जेव्हा शिक्षकाच्या जागी पारी असतं आणि विषय असतो ग्रामीण भारत तेव्हा शिकणं असतं खरंखुरं, प्रत्यक्षात दिसणारं आणि चिरंतन.

आमच्यासोबत इंटर्नशिप करणाऱ्या आयुष मंगलचंच उदाहरण घ्या. पारीसोबत काम करत असताना त्याने छत्तीसगडच्या आदिवासींना आरोग्यसेवांपर्यंत पोचण्यात येणारे अडथळे समजून घेतले आणि झोला छाप डॉक्टरांच्या दुनियेत डोकावण्याचा प्रयत्न केला. “खाजगी आणि सार्वजनिक सेवा, पात्र आणि अपात्र डॉक्टर आणि त्यांचे रुग्ण यांच्यामधलं नातं सरळसाधं नाही हे मला उमजलं. आणि धोरण ठरवताना या गुंतागुंतीचा विचार करावाच लागणार हेही,” आयुष सांगतो. तो छत्तीसगडच्या जांजगीर चंपा जिल्ह्याचा रहिवासी असून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतोय.

आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये उल्लेखही नसलेल्या परिघावरच्या लोकांविषयी ही तरुण मुलं जाणून घेतायत. ओडिशातल्या कोरापुटमधल्या गौरासारख्या अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींसाठी शासकीय योजनांचा लाभ घेताना किती अडथळे येऊ शकतात हे पत्रकारितेची विद्यार्थिनी असणाऱ्या सुभश्री मोहापात्राला समजलं ते पारीसोबत काम करत असताना. आणि मग ती प्रश्न विचारते, “गौराला इतका शारीरिक आणि मानसिक त्रास झाला त्याला शासनाचा अभावच जबाबदार आहे की नाही?”

सप्टेंबर २०२२ मध्ये पारीमध्ये शिक्षणासंबंधी काम करणाऱ्या पारी एज्युकेशनला पाच वर्षं पूर्ण झाली. या काळात कॉलेज, विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या, सामाजिक बदलासाठी काम करणाऱ्या संघटनांमधल्या तरुण मुला-मुलींमध्ये तसंच अगदी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही साध्यासुध्या माणसांकडे किती विविध प्रकारची कौशल्यं आणि ज्ञान असतं याची सखोल जाण तयार झाली आहे. आणि त्यासोबतच त्यांच्या आयुष्यातले ताण तणाव, सुख-दुःखंसुद्धा त्यांनी जवळून पाहिली आहेत. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये धान झूमर बद्दल जाणून घेतल्यानंतर माध्यमिक शाळेत शिकणारा प्रज्वल ठाकूर म्हणतो, “सणवारांमध्ये शेतकऱ्यांचं स्थान किती तसंच धान किती मोलाचं आहे हे मला अधिक समजून घेता आलं. पारी एज्युकेशनसोबत काम करत असताना मी राहतो त्या समाजाबद्दल मला नवा दृष्टीकोन मिळाला.”

व्हिडिओ पहाः ‘पारी एज्युकेशन नक्की काय आहे?’

शंभराहून अधिक ठिकाणांहून आपल्या शाळा आणि विद्यापीठाच्या प्रकल्पाचा भाग म्हणून ते सध्या सुरू असलेल्या घडामोडींमध्ये भाग घेतायतः दिल्लीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन असो किंवा देशभरातल्या गरीब-वंचित घटकांवर होणारा कोविड-१९ चा परिणाम असो. स्थलांतरित कामगारांच्या आयुष्याचा मागोवाही ते घेत आहेत.

पत्रकारितेचा विद्यार्थी असणाऱ्या आदर्श प्रदीपने कोची मध्ये कॅनॉलच्या किनाऱ्यावर राहत असलेल्या लोकांची दुर्दशा पाहिली. कालव्याचं काळंभोर पाणी त्यांच्या घरांमध्ये शिरत असल्याने सगळे उंचावरच्या भागात निवारा शोधतायत हे पाहून त्याने आपलं घर सोडावं लागणाऱ्या या लोकांचं वार्तांकन केलं. तो म्हणतो, “पारीसोबत काम करत असताना मी कित्येक गोष्टी शिकलोः सरकारी स्रोतांमधून विश्वासार्ह आकडेवारी कशी गोळा करायची, बारीक बारीक तपशील कसे शोधायचे, इत्यादी. हा खूप काही शिकवणारा अनुभव तर होताच पण सोबत मी ज्यांच्याविषयी संशोधन करत होतो त्यांच्याशी माझी जास्त जवळीक निर्माण झाली.”

