रूपेश्वर बोडो आम्हाला उत्साहाने हूलॉक गिबनच्या हावभावांची नक्कल करून त्यांचे किस्से सांगत आहेत. ते या प्रायमेटचा आवाज काढण्याचा प्रयत्न करतात आणि ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर कशा उड्या मारतात, हे हातवारे करून दाखवतात.
आम्ही बोडोंना लोहारघाट क्षेत्राधिकार कार्यालयात भेटलो; ते वन विभागात ड्रायव्हरचं काम करतात. मात्र, त्यांनी कधीच गिबन पाहिला नसल्याची ते कबुली देतात. "माझ्या घरातून बरेचदा माकडांची हुपहुप कानावर यायची. पण ते आमच्या गावाजवळ कधीच फिरकले नाहीत. आम्हाला दूरवरच्या डोंगरांतूनच त्यांचा आवाज ऐकू येतो," ते सांगतात. आसाममधील कामरूप जिल्ह्यातील त्यांचं गाव मुडुकी हे राणी वन क्षेत्राहून साधारण ३५ किमी दूर आहे.
मात्र, मागील वर्षी ८ डिसेंबर रोजी राणी वनक्षेत्राच्या नजीक असलेल्या बारदुआर राखीव जंगलात सफर करायला निघालेल्या गोआलपाडा फोटोग्राफिक सोसायटीच्या सदस्यांना वेस्टर्न हूलॉक गिबनची (हूलॉक हूलॉक) जोडी दिसून आली होती. स्थानिक बोलीत बोन मनुह अर्थात 'वन्यमानव' म्हणून ओळखलं जाणारी ही लांब हाताची वानरं आसाम-मेघालय सीमाक्षेत्रात क्वचितच पाहायला मिळतात.
ही गिबनची प्रजाती ईशान्य भारतातील राज्यं तसंच पूर्व बांगलादेश आणि वायव्य म्यानमारमधील जंगली भागांमध्ये वास्तव्याला असून आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या (आययूसीएन) संकटग्रस्त प्रजातींच्या लाल सूचीत समाविष्ट आहेत. ईस्टर्न हूलॉक गिबन (हूलॉक ल्यूकोनेडिस) ही प्रजात अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या पट्ट्यांमध्ये, आणि दक्षिण चीन आणि ईशान्य म्यानमारमध्ये वास्तव्याला असून आययूसीएनच्या सूचीत 'असुरक्षित' म्हणून नोंदवण्यात आली आहे.
"लांब व सडपातळ हात असलेली हूलॉक वानरं चपळ असून ती जमिनीवर क्वचितच पाय ठेवतात," असं वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर-इंडियाने नमूद केलंय . "ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर एक प्रकारची हालचाल करतात जिला बाहुगमन म्हणतात आणि ताशी ५५ किमी इतक्या वेगाने बाहुगमन करत ती सहा मीटरपर्यंतचं अंतर एकाच उडीत मागे टाकतात!"
गोआलपाडा फोटोग्राफी सोसायटीच्या (जीपीएस) छायानी-बारदुआर डेव्हलपमेंट ब्लॉकमधील पश्चिम कामरूप वन विभागाचा भाग असलेल्या बारदुआर जंगलात गिबन पाहिले असता त्यांनी या माकडांचे फोटो काढले. जीपीएसचे सदस्य आणि गोआलपाडा जिल्ह्यातील दुधनोई शहरातील एका प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले इंद्रनारायण कोच हे देखील त्या दिवशी तिथेच होते. त्यांनी गुवाहाटीतील एका स्थानिक वृत्त वाहिनीने प्रसारित केलेली त्यांच्या विक्रमाच्या वृत्ताची एक फित आम्हाला दाखवली. आम्ही त्यांना आसामच्या राजधानी दिसपूरहून साधारण ६० किमी लांब असलेल्या जुपांगबाडी क्रं. १ नावाच्या एका दुर्गम कसब्यात भेटलो होतो. ते काही तरुणांच्या मदतीने रान स्वच्छ करून एक पर्यावरणस्नेही शिबिर आयोजित करण्यात गर्क होते.
