"हा एक भन्नाट आणि अप्रतिम प्रकल्प आहे"
- नेवील रॉय सिंघम, अध्यक्ष, ThoughtWorks Inc.
"झपाटलेपणात निश्चितच एक आनंद आहे, तो केवळ त्या वेड्यालाच ठाऊक"
- द स्पॅनिश फ्रायर (१६८१) मधील जॉन ड्रायडेन
ग्रामीण भारत — एक जिवंत दैनंदिनी, एका संग्रहाचा श्वास
दैनंदिन लोकांची दैनंदिन आयुष्ये
पी. साईनाथ
एखादा प्रकल्प कधीही पूर्ण न होणे, हा त्या प्रकल्पाच्या यशाचा मापदंड ठरू शकतो का? होय, जर तो जगातील सर्वांत व्यामिश्र आणि गुंतागुंतीच्या ग्रामीण प्रदेशातील जिवंत संग्रह असेल तर. ग्रामीण भारत हा अनेक अर्थाने या ग्रहावरील सर्वांत व्यामिश्र भाग आहे. ग्रामीण भारताच्या या ८३३ दशलक्ष लोकांमध्ये ७०० हून अधिक भाषा बोलणारे विभिन्न समाज आहेत. त्यातील काही भाषा तर हजारो वर्षे जुन्या आहेत. पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया नुसार संपूर्ण देशात ७८० भाषा बोलल्या जातात आणि ८६ वेगवेगळ्या लिपी वापरल्या जातात. परंतु, इयत्ता ७ वी पर्यंतच्या शैक्षणिक तरतुदीसाठी, त्या ७८० भाषांपैकी केवळ ४% भाषांमध्येच शिक्षण असल्याचे दिसून येते.
भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात २२ भाषांची यादी आहे, ज्यांच्या विकासासाठी प्रोत्साहन देणे केंद्र सरकारसाठी अनिवार्य आहे. तरिही, अशीही काही राज्ये आहेत ज्यांच्या अधिकृत भाषा त्या २२ भाषांच्या यादीत येत नाहीत, जसे मेघालय राज्याच्या खासी आणि गारो या भाषा. सहा भारतीय भाषांपैकी प्रत्येक भाषा बोलणारे ५० दशलक्ष किंवा त्याहून अधिक आहेत. तीन भाषा ह्या ८० दशलक्षाहून अधिक लोक बोलतात. एक भाषा तर जवळ जवळ ५०० दशलक्ष लोक बोलतात. त्याचवेळी, दुसरीकडे अनन्य आदिवासी भाषा बोलणारे ४,००० इतकी कमी लोकसंख्याही आहे, काही तर त्याहूनही कमी. पूर्वेकडील एकट्या ओडिशातच काही ४४ आदिवासी भाषा आहेत. पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया नुसार गेल्या ५० वर्षांत जवळ जवळ २२० भाषांचे अस्तित्व संपलेले आहे. त्रिपुरातील 'सैमार' भाषेचे आता फक्त सात भाषिक आहेत. बहुतेक भारतीय भाषिक हे ग्रामीण आहेत.
