१८ फेब्रुवारी २०२४. दुपारचे तीन वाजले होते. सूर्य माथ्यावर होता आणि त्या चमकत्या उन्हात रंगीबेरंगी वस्त्रं परिधान केलेली ४०० माणसं सबर पासून मैसुरु टाउन हॉलपर्यंत चालत चालली होती. नाचत, गात. मैसुरूमधला हा दुसरा प्राइड मार्च होता.

“इथे येणं ही अभिमानाचीच गोष्ट आहे. मैसुरु बदललंय,” याच शहरात लहानपण गेलेल्या शैकझाराचं हे म्हणणं आहे. “मी गेल्या ५-६ वर्षांपासून मुली आणि मुलं दोघांचे कपडे परिधान करतोय. पण लोक अजूनही त्याकडे शंकेने पाहतात आणि विचारतात, ‘मुलगा असून मुलीचे कपडे का घालतोय?’ जरा जरा बदल होतोय आणि लोक बदलतायत. मी जसा आहे त्याचा मला अभिमान आहे,” बंगळुरुच्या एका कॉल सेंटरमध्ये काम करणारा शैकझारा सांगतो. या मोर्चाला आपला पाठिंबा देण्यासाठी कर्नाटकातल्या वेगवेगळ्या भागातून लोक आले होते तसंच गोवा आणि तमिळनाडूचेही काही जण यात सहभागी झाले होते.

या सगळ्या सोहळ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे यल्लम्मा देवीचा सोनेरी पुतळा. हिलाच रेणुका म्हणूनही ओळखलं जातं. सुमारे १० किलो वजनाचा हा पुतळा मोर्चेकरी आपल्या डोक्यावर ठेवून चालत होते आणि त्यांच्याभोवती अनेक जण ढोलावर ताल धरत होते, नाचत होते.

PHOTO • Sweta Daga
PHOTO • Sweta Daga

डावीकडेः प्राइड मोर्चामध्ये सहभागी शैकझारा (मध्यभागी), सोबत सकिना (डावीकडे) आणि कुणाल (उजवीकडे). शैकझाराच्या म्हणण्यानुसार, ‘इथे येणं ही अभिमानाची गोष्ट आहे. मैसुरु बदललंय.’ उजवीकडेः गदग येथे शिकत असलेला तिप्पेश आर १८ मार्च २०२४ रोजी निघालेल्या मोर्चात

PHOTO • Sweta Daga

अंदाजे १० किलो वजनाचा यल्लम्मा देवीचा पुतळा मोर्चेकरी आपल्या डोक्यावर घेऊन चालत होते

हा मोर्चा नम्मा प्राइड आणि सेवन रेनबोज या पारलिंगी व्यक्तींबरोबर काम करणाऱ्या संघटनांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आला होता. “हा आमचा दुसरा प्राइड मोर्चा होता. आणि या वेळी एका दिवसात परवानगी मिळाली. मागच्या वेळी दोन आठवडे लागले होते,” प्रणती अम्मा सांगतात. सेवन रेनबोज या संघटनेच्या संस्थापक असलेल्या प्रणती अम्मा गेली ३७ वर्षं लिंगभाव आणि लैंगिकतेच्या मुद्द्यांवर भारतभर काम करतायत.

“आम्हाला आता पोलिसांबरोबर योग्य पद्धतीने संवाद साधणं जमायला लागलंय. मैसुरूत आजही किती तरी लोक आहेत ज्यांना आम्ही पसंत नाही. त्यांना वाटतं आम्ही दिसेनासं व्हावं. पण यापुढे दर वर्षी हा प्राइड मोठा होत जाईल आणि अधिकाधिक वैविध्य सामावून घेईल अशीच आम्हाला आशा आहे,” त्या सांगतात.

एक किलोमीटर अंतर चाललेला हा मोर्चा मैसुरूच्या सगळ्यात वर्दळीच्या बाजारपेठ भागातून गेला. स्थानिक पोलिसांनी अगदी स्वतःहून वाहतूक वळवली आणि हा सोहळा सुखरुप पार पडेल यासाठी मदत केली. “आम्हाला या समुदायाबद्दल आदरच आहे. आम्ही स्वतः त्यांच्या सोबत चालत जातो जेणेकरून वावगं काही होऊ नये. आमचा या [पारलिंगी] लोकांना पाठिंबा आहे,” सहाय्यक पोलिस उप-अधीक्षक, विजयेंद्र सिंग सांगतात.

“भारतीय समाजात पारलिंगी स्त्रियांचं आगळं वेगळं स्थान आहे. आणि ते गुंतागुंतीचं आहे. त्यांच्याबाबत अनेक मिथकं आहेत, त्यांच्याकडे जादुई काही शक्ती असल्याची लोकांची भावना असल्याने त्यांना सांस्कृतिकदृष्ट्या काही स्थान देण्यात आलं आहे. मात्र त्यांच्या बाबत मोठा भेदभाव होतो आणि छळही होतो,” दीपक धनंजय सांगतात. ते मानसिक आरोग्य कार्यकर्ते आहेत आणि ‘क्वियर’ पुरुष अशी स्वतःची लैंगिक ओळख सांगतात. “इथला पारलिंगी समुदाय लोकांमध्ये जागरुकता यावी यासाठी प्रयत्न करत आहे. पण मानसिकतेत बदल एका रात्रीत काही घडून येत नाही. पण असे, खास करून छोट्या शहरात होणारे प्राइड मार्च पाहिले, त्यात कुठलीही आगळीक होत नाहीये हे पाहिलं की मनातली आशा दुणावते,” ते सांगतात.

