आणि विजेता आहे... असं म्हटल्यावर जे काही घडतं, तसंच सगळं घडण्याच्या बेतात आहे. सहा पुरुषांचं एकमत झालंय की फणसाचा धंदा बायांचं काम नाही. वाहतूक म्हणा, वजनदार फळ उचलणं म्हणा, शक्यच नाही. या संभाषणानंतर पाचच मिनिटात लक्ष्मी दुकानात अवतरतात. पिवळी साडी, पिकत चाललेल्या केसाचा अंबाडा, नाका-कानात सोनं. “या धंद्यातली ही सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे बरं,” एक शेतकरी निवाडा देऊन टाकतो.

“आमच्या मालाचा भाव त्याच ठरवतात.”

पासष्ट वर्षांच्या ए. लक्ष्मी पनरुतीत फणसाचा व्यापार करणाऱ्या एकमेव महिला व्यापारी आहेत. आणि तितकंच नाही कृषी व्यापार क्षेत्रातल्या बऱ्याच अनुभवी व्यापाऱ्यांपैकीही त्या एक आहेत.

कडलूर जिल्ह्यातलं पनरुती हे गाव फणसासाठी प्रसिद्ध आहे. फळाच्या हंगामात इथे टनावारी फणसाची खरेदी विक्री होते. दर वर्षी पनरुतीतच्या मंडईतल्या २२ दुकानांमध्ये जे फळ विकलं जाईल त्याचा भाव लक्ष्मी ठरवतात. खरेदी करणाऱ्यांकडून त्यांना दर हजार रुपयांमागे ५० रुपये कमिशन मिळतं. शेतकरी पण त्यांच्या इच्छेनुसार त्यांना काही तरी देत असतात. त्यांच्या अदाजानुसार फणसाच्या हंगामात त्यांचं दिवसाचं उत्पन्न १,००० ते २,००० रुपये इतकं असतं.

पण हा पैसा हातात येतो कारण त्या दिवसाचे १२ तास काम करतात. आणि सुरुवात मध्यरात्री १ वाजता होते. “माल खूप जास्त असेल तर मला न्यायला व्यापारी पार मध्यरात्रीच घरी येतात,” लक्ष्मी सांगतात. रिक्षाने उशीरात उशीरा म्हणजे मध्यरात्री ३ वाजता त्या मंडीत पोचतात. त्यांचा कामाचा ‘दिवस’ दुपारी १ वाजेपर्यंत चालतो. त्यानंतर घरी जायचं, जेवायचं आणि निजायचं. ते परत एकदा रात्रीच्या अंधारात बाजारात जाईपर्यंत...

“फणस पिकतो कसा वगैरे मला फार काही माहित नाही,” त्या सांगतात. तासंतास बोलून, घसा ताणून ओरडून त्यांचा आवाज घोगरा झालाय. “पण तो विकायचा कसा ते मात्र मला थोडं फार माहित आहे.” थोडंफार? हा लक्ष्मींचा नम्रपणा. गेली तीस वर्षं त्या या धंद्यात आहेत आणि त्या आधीची २० वर्षं त्यांनी रेल्वेत फणस विकलाय.

Lakshmi engaged in business at a jackfruit mandi in Panruti. She is the only woman trading the fruit in this town in Tamil Nadu's Cuddalore district
PHOTO • M. Palani Kumar

पनरुतीच्या मंडईत लक्ष्मींचं काम सुरू आहे. तमिळ नाडूच्या कडलूरमध्ये फणसाच्या त्या एकमेव महिला व्यापारी आहेत

वयाच्या १२ व्या वर्षी त्यांचं फणसाशी नातं जुळलं. कारी वन्डीत म्हणजेच वाफेच्या इंजिनवर धावणाऱ्या पॅसेंजर गाड्यांमध्ये लहानगी लक्ष्मी फणसाचे गरे विकायची.  आज तीच वयाच्या ६५ व्या वर्षी स्वतःचं नाव असलेल्या लक्ष्मी विलास या घरात राहतीये.

आणि हे घर लक्ष्मींनी बांधलं ते सगळ्या फळांत सर्वात मोठं फळ असलेल्या फणसाच्या व्यापारातून.

*****

फणसाचा हंगाम जानेवारी-फेब्रुवारीत सुरू होतो आणि साधारणपणे सहा महिने चालतो. २०२१ साली ईशान्य मोसमी वाऱ्यांनी अवकाळी पाऊस आणला आणि फुलोरा धरायचं, फळ धरायचं चक्र आठ आठवड्यांनी पुढे गेलं. पनरुतीच्या मंडईत फळ आलं तेच मुळी एप्रिल महिन्यात. आणि ऑगस्टमध्ये हंगाम संपला देखील.

या भागात फणस ‘जॅक’ म्हणून ओळखला जातो. पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडच्या प्रांतातलं हे देशी फळ आहे. मल्याळम चक्का वरून नाव पडलं जॅक. त्याचं शास्त्रीय नाव आहे Artocarpus heterophyllus.