हीच विविधतेची वैशिष्ट्ये ग्रामीण भारतातील व्यवसाय, कला आणि हस्तकला, संस्कृती, साहित्य, दंतकथा, वाहतूक यांबाबतीतही दिसून येतात. भारताच्या ग्रामीण भागात झपाट्याने, अतिशय त्रासदायक असे बदल घडत असल्याने, ह्या वैशिष्ट्यांपैकी आता बरीच वैशिष्ट्ये नाहीशी होत आहेत, ज्यामुळे आपण अधिकच गरीब झालेलो आहोत. उदाहरणार्थ, विणकामाच्या जेवढ्या पद्धती, शैली आणि घराणी भारतात आहेत त्या कदाचित इतर कोठेही आढळणार नाहीत. यातील बरेच पारंपारिक विणकाम समुदाय कोलमडले आहेत, ज्यामुळे जग उत्तमोत्तम कलेला मुकले आहे. काही खास व्यवसाय - व्यावसायिक कथाकार, महाकाव्याचे गायक - हेही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
याव्यतिरिक्त असेही काही व्यवसाय आहेत जे केवळ काही देशांनाच ठाऊक आहेत. जसे दररोज ५० ताडाची झाडे चढणारे ताडी कामगार. हंगामात प्रत्येक झाड तीनदा चढणारेही! खजुरीपासून ते ताडाचा गूळ किंवा ताडी बनवतात. हंगाम जोरात चालू असताना, ताडी कामगार एका दिवसात जी एकूण उंची गाठतात ती न्यूयॉर्कच्या एंपायर स्टेट बिल्डिंगपेक्षाही अधिक आहे. पण असे कितीतरी व्यवसाय कोलमडत आहेत. कुंभार, धातुकाम करणारे कारागीर आणि असे लाखो कुशाग्र, कलाकुसर जाणून असणारे लोक त्यांच्या उपजीविका गमावत आहेत.
भारताच्या ग्रामीण रूपाला जे सौंदर्य प्राप्त करवून देते, असे आपण बरेच काही २०-३० वर्षांमध्ये गमावणार आहोत. आणि त्याची काहीही माहिती आपल्याला नसणार! कसली नोंद नाही, दृश्य किंवा मौखिक स्वरूपात, आपल्या शिक्षणासाठी काहीच उपलब्ध नसणार!! मग ह्या अविश्वसनीय विविधतेचं रक्षण करण्यासाठी प्रोत्साहन तर दूरच राहीलं. आपण आपल्या ग्रामीण भारताचे विश्व आणि त्याचा आवाज हरवत चाललो आहोत ज्याबद्दल येणार्या पिढ्यांना काहीही ठाऊक नसणार. तसेही सध्याची पिढी ह्या विश्वाशी असलेले लागेबांधे झुगारून देत आहे.
हेच नेमकं पारीने ओळखलं
ग्रामीण भारतात नक्कीच अशा अनेक गोष्टी आहेत ज्या नष्ट झाल्या पाहिजेत. ग्रामीण भारतातील जे जे अत्याचारी, अन्यायी, प्रतिगामी आणि क्रूर आहे - आणि जे जे समूळ नष्ट झाले पाहिजे ते संपुष्टात आलेच पाहिजे. अस्पृश्यता, सरंजामशाही, वेठबिगारी, जात आणि लिंग आधारित आत्यंतिक दडपशाही आणि शोषण, जमिनी बळकाविणे आणि बरंच काही. दुर्दैवाने, परिवर्तनाचे स्वरूप असे काही आहे की, जे प्रतिगामी आणि रानटी आहे त्यास आश्रय दिला जातोय आणि उत्तमोत्तम गोष्टींना, विविधतेला संपवण्यात येत आहे. ते सर्व देखील येथे कॅप्चर केले जाईल. पारी एक जिवंत दैनंदिनी आणि जिवंत संग्रह सुद्धा आहे. पारी ग्रामीण भारतातील जे काही वर्तमान आणि समकालीन आहे त्याचा अहवाल देते. त्याचवेळी, शक्य तेवढ्या स्त्रोतांकडून आधीच प्रकाशित झालेले लेख, कथा, रिपोर्ट्स, व्हिडिओ आणि ऑडिओ यांचा एक डेटाबेसही तयार करते. पारीची स्वत:ची सर्व सामग्री क्रिएटिव्ह कॉमन्स अंतर्गत येते (http://www.ruralindiaonline.org/legal/copyright/) आणि ही साइट विनामूल्य उपलब्ध आहे. तसेच, पारीसाठी कोणीही योगदान देऊ शकते. या साइटच्या दर्जानुसार प्रमाणित आणि आमच्या आज्ञेशी सुसंगत : दैनंदिन लोकांची दैनंदिन आयुष्ये, आपल्या कोणत्याही साहित्याचे पारी स्वागत करते - आपण आमच्यासाठी लिहू शकता, चित्रीकरण करू शकता, रेकॉर्डिंग करू शकता.
