पुणे जिल्ह्याच्या कोळावड्यातल्या या दोघी वाफेवरच्या इंजिनवर मुंबईकडे धावणाऱ्या आगगाडीविषयी गातात, गाडीतला प्रवास आणि मोठ्या शहरातल्या जगण्याबद्दलच्या या ओव्या वाचा, ऐका

बाई आगीनगाडीचा, हिचा पितळंचा गळा
पितळंचा गळा, बोरीबंदर बाई, भाईखळा

या ओवीत ७२ वर्षीय राधाबाई सकपाळ वाफेचे आणि धुराचे लोट बाहेर फेकणाऱ्या आगागडीच्या चिमणीला ‘पितळंचा गळा’ म्हणतात. आणि हे लोटही अगदी तालात येतात, भका भका.

पुणे जिल्ह्यातल्या कोळावड्याल्या राधाबाई सकपाळ आणि राधाबाई उभे या दोघींनी या १३ ओव्या गायल्या आहेत. जात्यावर दळणं करत असताना या दोघी वाफेवर चालणारी आगगाडी, त्यातले प्रवासी, मुंबईपर्यंतचा प्रवास असं सगळं काही गातात. कामाच्या शोधात मुंबईला गेलेल्या लोकांचं जगणं कसं असतं याचंही वर्णन त्यांच्या ओव्यांमध्ये येतं.

गाडीत बसण्याआधी नवऱ्याला सोडचिठ्ठी मागणारी एक बाई एका ओवीत येते. कामासाठी मुंबईला गेल्यामुळे होणारी फारकत आणि त्याचा परिणाम तर नसेल हा? किंवा शहरात सकाळ ते रात्र कराव्या लागणाऱ्या मेहनतीचा परिणाम? किंवा मग बेईमान नवऱ्याबरोबर तिला संसारच करायचा नसेल?

गाडी सुरू होते आणि मग एका ओवीत एक जण सोबतच्या प्रवाशांना विचारते, ‘कंच्या डब्यात बाई माझा भाऊ’, पुढे ती विचारते, ‘कंच्या डब्यात माझं बाळ’. ती आपला भाऊ किंवा लेकाबरोबर, किंवा कदाचित दोघांबरोबर मुंबईला निघाली असावी. रेल्वेच्या घाई-गोंधळात आपल्या सोबतच्या नातेवाइकांबरोबर एखादीची चुकामूक कशी होते हेच या ओवीतून जाणवत राहतं.

PHOTO • Swadesha Sharma

“बाई आगीनगाडीचा धूर, निघतो बाई भकभका”

पुढच्या दोन ओव्यांमध्ये आगगाडीचं भन्नाट वर्णन येतं. ‘बाई आगीनगाडीचा धूर निघतो बाई काळा निळा’, ‘बाई आगीनगाडी कशी करती बाई आउबाउ’ अशा शब्दात ओव्यांमध्ये आगगाडीचं वर्णन करणाऱ्या या बायांच्या मनातलं आगगाडीच्या प्रवासाचं नवल, सोबतच्यांबरोबर झालेली ताटातूट त्यामुळे होत असलेली चलबिचल असं सगळं जाणवू लागतं.

मराठीमध्ये आगगाडी स्त्रीलिंगी शब्द आहे. प्रवासातला गोंधळ आणि या बाईची आणि तिच्या सोबतच्यांची ताटातूट याची कुठे तरी तुलना केली गेली असल्याचंही दिसून येतं.

बोरीबंदर (आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) बाईचं सासर आणि माहेर असल्याचं म्हटलं जातं. या शेवटच्या स्थानकात गाडी जराशी थांबते आणि प्रवासी उतरून जातात.

आता नवे प्रवासी गाडीत चढतात. त्यांना सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी न चुकता सोडत गाडी पुढे जात राहते. सकाळपासून रात्रीपर्यंत एक बाई घरी सगळी कामं कशी निमूटपणे करत असते तसंच काहीसं गाडीचं काम आहे.

PHOTO • Samyukta Shastri

राधाबाई सकपाळ आणि त्यांच्या सासूबाई (खाली बसलेल्या). मागच्या भिंतीवर असलेल्या तसबिरीत राधाबाईंचा दिवंगत नवरा आणि त्याची दुसरी बायको

दुसऱ्या एका ओवीत त्या गातात की आगगाडी तयार करण्यासाठी खूप सारं लोखंड वितळवलं असणार. आणि हे पाहून ‘जिला नाही लेक’ अशा एकीला नवलच वाटू लागलं. पितृसत्ताक समाजात एका बाईला कसा लढा द्यावा लागतो त्याचीच उदाहरणं या ओवीत आपल्याला दिसून येतात. लेकीला मोठं करून तिचं लग्न लावून देणं या सगळ्यासाठी पालकांना खूप खस्ता खाव्या लागतात. हे कष्ट नक्की काय असतात हे लेक असलेल्या बाईलाच समजू शकतं असा या ओवीचा अर्थ असावा.

एखादी बाई मुंबईला स्थलांतर करून गेल्यावर तिचं आयुष्य कसं असतं हे पुढच्या ओव्यांमध्ये येतं. तिच्या मनात असलेली धाकधूक, उत्साह सगळं काही यात येतं. “बाई ममईला जाया नार मोठी नटयली” असं गात पुढच्याच ओळीत “खंडाळ्याच्या बाई घाटामधी बाबाबये आठवली” असंही त्या गातात. पुढची वाट आपल्या आई-वडलांशिवाय किती खडतर आहे याचीच तिला जाणीव होत असल्याचा भाव या ओवीत आहे.