२०२२ साली एप्रिलमध्ये पारीतर्फे आम्ही पनरुतीच्या फणस व्यापारी आणि शेतकऱ्यांची भेट घेतली होती. चाळिशीचे आर. विजयकुमार फणसाचे शेतकरी आणि व्यापारी आहेत. त्यांनी त्यांच्या दुकानात आमचं स्वागत केलं. घट्ट चोपलेली मातीची जमीन, झापाचं छप्पर आणि भिंती असं साधंसुधं दुकान. त्यातल्या एका दुकानाचं भाडंच वर्षाला ५०,००० रुपये आहे. एक बाकडं आणि दोन-चार खुर्च्या म्हणजे चैन अशी गत.

पूर्वी कधी तरी झालेल्या सोहळ्याच्या कलाबुती लटकतयात, भिंतीवर हार घातलेली वडलांची तसबीर, एक टेबल आणि ढीगभर फणस. दारातल्या पहिल्या ढिगात १०० फळ असेल. छोट्याशा टेकाडासारखा वाटतो तो ढीग.

“२५,००० रुपयाचा माल आहे तो,” विजयकुमार सांगतात. शेवटचा ढीग दोन गिऱ्हाइकांनी विकत घेतलाय आणि चेन्नईच्या अड्यारला त्यातली ६० फळं चाललीयेत. त्याचे १८,००० रुपये येतील.

R. Vijaykumar, a farmer and commission agent, in his shop in Panruti, where heaps of jackfruit await buyers
PHOTO • M. Palani Kumar

आर. विजयकुमार शेतकरी आणि दलाल आहेत. पनरुतीच्या त्यांच्या दुकानात फणसाचे ढीगच्या ढीग गिऱ्हाइकाच्या प्रतीक्षेत

इथून १८५ किलोमीटरवर चेन्नईला फणस पाठवला जातो. तोही प्रेसच्या गाड्यांमधून. “तिथून अजून उत्तरेला पाठवायचा असला तर आम्ही टाटा एस ट्रकमधून माल पाठवतो. आमचे कामाचे तास विचारूच नका. फणसाच्या हंगामात आम्ही पहाटे ३-४ वाजता येतो ते रात्री १० वाजेपर्यंत इथेच असतो,” विजयकुमार सांगतात. “फणसाला फार मागणी आहे. सगळेच खातात ना. अगदी डायबेटिस असलेला माणूससुद्धा चार तरी गरे खातोच,” ते हसून म्हणतात. “आम्ही मात्र गरे खाऊन कंटाळून जातो, बघा.”

विजयकुमार सांगतात की पनरुतीमध्ये ठोक खरेदी-विक्री करणारी २२ दुकानं आहेत. त्यांच्या वडलांचं इथेच दुकान होतं. २५ वर्षं त्यांनी ते चालवलं. त्यांच्या मृत्यूनंतर गेली १५ वर्षं विजयकुमार दुकानाचं काम पाहतायत. प्रत्येक दुकानात दररोज सुमारे १० टन फळाचा धंदा होतो. “अख्ख्या तमिळ नाडूमध्ये पनरुती तालुक्यात सगळ्यात जास्त फणस पिकतो,” ते म्हणतात. आणि त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत बाकड्यावर बसलेले शेतकरी आणि विक्रेते माना डोलावतात.

वेष्टी आणि शर्ट अशा कपड्यातले हे सगळे जण एकमेकांना ओळखतात. आणि फक्त एकमेकांना नाही या धंद्यातल्या जवळपास सगळ्यांनाच. गप्पा जोरात सुरू असतात, फोनचे रिंगटोन त्याहून जोरात. आणि त्यावर कडी म्हणजे ट्रकचे आणि त्यांच्या हॉर्नचे कर्णकर्कश्श आवाज.

के. पट्टुसामी, वय ४७, फणसाची शेती करण्याचा आपला अनुभव सांगू लागतात. पनरुती तालुक्याच्या कट्टंडीकुप्पम गावात त्यांची ५० झाडं आहेत. इतर ६०० झाडं ते भाड्यावर घेतात. शेकडा झाडाला सव्वा लाख रुपये असा दर सुरू असल्याचं ते सांगतात. “मी गेली २५ वर्षं या धंद्यात आहे,” ते सांगतात. “कशाचीही शाश्वती नाही.”

किती पण फळ लागू द्या, ते पुढे म्हणतात, “दहा तरी सडणार, दहा फुटणार, दहा खाली पडणार आणि दहा-पाच प्राण्यांच्या तोंडी जाणार.”

फळं जास्त पिकली की त्याचे चारखंड गाई-गुरांना खायला होतात. सरासरी ५ ते १० टक्के फळ वाया जातं. म्हणजे फणसाचा हंगाम भरात असताना प्रत्येक दुकानामागे दररोज अर्धा ते एक टन. पण असं फळ फक्त गुरंच खाऊ शकतात असं शेतकऱ्यांचं म्हणणं पडलं.

