जमलेली गर्दी पाहिलीत तर तुम्हाला वाटेल की सचिन तेंडुलकरची शेवटची कसोटी आहे. तुम्हालाच काय, कुणालाही वाटेल. खेळ सुरू होण्याआधी पाच तास दोन लाखाच्या वर लोक मैदानात जमलेत, तेही पावसाची पिरपिर चालू असताना. पण कुंडलसाठी ही गर्दी नेहमीपेक्षा कमीच. कुंडलला दर वर्षी जंगी सामने भरवले जातात. क्रिकेटचे नाही... कुस्त्यांचे. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणाशी फार थोड्या खेळांची इतकी घट्ट नाळ जुळलीये, खास करून पश्चिम महाराष्ट्रात जास्तच. इतकी, की गेल्या वर्षीच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे अगदी कुंडलच्या कुस्त्याही रहित कराव्या लागल्या होत्या.

“ऐन दुष्काळात तीन लाख लोकांसाठी पाण्याची सोय करायची. तुम्हीच विचार करा,” एक संयोजक सांगतात.

राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये क्रीडा, राजकारण आणि संस्कृतीचा संगम म्हणजे कुस्ती. शहरांमधूनही कुस्ती खेळली जाते, पण पैलवान गावाकडचेच असतात. तेही बहुतांश गरीब कुटुंबांमधले. हिंदू वृत्तपत्रातर्फे अनेक पैलवानांना दिलेल्या भेटींमधून आम्हाला हेच आढळून आलं.

शेती संकटाचा फटका

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रावर असणाऱ्या शेती संकटाचा फटका कुस्तीला बसलेला दिसतो. गेल्या वर्षीचा दुष्काळ आणि या वर्षीच्या सुरुवातीचं पाण्याचं दुर्भिक्ष्य यामुळे परिस्थिती अजूनच बिकट झालीये. “दुष्काळाने आमचा कणाच मोडलाय,” राज्यातल्या कुस्ती क्षेत्रातलं मोठं प्रस्थ असणारे अप्पासाहेब कदम, त्यांच्या कोल्हापुरातल्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रातल्या तालमीत आमच्याशी बोलत होते. “बहुतेक स्थानिक कुस्त्या रद्द कराव्या लागल्या.” जिथे झाल्या तिथे बक्षिसाच्या रकमेत कपात करावी लागली. “किती तरी खेळाडूंनी भागच घेतला नाही, त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या तालमीवर केलेला खर्च पाण्यातच गेला म्हणायचा.” आणि यंदा, अतिरेकी पावसामुळे तीच गत व्हायची वेळ आलीये.

इथल्या छोट्या कुस्त्यांमध्ये विजेत्याला बक्षीस म्हणून अगदी ट्रॅक्टरही दिला जाऊ शकतो. सांगलीतल्या कुंडलच्या जंगी कुस्त्यांचे आयोजक बाळासाहेब लाड आणि अरुणा लाड म्हणतात, “एखादी खाजगी कंपनी खर्च उचलू शकते. पण एकूण जमा होणाऱ्या २५ लाखातले तब्बल १५ लाख साध्या शेतकऱ्याच्या खिशातून येतात. त्यांचीच परिस्थिती बिकट असेल, तर कुस्त्यांना फटका बसणारच.”

चांगल्या आयुष्याचं तिकिट

खेड्यापाड्यातल्या गरिबासाठी कुस्ती म्हणजे दारिद्र्यातून बाहेर यायचा आणि समाजात काही तरी पत मिळवण्याचा मार्ग असतो. “कुस्त्या खेळणारी ९० टक्के पोरं गरीब शेतकरी कुटुंबातली आहेत,” कोल्हापूरमध्ये कदम आम्हाला सांगतात. “आणि बाकीची, भूमीहीन मजुरांची, सुतार आदी कारागिरांची. कुणीच शिकल्या-सवरलेल्या घरातली नाहीत. आणि बघा, कुस्तीचं एक वेडच असतं. या सगळ्यांमधले जास्तीत जास्त पाच टक्के पैलवान खेळात पुढे जातात.”

