नव्याने उभ्या राहणाऱ्या एका राष्ट्राच्या जाणिवांना कलाटणी देणारा प्रसंग होता जालियाँवाला बागेतील कत्तलीचा. आपल्यापैकी अनेकांना बालपणापासून हेच माहित होतं की भगतसिंगाची कहाणी इथूनच सुरू झाली – दहा वर्षांचा असताना तो तिथे गेला आणि त्याने एका बाटलीत तिथली रक्तात भिजलेली माती भरून आपल्या गावी नेली. त्याच्या बहिणीने आणि त्याने ती माती आपल्या आजोबांच्या बागेत एका ठिकाणी मिसळली आणि दरवर्षी त्या जागी फुलझाडे वाढवली.
१३ एप्रिल १९१९ रोजी पंजाबातील अमृतसरमध्ये हजार (इंग्रज म्हणतात ३७९) नि:शस्त्र नागरिकांच्या हत्येची टोचणी त्या मारेकऱ्यांच्या किंवा त्यांच्या नंतर आलेल्या सरकारांच्या सदसद्विवेकबुद्धीला लागलेली दिसत नाही. ब्रिटीश पंतप्रधान तेरेसा मे यांनी या आठवड्यात ब्रिटनच्या संसदेत खेद व्यक्त केला असला तरी या भयानक अत्याचाराबद्दल क्षमा मात्र मागितली नाही.
जालियाँवाला बागेला भेट देऊनही भावूक झाला नाहीत तर तुमचं काळीज दगडाचं आहे असंच म्हणावं लागणार. आज, १०० वर्षांनंतरही, त्या कत्तलीतील आक्रोश या बागेत ऐकू येतो. सुमारे ३५ वर्षांपूर्वी मी तिथे गेलो असता, न राहवून मी तिथल्या एका भिंतीवर या ओळी लिहिल्या –
आम्हा नि:शस्त्र लोकांवर त्यांनी हल्ला केला
गर्दी पांगली
त्यांनी लाठ्या काठ्या चालवल्या
आमची हाडं मोडली
त्यांनी गोळ्या झाडल्या,
अनेकांची आयुष्ये संपली
आमचं स्वत्व नाही मोडलं
त्यांचं साम्राज्य कोलमडलं
अनुवादः छाया देव