Buying, selling, fetching and carrying of jackfruits at a mandi in Panruti
PHOTO • M. Palani Kumar

पनरुतीच्या मंडईत फणसाची आवक सुरू आहे, खरेदी-विक्री आणि इतर व्यवहारही

गाईगुरांप्रमाणे झाडंदेखील एक प्रकारची गुंतवणूकच असतात. गावाकडे झाडांचा विचार भागभांडवलासारखा केला जातो. मूल्य वाढतच जातं आणि विकल्यास नफा मिळण्याची देखील बऱ्यापैकी खात्री असते. विजयकुमार आणि त्यांचे साथीदार सांगतात की फणसाचा बुंधा रुंदीला आठ हात आणि उंचीला सात किंवा नऊ हात झाला की “त्याच्या लाकडाचेच ५०,००० रुपये येतात.”

शक्य होईल तोपर्यंत शेतकरी झाडावर कुऱ्हाड चालवत नाहीत, पट्टुसामी सांगतात. “आम्ही जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करतो. पण एकरकमी पैसा लागणार असेल, काही आजारपण आलं, घरात लग्न वगैरे असेल तर आम्ही थोडी फार झाडं लाकडासाठी विकून टाकतो.” अशा लाकडातून एक-दोन लाख रुपये हातात येतात. गरज भागते आणि 'कल्याणम' (लग्न) पार पडतं...

दुकानाच्या मागच्या बाजूस जात पट्टुसामी म्हणतात, “या, इथे या.” कधी काळी जिथे मोठमोठाले फणस वृक्ष होते, तिथे आता फक्त 'पाळ कन्नु' म्हणजेच बारकी झाडं दिसतायत. नड भागवायला मालकाने झाडं विकली. नंतर नवी लावली. “ही झाडं फक्त दोन वर्षांची आहेत,” बारीक, सरळसोट झाडांकडे निर्देश करत पट्टुसामी सांगतात. “काही वर्षांची झाल्यानंतर फणसाच्या झाडाला फळ लागतं.”

दर वर्षी हंगामातलं पहिलं फळ प्राण्यांच्या तोंडी जातं. “माकडं दाताने फळं फोडतात आणि मग हाताने आतले गरे खातात. खारींनाही फणस फार आवडतो.”

पट्टुसामी म्हणतात की झाडं भाड्याने देण्या-घेण्याचा सगळ्यांनाच फायदा होतो. “झाडाच्या मालकाला दर वर्षी एकरकमी पैसा मिळतो आणि परत इथे एका झाडाची, तिथे दुसऱ्या झाडाची फळं उतरवावी लागत नाहीत. परत बाजारात आणण्याची कटकट नाही. आणि माझ्यासारख्याला १००-२०० फळ एकत्र उतरवून मंडईत आणता येतं. माझ्याकडे चिक्कार झाडं आहेत, त्यामुळे बरं पडतं.” हवा-पाणी सगळं काही ठीक असलं, झाडं ठीकठाक असली, चांगलं फळ धरलं तर सगळ्यांचाच फायदा होतो.

पण, खेदाची बाब म्हणजे, सगळं काही ठीक असलं तरी शेतकरी आजही आपल्या मालाचा भाव ठरवू शकत नाही. तसं असतं तर भावात इतका मोठा चढ-उतार झालाच नसता. २०२२ साली फणसाच्या भावात टनामागे कधी १०,००० तर कधी त्याच्या तिप्पट ३०,००० इतका चढउतार झाला होता.

Vijaykumar (extreme left ) at his shop with farmers who have come to sell their jackfruits
PHOTO • M. Palani Kumar

विजयकुमार (सर्वात डावीकडे) फणस विकायला आलेल्या शेतकऱ्यांसोबत आपल्या दुकानात

“जेव्हा भाव चढा असतो तेव्हा असं वाटतं की बख्खळ पैसा आहे,” आपल्या लाकडी टेबलाच्या खणाकडे बोट दाखवत विजयकुमार म्हणतात. दोन्ही बाजूकडून त्यांना पाच टक्के कमिशन मिळतं. “पण एखाद्या गिऱ्हाइकानं गंडवलं की सगळंच पाण्यात. मग आम्हाला आमचेच खिसे इथे रिकामे करावे लागतात,” खणावर टिचक्या मारत ते म्हणतात. “शेतकऱ्याची भरपाई करावी लागते. शेवटी शब्द आमचाच असतो की नाही?”

एप्रिल २०२२ मध्ये फणस शेतकऱ्यांनी एक संगम, म्हणजेच समिती स्थापन केली. विजयकुमार त्याचे सचिव आहेत. “दहाच दिवस झालेत, अजून नोंदणीसुद्धा केलेली नाहीये,” ते सांगतात. या समितीकडून सगळ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. “आम्हाला भाव ठरवता येईल. जिल्हाधिकाऱ्याची भेट घेऊन शेतकऱ्याला, या उद्योगाला मदत करण्याची विनंती करता येईल. फळ पिकवणाऱ्याला काही ना काही लाभ मिळायला पाहिजे असं आमचं मत आहे. खास करून शीतगृहांची गरज आहे. कसंय, आम्ही संघटित झालो तरच आम्ही तिथे जाऊन आमच्या मागण्या मांडू शकतो, हो का नाही?”