ही जमीन बिस्वजित राभा यांच्या घराला लागून आहे. गिबन पाहिलेल्या फोटोग्राफी समूहात तेही होते. स्थानिक हस्तकला कारागीर असलेल्या बिस्वजित यांची या 'महाकाय' प्राण्यांना पाहण्याची ही पहिलीच वेळ होती. "मी त्यांना इकडे [जुपांगबाडी क्रं. १ मध्ये] एकदाही पाहिलं नाही. हे फारच दुर्मिळ आहे. आम्ही त्यांना दाट झाडीत पाहिलं," ते म्हणतात.
"आम्ही चार-एक तास जंगलात फोटो काढत होतो. अजय राभाला [जीपीएसचा एक सदस्य] ३० फूट अंतरावर पानं आणि फांद्यांची सळसळ दिसून आली आणि त्याने आम्हाला इशारा केला. ते गिबन साल वृक्षांमध्ये होतं. आम्ही चाल करून गेलो तोच ते वानर वेगानं दूर पळालं, पण आम्ही पाहतो तर काय – एक काळं हूलॉक गिबन!" कामरूप जिल्ह्यातील चुकुनियापाडा गावचा २४ वर्षीय अभिलाष राभा म्हणतो. तो जीपीएसचा सदस्य असून डुक्करपालन करतो.
"आम्ही २०१८ पासून त्या भागात [बारदुआर] हूलॉक गिबन वानरांचा शोध घेत आहोत आणि अखेर डिसेंबर २०१९ मध्ये आम्हाला ती बघायला मिळाली,” बेंजामिन कामन म्हणतात. ते जीपीएसचे संस्थापक सदस्य असून शासकीय कृषि विज्ञान केंद्र, दुधनोई येथे मृदा व जल संरक्षण अभियांत्रिकीत तांत्रिक अधिकारी आहेत. “आम्ही गिबनचे हुत्कार ऐकले होते, पण त्यांचं चित्रण किंवा फोटो घेऊ शकलो नाही. आणि आता त्यांना पाहिलं असल्यामुळे यात सरकारने हस्तक्षेप करावा आणि या महाकाय प्राण्यांच्या संवर्धनासाठी काही तरी करावं अशी आमची इच्छा आहे," ते पुढे म्हणतात.
कामन म्हणतात की, बारदुआरपासून १२५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोआलपारा जिल्ह्यातील हुलू कांदा पहाड (‘ज्या डोंगरावर हूलॉक वानरांचं रडणं ऐकू येतं’) ही एकेकाळी गिबनची वस्ती होती. ते मूळ आसाममधील धेमाजी या पूरप्रवण जिल्ह्याचे आहेत. पुढे ते म्हणतात, “२०१८ मध्ये आम्ही हुलू कांदा जंगलाच्या अनेकदा वाऱ्या केल्या, पण त्याचा [वानराचा] पत्ता काही केल्या लागेना.” मेघालय-आसाम सीमेला लागून असलेल्या गोआलपारा जिल्ह्यातील रंगजुली तालुक्यातल्या खेड्यांमध्ये आणखी एका शोध मोहिमेत देखील त्यांना एकही गिबन दिसलं नाही.
गेल्या ३-४ दशकांत वेस्टर्न हूलॉक गिबनची संख्या वेगाने कमी होत चालली आहे – आसाममध्ये "अधिवास हानी आणि विभाजनामुळे" ८०,००० हून अधिक असलेल्या या वानरांची संख्या आता ५,००० हून कमी एवढी झाली आहे," प्रायमेट रिसर्च सेंटर नॉर्थईस्ट इंडियाचे डॉ. जिहोसुओ बिस्वास म्हणतात . आययूसीएनच्या लाल यादीनुसार , "ही प्रजात ३० वर्षांपूर्वी ईशान्य भारतातील सगळ्या जंगली पट्ट्यांमध्ये आढळून यायची, पण आता ती काही जंगल तुकड्यांपुरतीच मर्यादित आहे. त्यांची ईशान्य भारतातील एकूण संख्या १२,००० च्या घरात असून पैकी अंदाजे २,००० आसाम राज्यात आढळून येतात."
