कारगिलच्या मुख्य बाजारातून फेरफटका मारला तर एक वळणावळणाची अरुंद गल्ली लागते. दोन्ही बाजूला दुकानं. प्रत्येक दुकानाबाहेर रंगीबेरंगी रुमाल आणि ओढण्या फडफडत असतात. आणि आतमध्ये सलवार कमीझचं कापड, गरम कपडे, दागिने, चपला, लहान मुलांचे कपडे आणि किती तरी वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या दिसतात.

हे आहे ‘कमांडर मार्केट’, स्थानिकांच्या मते याचं असं नाव पडण्याचं कारण म्हणजे ही दुकानं ज्या जागेवर उभी आहेत ती जागा एका ‘कमांडर’च्या मालकीची आहे. आणि इथल्या सगळ्या दुकान मालकिणी शिया आहेत.

लडाखच्या सीमेवर जवळच कारगिल वसलंय, मागे हिमालयाच्या पर्वतरांगा. १९४७ मध्ये फाळणीने भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमारेषा तयार केली गेली तोपर्यंत मध्य आशियाच्या रेशीम मार्गावरचं दक्षिणेकडचं हे महत्त्वाचं ठिकाण होतं. या शहराच्या ११,००० लोकसंख्येत (जनगणना २०११) प्रामुख्याने मुस्लिम आहेत, काही बौद्ध आणि थोडीफार शीख कुटुंबं. त्यांच्या अनेक पिढ्यांनी आजतोवर तीन युद्धं पाहिली आहेत, त्यातलं अखेरचं होतं १९९९ सालचं.

कमांडर मार्केटमधलं पहिलं दुकान तीस वर्षांपूर्वी एका बाईने सुरू केलं. तेव्हा या जागेला कमांडर मार्केट हे नाव मिळालं नव्हतं. तिला खूप विरोध झाला आणि वाईट वागणूक सहन करावी लागली, असं सध्याची दुकान मालकीण सांगते आणि त्यामुळेच तिचं नावही सांगायला ती तयार नाही. मात्र कालांतराने त्या पहिल्या दुकान मालकिणीच्या संघर्षापासून प्रेरणा घेऊन इतर दोघीतिघींनी त्याच ठिकाणी भाड्याने जागा घेतल्या. आता या जागेत सुमारे ३० दुकानं आहेत, आणि त्यातली फक्त तीन वगळता सगळी दुकानं बाया चालवतात.

१० वर्षांमागे कारगिलमध्ये सार्वजनिक ठिकाणी क्वचितच कुणी बाई दिसायची. त्या पार्श्वभूमीवर कमांडर मार्केटचं हवं तितकं कौतुक केलं गेलं नाही असंच म्हणावं लागेल. इथल्या तरुण दुकानदारांच्या मते साक्षरतेत वाढ होत असल्यामुळे हा बदल घडून आला आहे (२००१ मध्ये ४२% ते २०११ मध्ये ५६%). दुकान चालवणाऱ्या बायांना मिळालेलं आर्थिक स्वातंत्र्य पाहूनही इतर काही जणी मार्केटमध्ये सामील झाल्या – काहींना कमावणं गरजेचं होतं तर काही त्यांच्या पूर्वजांची प्रेरणा घेऊन आल्या होत्या. त्या म्हणतात, कारगिलने हा बदल आता स्वीकारला आहे.

मी या फोटो निबंधासाठी जेव्हा कमांडर मार्केटला भेट द्यायला गेले तेव्हा काही जणींनी कॅमेऱ्यासमोर यायचं टाळलं, काहींना त्यांचा फोटो छापला जाईल याबाबत चिंता होती आणि काही जणींना त्यांचं पूर्ण नाव सांगायचं नव्हतं. पण बहुतेक जणींनी आनंदाने आणि अभिमानाने त्यांची कहाणी मला सांगितली.

PHOTO • Stanzin Saldon

रमझानच्या महिन्यात गजबजलेलं कमांडर मार्केट

PHOTO • Stanzin Saldon

अबिदा खानम (उजवीकडे), वय २८: मी स्वतः ठरवून दूरस्थ शिक्षणाद्वारे पदवी घेण्याचा निर्णय घेतला कारण मला आर्थिकदृष्ट्या माझ्या पायावर उभं रहायचंय. हे माझ्या मावशीचं आहे. शाहिदा आणि मी तिला मदत करतो. मला मावशी महिन्याला ७-८००० पगार देते. एकत्र काम करायला मज्जा येते आम्हाला.

