पारीवरच्या ओवी संग्रहातल्या या सहा ओव्यांमधल्या एका ओवीतली ही गाईची लेकरं म्हणजे शेतकरी आणि त्याचं जितराब. पुणे जिल्ह्यातल्या निमगाव केतकीच्या फुलाबाई भोंग पाऊस न पडल्यामुळे सारे कसे चिंतेत आहेत ते तर सांगतातच पण पाऊस पडल्यावर कसा आनंद पसरतो तेही मांडतात.
ओवी संग्रहातल्या या वेळच्या ओव्या पावसाशिवाय कसं वाटतं आणि पाऊस आल्यावर काय स्थिती होते ते सांगतात. फुलाबाईंच्या खर्जातल्या या ओव्या अतिशय गोड आणि ओठावर पटकन रुळणाऱ्या आहेत.
पहिल्याच ओवीत फुलाबाई मेघराजाचे आभार मानतायत. त्या म्हणतायत, तू असाच पडत रहा म्हणजे माझ्या बैलाला तासाला पाणी प्यायला मिळेल. त्याला तळ्याला जायची गरज नाही.
दुसऱ्या ओवीत फुलाबाई म्हणतात मेघराजाने काळी घोडी सजवलीये (काळे ढग) आणि ती काळी घोडी पाहून पृथ्वी हर्षोल्लासाने वेडी झालीये.
तिसऱ्या ओवीत पृथ्वी आणि पाऊस यांची तुलना कामिनी म्हणजे बाई आणि तिच्या भरताराशी म्हणजे पतीशी केली आहे. फुलाबाई म्हणतात, पाऊसपाणी नाही, तर साऱ्या जमिनीचं तेजच हरवून गेलंय. भरताराशिवाय बाईला काहीच मोल नाही अगदी तसंच. एखाद्या अविवाहित किंवा विधवा बाईपेक्षा लग्न झालेलीला समाजात जास्त मान दिला जातो हे ग्रामीण आणि खरं तर देशभरातलं वास्तव या ओळींमध्ये चपखलपणे वर्णन केलंय.
जेव्हा पाऊस वेळेवर बरसत नाही, तेव्हा फुलाबाई मेघराजाला प्रश्न करतात, तुझ्या मनात नक्की काय चाललंय? रानात गायीची लेकरं – शेतकरी आणि जितराबं – दोघंही हात जोडून तुझा धावा करतायत. पाऊस पाणी नाही म्हणून सारी दुनियाच गांजली आहे, चिंतेत आहे. गायीच्या या लेकरांना आता रोजे धरल्यावाचून, उपास करण्यावाचून पर्याय नाही.
शेवटच्या म्हणजेच सहाव्या ओवीत पाऊस पडून गेल्यावर किती छान वाटतं ते फुलाबाई सांगतात. त्या मेघराजाला म्हणतात, की तू पडत रहा. साऱ्या माळावर पाणी पाणी होऊ दे. मेंढ्यांची आणि बायांची बाळं तान्ही आहेत. त्यांना पाणी मिळू दे, त्यांची तहान भागू दे.
पड पड तू मेघराजा, आत्ता पडूनी बरं केलं
नेनत्या राघूबाचं, नंदी तासाला पाणी पेलं
अगं पड तू मेघराजा यानं सजवीली काळी घोडी
यानं सजवीली काळी घोडी, सारी पिरतीम झाली येडी
पावूस पाणी नाही त्याज नाही त्या जमिनीला
भरतारावाचूनी वजं नाही त्या कामीनीला
असा पावूस पाणी नाही, कायी तुझ्या रे मनामंदी
गायीच्या बाळाईनी हात जोडीले रानामंदी
असा पावुस पाणी नाही, सरवी दुनीया गांजयली
अग गायीच्या बाळायानी, कशी रोजना मांडीयली
पड पड तू मेघराजा, साऱ्या माळानी पाणीपाणी
किती सांगू गं बाई तुला, मेंढ्या, बायाची बाळं तान्ही
कलाकार : फुलाबाई भोंग
गाव : निमगाव केतकी
तालुकाः इंदापूर
जिल्हा : पुणे
जात : फुलमाळी
दिनांक – हे तपशील, ओव्या आणि छायाचित्र ५ ऑक्टोबर १९९९ नोंदवण्यात आले आहेत.
छायाचित्रः हेमा राईरकर, नमिता वाईकर
पोस्टरः श्रेया कात्यायनी