कदमांच्या तालमीत खोली करून एकत्र राहणाऱ्या, हाताने करून खाणाऱ्या तरुण मुलांकडे पाहिलं की कुस्तीचं वेड काय असतं ते समजून येतं. तालमीत पहाटे ५ वाजता सराव सुरू होतो आणि ८.३० पर्यंत चालतो. त्याच्या आधी, पहाटे ४ वाजता यातले काही जण धावायला जातात. लहानगी पोरं १० ते ५ शाळेत जातात. परतल्यावर अर्ध्या तासात तालमींना सुरुवात होते ती थेट ८.३० वाजेपर्यंत. कडक शिस्तीशिवाय काहीच नाही. “उदयोन्मुख क्रिकेटपटू वर्षातून चार महिने सराव करत असतील. पण पैलवानासाठी दहा वर्षांची तालीमही कमीच.”

आपल्या पोरांना कुस्ती शिकवा म्हणून तालमीत वस्तादांच्या विनवण्या करणारे शेतकरी आणि शेतमजूर नजरेस पडतात. सकाळचे ६ पण वाजलेले नाहीत. कोल्हापूरच्या आपल्या तालमीत ८३ वर्षांचे गणपतराव आंधळकर एका आठ वर्षांच्या पोराला डाव शिकवताना दिसतात. एशियाडमधले सुवर्ण पदक विजेते, ऑलिम्पिकपटू असणारे आंधळकर मोठ्या मुलांच्या तालमीवर करडी नजर ठेवून असतात. आणि तेव्हाच चिल्ल्यापिल्ल्यांना कुस्तीच्या खेळी समजून सांगत असतात. कधी तरी मध्येच ते पैलवानांना मोठ्याने एखादी सूचना देतात, बजावतात. अनेकदा ते सर्वात लहान खेळाडूंबरोबर स्वतःच मातीत उतरतात आणि कुस्त्या खेळणाऱ्यांना तिथल्या तिथे डाव पेच शिकवतात.

आंधळकरांच्या मते “कुस्तीची मुळं शेतीच्या अर्थकारणात फार खोलवर रुजलेली आहेत. पण आज तीच अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. तालमीचं शुल्क अगदीच किरकोळ असतं. महिन्याला १०० – २०० रुपये.” आंधळकरांना राज्यभरात विविध कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून मिळणारं मानधन या फीतून मिळणाऱ्या पैशापेक्षा जास्त असेल. खूपच गरीब असणाऱ्या मुलांकडून ते काहीच घेत नाहीत. “तरीदेखील चांगला खुराक घेण्यासाठी त्यांना किती तरी खर्च करावा लागतोच की.”

शासनाचा तुटपुंजा पाठिंबा

एकाहून एक सरस पैलवान तयार करूनही – आणि कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी मोठमोठे राजकारणी असूनही – कुस्तीच्या वस्तादांना सरकारकडून फारच कमी सहाय्य मिळतं. सबंध पश्चिम महाराष्ट्रातून हीच तक्रार कानी येते, की पंजाब आणि हरयाणा सरकार त्यांच्या पैलवानांची जास्त काळजी घेते.




“खाण्यावर, आहारावर खूप खर्च करावा लागतो,” एशियाड, कॉमनवेल्थ आणि राष्ट्रीय पदक विजेते, सुप्रसिद्ध पैलवान काका पवार त्यांच्या पुण्यातल्या तालमीत आमच्याशी बोलत होते. तरुण पैलवानांना रोज ४०० ग्रॅम बदाम, चार लिटर ताजं दूध, अर्धा किलो तूप, अंडी, फळं, भाज्या असा आहार पाहिजे. आठवड्यातून तीनदा मटण वेगळंच. “म्हणजे बघा, रोजचे ७०० रुपये, लहानांसाठी ५०० रुपये.”

एखाद्या गरीब कुटुंबासाठी हा खर्च फार जास्त आहे. “पण कधी कधी अख्खं गावच मदत करतं.” काही वर्षात एखादा लहागना खेळाडू एका कुस्तीचे रु. २००० जिंकतो तर तरूण पैलवान ५००० रुपयांची कुस्ती मारतो. जसजसा खेळ सुधारेल तसतशी ही रक्कम वाढत जाते. जत्रांमध्ये कित्येक कुस्त्या होतात, त्याला लाखो लोक गोळा होतात. कधी कधी एखाद्या उभरत्या पैलवानाला प्रेक्षकही मदत करतात. आणि काही स्पर्धांमध्ये तर चांगल्या खेळाडूंची रु. २०,००० ते रु. ५०,००० ची कमाई होते, अप्पासाहेब कदम आम्हाला माहिती देतात.