हूलॉक गिबनची भारताच्या वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या पहिल्या अनुसूचीत नोंद करण्यात आली असली तरीही आययूसीएनच्या लाल यादीत पाश्चिमात्य हूलॉक गिबनची संख्या कमी होण्यामागील काही कारणं नमूद केली आहेत: निवासी आणि व्यापारी विकास, बिगर-लाकडी पिकं जसं की चहाच्या मळ्यांची लागवड, खाणकाम आणि खनिज उत्खनन, आणि लाकूडतोड इत्यादी.
रस्ते व रेल्वे मार्गांमुळे झालेलं वन विभाजन आणि वनांचे तुकडे पडल्यांमुळे देखील समस्त ईशान्य भारतातील वन्यजीवांची हानी झाली आहे. हुलू पहाडमधील जंगल लहान होऊ लागलं तसं हूलॉक गिबन आपल्या अधिवासातून गायब होऊ लागले. भारतीय वन्य सर्वेक्षणाच्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०१९ या अहवालानुसार ईशान्य भारतातील वन आच्छादन २०१७ सालच्या क्षेत्रापेक्षा ७६५ चौ. किमीने कमी झालेलं दिसतं.
"वन विभाजनामुळे वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे, आणि हूलॉक गिबनसुद्धा त्याला अपवाद नाही," डॉ. नारायण शर्मा आम्हाला फोनवर सांगतात. ते कॉटन युनिव्हर्सिटी, गुवाहाटी येथे पर्यावरण जीवशास्त्र आणि वन्यजीव विज्ञान विभागात सहायक प्राध्यापक आहेत. बदलत्या लागवड पद्धती [मुख्यतः धान], चहाचे मळे आणि मानवी वस्तीचा विस्तार यांनीसुद्धा गिबनची संख्या नष्ट केली आहे. "जबरदस्ती केल्याशिवाय ते दूरवर स्थलांतर करत नाहीत. ते उष्णकटिबंधीय अविचल जंगलात राहतात आणि त्यांना जमिनीवर चालण्याची सवय नसते. घनदाट जंगलं नसतील तर वन्यजीवन समृद्ध होण्याची अपेक्षा करणं फोल ठरेल."
ईशान्य भारतातील काही भागांमध्ये गिबनची शिकार होत असे, मात्र डॉ. शर्मा यांच्या मते आसाममध्ये असं घडणं विरळाच. "ईशान्येतील काही भागांमध्ये, जसं की नागालँड, मांसाकरिता वानरांची शिकार व्हायची, मात्र आता हे फार क्वचित घडतं. मिझोराममधील काही जमातींच्या महिला [पूर्वी] हूलॉक गिबनची हाडं संधिवात नाशक आहेत असं मानून ती आपल्या पायांवर बांधत असत. म्हणून त्यांची मांसासाठी तसंच औषधी गुणांमुळे त्यांची शिकार व्हायची."
"त्यांना आपल्या जंगलात खायला काहीच उरलं नाहीये. म्हणून ते बरेचदा अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत येतात," नलिनी राभा म्हणतात. ते छायानी-बारदुआर तालुक्यामध्ये राजापाडा गावातील शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. "पण त्यांना [इथेही] खायला मिळत नाही. आमच्या इथे [अंगणात आणि शेतांमध्ये] फक्त पोमेलो, कमरख आणि सुपारीची काही झाडं आहेत. बघाल तिथे फक्त सागवान आणि चहाचे मळेच नजरेस पडतात. ते जाऊन जाऊन कुठे जातील?" गिबनच्या अन्न संकटाबद्दल हा वडीलधारा माणूस सवाल करतो.