गेल्या २० वर्षांत, भारतात अनेक ग्रंथालये आणि संग्रहालये यांचा वापर अगदी हद्दपार झालाय. संग्रहालयातल्या वस्तूंच्या ज्या छोट्या छोट्या प्रतिकृती रस्त्यांवर मिळायच्या, जसे चित्रे, वास्तुशिल्प, आता तेही नाहीसं होत चाललेलं आहे. आजकालचे तरूण कोठे हो ग्रंथालय किंवा संग्रहालयात जाताना दिसतात!? पण एक अशी जागा आहे जेथे जगातील सर्व लोक सदैव, पिढ्यान् पिढ्या जाणार, ते म्हणजे इंटरनेट. इंटरनेट, विशेषत: ब्रॉडबॅन्डची पाळेमुळे भारतात हळूहळू मूळ धरत आहेत पण त्याचा विस्तार मात्र झपाट्याने होतोय. सार्वजनिक स्त्रोत उभारण्यासाठी ही एक उत्तम जागा आहे. एक जिवंत, श्वास घेणारी दैनंदिनी आणि एक जिवंत संग्रह, ज्याचा उद्देश आहे लोकांचं रोजचं आयुष्य रेकॉर्ड करणं, त्याची नोंद करणं. ग्रामीण भारतातील लोकांसाठी असलेला संग्रह, पीपल्स आर्काइव्ह ऑफ रूरल इंडिया. अनेकानेक विश्व केवळ एका वेबसाईटवर एकवटलेली. कदाचित जगातल्या कोणत्याही एका वेबसाईटवर एवढे आवाज, एवढ्या सुस्पष्ट, निराळ्या भाषा, एवढी विविधता आढळणार नाही.
याचा अर्थ, एक असं कार्य हाती घेणे, ज्याचे प्रमाण आणि व्याप्ती अभूतपूर्व आहे आणि ज्यात ऑडिओ, दृश्य आणि लेखांच्या साहाय्याने, माध्यमांच्या अगणित रूपांची नोंद करायची आहे. हे एक असं ऐतिहासिक, गुंतागुंतीचं पण आनंददायी कार्य आहे, ज्यात ग्रामीण भारतीय स्वत: (जेवढं शक्य होईल तेवढं) कथांचं, कामाचं, कार्यांचं, इतिहासाचं कथन करतील, त्यांच्या शैलीत, भाषेत संवाद साधतील. आपण इथे खर्याखुर्या लोकांना पाहू शकतो - चहाच्या मळ्यात चहाची पानं खुडणार्या लोकांची कहाणी. समुद्रावरील कोळ्याची कहाणी. भाताच्या शेतात गाणी गात भाताची रोपं पेरणार्या स्त्रियांची गाणी किंवा पारंपारिक कथनकार. कोणतेही काटे-फाटे आणि क्रेन्स न वापरता, शतकानु शतकांपूर्वीच्या जुन्या पद्धती वापरून समुद्रात भव्य जहाजे उभारणार्या खलाशांची कहाणी. थोडक्यात, रोजचं आयुष्य जगणारी साध्या माणसांची, त्यांच्या कष्टप्रद आयुष्याची कहाणी त्यांच्याकडूनच! - एक असं जग ज्याच्याकडे आपण पाहायचंच विसरून गेलोय.
