“आम्हाला दोनच कामं येतात – नाव वल्हवायची आणि मासे धरायचे. पिढ्यान् पिढ्या. आणि सध्याची रोजगाराची स्थिती पाहता माझ्या पोरांनाही हेच काम पुढे चालू ठेवावं लागणार असं वाटायला लागलंय,” विक्रमादित्य निषाद सांगतात. गेली २० वर्षं ते भाविक आणि पर्यटकांना गंगेच्या या घाटावरून त्या घाटावर नावांमधून फिरवून आणतायत.
ज्या उत्तर प्रदेशात गंगा नदी तब्बल १००० किलोमीटर अंतर वाहत जाते तिथे रोजगार मात्र गेली पाच वर्षं ५० टक्क्यांवरून तसूभरही पुढे गेलेला नाही असं २०२४ चा भारतातील रोजगार अहवाल सांगतो.
“मोदी जी ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘विरासत ही विकास’ हा नारा देतात. ही विरासत म्हणजे नक्की कोण आहे ते जरा मला सांगा बरं. आम्ही काशीचे लोक का कुणी बाहेरचे?” ते विचारतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून खासदार म्हणून निवडून आले आहेत. पण त्यांचा निवडणूक प्रचार फार कुणाला आवडला नव्हता असं नावाडी असलेले निषाद म्हणतात. “आता आम्हाला खरंच विकास पहायचाय.”