मुंबईला गेलेली ही मैत्रीण तिथे म्हावरं म्हणजे मच्छी खात नाही. गावी आल्यावर चिलाच्या भाजीसाठी ती वावरं धुंडत बसते इतकी गावाची आठवण तिला येते असं या ओवीत गायलं जातं.


मुंबईला गेल्यावर बाईचं आयुष्य कसं बदलून जातं ते पुढच्या ओवीत येतं. ती खानावळ चालवते. आणि तिच्याकडे जेवायला येणारेही बहुधा स्थलांतर करून आलेले पुरुषच असतात. मुंबईला गेल्यावर ती नीट वेणी-फणी करते. नवऱ्यापेक्षा खानावळीत येणारा तिचा धनी असावा असं तिचं वागणं बदलून जातं. मुंबईला गेल्यावर तिला चार घटका जमिनीवर टेकायला मिळत नाहीत, डोईला तेल लावायला तिच्यापाशी वेळ नाही. मुंबईला गेलेली नार नवऱ्यापेक्षा खानावळीत येणाऱ्यालाच जास्त जपते असा खोचक उल्लेखही ओवीत येतो.

PHOTO • Swadesha Sharma

भारतात आगगाड्यांची सुरुवात

आगगाडीचा आणि आयुष्य दोन्हीचा प्रवास व्यक्त करणाऱ्या या ओव्या ऐका

बाई आगीनगाडीचा, हिचा पितळंचा गळा
पितळंचा गळा, बोरीबंदर बाई, भाईखळा

बाई आगीनगाडीला हिची पितळीची पट्टी
पितळंची बाई पट्टी, नार मागती बाई सोडचिठ्ठी

बाई आगीनगाडीचा धूर, निघतो बाई भकभका
धूर निघतो भकभका, कंच्या डब्यात बाई माझा सखा

अशी आगीनगाडी हिचं बोरीबंदर बाई माहेयरु
बाई आता नं माझं बाळ, तिकीट काढून तयायरु

बाई आगीनगाडीचं, बोरीबंदर बाई सासयरु
बाई आता ना माझं बाळ,  तिकीट काढून हुशायरु

आगीनगाडी बाईला बहु लोखंड बाई आटयिलं
बाई जिला नाही लेक, तिला नवल बाई वाटयिलं

बाई आगीनगाडी कशी करती बाई आउबाउ
आता माझं बाळ, कंच्या डब्यात बाई माझा भाऊ

बाई आगीनगाडीचा धूर निघतो बाई काळा निळा
आत्ता ना बाई माझं बाळ, कंच्या डब्यात माझं बाळ

बाई ममईला जाया नार मोठी नटयली
खंडाळ्याच्या बाई घाटामधी बाबाबये आठवली

नार ममईला गेली नार, खाईना बाई म्हावयिरं
बाई चिलाच्या भाजीयिला, नार हिंडती बाई वावयिरं

नार ममईला गेली नार करिती बाई तेल-फणी
बाई नवऱ्यापरास खानावळी ना बाई तिचा धनी

नार ममईला गेली नार बसंना बाई भोईला
बाई खोबऱ्याचं तेल, तिच्या मिळंना बाई डोईला

नार ममईला गेली नार खाईना बाई चपायती
असं नवऱ्यापरास खाणावळ्याला बाई जपयती

PHOTO • Samyukta Shastri

कलाकारः राधाबाई सकपाळ, राधाबाई उभे

गाव: कोळवडे

वाडीः खडकवाडी

तालुकाः मुळशी

जिल्हाः पुणे

जातः मराठा

या ओव्या आणि माहिती ६ जानेवारी १९९६ रोजी रेकॉर्ड केली आहे. छायाचित्रं ३० एप्रिल २०१७ रोजी घेतली आहेत. राधाबाई उभेंची भेट घेता आली नाही.

पोस्टरः ऊर्जा

हेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या जात्यावरच्या ओव्या या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा.

नमिता वाईकर एक लेखक, अनुवादक, और पारी की मैनेजिंग एडिटर हैं. उन्होंने साल 2018 में ‘द लॉन्ग मार्च’ नामक उपन्यास भी लिखा है.

की अन्य स्टोरी नमिता वायकर
PARI GSP Team

पारी ग्राइंडमिल सॉन्ग्स प्रोजेक्ट टीम: आशा ओगाले (ट्रांसलेशन); बर्नार्ड बेल (डिजीटाइज़ेशन, डेटाबेस डिज़ाइन, डेवलपमेंट ऐंड मेंटेनेंस); जितेंद्र मैड (ट्रांसक्रिप्शन, ट्रांसलेशन असिस्टेंस); नमिता वाईकर (प्रोजेक्ट लीड ऐंड क्यूरेशन); रजनी खलदकर (डेटा एंट्री)

की अन्य स्टोरी PARI GSP Team
Illustrations : Swadesha Sharma

स्वदेशा शर्मा, पीपल्स आर्काइव ऑफ़ रूरल इंडिया में रिसर्चर और कॉन्टेंट एडिटर के रूप में कार्यरत हैं. वह स्वयंसेवकों के साथ मिलकर पारी लाइब्रेरी पर प्रकाशन के लिए संसाधनों का चयन करती हैं.

की अन्य स्टोरी Swadesha Sharma
Editor : Dipanjali Singh

दीपांजलि सिंह, पीपल्स आर्काइव ऑफ़ रूरल इंडिया में सहायक संपादक हैं. वह पारी लाइब्रेरी के लिए दस्तावेज़ों का शोध करती हैं और उन्हें सहेजने का काम भी करती हैं.

की अन्य स्टोरी Dipanjali Singh