पारीवर आपल्याला व्हिडिओ, चित्र, ऑडिओ आणि लेखांचा संग्रह पाहायला मिळेल. आमच्याकडे आधीच असलेले साहित्य तर तेथे आहेच पण त्याचबरोबर आम्ही सातत्याने जे नवीन साहित्य अपलोड करतो तेही आपल्याला आढळेल. दोन्ही प्रकारच्या साहित्याला योग्य रूपात मांडण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी आम्ही पुरेसा वेळ आणि मेहनत घेतो. जे व्हिडिओ विशेषत: पारीसाठी तयार केले गेले आहेत, त्यात गरीब आणि सामान्य भारतीयांचं आयुष्य आणि उपजीविका रेकॉर्ड केलेली आहे. उदाहरणार्थ, एक ग्रामीण, शेतकाम करणारी मजूर स्त्री आपल्याला तिच्या आयुष्याची प्रत्यक्ष माहिती देते, तिचं काम, तिची मजूरीचं काम करण्याची पद्धत, तिचा कामाच्या ठिकाणी जाण्याचा प्रवास, तिचं घर, स्वयंपाकघर, तिच्यासाठी महत्त्वाची असलेली प्रत्येक गोष्ट. अशा चित्रपटाचं पहिलं श्रेय तिला जातं; दुसरं श्रेय तिच्या गावाला/समुदायाला जातं. दिग्दर्शकाचा क्रमांक तिसरा येतो. ह्या चित्रपटाची कथा तिची आहे त्यामुळे पारी सन्मानपूर्वक तिला त्याचं श्रेय देते. आमचं एक उद्दिष्ट असंही आहे की ज्यात ही सामान्य माणसे, ज्यांच आयुष्य आम्ही टिपतो, त्यांचं या साईटच्या उभारणीत काही मत असेल, योगदान असेल तर तेही त्यांना शक्य व्हावं. लेखांच्या संग्रहात एक 'स्त्रोत' असा विभागही आहे जेथे आम्ही ग्रामीण भारताशी संबंधित अहवाल, संशोधन प्रकाशित करतो. आणि, अर्थातच, आमच्या उद्देशाप्रमाणे आपण पारीवर हजारो लेख वाचू शकाल, जे खास पारीसाठी किंवा आधीच प्रकाशित केलेले आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित केलेलेही आहेत. साइटच्या ऑडिओझोनमध्ये (त्यावर काम चालू आहे) आपण हजारो क्लिप्स ऐकू शकाल - संभाषणाच्या, गाण्यांच्या, कवितांच्या - ज्या प्रत्येक भारतीय भाषेत आम्ही रेकॉर्ड करू शकू असे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही तयार केलेल्या प्रत्येक लघुपटासाठी आम्ही भारतीय भाषांमध्ये उपशीर्षकेही तयार करत आहोत.
पारी: विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि शिक्षण
विद्यार्थी, शिक्षक, शाळा, कॉलेज आणि विद्यापीठांसाठीही माहितीपूर्ण आणि प्रसन्न शिक्षण साधने तयार करण्यात मदत करणे हेही पारीचे एक उद्दिष्ट आहे. येत्या काही वर्षांत शिक्षण घेणे, शिकविणे आणि पाठ्यपुस्तकेही ऑनलाईन होणार आहेत. जगातल्या काही देशांमध्ये तर ते केव्हाच सुरू झालेलं आहे. या माध्यमाचा, त्याच्या वैशिष्ट्यांचा योग्य उपयोग करून जर उत्तम पाठ्यपुस्तके किंवा शिक्षण साधने तयार केली तर त्याचा अर्थ त्याच्यात आवश्यक त्या नवीन गोष्टी जोडता येतील, बदल करता येतील, अद्ययावत तसेच दुरुस्तही करता येतील, इतकंच काय पण त्याची व्याप्तीही वाढवता येईल. जसजसा ब्रॉडबॅन्डचा वापर वाढत जाईल, तसतसा अनेक विद्यार्थ्यांना कमी खर्चात याचा लाभ घेता येईल, कारण पारी सार्वजनिक लोकांच्या वापरासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि विद्यार्थी कशा प्रकारे स्वत:ची पुस्तके तयार करू शकतील हे समजून घेण्यासाठी पुढील लिंक पाहा: http://www.ruralindiaonline.org/about/pari-teachers-students/
पारीवर आमचा 'स्त्रोत' विभागही आहे जेथे आमचं उद्दिष्ट (केवळ लिंक नाही तर पूर्ण मजकूर), सर्व अधिकृत (अनधिकृतही पण विश्वसनीय), ग्रामीण भारताशी संबंधित अहवाल उपलब्ध करून देणे हा आहे. उदाहरणार्थ, असंघटीत क्षेत्रातील उद्योगांसाठी राष्ट्रीय आयोगाचा (NCEUS) प्रत्येक अहवाल; योजना आयोग, मंत्रालय, संयुक्त राष्ट्र संघांचे आणि इतरही बरेच अहवाल. संशोधकांना विविध साइट्सवर जाऊन निरनिराळे स्त्रोत शोधून महत्त्वाचे अहवाल आणि शोधनिबंध यासाठी फार सर्फिंग करण्याची गरज नाही.
