हे पॅनेल दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया या ऑनलाइन फोटो प्रदर्शनातील आहे. ग्रामीण बाया किती विविध तऱ्हेची कामं करतात ते या फोटोंमधून आपल्याला दिसतं. १९९३ ते २००२ या काळात पी. साईनाथ यांनी भारतातल्या १० राज्यांमध्ये हे फोटो काढले आहेत. अनेक वर्षं भारताच्या विविध भागांत सादर झालेलं हे मूळ प्रदर्शन पारीने कल्पकरित्या डिजिटाइझ केलं आहे.
आयुष्यभर ओणवं
ती क्षणभरासाठी थांबली, विजयनगरमच्या मध्यान्हीच्या सूर्याच्या तलखीने थकलेली. पण ती तशीच ओणवी थांबली. तिला माहित होतं की काही क्षणात तिला परत कामाला लागायचंय, त्याच स्थितीत.
त्याच काजूंच्या बागांमध्ये तिच्या गावच्या बायांचे इतर दोन गट काम करत होते. एका गटाने त्यांचं खाणं आणि पाणी दोन किलोमीटरवर शेतात सोबत आणलेलं होतं. इतर बाया उलट्या दिशेने काम करत येत होत्या. सगळ्याच कमरेत वाकलेल्या.
ओरिसाच्या रायगडामध्ये शेतात पुरुषही होते. कॅमेऱ्याच्या लेन्समधून दिसणारं दृश्य भन्नाट होतं. सगळे पुरुष ताठ उभे आणि सगळ्या बाया वाकलेल्या, ओणव्या. ओरिसातल्या नौपाडात पावसाचे थेंब आले तरी ती तण काढायचं थांबली नव्हती. कमरेत खाली वाकून ती काम करतच होती. छत्रीआड.








