बंगळुरूच्या रस्त्यांवर लॉलिपॉपच्या आकाराच्या, गोल गोल फिरणाऱ्या भिरभिऱ्यांचा टरटर आवाज आला की समजावं खेळणीवाले आले. आणि मग आसपासच्या सगळ्या लेकरांना हे खेळणं हवं म्हणजे हवंच. शहराच्या कित्येक गल्लीबोळात, सिग्नलवर ही आवाज करणारी खेळणी विकणारे खेळणीवाले पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधले. इथून २,००० किलोमीटरवरचे. “आमची खेळणी इतकी दूर पोचतात याचाच आम्हाला फार आनंद आहे,” एक खेळणी निर्माता अगदी अभिमानाने सांगतो. “आम्हाला लाख वाटतं, पण आम्ही नाही जाऊ शकत...पण आमची खेळणी जातात ना...चांगलं मानलं जातं ते.”
मुर्शिदाबादच्या हरिहरपारा तालुक्यात रामपारा गावातले पुरुष आणि बाया काटक्येटी बनवतात (बंगाली भाषेत याला कोटकोटी म्हणतात). गावातल्या भाताच्या खाचरातली माती आणि पलिकडच्या गावातल्या बांबूच्या बारीक कामट्या वापरून काटक्येटी बनवतात, रामपारामध्ये आपल्या घरी खेळणी बनवणारे तपन कुमार दास सांगतात. ते नाही तर त्यांचं अख्खं कुटुंबच खेळणी बनवतं. या दोन गोष्टींसोबत रंग, तारा, रंगीत कागदही खेळण्यांमध्ये वापरले जातात. आणि, जुन्या चित्रफिती! “जुन्या फिल्मच्या दोन तुकड्यांचे एकेक इंचाचे तुकडे या फटीत [बांबूच्या कामटीत] घातले जातात. चार तुकडे झाले,” दास म्हणतात. त्यांनी काही वर्षांपूर्वी कोलकात्याच्या बड़बाझारहून जुन्या फिल्मची रिळं विकत घेतली आहेत. या चार तुकड्यांमुळेच काटक्येटीचा आवाज येतो आणि ते गोल गोल फिरतं.
“आम्ही खेळणी आणतो आणि विकतो...त्यावर [फिल्मच्या तुकड्यांवर] सिनेमा कोणता ते काही आम्ही पाहत नाही,” एक खेळणी विक्रेता सांगतो. या फिल्मच्या तुकड्यांमध्ये कैद झालेल्या सुप्रसिद्ध नटनट्या ना खेळणी विकणाऱ्यांनी पाहिलेत, ना ती विकत घेणाऱ्यांनी. “हे रणजित कुमार आहेत, आमच्याकडचे, बंगालचे,” आणखी एक काटक्येटी विक्रेता खेळणं दाखवत सांगतो. “इतरही नट पाहिलेत मी. प्रसेनजित, उत्तम कुमार, रितुपर्णा, शताब्दी रॉय...किती तर सिनेमा कलाकार आहेत या खेळण्यांमध्ये.”
या खेळणी विक्रेत्यांमधले अनेक जण शेतमजूर आहेत. आणि ही खेळणी त्यांच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. गावी शेतातल्या मजुरीतले कष्ट आणि अगदी फुटकळ मजुरीपेक्षा ही खेळणी विकण्याचं काम त्यांना जास्त पसंद आहे. ते बंगळुरूसारख्या शहरात येतात आणि अनेक महिने इथे मुक्काम करतात. रोज ८-१० तास पायी फिरत आपली खेळणी विकतात. २०२० साली कोविड-१९ ची महासाथ आली आणि त्यांच्या धंद्याला जबर फटका बसला. टाळेबंदी लागली आणि या खेळण्यांचं उत्पादन थांबलं कारण सगळ्या मालाची ने-आण रेल्वेनेच केली जाते. अनेक खेळणी विक्रेत्यांना घरी परतावं लागलं.
कलाकारः काटक्येटी तयार करणारे आणि विकणारे कारागीर
दिग्दर्शन, छायाचित्रण आणि ध्वनीमुद्रणः यशस्विनी रघुनंदन
संकलन आणि ध्वनीरेखनः आरती पार्थसारथी
२०१९ साली या फिल्मची एक आवृत्ती 'द क्लाउड नेव्हर लेफ्ट' रॉटरडॅम, कासेल, शारजा, पेसॅरो आणि मुंबई इथल्या अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आली असून ही फिल्म अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आली आहे. फ्रान्समधील फिलाफ फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्ड फिलाफ या पुरस्काराचा यात विशेष उल्लेख करायला हवा.
अनुवादः मेधा काळे