सध्या जास्तीत जास्त पाच दिवस फणस टिकतो. “थोडा जास्त टिकला तर आम्हाला बरंय,” लक्ष्मी म्हणतात. सहा महिने टिकू शकला तर भारी होईल असं त्यांना वाटतं. विजयकुमार तीन महिन्यांवर खूश आहेत. सध्या फणस विकला गेला नाही तर काही दिवसांनी टाकून द्यावा लागतो किंवा किरकोळ विक्रेत्यांना विकावा लागतो. ते गरे काढून विकतात.

*****

“फणसासाठी शीतगृह हे सध्या मनातले इमले आहेत. तुम्ही बटाटा किंवा सफरचंद साठवू शकता. फणसावर असा काही प्रयोग आजवर झालेला नाही. फणसाचे तळलेले गरेसुद्धा हंगामानंतर एक दोन महिनेच मिळतात,” श्री पाद्रे सांगतात. ते अदिके पत्रिके या कृषी वार्तापत्राचे पत्रकार आणि संपादक आहेत.

“पण असं काही झालं ना तर सगळं चित्रच पालटून जाईल,” ते म्हणतात. “फणसाचे किमान दहा-बारा पदार्थ वर्षभर मिळू शकले तर...”

Lakshmi (on the chair) with a few women jackfruit sellers at a mandi ; she has been a jackfruit trader since 30 years
PHOTO • M. Palani Kumar

मंडईमध्ये लक्ष्मी (खुर्चीवर बसलेल्या) आणि इतर काही फणस विक्रेत्या महिला. लक्ष्मी गेल्या ३० वर्षांपासून फणसाच्या धंद्यात आहेत

फणसाच्या शेतीसंबंधी किती तरी मोलाची माहिती श्री पाद्रे यांच्याकडून पारीला मिळाली. फोनवर झालेल्या या संभाषणात सुरुवातीलाच ते सांगतात की फणसाबद्दल फारशी आकडेवारीच उपलब्ध नाहीये. “आकड्यांचा काय अर्थ लावायचा ते स्पष्ट नाही आणि गोंधळच जास्त उडतो. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत फणसाकडे फार कुणाचं लक्ष नव्हत. पनरुती हा अपवाद आहे, आणि तोही अगदी विलक्षण.”

पाद्रे सांगतात की अख्ख्या जगात फणसाच्या उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. “फणसाची झाडं तुम्हाला सगळीकडे दिसतील पण मूल्यवर्धनाचा विचार केला तर जागतिक नकाशावर आपण कुठेही नाही.” देशाचा विचार केला तर केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात फणसावर पुढे काही तर प्रक्रिया होते पण तमिळ नाडूमध्ये अजूनही त्यावर फारसं काम झालेलं नाहीये.

आणि ही अगदी लाजिरवाणी गोष्ट आहे, पाद्रे म्हणतात. “फणसावर इतकं तोकडं संशोधन झालंय. एका मोठ्या झाडाला एक ते तीन टन फळ लागतं.” फळाशिवाय इतर पाच प्रकारचा माल तयार होत असतो – कच्चा फणस. त्यानंतर भाजीसाठी वापरता येईल असा कोवळा फणस. त्यानंतर पापड आणि गरे करतात, तो. मग पिकलेले गरे आणि आठळ्या.

“याला ‘सुपरफूड’ म्हणतात ते उगाच नाही,” ते सांगतात. “आणि तरीही, त्यासाठी एकही संशोधन केंद्र नाही, प्रशिक्षण केंद्र नाही. फणस शास्त्रज्ञ नाहीत ना तज्ज्ञ. केळी, बटाट्याबद्दल असं सगळं होतं का नाही?”

आणि हीच कमतरता भरून काढण्याचा ते प्रयत्न करतायत. “गेल्या १५ वर्षांपासून मी फणसाबद्दल लिहितोय, माहिती देतोय, लोकांना त्यातून काही करण्याची प्रेरणा मिळेल असा माझा प्रयत्न सुरू आहे. आणि पंधरा वर्षं म्हणजे आमचं अदिके पत्रिके सुरू झालं [३४ वर्षांपूर्वी] तेव्हापासूनचा निम्मा काळच म्हणा ना. आतापर्यंत आम्ही फक्त फणसावरच ३४ मुख्य कथा केल्या आहेत.”

With their distinctive shape, smell and structure, jackfruits are a sight to behold but not very easy to fetch, carry and transport
PHOTO • M. Palani Kumar

अगडबंब आकार, सुगंध आणि आतले गरे या सगळ्यामुळे फणस हे फार आकर्षक फळ आहे. पण वाहतुकीला  तितकंच अवघड

Jackfruit trading involves uncertainties. Even if the harvest is big, some fruits will rot, crack open, fall down and even get eaten by  animals
PHOTO • M. Palani Kumar

फणसाच्या व्यापारात कशाचीच शाश्वती नाही. कितीही फळ लागलं तरी काही सडणार, काही फुटणार, खाली पडणार आणि जनावरांच्या तोंडी जाणार

फणसाच्या अनेक यशोगाथा पाद्रे सांगतात. गप्पांच्या ओघात फणसाच्या स्वादिष्ट आइसक्रीमचाही उल्लेख त्यांच्या बोलण्यात येतो. पण ते अडचणींकडे काणाडोळा करत नाहीत. “जर काही तरी करून दाखवायचं असेल तर सुरुवात शीतगृहांपासून होते. आणि पहिलं प्राधान्य म्हणजे पिकलेला फणस गोठवून किंवा फ्रोझन स्वरुपात वर्षभर मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. आता हे अशक्य कोटीतलं काही नाही. पण आपण अजून त्या दिशेने काहीच प्रयत्न सुरू केलेले नाहीत.”

