तिशीतला गणेश पंडित हा नवी दिल्लीतल्या लोहा पूल या जुन्या यमुना पूलाजवळच्या भागातला सर्वात तरुण व्यक्ती असेल कदाचित. त्याच्या समाजातले इतर तरुण जवळच्या चांदनी चौक भागातल्या पोहण्याचे प्रशिक्षक म्हणून किंवा दुकानांमध्ये नोकरी करण्याला प्राधान्य देतात असं त्याने सांगितलं.
दिल्लीतून वाहणारी यमुना नदी ही गंगेची सर्वात जास्त लांबीची उपनदी आहे आणि आकारमानाच्या बाबतीत दुसरी सर्वात मोठी (घाघरा प्रथम क्रमांकावर आहे) उपनदी आहे.
पंडित यमुनेवर छायाचित्र काढून देण्याची व्यवस्था करतो तसंच ज्यांना यमुनेच्या पात्रात जाऊन काही धार्मिक विधी करायचे आहेत त्यांना नावेतून यमुनेच्या पात्रात घेऊन जातो आणि परत सोडतो. तो म्हणतो, “जिथं विज्ञान अपयशी ठरतं तिथं विश्वास कामी येतो.” त्याचे वडील तिथले पुजारी आहेत. तो आणि त्याचे दोन्ही भाऊ लहान असतानाच यमुनेत पोहायला शिकले. गणेशचे भाऊ फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जीवरक्षक म्हणून काम करतात.
गणेश सांगतो, “लोकांना आपल्या मुलीचं लग्न नावाड्यासोबत लावून द्यायचं नाहीये; कारण या व्यवसायाला मान नाही. कमाईही फारशी नाही. मी नावेतून लोकांची ने-आण करुन दिवसाला ३०० ते ५०० रुपये कमावतो. नदीत छायाचित्रण किंवा चित्रीकरण करण्यासाठी मदत केली तर मला बऱ्यापैकी पैसे मिळतात.”
दहा वर्ष झाली तो हे काम करतोय. नदीचं पाणी प्रदूषित होतंय आणि त्याची त्याला हळहळ वाटते. “सप्टेंबर महिन्यात पावसामुळे नदीतला कचरा वाहून नेला जातो. तेव्हा वर्षातून फक्त एकदाच नदीची स्वच्छता होते,” त्यानं सांगितलं.
देशाच्या राजधानीतून म्हणजेच दिल्लीतून वाहणाऱ्या यमुनेचं पात्र केवळ २२ किलोमीटर लांब आहे. म्हणजे एकूण लांबीच्या केवळ १.६७ टक्के. पण एकूण १३७६ किलोमीटर लांबीच्या या नदीत टाकल्या जाणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी दिल्लीत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण मात्र ८० टक्के आहे. वाचा – जेव्हा यमुनेतले ‘मेलेले मासे जरासे ताजे असतील’