जलाल अली माशांसाठी जाळ्या बनवायला शिकले. कारण? पोटातली भूक.
जलाल अली रोजंदारीवर काम करून पोट भरायचे. पावसाळ्यात कामंच नसायची. “पावसाळ्यात भातलावणीचं काम असायचं काही दिवस. ते सोडलं तर दुसरं कुठलंच काम नसायचं,” ते सांगतात.
पण पावसाळ्यात ते राहात त्या दरांग जिल्ह्यातल्या मौसिता-बालाबारी मधल्या दलदलींमध्ये, ओढे-नाल्यांमध्ये माशांची ही गर्दी व्हायला लागायची. आणि मग ते धरण्यासाठी बांबूच्या जाळ्या आणि सापळ्यांना मोठी मागणी असायची. “मी या जाळ्या बनवायला शिकलो कारण त्यातून घरच्यांचं पोट भरता येणार होतं. भूक असते ना पोटात तेव्हा तुम्ही लवकरात लवकर चार घास कसे मिळवता येतील याचाच विचार करता,” ६० वर्षीय जलाल हसत हसत सांगतात.
आज सेप्पा, बोस्ना आणि बैर या नावांनी ओळखले जाणारे मासे धरायचे बांबूचे सापळे तयार करणारे एक निष्णात कारागीर म्हणून जलाल प्रसिद्ध आहेत. आसाममधल्या मौसिता-बालाबारी या पाणथळ परिसराजवळच्या आपल्या पुब-पोडोखात या गावी घरीच ते या वस्तू तयार करतात.
“अगदी वीस वर्षांपूर्वीपर्यंत माझ्या आणि आसपासच्या गावातले लोक मासे धरण्यासाठी बांबूच्या जाळ्या आणि सापळेच वापरत होते. बांबूची जाळी किंवा मद शिव जाल.” गावात याला टोंगी जाल किंवा झेटका जाल असंही म्हणतात. चौकोनी आकाराच्या जाळ्याची चार टोकं बांबूच्या काठ्यांना किंवा दोऱ्यांना बांधून हे जाळं तयार केलं जातं.
या सापळ्यांची नावं त्यांच्या आकारावरून पडली आहेत. “सेप्पा एखाद्या ढोलासारखा अंडाकृती असतो. बैर पण तसाच पण उंची आणि रुंदीला जास्त मोठा असतो. दरकी एखाद्या पेटीसारखा,” जलाल सांगतात. दुयेर, दियार आणि बोइष्नो ही जाळी वाहत्या पाण्यात लावतात. पाणी भरलेली भाताची, तागाची खाचरं, दलदलीकडे जाणारे ओढे आणि नद्यांच्या मुखापाशी ही जाळी लावून मासे धरतात.