पारीवर काय आहे? संग्रहात आपल्याला अनेक श्रेण्या आढळतील ज्या अंतिम नाहीत. त्यातील काही पुढीलप्रमाणे:
आपलं दैनंदिन जगणं: हा विभाग आपल्याला ग्रामीण भारतीय मजूरांच्या गुंतागुंतीच्या जगात घेऊन जातो. शेतात राबणारे भूमिहीन कामगार, शेतकरी आणि लाकूडतोड करणारे, विटा बनविणारे तसेच लोहार, या सर्वांना आपण भेटू शकाल. केवळ काही रूपयांसाठी दुचाकीवर २०० किलो कोळसा ४० किमी अंतर ढकलत घेऊन जाणार्या माणसांपासून, कचर्याच्या प्रचंड ढिगार्यातून धोका पत्करून कोळसा शोधून काढणार्या स्त्रियांपर्यंत आपल्याला येथे मजूर आढळतील. स्थलांतर करणार्या मजूरांची कहाणीही आपण पहाल - ज्यांना काम शोधण्यासाठी प्रत्येक वर्षी हजारो किमी प्रवास करावा लागतो, जे कोठेही सहा महिन्यांपेक्षा जास्त वास्तव्य करू शकत नाहीत, अगदी त्यांच्या गावीही नाही.
त्यांच्या कहाण्यांव्यतिरिक्त आम्ही ते काम करत असताना जी साधने वापरतात - तीही कॅमेरात टिपतो - ज्यातील बरीच निश्चितपणे येत्या काही वर्षांत नाहीशी होणार आहेत.
मातृभाषा: बोलल्या जाणार्या, मौखिक आणि लिखित, प्रत्येक भारतीय भाषेत, आमचा, साहित्य कॅमेराबद्ध आणि ध्वनीबद्ध करण्याचा प्रयत्न असतो. आपल्याला पारीवर असे अनेक व्हिडिओ पाहावयास मिळतील. आमचा प्रयत्न हाही आहे की ती भाषा बोलणार्या व्यक्तीला स्वत:च्या भाषेबद्दल काय वाटतं हेही टिपलं जावं. ह्या रेकॉर्डिंग्ज ऑडिओ किंवा व्हिडिओमध्ये आपल्याला आढळतील, लेखामध्ये समाविष्ट लघुपट किंवा 'बोलक्या अल्बम्सच्या' रूपातही या भाषा आपण ऐकू शकाल.