त्यात या फळाबद्दल एक अडचण म्हणजे बाहेरून आतला गरा कसा आहे हे अजिबात समजत नाही. पनरुतीमध्ये लोक आवर्जून फणस पिकवतायत, आणि या फळासाठी खात्रीशीर बाजारपेठ देखील आहे. इतर ठिकाणी मात्र ही परिस्थिती नाहीये. शेतकऱ्यांना मदतकारक होतील अशा पुरवठा साखळ्या देखील नाहीत. आणि त्यामुळे खूप सारं फळ वाया जातं.

फळ वाया जाऊ नये म्हणून आपण काही तरी केलं आहे का, पाद्रे विचारतात. “हे देखील अन्नच आहे की नाही? आपण फक्त गहू आणि तांदळालाच इतकं जास्त महत्त्व का देतो?”

धंदा वाढीला लागायचा असेल तर पनरुतीचा फणस सगळीकडे पोचला पाहिजे – प्रत्येक राज्यात, प्रत्येक देशात. विजयकुमार सांगतात. “त्याला अधिक प्रसिद्धी मिळायला पाहिजे. तरच चांगला भाव पण मिळेल,” ते म्हणतात.

चेन्नईच्या कोयाम्बेडु ठोक बाजार समितीतल्या फणस व्यापाऱ्यांचीही मागणी अशाच स्वरुपाची आहे. बाजारसमितीत शीतगृहाची सोय पाहिजे. इथल्या व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी असणारे सी. कुमारवेल म्हणतात की फळाच्या किंमतीत प्रचंड तफावत आहे. १०० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत.

“कोयाम्बेडुमध्ये आम्ही फळांचे सौदे करतो. जेव्हा फळाची आवक जास्त असते तेव्हा भाव पडतात आणि बराचसा माल वाया देखील जातो. अगदी ५ ते १० टक्के इतका. आम्हाला फणस साठवून नंतर विकता आला असता तर शेतकऱ्यालाही बरा भाव मिळू शकतो.” कुमारवेल यांच्या अंदाजानुसार इथल्या दहा दुकानांना दर दिवशी प्रत्येकी ५०,००० रुपयांचा धंदा होतो. “पण हे फक्त फणसाच्या हंगामकाळात – वर्षातले पाच महिने.”

Jackfruits from Panruti are sent all over Tamil Nadu, and some go all the way to Mumbai
PHOTO • M. Palani Kumar

पनरुतीचे फणस अख्ख्या तमिळ नाडूमध्ये पोचतात, आणि काही तर थेट मुंबईला

Absence of farmer-friendly supply chains and proper cold storage facilities lead to plenty of wastage
PHOTO • M. Palani Kumar

शेतकरी-स्नेही पुरवठा साखळी आणि योग्य शीतगृहांचा अभाव या दोन्ही कारणांमुळे बराचसा माल वाया जातो

तमिळनाडू कृषी व शेतकरी कल्याण विभागाने तयार केलेल्या २०२२-२३ साठीच्या धोरणात्मक टिपणामध्ये फणस पिकवणारे शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी आशेचा किरण दिसतो. त्यात म्हटलं आहे की “केवळ फणसासाठी एक विशेष केंद्र कडलुर जिल्ह्याच्या पनरुती तालुक्यात पणिकनकुप्पम इथे उभारलं जाईल. फणसाची लागवड आणि प्रक्रिया या दोन्ही क्षेत्रात असलेल्या संधींचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी रु. पाच कोटी इतका निधी वर्ग करण्यात आला आहे.”

शिवाय पनरुतीच्या फणसाला भौगोलिक चिन्हांकन (जीआय टॅग) मिळावा यासाठीही प्रयत्न सुरू असून असं चिन्हांकन मिळाल्यास “जागतिक बाजारात जास्त मूल्य मिळू शकेल.”

लक्ष्मींना मात्र एका गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटत राहतं. “किती तरी लोकांना अजूनही पनरुती माहितही नाहीये.” त्या सांगतात की २००२ साली आलेल्या सोल्ल 'मारंद कदई' (विस्मृतीत गेलेली गोष्ट) या सिनेमामुळे त्यांचं गाव परत एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलं. “दिग्दर्शक तंकर बाचन याच भागातला आहे. मी देखील आहे त्या सिनेमात,” त्या अगदी अभिमानाने सांगतात. “शूटिंगच्या वेळी भयंकर उकाडा होता, पण मजा आली.”

*****

फणसाच्या हंगामात लक्ष्मींना क्षणाचीही उसंत नसते. फणसप्रेमी लोकांचे फोन सतत सुरू असतात. सगळ्यात चांगलं फळ त्याच मिळवून देणार याची त्यांना खात्री असते.

