नावः वजेसिंग पारगी. जन्मः १९६३. गावः इटावा. जिल्हाः दाहोद, गुजरात. पंचमहाली भिल आदिवासी. कुटुंबातील सदस्यः वडील चिस्का भाई, आई चतुरा बेन. पाच भावंडांमधले वजेसिंग सगळ्यात थोरले. कुटुंबाचा व्यवसायः शेतजमुरी

एका गरीब आदिवासी कुटुंबात जन्माला आल्यावर वारशाने काय मिळालं? वजेसिंग यांच्या स्वतःच्या शब्दात, ‘आईच्या पोटातला अंधार.’ ‘ वाळवंटाइतकं अथांग एकटेपण’. ‘विहीरभर घाम.’ आणि ‘भूक’, ‘दुःखाची निळाई’ आणि ‘काजव्यांचा उजेड’. शब्दांवरची मायाही जन्मतःच मिळालेली.

कधी तरी, त्यांच्या तरुणपणी कुठलं तरी भांडण लागलं होतं, आणि त्यांच्या नकळत बंदुकीची गोळी त्यांचा जबडा आणि मानेतून पार झाली. जखम झाली त्यात त्यांच्या आवाजावर परिणाम झाला. सात वर्षं उपचार, १४ वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आणि कर्जाचा डोंगर झाल्यानंतरही ते त्यातून पूर्ण बरे झालेच नाहीत. मुखर नसलेल्या एका समाजात जन्माला आलेल्या या तरुणाकडे स्वतःचा आवाज होता पण तोही क्षीण झाला. पण त्यांची नजर मात्र अगदी तीक्ष्ण राहिली, कायम. गुजराती साहित्यातली सर्वात उत्तम मुद्रितशोधन करणारी व्यक्ती म्हणजे वजेसिंग पारगी. त्यांच्या स्वतःच्या लिखाणाला मात्र आवश्यक ती थाप मिळाली नाही.

पंचमहाली भिली भाषेत आणि गुजराती लिपीमध्ये लिहिलेल्या या कवितेत त्यांच्या मनातलं द्वंद्व ते मांडतात.

पंचमहाली भिली भाषेतील कविता प्रतिष्ठा पंड्यांच्या आवाजात ऐका

पंचमहाली भिली भाषेतील कवितेचा इंग्रजी अनुवाद प्रतिष्ठा पांड्यांच्या आवाजात

મરવું હમુન ગમતું નથ

ખાહડા જેતરું પેટ ભરતાં ભરતાં
ડુંગોર ઘહાઈ ગ્યા
કોતેડાં હુકાઈ ગ્યાં
વગડો થાઈ ગ્યો પાદોર
હૂંકળવાના અન કરહાટવાના દંન
ઊડી ગ્યા ઊંસે વાદળાંમાં
અન વાંહળીમાં ફૂંકવા જેતરી
રઈં નીં ફોહબાંમાં હવા
તેર મેલ્યું હમુઈ ગામ
અન લીદો દેહવટો

પારકા દેહમાં
ગંડિયાં શેરમાં
કોઈ નીં હમારું બેલી
શેરમાં તો ર્‌યાં હમું વહવાયાં

હમું કાંક ગાડી નીં દીઈં શેરમાં
વગડાવ મૂળિયાં
એવી સમકમાં શેરના લોકુએ
હમારી હારું રેવા નીં દીદી
પૉગ મેલવા જેતરી ભૂંય

કસકડાના ઓડામાં
હિયાળે ઠૂંઠવાતા ર્‌યા
ઉનાળે હમહમતા ર્‌યા
સુમાહે લદબદતા ર્‌યા
પણ મળ્યો નીં હમુન
હમારા બાંદેલા બંગલામાં આસરો

નાકાં પર
ઘેટાં-બૉકડાંની જેમ બોલાય
હમારી બોલી
અન વેસાઈં હમું થોડાંક દામમાં

વાંહા પાસળ મરાતો
મામાનો લંગોટિયાનો તાનો
સટકાવે વીંસુની જીમ
અન સડે સૂટલીઈં ઝાળ

રોજના રોજ હડહડ થાવા કરતાં
હમહમીને સમો કાડવા કરતાં
થાય કી
સોડી દીઈં આ નરક
અન મેલી દીઈં પાસા
ગામના ખોળે માથું
પણ હમુન ડહી લેવા
ગામમાં ફૂંફાડા મારે સે
ભૂખમરાનો ભોરિંગ
અન
મરવું હમુન ગમતું નથ.

मरावंसं नाही वाटत, खरंच

डोंगर कोसळले,
नद्या कोरड्या पडल्या
गावांनी घेतला जंगलांचा घास
डरकाळ्यांचे, आरोळ्यांचे
दिवस सरले, वाऱ्यावर विरून गेले.
बासरी वाजवण्याइतकाही उरला नाही श्वास
माझ्या फुफ्फुसात
आणि खपाटीला गेलं रिकामं पोट
तेव्हा मी गाव सोडलं
आणि गेलो वनवासात...

परक्या भूमीत,
वेड्या शहरात,
जिथे कुणालाच नव्हती फिकीर
आमची, हीन, खालच्या लोकांची.

आमची मुळं रुजवू की काय
तिथल्या भूमीत, म्हणून
शहरातल्या लोकांनी दिलीच नाही जागा
इंचभरही,
अगदी दोन पावलांइतकीही.

प्लास्टिकच्या कागदी भिंतीत राहिलो
थंडीत काकडलो
उन्हाळ्यात घामाने थबथबलो
पावसात भिजून थिजून गेलो.
जे बंगले बांधले
तिथेही निवारा मिळालाच नाही.

चौकातल्या अड्ड्यावर
विकले आमचे श्रम
जनावरांसारखे
आम्ही कवडीमोल विकलो गेलो.

आजही विंचवाच्या नांगीसारखे
पाठीला डंख करतायत त्यांचे शब्द
‘मामा’ आणि ‘लंगोटिया’
तो विखार भिनतो माझ्या शिरात.

वाटतं सोडावा हा नरक
हा रोजचा अवमान
आणि गुदमरायला होईल असं जिणं.
वाटतं गावी परतावं,
त्या भूमीच्या कुशीत डोकं ठेवावं.
पण तिथेही फणा उगारून
उभा आहे भुकेचा साप
तयार घ्यायला आमचा घास.
आणि मला
मरावंसं वाटत नाही, खरंच.

पंचमहाली भिलीतून इंग्रजीत अनुवादः प्रतिष्ठा पांड्या

वजेसिंग पारगी यांना फुफ्फुसाचा कर्करोग  झाला आहे. आजार जास्त बळावल्याने त्यांच्यावर दाहोदच्या कायझर मेडिकल नर्सिंग होममध्ये उपचार सुरू आहेत.

Vajesinh Pargi

Based in Dahod, Gujarat, Vajesingh Pargi is a poet writing in Panchamahali Bhili and Gujarati. He has published two collections of his poems titled "Zakal naa moti" and "Aagiyanun ajawalun." He worked as a proof-reader with the Navajivan Press for more than a decade.

Other stories by Vajesinh Pargi
Illustration : Labani Jangi

Labani Jangi is a 2020 PARI Fellow, and a self-taught painter based in West Bengal's Nadia district. She is working towards a PhD on labour migrations at the Centre for Studies in Social Sciences, Kolkata.

Other stories by Labani Jangi