आहेत. त्यांच्या मते “आता कट्टीच (ऊस) मिळत नाही, तर कारखाने बंदच पडणार ना”
संध्याकाळ झालीये. कारखाना बंद व्हायची वेळ होत आलीये. बाजाचे ३८ वर्षांचे सुभाष यादव त्यांच्या बैलगाडीतून जवळच्या शेतांमधनं ऊसाची अखेरची खेप घेऊन येतात. “हे ऊस वाहण्याचं काम मी गेली कित्येक वर्षं करतोय,” ते सांगतात
कारखान्यात वाट पाहत थांबलेले कामगार गाडी आल्या आल्या झटक्यात ऊस आवारात उतरवून घेतात. हे काम उरकलं की ते आपापल्या गावी परततील
तोपर्यंत, दोन गायी ताज्या उसावर मजेत ताव मारत आहेत. त्या मालकाच्याच असल्याने – त्यांना असं काहीही करायची मुभा आहे
अनुवादः मेधा काळे