आणि ते खरंच आहे. पनरुतीतल्या २० मंडयांमध्ये लक्ष्मींचा राबता असतो आणि इथे फणस आणणाऱ्या अनेक शेतकऱ्यांशी त्यांची ओळख आहे. अनेकदा त्यांचं फळ बाजारात कधी येणार हे देखील लक्ष्मींना माहित असतं.

पण हे सगळं त्या कसं काय करतात? लक्ष्मी काहीच उत्तर देत नाहीत. पण अगदी सरळ आहे – गेली अनेक वर्षं त्या इथे बाजारात आहेत. हे सगळं माहित असणं क्रमप्राप्त आहे. आणि त्यांना ते सगळं माहित आहे देखील.

पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात त्या आल्या तरी कशा? या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांनी दिलं. “तुमच्यासारखे लोक त्यांच्यासाठी फणस विकत घ्यायला सांगतात. आणि मी त्यांना बऱ्या भावाला फणस मिळवून देते.” पण व्यापाऱ्याचं नुकसान होणार नाही याची देखील त्या काळजी घेतात. आणि खरंच व्यापारी आणि शेतकरी दोघंही त्यांच्या निर्णयाचा मान राखतात. त्यांच्यासाठी दुकानाची दारं उघडी असतात आणि कौतुकाचे चार शब्दही सगळ्यांकडून ऐकायला मिळतात.

Lakshmi sets the price for thousands of kilos of jackfruit every year. She is one of the very few senior women traders in any agribusiness
PHOTO • M. Palani Kumar

दर वर्षी लक्ष्मी टनावारी फणसांचा भाव ठरवतात. या कृषी-व्यवसायात काम करणाऱ्या मोजक्या महिला व्यापाऱ्यांपैकी त्या एक आहेत

त्या राहतात त्या परिसरात प्रत्येकालाच त्यांचं घर माहित आहे. “फार काही नाही. माझा एक 'सिल्लरई व्यापारम' (छोटासा धंदा) आहे. मी सगळ्यांनाच चांगला भाव मिळवून देते,” त्या म्हणतात.

मंडईत फणसाची आवक सुरू असते. लक्ष्मी भाव ठरवण्याआधी फणस कसा आहे ते जोखून पाहतात. दोन-तीन थापटा मारून त्या सांगू शकतात की फळ पिकलंय का वेळ आहे, दुसऱ्या दिवशी फोडून खाता येईल का नाही ते. आणि आपल्या आडाख्याबद्दल जरा जरी शंका असली तर त्या एक छोटा काप देतात आणि आतला एक गरा काढून पाहतात. फणस कसा आहे ठरवण्याची ही सगळ्यात अचूक पद्धत असली तरी त्याचा फारसा वापर केला जात नाही. फळाला भोक पडतं, म्हणून ती टाळतात.

“गेल्या वर्षी एवढ्याच आकाराचा फणस १२० रुपयांना गेला होता. आणि आज त्याचा भाव २५० रुपये झालाय. यंदाचा पाऊस आणि त्यामुळे फळाचं मोठं नुकसान झालंय. म्हणून भाव चढलेत.” अजून दोन महिन्याभरात (जून) त्यांच्या अदाजानुसार प्रत्येक दुकानात १५ टन फळ असेल. आणि मग भाव कोसळतील.

लक्ष्मी सांगतात की त्या या धंद्यात आल्या तेव्हापेक्षा आता त्याचा व्याप खूप वाढला आहे. झाडांची, फळांची संख्या कित्येक पटींनी वाढलीये. धंदाही. शेतकरी मात्र अजूनही त्यांचा माल ठरलेल्या कमिशन एजंटकडे आणतात. निष्ठा हा एक भाग. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एजंट त्यांना गरजेप्रमाणे कर्ज देत असतो. लक्ष्मी सांगतात की शेतकरी अगदी दहा हजारांपासून एक लाखापर्यंत कर्ज घेतात आणि मालाच्या विक्रीतून ‘अडजस्ट’ करतात.

त्यांचा मुलगा रघुनाथ आणखी एक पैलू जोडतो. “ज्यांच्याकडे मोठी वाडी आहे ते शेतकरी आजकाल फणस विकत नाहीयेत. चार पैसे जास्त मिळावेत यासाठी ते आता मूल्य वर्धन करू पाहतायत.” फणसाचे तळलेले गरे, पिकलेल्या फणसाचा जॅम, वगैरे, ते सांगतात. शिवाय कोवळा फणस शिजवून मटणाला पर्याय म्हणूनही वापरला जातो.

“गरे सुकवून नंतर त्याची भुकटी करणारे कारखाने देखील आहेत,” रघुनाथ सांगतात. ही भुकटी दुधात उकळून त्याची खीर केली जाते. या पदार्थांना अजून फळाइतकी मागणी नाही मात्र त्यात वाढ होईल असा त्यांना विश्वास आहे.

Lakshmi is in great demand during the season because people know she sources the best fruit
PHOTO • M. Palani Kumar

फणसाच्या हंगामात लक्ष्मींना बिलकुल उसंत नसते कारण त्या सगळ्यात चांगलं फळ आपल्याला मिळवून देणार अशी सगळ्यांचीच खात्री असते

लक्ष्मी यांनी आपलं घर फणसाच्या धंद्यातून आलेल्या पैशातून बांधलंय.

