“त्याला दिसत नाही, तरी तो तुमच्याकडे पाहतोय बरं,” मदनलाल मुरमू मला सांगतो. त्या चमकणाऱ्या, सोनेरी पिवळ्या डोळ्यांनी माझा ताबाच घेतला होता – त्या अवकळा आलेल्या चिखल-धुळीने भरलेल्या वातावरणामध्ये इतक्या विलक्षण रंगाचं तेवढं एकच काही तरी होतं. मी फोटो घ्यायला म्हणून जरा जवळ सरकताच त्याने मान फिरवली. मी पण त्या बाजूने गेले आणि फोटो काढलाच.

मदनलालने त्यांना खुणावत काही तरी विशिष्ट आवाज काढला आणि त्यांनी खरंच त्याला प्रतिसाद दिला. मदनलालने हसत माझी त्यांच्याशी – त्याच्या दोन पाळलेल्या घुबडांशी ओळख करून दिली – सिधू मुरमू आणि कान्हू मुरमू. “ते आमच्या कुटुंबातलेच एक आहेत,” त्याने सांगितलं.
PHOTO • Shreya Katyayini

मी बिहारच्या बांका जिल्ह्यात चिहुतियाला निघाले होते. एखादी गोष्ट/कहाणी मिळते का हे शोधत असतानाच मला मदनलाल भेटला. जमिनीवर बसून कुंचे विणण्यात मग्न. आम्ही काही काळ बोललो आणि त्यानंतर तो मला सोडायला त्याच्या वस्तीच्या वेशीपर्यंत आला. तिथे त्याच्या घरातली ती दोन घुबडाची पिलं माझ्याकडे वळून पाहत होती. (घुबडांना दिवसा दिसत नाही हा गैरसमज आहे. त्यांना खरं तर दिवसाच्या मानाने रात्री जास्त चांगलं दिसतं.)

PHOTO • Shreya Katyayini

या दोघा पिलांची नावं आहेत – सिधू आणि कान्हू, १८५५ मध्ये इंग्रजांच्या विरोधात संथाळांच्या उठावाचे विख्यात नेते. ते दोघंही मुरमू जमातीचे – मुरमू ही एक संथाळी जमात आहे. (मदनलालने मला सांगितलं की तिलका मांझी आणि त्याचं आयुष्ही त्याला फार प्रेरणा देतं. मांझी एक आदिवासी पुढारी होता ज्याने १७८४ मध्ये इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र बंड केलं होतं. १८५७ मध्ये मंगल पांडेने केलेल्या उठावाच्या कितीतरी आधी.)

PHOTO • Shreya Katyayini

मदनलाल चाळिशीतला आहे, संथाळ जमातीचा. त्याच्या मालकीची जमीन नाही. तो आणि त्याची पत्नी एका छोट्या मातीच्या आणि गवताने शाकारलेल्या झोपडीत राहतात. बिहारच्या बांका जिल्ह्यातल्या काकवारा टोलाच्या चिहुतिया गावाजवळ वन विभागाच्या जागेवर त्याची ही झोपडी आहे.

तो घराजवळ उगवणाऱ्या कुशा गवतापासून कुंचे विणतो आणि जवळपासच्या गावांमध्ये चाळीस रुपयाला एक असे विकतो. पेरणी आणि कापणीच्या वेळी मदनलाल आजूबाजूच्या गावांमध्ये मजुरीही करतो.

हे इतके अनोखे पाळीव पक्षी तुम्हाला सापडले तरी कुठे, मी विचारलं. “असंच एकदा मी जंगलात लाकूडफाटा आणायला गेलो होतो,” मदनलाल सांगतो. “मला ही दोघं तिथे सापडली आणि मग मी त्यांना सोबत आणलं.”

“आम्ही त्यांची फार काळजी घेतो बरं. आणि ते फार शुभ आहेत, लक्ष्मीचं वाहन असतं ना घुबड,” शेजारच्या झोपडीबाहेर बसलेले मदनलालचे शेजारी म्हणतात. मुरमूनेही होकार भरला. भरीस भर मोठी झाल्यावर या पक्ष्यांना चांगली किंमत मिळू शकते.

कान्हू आणि सिधू आता महिन्याचे झालेत आणि दोघांचं वजन आताच किलोभर आहे, मदनलाल सांगतो. “ते अजून खूप मोठे होतील, खूप देखणे आणि चांगलेच वजनदार,” त्यांच्याकडे प्रेमाने पाहत मदनलाल मला सांगतो. या पक्ष्यांचे पंख, आता पिलं असले तरी खूप मोठे असतात. आता तर ते उडण्याइतके मोठेही नाहीत आणि त्यांना पिंजऱ्यातही ठेवलेलं नाही. त्यांचे पाय मात्र दिसायला एकदम मजबूत आहेत.

व्हिडिओ पहाः हे आहेत मुरमू

पूर्ण वाढ झाली की त्यांचं वजन अंदाजे ६-७ किलो भरेल असा मदनलालचा अंदाज आहे. तसं खरंच झालं तर सिधू आणि कानू आकाराने खरंच भले मोठे असतील. साधारणपणे घुबडांचं वजन तीन किलोच्या घरात भरतं. त्यांच्या मानाने खरंच चांगलेच वजनदार असतील ते..

कान्हू आणि सिधूचा आहार मांसाहारी आहे. “मी त्यांना थोडा भात देतो, पण त्यांच्या सगळ्यात आवडीचे म्हणजे किडे-कीटक,” मदनलाल सांगतो. त्याच्या अंदाजानुसार अजून महिनाभरात ते उंदरासारखी जरा मोठी शिकार करायला लागतील.

PHOTO • Shreya Katyayini

गावात कुणी घुबड पाळणं तसं काही नवं नाही. या आधी देखील दलालांनी या पक्ष्यांसाठी चांगली किंमत दिली आहे. यावेळीही दलाल यांच्यासाठी ५०-६०,००० रुपये देतील असा मदनलालचा अंदाज आहे. नंतर त्यांचं काय होईल हे काही तो सांगू शकत नाही. “मला नक्की काही माहित नाही, डॉक्टर लोक त्यांच्या किडन्या वापरतात बहुतेक... डॉक्टर प्रयोगासाठी घुबडं वापरतात. [प्रयोगशाळेत]”

तर अखेर, सिधू आणि कान्हूची झेप परत एकदा अर्ध्यातच थांबेल. यावेळी मात्र त्याला त्यांचेच गाववाले जबाबदार असतील.

Shreya Katyayini

श्रेया कात्यायिनी एक फ़िल्ममेकर हैं और पीपल्स आर्काइव ऑफ़ रूरल इंडिया के लिए बतौर सीनियर वीडियो एडिटर काम करती हैं. इसके अलावा, वह पारी के लिए इलस्ट्रेशन भी करती हैं.

की अन्य स्टोरी श्रेया कात्यायिनी
Translator : Medha Kale

मेधा काले पुणे में रहती हैं और महिलाओं के स्वास्थ्य से जुड़े मुद्दे पर काम करती रही हैं. वह पारी के लिए मराठी एडिटर के तौर पर काम कर रही हैं.

की अन्य स्टोरी मेधा काले