पाणिमाराचे स्वातंत्र्य सैनिक एकाच वेळी अनेक लढाया लढत होते. त्यातल्या काही तर घरीच चालू होत्या.
गांधीजींनी अस्पृश्यतेच्या विरोधात हाक दिली आणि त्यांनी ती लागलीच अंमलात आणली.
“एक दिवस आम्ही ४०० दलितांना घेऊन गावच्या जगन्नाथाच्या मंदिरात प्रवेश केला”, चामरू सांगतात. ब्राह्मणांना हे अजिबात आवडलं नाही. पण त्यांच्यातल्या काहींनी आम्हाला पाठिंबाही दिला. त्यांचा नाईलाज असावा कदाचित. तेव्हा माहोलच तसा होता. गौंटिया (गावचा पुढारी) देवळाचा विश्वस्त. तो भयंकर चिडला आणि निषेध म्हणून गाव सोडून गेला. त्याचा मुलगा मात्र वडलांच्या भूमिकेशी फारकत घेत आमच्यात सामील झाला.
“इंग्रजी वस्तूंवर बहिष्कार सगळे मनोमन पाळत होते. आम्ही फक्त खादीच वापरत होतो. तीसुद्ध स्वतः विणून. त्याच्यामागे पक्की विचारधारा होती. आमची परिस्थिती फार बिकट होती त्यामुळे खरं तर हे आमच्या पथ्यावरच पडलं.
स्वातंत्र्य संग्रामाला एवढी वर्षं उलटली तरी स्वातंत्र्यसैनिकांनी खादीचा वापर सोडलेला नाही. बोटं सूत कताई आणि खादी विणेनाशी झाली तोपर्यंत तर नाहीच. “मागच्या वर्षी, नव्वदी पार केल्यावर, मी विचार केला की आता काही हे जमायचं नाही,” चामरू सांगतात.
“या सगळ्याची सुरुवात १९३० साली
संबलपूरमध्ये भरलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात झाली. शिबिराचं नाव ‘सेवा’
असलं तरी प्रत्यक्षात तुरुंगात कसं रहावं लागतं याचंच प्रशिक्षण आम्हाला दिलं जात
होतं. संडास साफ करणं, अतिशय निकृष्ट खाणं, वगैरे. हे नक्की कसलं प्रशिक्षण आहे ते आम्हाला कळून चुकलं होतं. आमच्या
गावचे नऊ जण या शिबिरासाठी आलो होतो."
“संपूर्ण गाव आम्हाला निरोप द्यायला जमा झालं होतं. गळ्यात फुलांचे हार, कपाळावर गंध आणि फळं देऊन आमचा सत्कार झाला. असा सगळा उत्साह होता. लोकांसाठी ते सारं फार मोलाचं होतं.
“या सगळ्याच्या पाठी महात्मा गांधी या नावाची काही तरी जादू होतीच. सत्याग्रहात सामील व्हा असं आवाहन करणारं त्यांचं पत्र वाचून आमच्या अंगात जणू वारं संचारलं होतं. आम्ही निरक्षर, दरिद्री लोकही बंड पुकारून आमचं भागधेय बदलू शकणार होतो. पण आम्ही अहिंसेची शपथही घेतली होती. आणि काय करायचं आणि काय करायचं नाही याचे काही नियमही होतेच.”
त्यांच्यापैकी कुणीच गांधीजींना प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. खरं तर असे लाखो लोक होते ज्यांनी गांधींनी कधीही पाहिलं नव्हतं. पण त्यांनी दिलेली हाक त्यांच्या हृदयाला भिडली होती. “आमच्यासाठी मनमोहन चौधरी आणि दयानंद सतपतींसारखे काँग्रेसचे नेते आमचं प्रेरणास्थान होते. १९४२ चा ऑगस्ट उजाडण्याआधीच पाणिमाराचे हे स्वातंत्र्यसैनिक तुरुंगाची वारी करून आले होते. “आम्ही शपथ घेतली होती. युद्धाला (दुसऱ्या महायुद्धाला) कसल्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा प्रत्यक्ष सहभाग म्हणजे दगा-फितुरी. पापच ते. युद्धाचा विरोध करायचाच, पण तोही अहिंसक मार्गानी. गावच्या सगळ्यांचाच आम्हाला पाठिंबा होता.