“वीस वर्षं झाली,” बोटांनी घराच्या जमिनीला स्पर्श करत लक्ष्मी म्हणतात. मात्र घराचं काम पूर्ण होण्याआधीच त्यांचे पती वारले. कडलुरहून पनरुतीला रेल्वेमध्ये त्या फणस विकायच्या आणि पनरुतीत त्यांच्या नवऱ्याची चहाची टपरी होती. तिथेच त्यांची भेट झाली.

त्यांचा प्रेमविवाह. भिंतीवरच्या सुंदर तसबिरींमधून ते प्रेम आजही व्यक्त होत राहतं. पनरुतीहून एका चित्रकाराला खास बोलावून त्यांनी ही चित्रं काढून घेतली आहेत. त्यांच्या पतीच्या चित्राला ७,००० रुपये आणि त्यांच्या दोघांच्या चित्राला ६,००० रुपये खर्च आला होता. त्या मला किती तरी कहाण्या सांगतात. घोगऱ्या पण जोरकस आवाजात. त्यांच्या कुत्र्याबद्दल त्या म्हणतातः “एकदम हुशार, एकनिष्ठ होता तो. फार आठवण येते त्याची.”

दुपारचे दोन वाजायला आलेत. लक्ष्मींनी अजून काहीही खाल्लेलं नाही. खाईन जराशानं असं म्हणत त्या बोलत राहतात. फणसाच्या हंगामात त्यांना घरचं काहीही पहायला वेळ नसतो. त्यांची सून कायलविळी सगळं काही पाहते.

त्या दोघी मला फणसाचं काय काय करतात ते सविस्तर सांगतात. “आठळ्यांचा आम्ही उपमा करतो. कच्च्या गराची साल काढायची, हळदीच्या पाण्यात ते उकडायचे. खलबत्त्यात थोडे ठेचून घ्यायचे. उडदाच्या डाळीची फोडणी करायची. वरून ओलं खोबरं पेरायचं. गरा जरा पिठुळ असेल तर थोड्याशा तेलात परतून लाल तिखट घालून खायचा.” आठळ्या सांबारमध्ये देखील घालतात. आणि कच्च्या गऱ्यांची बिर्याणी करतात. लक्ष्मी म्हणतात की फणसाचे सगळेच पदार्थ एकदम “अरुमई” (भारी) आणि “टेस्टी” असतात.

लक्ष्मींचे खायचे तसे काहीच चोचले नाहीत. त्या चहा पितात आणि जवळच्याच खानावळीत जेवतात. त्यांना “प्रेशर आणि शुगर”, रक्तदाब आणि मधुमेह आहे. “मला वेळेवर खायला लागतं नाही तर मला गरगरतं.” त्या दिवशी सकाळी विजयकुमार यांच्या दुकानातच त्यांना चक्कर आल्यासारखं झालं म्हणून त्या लवकर घरी निघून आल्या होत्या. काम असलं की त्यांना तासंतास उभं रहावं लागतं. पण त्याचं लक्ष्मींना फार काही वाटत नाही. “काहीच त्रास नाही.”

Lakshmi standing in Lakshmi Vilas, the house she built by selling and trading jackfruits. On the wall is the painting of her and her husband that she had commissioned
PHOTO • Aparna Karthikeyan
In a rare moment during the high season, Lakshmi sits on her sofa to rest after a long day at the mandi
PHOTO • Aparna Karthikeyan

डावीकडेः फणसाच्या धंद्यातून आलेल्या पैशातून बांधलेल्या लक्ष्मी विलास या आपल्या घरी उभ्या असलेल्या लक्ष्मी. त्यांचं आणि त्यांच्या नवऱ्याचं हे चित्र त्यांनी खास चित्रकार बोलावून काढून घेतलंय. उजवीकडेः फणसाच्या हंगामातले काही दुर्मिळ क्षण – लक्ष्मी घरी सोफ्यावर निवांत बसून आराम करतायत

तीस वर्षांपूर्वी लक्ष्मी रेल्वेत फणस विकायच्या त्या काळी फणस १० रुपयांना विकला जायचा. (आज या किमतीत २० ते ३० पटीने वाढ झाली आहे.) लक्ष्मी सांगतात की तेव्हा रेल्वेचे डबे अगदी पेटीसारखे असायचे. एक अलिखित नियम असायचा. एका वेळी एकच विक्रेता डब्यात जायचा. तो किंवा ती बाहेर आली की दुसरा आत जायचा. “तिकिट तपासनीस काही आम्हाला तिकिट किंवा भाड्यावरून त्रास द्यायचे नाहीत. आम्ही फुकट प्रवास करायचो,” त्या सांगतात. “आम्ही त्यांना फणस द्यायचो ना थोडा...” दबक्या आवाजात लक्ष्मी म्हणतात.

त्या पॅसेंजर गाड्या असायच्या. संथ जायच्या आणि सगळ्या छोट्या मोठ्या स्थानकांवर थांबायच्या. चढणारे, उतरणारे प्रवासी फणस विकत घ्यायचे. पण कमाई फार नसायची. तेव्हा दिवसाला किती कमाई व्हायची ते काही त्यांना धड सांगता येत नाही पण त्या म्हणतात, “१०० रुपये म्हणजे तेव्हा फार मोठी रक्कम होती.”

