लक्ष्मीबाईंचं कसब मागणीवाचून अधांतरी

'पारी' स्वयंसेवक संकेत जैन याला भारतभर ३०० गावांत जायचंय आणि इतर गोष्टींसोबतच ही मालिका तयार करायची आहे: गावातील एखाद्या दृश्याचं किंवा प्रसंगाचं छायाचित्र आणि त्याच छायाचित्राचं एक रेखाचित्र. हे 'पारी'वरील मालिकेतलं नववं पान. पूर्ण छायाचित्र किंवा रेखाचित्र पाहण्यासाठी पट्टी सरकवा.

“मी कधीही धागे कातायचं थांबवणार नाही,” लक्ष्मीबाई धनगर आपल्या चरख्याकडे हसून पाहतात आणि म्हणतात. आता सत्तरीच्या असणाऱ्या लक्ष्मीबाई गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मेंढीच्या लोकरीपासून धागा कातत आहेत. त्यांच्याकडे विलक्षण कौशल्यं आहेत - ज्याला बाजारपेठ नाही.

पूर्वी, त्या दिवसाचे १० तास धागे कातायच्या. “माझ्या सासूनं मी [जवळपास १५ वर्षांची असताना] लग्न होऊन आले तेव्हाच १२ पोती [अंदाजे १२० किलो] मेंढ्यांचे केस भरून ठेवली होती,” लक्ष्मीबाई आठवून सांगतात. “रोज ८ ते १० तास कष्ट करून, मला त्या १२ पोत्यांतील धागा कातायला मला सहा महिने लागले,” त्या म्हणतात. आता मात्र दिवसाचे दोन तासच त्या हे काम करतात.

लक्ष्मीबाई धनगर आहेत. धनगर ही परंपरेने शेळ्यामेंढ्या पाळणारी जमात आहे, महाराष्ट्रात भटकी जमात म्हणून वर्गीकृत. त्या कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील अडूर गावात राहतात. इथे, वर्षातून दोनदा मेंढ्या भादरल्या जातात, त्यांची लोकर आणि केस काढले जातात. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दिवाळी झाल्यावर आणि एप्रिल-मी महिन्यात अक्षय्य तृतीयेनंतर.

“जमाना झाला, केवळ बायाच सूत काततात अन् गडी मेंढ्या भादरतात आणि दूधही काढतात,” लक्ष्मीबाई म्हणतात. परंपरेने, केवळ गडीच गुरांना चरायला घेऊन जात असत, आजकाल स्त्रियादेखील त्यांच्या सोबत जातात.

खरखरीत केस मशीनवर मऊ आणि एकसारखे बनवण्यासाठी धनगरांना किलोमागे ८ रुपये खर्च येतो. हे काम आसपासच्या गावातील लोक करून देतात. पूर्वी, हे काम धनुष्याच्या आकाराची लाकडी अवजारं वापरून स्त्रियाच करत असत.

मऊ केसांना चरख्यावर कातून त्याचा धागा बनवतात. तयार धागा सनगरांकडे (हातमागाने लोकर विणण्यात कुशल असलेली धनगरांची एक पोट-जात) सुपूर्त केला जातो. सनगर गडी त्यापासून घोंगड्या बनवतात. ७.५ बाय २.५ फूट घोंगडी विणण्यासाठी सनगरांना ४०० रुपये आणि सहा किलो लोकरीचा धागा द्यावा लागतो. धनगर बाया अनेक तासांच्या मेहनतीचा खर्च धरून १,३०० रुपयाला एक या भावाने घोंगड्या विकतात.

तीन महिने होऊनही विकल्या न गेलेल्या एका घोंगडीकडे बोट दाखवून त्या म्हणतात, “१,३०० रुपयांना घोंगडी विकणं आता कठीण झालं आहे. [यंत्र-निर्मित] बेडशीट फक्त ५०० रुपयांना पडते आणि एक घोंगडी बनवण्यामागे लागणारी मेहनत काही लोकांना कळायची नाही.” दशकभरापूर्वी, ते महिन्याला ४ घोंगड्या विकत असत. आता तो आकडा एकावर येऊन ठेपलाय.