“आम्ही सहा आठवडे कटकच्या तुरुंगात होतो. इंग्रज फार काळ कुणाला तुरुंगात ठेवत नसत. कसे ठेवणार? हजारो लोक आधीच तुरुंगात डांबलेले होते. आणि अटक करून घेणाऱ्यांची संख्या तर दिवसागणिक वाढतच चालली होती.”
अस्पृश्यतेविरोधातल्या आंदोलनामुळे पहिल्यांदाच काही अंतर्गत विरोध पुढे आले. पण तेही शमले. दयानिधी सांगतात, “आजही आमचे बहुतेक विधी ब्राह्मणांशिवायच होतात. आमच्या मंदीर प्रवेशामुळे त्यांच्यातले काही जण नाराज झाले. तरीसुद्धा बहुतेक जण चले जाव चळवळीत आमच्यासोबत सहभागी झालेच.”
जातीमुळे इतरही काही दबाव येत होतेच. दर वेळी आम्ही
तुरुंगातून बाहेर यायचो तेव्हा आजूबाजूच्या गावातले आमचे नातेवाइक आम्हाला शुद्ध
करून घ्यायला भाग पाडायचे. तुरुंगात आम्ही इतर अस्पृश्यांसोबत राहिलो हे त्यामागचं
खरं कारण. मदन भोई त्या दिवसांना उजाळा देतात. (आजही ओरिसाच्या ग्रामीण भागात
‘वरच्या’ जातीतल्या कैद्यांचं शुद्धीकरण करण्याची प्रथा चालू आहे – साईनाथ)
“एकदा मी तुरुंगातून सुटून आलो आणि
त्याच दिवशी माझ्या आजीचा अकरावा होता. मी तुरुंगात असतानाच ती वारली. “माझ्या
चुलत्यांनी विचारलं, ‘मदन, तू शुद्ध
होऊन आलायस ना?’ मी ठाम नकार दिला. म्हणालो, ‘आम्ही सत्याग्रही आमच्या कृतीतून इतरांना शुद्ध करतो.’ मग काय, मला इतरांपासून वेगळं बसवलं गेलं, एकटं पाडलं गेलं.
मी जेवलोही एकट्यानेच.”
“तुरुंगात जायच्या आधी माझ्या लग्नाची बोलणी झाली होती. मी सुटून आलो पण लग्न मात्र मोडलं होतं. मुलीच्या वडलांना एक कैदी त्यांचा जावई म्हणून नको होता. पण अखेर मलाही बायको मिळाली, तीही काँग्रेसचा प्रभाव असलेल्या सरंदापल्लीमध्ये.”
* * *
१९४२ च्या ऑगस्टमध्ये चामरू, जितेंद्र आणि पूर्णचंद्र तुरुंगात होते. त्यांना मात्र असं काही शुद्ध अशुद्ध सहन करावं लागलं नाही.
“त्यांनी आम्हाला गुन्हेगारांच्या तुरुंगात धाडलं होतं. आम्ही या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. जितेंद्र सांगतात. त्या काळात जर्मनीविरोधात लढण्यासाठी इंग्रज सैन्यभरती करत होते. ज्या कैद्यांना दीर्घ मुदतीची शिक्षा झाली होती त्यांच्यापुढे त्यांनी एक प्रस्ताव मांडला होता. जे युद्धावर जायला तयार होतील, त्यांना १०० रुपये आणि त्यांच्या कुटुंबांना ५०० रुपये देण्यात येतील. आणि युद्धाहून परत आल्यावर त्यांना सोडून देण्यात येईल.
“आम्ही गुन्हेगार कैद्यांशी बोलायला सुरुवात केली. निव्वळ ५०० रुपयासाठी या गोऱ्यांच्या युद्धात तुम्ही तुमचा बहुमोल जीव देणार? मरणाऱ्यांमध्ये तुमचा नंबर पहिला असणार हे नक्की. इंग्रजांसाठी तुम्ही कस्पटासमान आहात. त्यांच्या युद्धात तुम्ही हकनाक का बळी जाताय? आम्ही त्यांना समजावून सांगत होतो.
“थोडा काळ गेला आणि ते आमचं म्हणणं लक्ष देऊन ऐकू लागले. ते आम्हाला
गांधी नाही तर चक्क काँग्रेस म्हणत असत. त्यांच्यापैकी अनेकांनी युद्धावर जायचा
विचार सोडून दिला. त्यांनी बंड केलं आणि सैन्यात भरती व्हायला नकार दिला. वॉर्डन
भडकला. ‘तुम्ही त्यांच्या मनात काय भरवताय? आतापर्यंत तर ते
जायला तयार होते.’ आम्हाला गुन्हेगारांसोबत ठेवल्याबद्दल आम्ही चक्क त्याचे आभार
मानले. कारण त्यामुळेच आम्ही या गुन्हेगारांना सत्य काय आहे हे सांगू शकलो होतो.