“मी कधीच शाळेत गेले नाही. मी लहान असतानाच माझे आई-वडील मरण पावले.” पोटासाठी म्हणून त्या वेगवेगळ्या रेल्वेत फणस विकायच्या. चिदंबरम, कडलुर, चेंगलपेट, विल्लुपुरम. “जेवण म्हणजे रेल्वे स्टेशनवरच्या कॅन्टीनमधून दहीभात किंवा चिंचेचा भात घ्यायचे. गरज पडली तर डब्यातल्या संडासात जायचं. तेव्हा सामानाच्या फडताळात फणसाची पाटी ठेवून जायचे. फार कष्ट काढले तेव्हा. पण काय पर्याय होता?”

पण आज त्यांच्याकडे हे स्वातंत्र्य आहे. फणसाचा हंगाम संपला की त्या निवांत घरी बसून आराम करतात. “मी चेन्नईला जाते. कधी याच्याकडे, कधी त्याच्याकडे असं नातेवाइकांकडे दहा-पंधरा दिवस रहायतं. आणि बाकीचा वेळ मी इथे सर्वेशबरोबर - माझ्या नातवाबरोबर घालवते.” तिथे जवळच सर्वेश खेळत होता. लक्ष्मी हसून त्याच्याकडे पाहत सांगतात.

कायलविळी सांगू लागते, “त्या त्यांच्या सगळ्या नातेवाइकांना मदत करत असतात. त्यांच्यासाठी दागिने आणतात. कुणी कधी काही मागितलंय आणि यांनी नाही म्हटलंय असं होतच नाही...”

लक्ष्मींनी मात्र या कामाला सुरुवात केली तेव्हा अनेकांचे नकार पचवले असणार. पण त्यांनी फक्त स्वतःच्या कष्टांच्या जोरावर, त्यांच्याच शब्दात सांगायचं तर “सोंद उळइप्पु” वर स्वतःच्या आयुष्याचा कायापालट केला आहे. त्यांची गोष्ट फणसाच्या गऱ्यासारखी आहे. गोड लागेल असं वाटत नाही. पण गोड गऱ्याची चव मात्र जिभेवर कायमची तरळत राहते.

या संशोधन कार्यास अझीम प्रेमजी युनिवर्सिटीच्या २०२० सालच्या रिसर्च फंडिंग प्रोग्रामअंतर्गत अर्थसहाय्य मिळाले आहे.

शीर्षक छायाचित्रः एम. पलानी कुमार

अनुवादः मेधा काळे

Aparna Karthikeyan

अपर्णा कार्तिकेयन एक स्वतंत्र पत्रकार, लेखक, और पारी की सीनियर फ़ेलो हैं. उनकी नॉन-फिक्शन श्रेणी की किताब 'नाइन रुपीज़ एन आवर', तमिलनाडु में लुप्त होती आजीविकाओं का दस्तावेज़ है. उन्होंने बच्चों के लिए पांच किताबें लिखी हैं. अपर्णा, चेन्नई में परिवार और अपने कुत्तों के साथ रहती हैं.

की अन्य स्टोरी अपर्णा कार्तिकेयन
Photographs : M. Palani Kumar

एम. पलनी कुमार पीपल्स आर्काइव ऑफ़ रूरल इंडिया के स्टाफ़ फोटोग्राफर हैं. वह अपनी फ़ोटोग्राफ़ी के माध्यम से मेहनतकश महिलाओं और शोषित समुदायों के जीवन को रेखांकित करने में दिलचस्पी रखते हैं. पलनी को साल 2021 का एम्प्लीफ़ाई ग्रांट और 2020 का सम्यक दृष्टि तथा फ़ोटो साउथ एशिया ग्रांट मिल चुका है. साल 2022 में उन्हें पहले दयानिता सिंह-पारी डॉक्यूमेंट्री फ़ोटोग्राफी पुरस्कार से नवाज़ा गया था. पलनी फ़िल्म-निर्माता दिव्य भारती की तमिल डॉक्यूमेंट्री ‘ककूस (शौचालय)' के सिनेमेटोग्राफ़र भी थे. यह डॉक्यूमेंट्री तमिलनाडु में हाथ से मैला साफ़ करने की प्रथा को उजागर करने के उद्देश्य से बनाई गई थी.

की अन्य स्टोरी M. Palani Kumar
Editor : P. Sainath

पी. साईनाथ, पीपल्स ऑर्काइव ऑफ़ रूरल इंडिया के संस्थापक संपादक हैं. वह दशकों से ग्रामीण भारत की समस्याओं की रिपोर्टिंग करते रहे हैं और उन्होंने ‘एवरीबडी लव्स अ गुड ड्रॉट’ तथा 'द लास्ट हीरोज़: फ़ुट सोल्ज़र्स ऑफ़ इंडियन फ़्रीडम' नामक किताबें भी लिखी हैं.

की अन्य स्टोरी पी. साईनाथ