एक वयस्क हूलॉक गिबन "कोवळी पानं, पिकली पानं, फुलं, फळं, देठ, कळ्या आणि पशूंचं मांसदेखील…" खातो, असं २०१७ मधील एका लेखात नमूद आहे. एकूण ५४ झाडांच्या प्रजातींव्यतिरिक्त "वर्षभराच्या भोजनकाळाचा सरासरी ५१% भाग … फळांनी व्यापला आहे. अशा फळप्रधान आहारामुळे या प्रजातीची लहान आणि वितरित जंगल पट्ट्यांमध्ये तगून राहण्याच्या क्षमतेवर मर्यादा येऊ शकतात."
"ते फार तणावात आहेत. त्यांना आपल्या वस्तीत माणसं आलेली अजिबात आवडत नाहीत," बेंजामिन कामन म्हणतात. "आम्हाला वाटतं की त्यांना एक संरक्षित वातावरण गरजेचं आहे." आम्ही जुपांगबाडी क्रं. १ मध्ये आहोत आणि छायाचित्रकारांसोबत सुरू असलेल्या आमच्या संभाषणाच्या आड येऊन एक गावकरी म्हणतो की तस्करांनी सारं काही नष्ट केलंय. "त्यांनी [सागवान आणि सालासारखी] सगळी जुनी झाडं छाटून ती बाहेर विकून टाकलीयेत. त्यांना फक्त पैसा दिसतो," तो म्हणतो.
"बहुतांश लाकडाची तस्करी रानी-मेघालय मार्गावरून होत असते. राज्याच्या काही जंगली भागांची सीमा शेजारच्या मेघालय राज्याला लागून आहे, आणि म्हणून तस्करांना लाकडाचे ओंडके वाहून नेऊन त्या राज्यातील जंगलांमधील [अवैध] लाकूड कारखान्यांना पुरवणं सहज शक्य होतं," इंद्रनारायण सांगतात.
जंगलांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी शासन काही पावलं उचलतंय, असं वाटतं. राज्य शासनाच्या एका संकेतस्थळावर शासन सध्या "जंगली परिसंस्थेचा पुनरुद्धार करण्यासाठी वन व जैवविविधता संवर्धनासाठीचा आसाम प्रकल्प लागू करत आहे" असं नमूद केलंय. शिवाय, आसाममध्ये २० अभयारण्यं आणि पाच राष्ट्रीय उद्यानं आहेत. पैकी, जोरहाट जिल्ह्यातील हूलाँगापार राखीव जंगलाचा १९९७ मध्ये हूलाँगापार गिबन अभयारण्यात श्रेणीसुधार करण्यात आला.
पण हे सगळे अधिकाधिक प्रमाणात विभाजित जंगली पट्टे आहेत, जिथे गिबन नजरेस पडणं फार दुर्मिळ झालंय. लोहारघाट क्षेत्राधिकार कार्यालयात फॉरेस्ट रेंजर असलेल्या शंतनू पटवारी यांनी आम्हाला फोनवर सांगितलं की त्यांच्या अखत्यारीत असलेल्या बारदुआर राखीव जंगलात त्यांनी अथवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एकही गिबन पाहिलं नाही.
दरम्यान, इंद्रनारायण आणि बिस्वजित राभा इतरांना निसर्गाच्या सान्निध्यात कसं राहावं आणि जंगलाचा आणि त्यातील रहिवाशांचा आदर कसा करायचा हे शिकवण्यासाठी आपलं पर्यावरणप्रेमी शिबिर उभारण्याच्या तयारीत आहेत. राज्यात फोफावत चाललेल्या, मोठ्या आवाजात गाणी लावणाऱ्या आणि रात्रीच्या अधारात प्रखर प्रकाश झोताचा वापर करणाऱ्या वन्यजीव शिबिरांपेक्षा त्यांचं शिबिर वेगळं असायला हवंय.
अनुवादः कौशल काळू