पूर्वी कळंबे तर्फ काळे, भामटे, चुये, कोपर्डे (सगळी कोल्हापूर जिल्ह्यातील गावं) येथून लोक त्यांच्या घरी घोंगड्या विकत घ्यायला येत असत. “आता फक्त म्हातारी मंडळीच घोंगड्या विकत घेतात,” त्या म्हणतात.

“तीन दशकांपूर्वी, माझ्या गावातल्या जवळपास ३० धनगर बाया धागे कातायच्या. आता आम्ही डझनभर जणी उरलो आहोत,” लक्ष्मीबाई अंदाज लावतात. हा ऱ्हास होण्यामागची मुख्य कारणं : अपुरी मिळकत, म्हातारपण आणि घोंगड्यांची कमी होत चाललेली मागणी.

तासन् तास धागे कातून, शेतात राबून आणि घोंगड्या विकूनसुद्धा लक्ष्मीबाईंची महिन्याची मिळकत ५,००० रुपयेही भरत नाही. साधारण दशकभरापूर्वी त्या दर हंगामात अडूर गावातील इतरांच्या शेतावर शेतमजुरी देखील करायच्या. रोज ८ तासाच्या कामाचे त्यांना १०० रुपये मिळत असत. “माझे मायबाप पण शेतमजुरी करायचे अन् मला शाळेत पाठवणं त्यांना परवडणारं नव्हतं,” त्यांना आठवतं.

दर वर्षी, त्यांचे पती शामराव धनगर, वय ७५, जवळपास २०० शेळ्या-मेंढ्या पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यांतील गावांमध्ये चरायला घेऊन जात असत. पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची चाहूल लागताच धनगर लोक तीन महिने (जून ते सप्टेंबर) भटकंती करतात.

शामराव आणि लक्ष्मीबाई यांची दोन मुलं, बीरदेव, वय ३५ आणि सुरेश, वय ४०, यांच्या मालकीच्या मिळून फक्त ६४ मेंढ्या आणि ६ शेळ्या आहेत. जितराब कमी होतंय त्याबद्दल शामराव म्हणतात, “आजकाल गायरानावरही लोकं उसाची लागवड करतात - आणि शेतकरी आम्हाला त्यांच्या शेतात शिरू देत नाहीत. गुरांना चरायला घेऊन जाणं आताशा लई मुश्किल झालंय.”

त्यांच्या मुली, भारती, वय ४० आणि तिशीतली संगीता दोघींची लग्नं झाली आहेत. पैकी भारतीने सूत कातायचं चालू ठेवलं आहे. “माझी सून म्हणत राहते: 'मला काही हे जमायचं नाही. यापेक्षा शेतमजुरी देखील परवडली',” लक्ष्मीबाई म्हणतात. तरुण पिढीतील लोक नव्या संधी आजमावून पाहत आहेत. उदा. मिळालं तर कारखान्यांत काम करणं, इ..

लक्ष्मीबाई यांचं स्वतःचं चरख्यावरचं काम आताशा रोज दोन तासांवर येऊन ठेपलंय. त्यांच्याकडच्या कौशल्याला असणारी मागणी तर कमी झालीच आहे, शिवाय त्यांची पाठदुखीही वाढत चाललीये हे आणखी एक कारण. “उद्याची पिढी काही हे काम करायची नाही. आमच्या घोंगड्यांना- आमच्या मेहनतीला - बरा भाव मिळावा हेच माझं स्वप्न आहे,” त्या म्हणतात.

अनुवाद: कौशल काळू

Sanket Jain

संकेत जैन, महाराष्ट्र के कोल्हापुर में रहने वाले पत्रकार हैं. वह पारी के साल 2022 के सीनियर फेलो हैं, और पूर्व में साल 2019 के फेलो रह चुके हैं.

की अन्य स्टोरी Sanket Jain
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

की अन्य स्टोरी कौशल कालू