या वर्षी अनेक कुस्त्या रद्द झाल्यामुळे सचिन जामदार आणि योगेश बोंबलेसारख्या युवा खेळाडूंना बक्षीसातून मिळणाऱ्या रकमेवर पाणी सोडावं लागलं. आणि चांगला खेळाडू असणाऱ्या संतोष सुतारला “कोल्हापूरची तालीम सोडून सांगलीला माझ्या घरी आटपाडीला परतावं लागलं.”

मॅटवरच्या कुस्त्यांमुळे खेळच बदलून गेलाय. “भारतीय पैलवान मातीत बनलेत हो, मॅटवर नाही,” थोर कुस्तीपटू आंधळकर सांगतात. शेकडो गावांमध्ये कुस्तीच्या आखाड्यातली माती तयार करणं हे फार जिकिरीचं काम आहे. फार कष्ट लागतात त्याला. मातीत दही, लिंबाचं पाणी, तूप आणि हळद कालवून माती मळली जाते. कुस्त्यांमध्ये पैलवानांना जखमा होतात, त्यावर उपाय म्हणून हळद. (काही ठिकाणी तर मातीला थोडा खिमाही लावला जातो.)

हॉकीचीच गत

नेहमीच्या ४० फूट x ४० फूटच्या मॅटचा खर्च आहे जवळ जवळ ७ लाख. छोट्या छोट्या गावांतल्या तालमींना हा किंवा याहून छोट्या मॅटचा खर्च पेलणं अशक्य आहे. जर सगळ्या कुस्त्या मॅटवर खेळवल्या तर बहुतेक स्थानिक स्पर्धांना आपला गाशा गुंडाळावा लागेल. अॅस्ट्रो-टर्फमुळे हॉकीची जी अवस्था झाली तीच मॅटमुळे कुस्तीची होणार असल्याचं भाकित काही जण वर्तवतात. स्थानिक पातळीवर अॅस्ट्रो-तर्फ परवडत नसल्यामुळे भारत आणि पाकिस्तानची हॉकीवरची पकड ढिली झाली, अगदी तसंच. मॅटवरच्या कुस्त्या झटपट, अगदी दोन तीन मिनिटांत संपतात. पण मातीतल्या कुस्तीत एकेक लढत २०-२५ मिनिटं चालते. “त्यातला फरक नाट्यमय आहे, संस्कृतीशी संबंधित आहे, आर्थिक आहे आणि खेळ म्हणून तर आहेच,” इति आंधळकर.

दरम्यान, आटपाडीमध्ये, जिथे गेल्या हंगामात सगळ्या कुस्त्या रद्द कराव्या लागल्या होत्या, तिथले वस्ताद श्रीरंग बादरे फारसे आशावादी नाहीत. “पाण्याच्या कायमस्वरुपी संकटामुळे प्रत्येक हंगामात लोक शेती सोडून दुसरं काही करताना दिसतायत. शेतीच टिकली नाही, तर कुस्त्या कशा टिकाव्या?”

या लेखाची एक आवृत्ती हिंदूमध्ये प्रकाशित झालीः

http://www.thehindu.com/opinion/columns/ sainath /wrestling-with-the-rural-economy/article5286230.ece

पी. साईनाथ, पीपल्स ऑर्काइव ऑफ़ रूरल इंडिया के संस्थापक संपादक हैं. वह दशकों से ग्रामीण भारत की समस्याओं की रिपोर्टिंग करते रहे हैं और उन्होंने ‘एवरीबडी लव्स अ गुड ड्रॉट’ तथा 'द लास्ट हीरोज़: फ़ुट सोल्ज़र्स ऑफ़ इंडियन फ़्रीडम' नामक किताबें भी लिखी हैं.

की अन्य स्टोरी पी. साईनाथ
Translator : Medha Kale

मेधा काले पुणे में रहती हैं और महिलाओं के स्वास्थ्य से जुड़े मुद्दे पर काम करती रही हैं. वह पारी के लिए मराठी एडिटर के तौर पर काम कर रही हैं.

की अन्य स्टोरी मेधा काले