वंचित, परिघावरच्या लोकांच्या समस्या विद्यार्थी स्वतः पाहतात आणि आपल्या भाषेत त्याविषयी वार्तांकन करतात. विद्यार्थी मुळातून हिंदी, ओडिया आणि बंगाली भाषेत लिहितायत. पारीने आयोजित केलेल्या एका कार्यशाळेत सहभागी झालेल्या बिहारच्या गया जिल्ह्यातल्या सिंपल कुमारीला मोराबद्दल लिहिण्याची प्रेरणा मिळाली. हिमाचल प्रदेशच्या कांग्रा जिल्ह्यात आशा कार्यकर्ती असणारी दलित समाजाची मोरा शेतकरी आहे, वॉर्डची नगरसेवक देखील आहे.

PHOTO • Antara Raman

भारतभरातल्या ६३ ग्रामीण आणि शहरी भागांतल्या संस्था-शाळा-महाविद्यालयांमधले विद्यार्थी आज पारीसोबत विविध गोष्टी नोंदवतायत, वार्तांकन करतायत

पारी एज्युकेशनच्या वेबसाइट वर आजच्या तरुण मुला-मुलींनी लिहिलेल्या २०० हून जास्त गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतील. माध्यमांमध्ये एरवी ज्यांच्याविषयी काहीही लिहून येत नाही अशा साध्यासुध्या माणसांबद्दल ही मुलं लिहितायत आणि ते करत असतानाच सामाजिक, आर्थिक, लिंगभाव आणि इतरही अनेक क्षेत्राच्या संदर्भात न्यायाची संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करतायत.

दिल्लीच्या एका छोट्याशा कारखान्यात काम करणाऱ्या स्थलांतरित कामगाराची दुनिया समजून घेत त्यांची गोष्ट लिहिणारी विद्यार्थी परवीन कुमार म्हणते, “मला आता हे कळतंय की लोकांच्या समस्या कधीच त्यांच्या एकट्याच्या किंवा त्यांच्यापुरत्या नसतात. त्या समस्यांची मुळं बाकी समाजामध्येच आहेत. एखाद्याला आपलं गाव सोडून कामाच्या शोधात शहरात यावं लागतं ही अख्ख्या समाजाने, राज्याने आणि देशाने विचार करण्याची बाब आहे.”

शोध घेत, इतरांशी संवाद साधत, सम-अनुभूतीतूनच आपली समाजाविषयीची समज तयार होत असते. पारी एज्युकेशनसोबतचं हे शिक्षण संपूर्ण आयुष्यभर तुमच्यासोबत राहणारं शिक्षण आहे.

आपल्या विद्यार्थ्यांशी ज्यांची नाळ जोडलेली आहे तेच सगळ्यात उत्तम शिक्षक असतात. आजच्या तरुणाईची नाळ ग्रामीण भारताशी जोडून पारी देखील अगदी तेच करतंय.

पारी एज्युकेशनच्या टीमशी [email protected] या ईमेलवर संपर्क साधू शकता.

शीर्षक छायाचित्रः बिनायफर भरुचा

अनुवादः मेधा काळे

PARI Education Team

हम ग्रामीण भारत और हाशिए के समुदायों पर आधारित कहानियों को स्कूली शिक्षा पाठ्यक्रमों का हिस्सा बनाने की दिशा में काम करते हैं. हम उन युवाओं के साथ मिलकर काम करते हैं जो अपने आसपास के मुद्दों पर रपट लिखना और उन्हें दर्ज करना चाहते हैं. हम उन्हें पत्रकारिता की भाषा में कहानी कहने के लिए प्रशिक्षित करते हैं और राह दिखाते हैं. हम इसके लिए छोटे पाठ्यक्रमों, सत्रों और कार्यशालाओं का सहारा लेते हैं, साथ ही साथ ऐसे पाठ्यक्रम तैयार करते हैं जिनसे छात्रों को आम अवाम के रोज़मर्रा के जीवन और संघर्षों के बारे में बेहतर समझ मिल सके.

की अन्य स्टोरी PARI Education Team
Translator : Medha Kale

मेधा काले पुणे में रहती हैं और महिलाओं के स्वास्थ्य से जुड़े मुद्दे पर काम करती रही हैं. वह पारी के लिए मराठी एडिटर के तौर पर काम कर रही हैं.

की अन्य स्टोरी मेधा काले