दिल्लीच्या मयूर विहार फेज १ च्या जवळच असणाऱ्या चिल्ला खदर या शहरी गावात सायकल रिक्षा चालवणारी, घरकाम करणारी, रस्ते झाडणारी आणि मंडईत भाजी विकणारी अनेक कुटुंबं वास्तव्याला आहेत. जनरेटर आणि विंधनविहिरींच्या भरोशावर त्यांचं आयुष्य चालू आहे. काही रहिवाशांचं म्हणणं आहे की सरकारने अजून त्यांना वीज आणि पाणी पुरवलेलं नाही. लहानगी मुलं खुल्या आभाळाखाली भरणाऱ्या किंवा गवताने शाकारलेल्या झोपड्यांमध्ये भरणाऱ्या तात्पुरत्या शाळांमध्ये जातात कारण सरकारी शाळा लांब आहे आणि पक्की सडक नसल्याने तिथे पोचणंही तसं मुश्किलच.
त्यांचं स्वतःचं जिणं हलाखीचं असलं तरी त्यांच्यातले बरेच जण दिल्लीत आज आणि उद्या होणाऱ्या मोर्चाला समर्थन द्यायला जमले आहेत. भारतभरातले शेतकरी आणि शेतमजूर शेतीवरच्या अरिष्टावर चर्चा करण्यासाठी संसदेचं २१ दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं ही मागणी घेऊन दिल्लीत मोर्चा काढणार आहेत. चिल्ला खदरचे लोक नक्की काय म्हणतायत, ते ऐका.
अनुवादः मेधा काळे