चित्रदालन: ग्रामीण आयुष्याच्या प्रत्येक पैलुचे क्षण चित्रबद्ध करण्याचा प्रयत्न करतो. चित्रसंग्रहाची सुरूवात, ग्रामीण भारतीयांच्या ८,००० कृष्णधवल प्रतिमा, ज्या त्यांच्या कामाच्या वेळी, मजूरी करताना टिपलेल्या आहेत, अशा प्रतिमांनी होते. त्याचप्रमाणे यात लोक, कुटुंबे, घर यांच्याही पोर्ट्रेटचा समावेश आहे. त्यातील काही साईटवर आहेत. बहुतेक, कृष्णधवल काळातील कॅमेरा छायाचित्रे असल्याने त्यांचे सध्या डिजीटीकरण होत आहे (जुन्या संग्रहातील) आणि काही काळाने अपलोड केले जातील. तरीही आमच्याकडे ग्रामीण भारताची हजारो डिजीटल छायाचित्रे आहेत (ज्यात अस्तित्वात असलेली, ज्ञात, रेकॉर्डेड आत्महत्यांच्या इतिहासातील, सर्वांत ऐतिहासिक आत्महत्येच्या लाटेने उद्धवस्त हजारो शेत घरांचीही छायाचित्रे आहेत). छायाचित्र संग्रहाचे एक अजून वैशिष्ट्य म्हणजे 'बोलते अल्बम्स', ज्यात विशिष्ट संकल्पनेच्या छायाचित्रांसह छायाचित्रकाराचे चित्र बंदिस्त करत असतानाचे भाव किंवा उद्गारही ऑडिओ रूपात आपण अनुभवू शकाल.
प्रवासवर्णने: वाहतुकीच्या साधनांच्या विविधतेसंदर्भात. वैशिष्ट्यपूर्ण, भारतीय वैचित्र्याचा नमुना, ज्याला 'जुगाड' संबोधले जाते, पाच एचपी मोटारांवर चालणारी गावाकडची वाहने, ज्यात विविध वाहनांचे टाकून दिलेले वेगळे पार्ट वापरलेले आहेत आणि ज्याची चाके असमान आकाराची असू शकतात. त्याचप्रमाणे बैलगाड्या, घोडागाडी, गाढवे, ऊंटांच्या गाड्या आणि प्रत्यक्ष ऊंटही वाहन म्हणून.
आपल्या सर्वांबद्दल: समुदायांबद्दल आणि संस्कृतीशी संबंधित. विशिष्ट समुदाय, समूह आणि त्यांच्या पद्धती यासंबंधीच्या कथा, त्यांची लोकनाट्ये, गाणी, नृत्य, कविता, कथा आणि आख्यायिका.
आपली कलाकौशल्ये: हा विभाग कला, हस्तकला आणि कलाकार यासंबंधित आहे. हस्तकौशल्याची अगणित घराणी, त्याच्या अगणित शैल्या आणि उत्पादने.
स्वातंत्र्याचे पायदळ सैनिक: ग्रामीण भारतातील, आता ९०च्या वयातील, स्वातंत्र्य सैनिकांची शेवटची फळी. वसाहतवादी राज्यापासून स्वतंत्र आणि लोकशाही असलेल्या भारताच्या स्थापनेपर्यंत ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत, तुरूंगात अनेक वर्षे घालविली त्यांचे कथन. पुढील दशकात कदाचित यांच्यापैकी कोणीही आपल्या कथा सांगण्यासाठी आपल्यात नसण्याची शक्यता आहे.
शेतीवरील संकटे: शब्द, व्हिडिओ, छायाचित्र आणि ऑडिओ रेकॉर्डिंग्जच्या स्वरूपातील वृतांत, भारताच्या सर्वांत मोठ्या आणि अजूनही चालू असलेल्या शेतसंकटांचे वास्तव चित्रण आणि कथन. यात शेतीशी संबंधित इतर अंगांचाही समावेश होतो, आत्महत्यांपलीकडे शेतीसंकटाची व्याप्ती आहे.
वाटसरू: सातत्याने चालू राहणारे नोटबुक, ज्यात ग्रामीण भारताच्या विविध भागात प्रवास करणार्या लेखकांचे अनुभव ते स्वत: रेकॉर्ड करत राहतील.