“दुसऱ्याच दिवशी आमची राजबंद्यांच्या तुरुंगात करण्यात आली. आमची शिक्षा सहा महिने साध्या कैदेत बदलण्यात आली.
* * *
एवढ्या मोठ्या राजवटीशी झुंज घेण्याइतकं नक्की काय झालं होतं? इंग्रज एवढा कोणता अन्याय करत होते?
माझ्या प्रश्नाची जराशी खिल्ली उडवत चामरूंनी उलट सवाल केला. “अन्यायाचं सोडा, इंग्रजांच्या राजवटीत न्याय कुठे होता ते विचारा.” त्यांना हा प्रश्न विचारून मी चूकच केली होती. “त्यांच्या राजवटीततली प्रत्येक गोष्ट अन्यायकारक होती.”
“आपण इंग्रजांचे गुलाम होतो. त्यांनी आपली अर्थव्यवस्था पूर्ण मोडकळीस आणली. आपल्या लोकांना कसलेही हक्क नव्हते. शेतीचा कणाच मोडला त्यांनी. लोक भयंकर गरिबीत लोटले गेले. १९४२ च्या जुलै ते सप्टेंबरच्या काळात इथली पाच-सात कुटुंबं सोडली तर बाकीच्या ४०० कुटुंबाकडे पोटाला पुरेसं अन्न नव्हतं. त्यांच्या वाट्याला होती फक्त भूक आणि मानहानी.
“आजचे राज्यकर्तेही तसलेच बेशरम आहेत. तेही गरिबांनाच लुटतायत. लक्षात घ्या, इंग्रज राजवटीशी कशाचीच तुलना होऊ शकत नाही. पण आपलं सध्याचं सरकार तितकंच बेकार आहे.
* * *
“पाणिमाराचे हे स्वातंत्र्य सैनिक रोज सकाळी जगन्नाथाला जातात, तिथला त्यांचा ढोल (निसान) वाजवतात, १९४२ पासून यात खंड पडलेला नाही. त्यांच्या सांगण्याप्रमाणे पहाटेच्या प्रहरात किमान दोन किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज पोचतो.
पण शुक्रवारी मात्र ते संध्याकाळी ५.१७ ला एकत्र जमतात. का? महात्मा गांधींचा खून शुक्रवारी झाला, बरोबर ५ वाजून १७ मिनिटांनी. गेली तब्बल ५४ वर्षं या गावाने त्या क्षणाची आठवण जिवंत ठेवलीये.
आज शुक्रवार. आम्ही त्यांच्यासोबत मंदिरात गेलो. हयात असलेल्या सात स्वातंत्र्यसैनिकांपैकी चौघं जण तिथे आले होते. चामरु, दयानिधी, मदन आणि जितेंद्र. चैतन्य, चंद्रशेखर साहू आणि चंद्रशेखर परिदा हे तिघं आज गावात नाहीयेत.
मंदिराच्या मंडप खच्चून भरलाय, लोक गांधींचं
आवडतं भजन गातायत. “१९४८ मध्ये जेव्हा गांधींच्या हत्येची बातमी कळाली तेव्हा
गावच्या अनेकांनी मुंडन केलं होतं. स्वतःचे वडील वारल्याची भावना होती ती. आजही
अनेक जण शुक्रवारचा उपास पाळतात.
नुसतं देवळात काय चाललंय बघायला आलेली मुलं सोडली तर या अख्ख्या गावाला इतिहासाचं पक्कं भान आहे. आपण केलेल्या शौर्याची आणि तितकंच नाही तर स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवणं आपलं कर्तव्य आहे ही जाणही या गावाला आहे.
पाणिमारातले बहुतेक जण छोटे शेतकरी आहेत. “गावात अंदाजे १०० कुळत्यांची घरं होती. (शेत कसणारी जात) आणि ८० उडिया (हेही शेतकरीच). अंदाजे ५० सौर आदिवास्यांची, १० सोनाराची घरं आणि काही गौड (यादव) कुटुंबंही होती गावात,” दयानिधी माहिती देतात.