PHOTO • Stanzin Saldon

“आम्ही जम्मू आणि श्रीनगर, लुधियाना आणि दिल्लीला जाऊन माल घेऊन येतो,” अबिदा खानम सांगते. ती म्हणते हिवाळ्यात जेव्हा पर्यटकांची गर्दी नसते तेव्हा सगळ्या जणी खरेदी करून येतात, कारगिलच्या गोठवणाऱ्या थंडापीसून तेवढीच सुटका मिळते. त्यांनी मागवलेला माल मे महिन्यात श्रीनगर-लेह राजमार्ग सुरू झाला की घरपोच येतो. नवा माल येईपर्यंत त्यांच्याकडे आदल्या वर्षाचा पुरेसा साठा असतो.

PHOTO • Stanzin Saldon

हे दुकान आता मन्सूर चालवतो. २० वर्षापूर्वी त्याच्या आईने ते सुरू केलं. “या मार्केटमधल्या मोजक्या पुरुषांपैकी मी एक आहे याचा अभिमान आहे मला,” तो म्हणतो, “माझ्या आई-वडलांचं आता वय झालंय, घर चालवायला मीसुद्धा काही हातभार लावू शकतोय याचा मला आनंद आहे.”

PHOTO • Stanzin Saldon

सारा (डावीकडे), वय ३२, व्यावसायिक म्हणून नवं आयुष्य सुरू करण्यास उत्सुक आहे. तिच्या धाकट्या बहिणीबरोबर ती तिचं दुकान सुरू करणार आहे. “इस्लाममध्ये स्त्रियांना कमी किंवा दुय्यम लेखलं आहे हे कणही खरं नाहीये,” ती म्हणते. “माझं कुटुंब पूर्णपणे माझ्या पाठीशी आहे आणि माझ्या धर्मातल्या आदर्श आणि कणखर स्त्रिया मला स्वतःसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अर्थार्जन करण्याची कायम प्रेरणा देतात.”

PHOTO • Stanzin Saldon

बानो, कॅमेऱ्याला बिचकत म्हणाली, “मला इतकं थकायला झालंय, इफ्तार कधी होतोय आणि कधी मी उपास सोडतीये असं झालंय.”

PHOTO • Stanzin Saldon

“हे आहे लोकरीचं ‘इन्फिनिटी लूप’, हे असं गळ्यात घालतात [गळ्यात लोकरीचा रुमाल कसा घालायचा ते दाखवत]. हे सध्या एकदमच जोरात आहे. कारगिलमध्ये येणाऱ्या परदेशी पर्यटकांमध्ये याची जास्त चलती आहे,” ३८ वर्षांच्या हाजी अख्तर सांगतात. “मी काही गावातल्या बायांचे स्व-मदत गट केलेत. त्यांनी तयार केलेल्या वस्तू, जसं हा रुमाल, मी माझ्या दुकानात आणि कारगिलमधल्या काही हॉटेल्समध्ये विकते. तेवढाच त्यांना हातभार. धंदा जोरात आहे, खास करून उन्हाळ्यात, मला महिन्याला ४०,००० किंवा कधी कधी तर त्याहून जास्त कमाई होते.”

PHOTO • Stanzin Saldon

कनीझ फातिमा, वय २५, तिच्या आईला मदत करते. २० वर्षांपूर्वी इथे दुकानं सुरू केलेल्या पहिल्या काही जणींपैकी त्या एक.

PHOTO • Stanzin Saldon

फातिमा गेल्या सहा वर्षांपासून हे दुकान चालवतायत. शेजारी बसलेले त्यांचे पती, मोहम्मद इसा, यांनी छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं. “ते अजूनही माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे आहेत, आपल्या पत्नीचा अभिमान आहे त्यांना,” फातिमा सांगतात. “ते माझा सगळ्यात मोठा आधार आणि प्रेरणा आहेत.”

PHOTO • Stanzin Saldon

“आचे (ताई), तू आमचे पण फोटो का काढत नाहीस?” दुकानात खरेदी करायला आलेली काही तरुण मुलं मला विचारतात.

Stanzin Saldon

स्टैंज़िन सैल्डॉन, लेह (लद्दाख) की रहने वाली हैं और साल 2017 की पारी फ़ेलो हैं. वह पिरामल फ़ाउंडेशन फ़ॉर एजुकेशन लीडरशिप के स्टेट एजुकेशनल ट्रांस्फ़ॉर्मेशन प्रोजेक्ट की क्वालिटी इंप्रूवमेंट मैनेजर हैं. वह अमेरिकन इंडिया फ़ाउंडेशन की डब्ल्यूजे क्लिंटन फ़ेलो (2015-16) रह चुकी हैं.

की अन्य स्टोरी Stanzin Saldon
Translator : Medha Kale

मेधा काले पुणे में रहती हैं और महिलाओं के स्वास्थ्य से जुड़े मुद्दे पर काम करती रही हैं. वह पारी के लिए मराठी एडिटर के तौर पर काम कर रही हैं.

की अन्य स्टोरी मेधा काले