आम्ही टप्प्या टप्प्याने पाळीव प्राणी आणि वन्यजीव ह्यासारख्या इतर अनेक श्रेण्यांचाही समावेश करणार आहोत. आम्ही सातत्याने योगदानकर्त्यांचा संग्रह वाढवत असतानाच, आम्हांला संपादकीय निवड आणि उत्तम दर्जा हे घटकही लक्षात घ्यावे लागतात. अर्थातच, या कामासाठी विश्वसनीय आणि अनुभवी योगदानकर्ते महत्वाचे ठरतात. यातील बहुतेक पत्रकार, लेखक आणि ग्रंथकार असतील, पण सगळेच नाही. या कार्यात स्वारस्य असलेला कोणताही भारतीय सहभागी होऊ शकतो, आमच्यासाठी लिहू शकतो, किंवा आपल्या मोबाईलमधील, सर्वसाधारण स्वीकारण्यायोग्य दर्जाच्या व्हिडिओचा वापर करुन, आमच्या सूचनांनुसार असलेलं साहित्य असल्यास, आमच्यासाठी पटही चित्रीत करू शकतो. त्यासाठी आपल्याला व्यावसायिक पत्रकार असण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे कदाचित इतरही कलागुण असू शकतील ज्याच्याद्वारे आपण संग्रहासाठी योगदान देऊ शकाल- जसे तंत्रज्ञ, संशोधक, डिझाईनर किंवा अनुवादक किंवा संपादक/व्हिडिओ संपादक, स्वयंसेवक. लक्षात घ्या एकूण कथनातला, साहित्यातला फार मोठा भाग हा प्रत्यक्ष ग्रामीण भारतीयाकडूनच आलेला आहे, कोणत्याही व्यावसायिकाच्या मदतीने ती कथा रेकॉर्ड केलेली नाही. त्यातील काही ग्रामीण भारतीय स्वत:च स्वत:च्या कथा चित्रित करणार आहेत. जोपर्यंत ग्रामीण क्षेत्र अस्तित्वात आहे - कथा नेहमीच असतील आणि त्यांना नवीन स्वरूपात मांडले जाईल.
पारी सार्वजनिक स्वरूपात लोकांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. ही वेबसाईट काउंटरमीडिया ट्रस्टतर्फे चालविली जाते. ही ट्रस्ट काउंटरमीडिया नेटवर्कचा भाग असून, ते ट्रस्ट ला सहाय्य आणि फंड पुरविते. ट्रस्टची कार्ये प्रामुख्याने सदस्य शुल्क, स्वयंसेवकांची कार्ये, देणग्या, आणि थेट वैयक्तिक योगदान यांच्या आधारावर केली जातात. ह्या स्वयंसेवकांच्या महाजालातील पत्रकार, व्यावसायिक चित्रपट निर्माते, चित्रपट संपादक, छायाचित्रकार, माहितीपट निर्माते, दूरचित्रवाणी, ऑनलाईन आणि वृत्तपत्र पत्रकार हे सर्व, हीच पारीची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्याशिवाय, पारीच्या स्थापनेसाठी आणि साईटच्या डिझाईनसाठी शैक्षणिक, शिक्षक, संशोधक, तंत्रज्ञ आणि इतर अनेक क्षेत्रांतील व्यावसायिक यांनी विनामूल्य योगदान दिले आहे. जे विनामूल्य प्राप्त होऊ शकते त्यापलीकडेही साहित्य निर्माण करण्यासाठी पारीला आर्थिक साधनांची गरज भासणार आणि म्हणूनच कार्यांमध्ये समूह, समुदाय यांचा सहभाग मिळविण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न असतात. ग्रामीण भारत ही अशी जादू आहे की ती कधीच पूर्णपणे पकडता येणार नाही आणि या वेबसाईटवरील साहित्य हा खर्याखुर्या, प्रचंड वास्तवाचा केवळ एक अंश आहे. ग्रामीण भारतात असलेली अनेक विश्वे आम्ही केवळ त्या निरनिराळ्या विश्वातील लोकांच्या सहभागानेच आपल्यासमोर मांडू शकू, त्याची व्याप्ती तेव्हाच शक्य आहे.