गावाचं चित्र आजही साधारण असंच आहे. स्वातंत्र्य सैनिकांपैकी बहुतेक जण कास्तकार जातींमधले आहेत. “खरंय तुमचं. आमच्यात जातीबाहेर फारशी लग्नं झालेली नाहीत. पण समाजा-समजातले संबंध अगदी स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून चांगले आहेत. मंदिर अजूनही सर्वांसाठी खुलं आहं. सर्वांच्या हक्कांचा आदरही केला जातो.”
अर्थात काही जणांना वाटतंय की त्यांच्या हक्कांची दखल घेतली गेली नाही. यातलेच एक म्हणजे दिबित्य भोई. ते सांगतात, “मी खूप लहान होतो. मला इंग्रजांनी बेदम मारलं होतं.” भोई तेव्हा फक्त १३ वर्षाचे होते. पण त्यांना तुरुंगवास झाला नाही आणि त्यामुळे त्यांचं नाव स्वातंत्र्यसैनिक म्हणून गणलं गेलं नाही. इतरही काही जणांना प्रचंड मारहाण झाली होती. पण त्यांनादेखील ‘अटक न झाल्यामुळे’ त्यांची नावं कागदोपत्री नोंदली गेली नाहीत.
स्वातंत्र्यसैनिकांच्या गौरव स्तंभावरच्या नावांभोवती यामुळे वेगळं वलय तयार होतं. जे तुरुंगात गेले त्यांचीच नावं स्तंभावर लिहिण्यात आली. अर्थात ज्यांची नावं आहेत, त्यांच्या योगदानाबद्दल कुणाच्या मनात कणभरही शंका नाही. खेदाची बाब हीच की ‘स्वातंत्र्य सैनिक कोण’ हे ठरवण्याच्या सरकारी खाक्यामुळे लढ्यासाठी काठ्या झेलूनही काहींची गणना स्वातंत्र्य सैनिक म्हणून केली गेली नाही.
ऑगस्ट २००२. ६० वर्षांनंतर पाणिमाराचे स्वातंत्र्य सैनिकांनी परत एक लढा उभारलाय.
या सगळ्यांमधले सर्वात हलाखीत राहणारे मदन भोई. यांच्याकडे अर्धा एकराहून किंचित जास्त जमिन आहे. त्यांच्या मित्रांबरोबर ते धरणं धरून बसलेत. सोहेला दूरसंचार केंद्रासमोर. भोई निराश होऊन सांगतात, “विचार करा, इतक्या वर्षांनंतरही या गावाला स्वतःचा साधा फोन नसावा...”
“आमच्या या मागणीसाठी आम्ही धरणं धरून बसलो आहोत. त्या एसडीओने (उप-विभागीय अधिकारी) म्हणे आमच्या गावाचं नावच कधी ऐकलं नाहीये. घ्या. बारगडमध्ये राहून असं बोलणं म्हणजे... अजब आहे. वर कडी म्हणजे अखेर पोलिसांनाच शेवटी हस्तक्षेप करावा लागला.” मदन भोईंना हसू आवरत नाही.
“पोलिसांना हे जिते जागते अध्वर्यू माहिती होते. एसडीओचं ‘ज्ञान’ पाहून तेही चक्रावले. ८० वर्षांपुढच्या या आंदोलकांच्या तब्येतीची पोलिसांना जास्त चिंता होती. प्रत्यक्षात, काही तास धरणं धरल्यानंतर पोलिस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला. तेव्हा कुठे दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत एक फोन देण्याचं कबूल केलं. बघू काय होतंय ते.”
पाणिमाराचे हे लढवय्ये परत एकदा लढा द्यायला सरसावले आहेत. इतरांसाठी; स्वतःसाठी नाही. एवढ्या मोठ्या लढ्यातून त्यांना स्वतःला असं काय मिळालं?
“स्वातंत्र्य,” चामरु उद्गारले.
तुमचं आणि माझं.
पूर्वप्रसिद्धी – मूळ लेखाचा भाग २ म्हणून द हिंदू सन्डे मॅगझिन, २७ ऑक्टोबर २००२. पहिला भाग – २० ऑक्टोबर २००२
छायाचित्रं – पी. साईनाथ
या
लेखमालेतील
इतर लेखः
इंग्रज सरकारला अंगावर घेणारी ‘सलिहान’
शेरपूरः कहाणी त्यागाची आणि विस्मृतीत गेलेल्या गावाची
गोदावरीः पोलिस अजूनही हल्ला होण्याची वाट पाहताहेत