तर, ही गोष्ट आमच्याकडून राहूनच गेली . पण त्यासाठी पारीचे वाचक आणि चाहते मला नक्कीच माफ करतील.  पारीच्या नियमित वाचकांना आपलं सर्वांत लोकप्रिय गाणं  आता चांगलंच पाठ झालं असणार : बटाट्याचं गाणं. हे गाणं एका लहानशा आदिवासी विकास प्रकल्प शाळेतल्या  (इयत्ता १ ली ते ४ थी) ८ ते ११ वयोगटातल्या  पाच  शाळकरी मुलींनी  गाऊन दाखवलं होतं.  केरळातील इडुक्कीच्या डोंगरातल्या सर्वांत दुर्गम भागातली आणि एकमेव आदिवासी पंचायत असलेल्या ईडमालकुडीतली ही शाळा.

आम्ही आठ जण तिथे पोचलो आणि विद्यार्थ्यांना आवडता विषय कोणता असं विचारताच  सर्व विद्यार्थ्यांनी एकमुखानं "इंग्रजी" असं उत्तर दिलं. ही अशा प्रदेशातली मुलं जिथे शाळेच्या बाहेर  एकाही बोर्डावर एकही इंग्रजी शब्द आढळणं मुश्किल आहे. बघू तरी तुमचं इंग्रजी किती चांगंलं आहे असं आव्हान देताच त्यांनी  चक्क इंग्रजी गाणीच गायली.

मुलींनी सादर केलेले बटाट्याचं गाणं  हे पारीचं सर्वांत लाडकं गाणं आहे.  पण त्या वेळी अजून एक गीत सादर केलं गेलं होतं, जे आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मुलींनी  'बटाटयाचं गीत' उत्तमरित्या सादर  केल्यानंतर, आम्ही मुलांकडे होरा वळवला.  मुलींनी तुम्हाला अगदीच खाऊन टाकलंय. त्यामुळे तुम्हीपण काही तरी सादर करायला पाहिजे असं म्हणून आम्ही त्यांना त्यांचं इंग्रजी कसंय ते दाखवायला सांगितलं.

मुलांना माहीत होतं की, मुलींच्या पंचकडीने सादर केलेल्या गाण्याची बरोबरी करणं शक्य नाही. तरीही   मोठ्या धैर्याने त्यांनी आव्हान  स्वीकारलं. गायनाचा दर्जा किंवा सादरीकरण सगळ्यातच मुलांचं गाणं डावं ठरलं. पण त्यांच्या गाण्याचे शब्द, त्यातला चक्रमपणा – त्यांची तुलना मात्र कशाशीच होऊ शकत नाही.

ज्या गावात कोणी बटाटा खात नाही, कोणी इंग्रजीतही बोलत नाही, तिथल्या शाळेतल्या मुलींनी बटाट्याच्या सन्मानार्थ इंग्रजीत गीत गायलं. तर मुलांनी इंग्रजीतून एका डॉक्टरला साकडं घातलं. (इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दहा वर्षांपासून पूर्ण-वेळ सेवा देणारा एकही डॉक्टर वैद्य नाही). भारताच्या बहुतांश ग्रामीण आणि नागरी भागात, डॉक्टर आणि शल्यविशारद यातला  फरक बहुतेकांना माहित नसतो. त्यांच्यासाठी या दोनही व्यक्ती सारख्याच आणि दोघांसाठी एकच शब्द आहे, तो म्हणजे 'डॉक्टर'. आधुनिक अॅलोपॅथिक वैद्यकावरचा या प्रार्थनेतला विश्वासही मनाला स्पर्श करून जातो.



गुड मॉर्निंग , डॉक्टर ,
माझ्या पोटात दुखतंय , डॉक्टर
माझ्या पोटात दुखतंय , डॉक्टर
मला तपासा , डॉक्टर
मला तपासा , डॉक्टर
मला तपासा , डॉक्टर
ऑपरेशन
ऑपरेशन
ऑपरेशन , डॉक्टर
थॅन्क यू , डॉक्टर
थॅन्क यू , डॉक्टर
थॅन्क यू , डॉक्टर
बाय बाय , डॉक्टर
बाय बाय , डॉक्टर
बाय बाय , डॉक्टर
बाय बाय , डॉक्टर

आपल्या भन्नाट  ' बटाट्याचं गाणं' प्रमाणेच, ही छोटीशी फिल्मदेखील पारीचे तांत्रिक संपादक सिद्धार्थ आडेलकर यांनी मोबाइल फोनवर  चित्रित केली. अशा गावात जिथे फोनला नेटवर्क नाही, जिथे बटाटा पिकत नाही आणि खाल्लाही जात नाही, जिथे कुणी इंग्रजी बोलत नाही आणि अशा पंचायतीत जिथे आजवर डॉक्टर फिरकलेलेच नाहीत.  पण, देशाच्या बहुतेक भागात इंग्रजी अशीच शिकविली जाते. भारतीय द्वीपकल्पातली ही एक दुर्गम आणि इतर जगाशी फारशी संपर्क नसणारी पंचायत. इथल्या या गावात मुलांपर्यंत गाण्याचे हे शब्द पोचले तरी कसे हे आमच्यासाठी एक न सुटलेलं कोडंच आहे.

पी. साईनाथ, पीपल्स ऑर्काइव ऑफ़ रूरल इंडिया के संस्थापक संपादक हैं. वह दशकों से ग्रामीण भारत की समस्याओं की रिपोर्टिंग करते रहे हैं और उन्होंने ‘एवरीबडी लव्स अ गुड ड्रॉट’ तथा 'द लास्ट हीरोज़: फ़ुट सोल्ज़र्स ऑफ़ इंडियन फ़्रीडम' नामक किताबें भी लिखी हैं.

की अन्य स्टोरी पी. साईनाथ
Translator : Medha Kale

मेधा काले पुणे में रहती हैं और महिलाओं के स्वास्थ्य से जुड़े मुद्दे पर काम करती रही हैं. वह पारी के लिए मराठी एडिटर के तौर पर काम कर रही हैं.

की अन्य स्टोरी मेधा काले