प्रियांक आशा सुकानंद, वय ३१ प्राइडमध्ये सहभागी झाला होता. तो म्हणतो, “मी विद्यापिठात असताना छळ आणि भेदभाव सहन केलाय. तेव्हाच मी ठरवलं की आपल्या हक्कांची जाणीव करून द्यायची आणि त्यांसाठी लढायचं. दर वेळी जेव्हा मी प्राइडमध्ये भाग घेतो तेव्हा माझा आणि माझ्यासारखीच परिस्थिती असलेल्या अनेकांचा संघर्ष मला आठवत राहतो. आणि मी त्या सगळ्यांसाठी प्राइडसोबत चालत राहतो.” बंगळुरूमध्ये विशेष विद्यार्थ्यांसाठी शिक्षक आणि शेफ असणारा प्रियांक पुढे सांगतो, “मैसुरूच्या एलजीबीटी समुदायाची खरी ताकद काय आहे ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आणि ही गोष्ट मोठी दिलासादायक होती.”

PHOTO • Sweta Daga

पारलिंगी समुदायाची पताका लहरवणारी नंदिनीः ‘मी बंगळुरूहून आलीये कारण मला वाटतं जिथे जिथे शक्य आहे तिथे उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे. आणि अर्थातच मज्जा येतेच’

PHOTO • Sweta Daga

स्थानिक पोलिसांनी स्वतःहून वाहतूक वळवली. ‘आम्हाला या समुदायाबद्दल आदरच आहे. आम्ही स्वतः त्यांच्या सोबत चालत जातो जेणेकरून वावगं काही होऊ नये. आमचा या [पारलिंगी] लोकांना पाठिंबा आहे,’ सहाय्यक पोलिस उप-अधीक्षक, विजयेंद्र सिंग सांगतात

PHOTO • Sweta Daga

नम्मा प्राइड आणि सेवन रेनबोज या संघटनांनी आयोजित केलेला हा मोर्चा सगळ्यांसाठी खुला होता – बहुविध लैंगिकता असलेले आणि त्यांच्या पाठीशी उभे असलेले त्यांचे समर्थकही यात सहभागी झाले

PHOTO • Sweta Daga

शहरात रिक्षा चालक असेलला अजहर (डावीकडे) आणि मानसिक आरोग्य कार्यकर्ते व क्वियर ओळख सांगणारे दीपक धनंजय. ‘हे असं या आधी मी कधीही पाहिलेलं नाही,’ अजहर सांगतो

PHOTO • Sweta Daga

डावीकडून उजवीकडेः प्रियांक, दीपक, जमील. आदिल पाशा आणि अक्रम जान. जमील, आदिल पाशा आणि अक्रम जान यांचा कापडाचा व्यवसाय असून इथेच जवळपास त्यांची दुकानं आहेत. ‘त्यांच्याबद्दल [पारलिंगी] आम्हाला फारसं काही कळत नाही. पण आम्ही त्यांचा तिरस्कार करत नाही. त्यांनाही हक्क असायलाच पाहिजेत’

PHOTO • Sweta Daga

यल्लम्मा देवीचा पुतळा या सोहळ्याचं आकर्षण होता. तिलाच रेणुकाही म्हटलं जातं

PHOTO • Sweta Daga

रंगीबेरंगी वस्त्रं परिधान केलेले सहभागी सबर ते मैसुरु टाउन हॉलपर्यंत चालत गेले

PHOTO • Sweta Daga

बंगळुरूचा मनोज पुजारी मोर्चामध्ये नाचतोय

PHOTO • Sweta Daga

एक किलोमीटरचा हा मोर्चा मैसुरुच्या सगळ्यात वर्दळीच्या बाजारपेठ भागातून गेला

PHOTO • Sweta Daga

प्राइड मोर्चातले सहभागी

PHOTO • Sweta Daga

टाउन हॉलच्या दिशेने निघालेले मोर्चेकरी

PHOTO • Sweta Daga

बेगम सोनीने तिचा पोषाख स्वतःच शिवलाय. त्याला असलेले पंख म्हणजे स्वतःची आगळी लैंगिकता जपण्याचं स्वातंत्र्य प्रतीत करतात

PHOTO • Sweta Daga

प्राइड मोर्चाची पताका

PHOTO • Sweta Daga

ढोल वाजवणाऱ्यांचा ताफा सगळ्या जमावासोबत. ‘आमच्या समुदायात अनेक ‘अक्का’ आहेत ज्या पारलिंगी आहेत. माझा स्वतःची बहीण देखील. त्या आमच्याच समाजाचा भाग आहेत त्यामुळे आम्ही कायमच त्यांना पाठिंबा देऊ,’ आर. नंदीश (जांभळ्या कपड्यांत)

PHOTO • Sweta Daga

मैसुरूच्या टाउन हॉलपाशी मोर्चाची सांगता झाली

Sweta Daga

Sweta Daga is a Bengaluru-based writer and photographer, and a 2015 PARI fellow. She works across multimedia platforms and writes on climate change, gender and social inequality.

Other stories by Sweta Daga
Editor : Siddhita Sonavane

Siddhita Sonavane is Content Editor at the People's Archive of Rural India. She completed her master's degree from SNDT Women's University, Mumbai, in 2022 and is a visiting faculty at their Department of English.

Other stories by Siddhita Sonavane
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale